साहित्य अकादमी पुरस्कार 2020

  • साहित्य अकादमी पुरस्कार  2020

    साहित्य अकादमी पुरस्कार 2020

    • 06 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 1939 Views
    • 2 Shares

     साहित्य अकादमी पुरस्कार  2020

              12 मार्च 2021 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍या 24 भाषांतील साहित्यिकांना जाहीर केला (साहित्य अकादमीच्या स्थापना दिनी ) गेले. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणार्‍या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. 1 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
     
    2009 सालापासून पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये करण्यात आली. 1955 साली पहिल्या पुरस्काराच्यावेळी ती 5 हजार रुपये होती.

    24 भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो -
    (अ) भारतीय संविधानातील 22 भाषा -
    1) आसामी
    2) बंगाली
    3) बोडो
    4) डोग्री
    5) गुजराती
    6) हिंदी
    7) कन्नड
    8) काश्मिरी
    9) कोंकणी 
    10) मैथिली
    11) मल्याळी 
    12) मणिपुरी
    13) मराठी
    14) नेपाळी
    15) ओरिया 
    16) पंजाबी
    17) संस्कृत
    18) संथाळी 
    19) सिंधी 
    20) तमिळ
    21) तेलुगू
    22) उर्दू

    (ब) भारतीय संविधानात नमूद नसलेल्या 2 भाषा -
            संविधानातील 22 भाषांव्यतिरिक्त पुढील 2 भाषातील साहित्यकृतींना हा पुरस्कार दिला जातो-
    1) इंग्रजी 
    2) राजस्थानी

    साहित्य अकादमी -
    1) 12 मार्च 1954 रोजी नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली. ही केंद्र शासनाच्या अखत्यारीखालील स्वायत्त स्वरूपाची संस्था असून तिला भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे पूर्णतः आर्थिक अनुदान दिले जाते. ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था आहे. 
     
    2) 1956 मध्ये साहित्यसंस्था म्हणून तिची अधिकृत नोंदणी झाली. भूतपूर्व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. 

    साहित्य अकादमीचे उद्दिष्ट व प्रमुख कार्यक्षेत्र -
     
    1) या अकादमीचे प्रमुख कार्य भारतातील साहित्यविषयक पूर्वसंचिताचे जतन करून, नवीन स्वतंत्र तसेच अनुवादित वाङ्मयाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, हे आहे. भारतीय भाषांचे इतिहास प्रकाशित करून भारतातील प्रमुख भाषांच्या विकासाला उत्तेजन देणे व त्यांना जास्तीत जास्त परस्परांच्या सान्निध्यात आणणे, हे उद्दिष्ट अकादमीने साध्य केले आहे. 
     
    2) अकादमी विविध प्रादेशिक भाषांतील लेखकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व मानचिन्हे देऊन गौरवीत असते. 
     
    3) प्रकाशने, अनुवाद, परिसंवाद, कार्यशाळा, देशाच्या विविध भागांत साहित्यमेळाव्यांचे आयोजन, लेखकांच्या वाचकांशी भेटी घडवून आणणे, असे नानाविध प्रकारचे उपक्रम राबवून त्यांद्वारे भारतीय साहित्याच्या अभिवृद्घीस व विकासास चालना देणे, हे या संस्थेचे उद्दिष्टानुसार प्रमुख कार्यक्षेत्र आहे. 
     
    4) भारतीय भाषांतील समकालीन वाङ्मयाची सूची तयार करणे, समकालीन लेखकांच्या उत्कृष्ट व निवडक साहित्यकृतींचे संग्रह प्रकाशित करणे, आधुनिक भारतीय भाषांतील वाङ्मयाचा इतिहास व विकास यांचा विस्तृत आढावा घेणारे प्रमाणभूत ग्रंथ इंग्रजी व हिंदी भाषांत तयार करून घेऊन ते प्रकाशित करणे, प्राचीन संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांच्या सटीप आवृत्त्या प्रसिद्घ करणे इ. अनेक योजना व उपक्रम अकादमीने आजपावेतो राबविले आहेत.
     
    5) साहित्य अकादमीने भारतातील प्रादेशिक भाषांमधील प्रसिद्घ पुस्तकांचे इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची व विविध भारतीय भाषांचे इतिहास प्रसिद्घ करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. ‘’आपल्या देशातील विविध भाषांचा परिचय सर्वांना असणे शक्य नाही; परंतु भारतातील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या भाषेतील ज्ञानाबरोबरच इतर भाषांतील साहित्याची माहिती करून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे. इतर भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचा, तसेच प्रसिद्घ पुस्तकांचा परिचय करून घेतला पाहिजे व या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृतीचा विशाल व उदार दृष्टिकोण आणि बहुभाषिक प्रेरणा वृद्घिंगत केली पाहिजे”- पं. नेहरुंच्या या उद्गारांमध्ये साहित्य अकादमीच्या कार्याची उद्दिष्टे नेमकेपणाने प्रतिबिंबित झाली आहेत. 

    कार्यप्रणाली व पद्घती -
     
    1) अकादमीने एकूण 24  प्रादेशिक भारतीय भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्या प्रत्येक प्रादेशिक भाषेतील एकूण 10 सदस्यांचे सल्लागार मंडळ अकादमीमार्फत स्थापले जाते व त्या त्या प्रादेशिक भाषेतील अकादमीकृत कार्याचे आयोजन व सुसूत्रीकरण या सल्लागार मंडळामार्फत केले जाते. संबंधित भाषेतील वेगवेगळे उपक्रम, पुरस्कार, अनुवादयोजना राबविण्यासाठी ग्रंथनिवड इ. अनेक बाबतींत हे सल्लागार मंडळ अकादेमीला सल्ला देत असते व त्यानुसार अकादमी कार्यवाही करते. 
    2) पूर्व, पश्रि्चम, उत्तर व दक्षिण ह्या 4 प्रादेशिक विभागांसाठी वेगवेगळी 4 प्रादेशिक विभागीय कार्यालये अकादमीने स्थापन केली आहेत व त्या त्या प्रादेशिक विभागांतील भाषांमध्ये परस्पर आदान-प्रदान घडवून आणणे, हे या विभागीय कार्यालयांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 
    3) नवी दिल्ली येथे अकादमीचे मुख्य मध्यवर्ती कार्यालय असून कोलकाता, मुंबई, बंगलोर व चेन्नई येथे प्रादेशिक विभागीय कार्यालये आहेत. 
    4) साहित्य अकादमीचे 4 भाषांतर विभाग असून ते बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद व कोलकाता येथे आहेत. 
    5) बडोदे येथे अकादमीचे प्रकल्प कार्यालय असून तेथे मौखिक तसेच आदिवासी साहित्याचे जतन व विकासाचे कार्य चालते. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिलेखागारही तेथे आहे. 
    6) नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालय, बंगलोर व कोलकाता येथील विभागीय कार्यालयांत बहुभाषिक ग्रंथांचा विपुल, प्रचंड व मौलिक साठा असलेली वैशिष्ट्यपूर्ण व समृद्घ ग्रंथालये आहेत. 24 प्रादेशिक भाषांतील 1.50 लाख ग्रंथ हे या संग्रहालयाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.

    साहित्य अकादमीचे पुरस्कार व बहुमान -
     
    1) पुरस्कार - साहित्य अकादमी प्रतिवर्षी मान्यताप्राप्त 24 प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्यकृतींसाठी 24 पुरस्कार व अनुवादित ग्रंथांसाठी 24 पुरस्कार देत असते. इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठीही पुरस्कार आहेत. 
    1) साहित्य अकादमी पुरस्कार (1955 पासून) - ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा देशातील दोन क्रमांकाचा साहित्य पुरस्कार.  स्वतंत्र साहित्यकृतीसाठी रु. 1 लाख आणि मानचिन्ह. 1955 पासून साहित्य अकादमीने सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. त्या योजनेतील पहिला मराठी पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ’वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला लाभला. 
    2) साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार (1989 पासून) - अनुवादित साहित्यकृतीसाठी रु. 50 हजार आणि मानचिन्ह.
    3) भाषा सन्मान (1996 पासून) - हा पुरस्कार प्रादेशिक भाषांच्या विकासकार्यार्थ दिला जातो. बिगर मान्यताप्राप्त भाषांच्या विकासासाठी योगदान देणार्‍यांचा बहुमान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
    4) साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार (2001 पासून) - यासाठी बालसाहित्यिकाची, पुरस्कार दिल्या जाणार्‍या वर्षाच्या अगोदर 5 वर्षापर्यंतची प्रकाशित पहिली साहित्यकृती विचारात घेतली जाते.
    5) साहित्य अकादमी युवा पुरस्कार (2001 पासून) - 35 वर्षाखालील युवा लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.

    2) साहित्यातील मौलिक योगदानाबद्दल साहित्यिकांना विशेष गौरववृत्ती दिली जाते. 

    3) 2004 साली साहित्य अकादमीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केलेल्या पहिल्या विशेष जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रेष्ठ दलित कवी नामदेव ढसाळ हे ठरले. 

    4) दक्षिण आशियाई भाषांतील विद्वानांना ‘आनंद कुमारस्वामी’ पुरस्कार देण्यात येतो.

    5) भारतीय साहित्याच्या संदर्भात विशेष मौलिक कार्य करणार्‍या परकीय विद्वानांना सन्मान्य गौरववृत्ती दिली जाते.

    साहित्य अकादमीची प्रकाशने -
     
    1) साहित्य अकादमी 24 प्रादेशिक भाषांत व इंग्रजी भाषेतही पुस्तके प्रकाशित करते. ह्या योजनेतर्गत भारतीय भाषांतील पारितोषिकप्राप्त पुस्तकांचे अनुवाद, भारतीय साहित्यातील सर्व प्रादेशिक भाषांतील श्रेष्ठ आणि युगप्रवर्तक साहित्यिकांवर, त्यांचे जीवन व वाङ्मयीन कार्य ह्यांचा परिचय करून देणार्‍या व्याप्तिलेखवजा प्रबंधिका, भारतीय प्रादेशिक भाषांचे वाङ्मयेतिहास, भारतीय तसेच विश्वसाहित्यातील श्रेष्ठ, अभिजात साहित्यकृतींची प्रादेशिक भाषांत भाषांतरे, निवडक ललित साहित्यकृतींची (उदा. कथा, कविता, निबंध इ.) संकलने, चरित्रे, भारतीय साहित्यिकांचे अल्पपरिचयात्मक कोश, अनुवाद-सूची, भारतीय साहित्यकोश इ. विविध प्रकारची पुस्तके अकादमीने प्रकाशित केली आहेत. अकादमीने गेल्या पाच सहस्रकांच्या कालावधीतील उत्कृष्ट निवडक भारतीय साहित्यकृतींचे संकलन एकूण दहा खंडांत प्रकाशित केले आहे. 
     
    2) भारताच्या वेगवेगळ्या भागांतील आदिवासींच्या साहित्याचे भाषांतर व प्रकाशन हा अकादमीने हाती घेतलेला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. बडोदे येथील अकादमीच्या कार्यालयात तो कार्यान्वित करण्यात आला आहे. ह्या प्रकल्पांतर्गत 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 
     
    3) अकादमीने नॅशनल बुक ट्रस्ट च्या सहकार्याने एक संयुक्त प्रकल्प राबविला असून त्याअंतर्गत 100 भारतीय अभिजात साहित्यकृतींच्या भाषांतराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. 

    साहित्य अकादमीची महत्त्वाची प्रकाशने -
     
    1) एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर (पाच खंड, 1987- 92) हा भारतीय साहित्यकोश
    2) नॅशनल बिब्लीऑग्रफी ऑफ इंडियन लिटरेचर ( चार खंड 1901-53) ही राष्ट्रीय ग्रंथसूची
    3) निरनिराळ्या प्रादेशिक भाषांतील विद्यमान लेखकांचा अल्पपरिचय करून देणारा हूज हू ऑफ इंडियन रायटर्स (दोन खंड, 1999)
    4) डॉ. सुकुमार सेनकृत हिस्टरी ऑफ बेंगॉली लिटरेचर (1960) 

    साहित्य अकादमीतर्फे तीन नियतकालिके प्रकाशित केली जातात -
     
    1) इंडियन लिटरेचर (इंग्रजी भाषेतील द्वैमासिक) 
    2) समकालीन भारतीय साहित्य (हिंदी भाषेतील द्वैमासिक) 
    3) संस्कृत प्रतिभा (संस्कृत भाषेतील अर्धवार्षिक) 

    साहित्य अकादमीतर्फे पुढील कार्यक्रममालिका योजिल्या जातात-
    वाङ्मयेतिहास, सौंदर्यशास्त्र तसेच विविध वाङ्मयीन विषयांवर अकादमीमार्फत प्रतिवर्षी सुमारे 30 चर्चासत्रे प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरही आयोजित केली जातात - ’मीट द ऑथर’, ’कविसंधी’, ’कथासंधी’,’अस्मिता’, ’मुलाकात’, ’मेन अँड बुक्स’, ’थ्रू माय विंडो’, ’लोक, द मेनी व्हॉइसेस’, ’आविष्कार’, ’अंतराल’, ’लिटररी फोरम’.

    साहित्य अकादमीचे साहित्यिक उपक्रम -
    1) साहित्य महोत्सव सप्ताह - साहित्य अकादमी दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात साहित्य महोत्सव सप्ताह आयोजित करते. ह्या आठवडाभरात काही विशिष्ट विषयांवर प्रकल्प योजिले जातात.प्राचीन भारतीय साहित्य, मध्ययुगीन भारतीय साहित्य, आधुनिक भारतीय साहित्य यांसारखे विषय ह्या प्रकल्पांत चर्चिले जातात. 
    2) भारतीय साहित्याच्या अभिलेखागाराची योजना - हा अकादमीचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. ह्या प्रकल्पांतर्गत चित्रफिती, दृक्ध्वनिफिती, श्रवणफिती, ‘सीडी’ आदी तांत्रिक साधनांद्वारे भारतातील दुर्मीळ व मौलिक साहित्यधनाचे जतन व दस्तऐवजीकरण तसेच श्रेष्ठ भारतीय साहित्यिकांची मूळ हस्तलिखिते, छायाचित्रे इ. सामग्री जतन करणे, अशा काही योजना राबविल्या जात आहेत. 
    3) प्रवास शिष्यवृत्ती - अकादमीच्या वतीने निरनिराळ्या राज्यांतील गुणी, तरुण लेखकांना प्रवास शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांनी भारतातील अन्य राज्यांमध्ये जाऊन तेथील लेखकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, तसेच तेथील प्रादेशिक साहित्य-संस्कृतीचा परिचय करून घ्यावा, ह्या उद्देशाने अशा शिष्यवृत्त्या दिल्या जातात. 
    4) सांस्कृतिक देवा-घेवाण - अकादमीच्या या योजनेच्या अंतर्गत भिन्न भिन्न प्रदेशांतील-भाषांतील लेखकांनी परस्परांचे साहित्य अनुवादित व प्रकाशित करणे, तसेच दोन भिन्न भाषिक राज्यांमध्ये लेखक-विद्वानांची परस्पर आवक-जावक असे अनेकविध उपक्रम राबविले जातात. 
     
    साहित्य अकादमी पुरस्कार  2020
            साहित्य अकादमीच्या 20 भाषांसाठी 2020 च्या वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये  सात कवितासंग्रह, चार कादंबर्‍या, पाच कथासंग्रह, दोन नाटके, एक-एक संस्मरण आणि महाकाव्याला पुरस्कार जाहीर झाले. 

    कविता संग्रह -
    1) हरीश मीनाश्रु (गुजराती)
    2) आर.एस. भास्कर (कोंकणी)
    3) ईरुंगबम देवेन (मणिपुरी)
    4) रूपचंद हांसदा (संथाली)
    5) निखिलेश्‍वर (तेलुगु)
    6) अरुंधति सुब्रमण्यम (इंग्रजी)
    7) अनामिका (हिंदी)

    कादंबरी -
    1) नंदा खरे (मराठी)
    2) डॉ. महेशचन्द्र शर्मा गौतम (संस्कृत)
    3) इमाइयम (तमिल)
    4) हुसैन-उल-हक (उर्दू)

    कथासंग्रह -
    1) अपूर्व कुमार सैकिया (असमिया)
    2) (दिवंगत) धरणीधर औवारी (बोडो)
    3) (दिवंगत) हृदय कौल भारती (कश्मीरी)
    4) कमलकान्त झा (मैथिली) 
    5) गुरदेव सिंह रूपाणा (पंजाबी)

    नाटक -
    1) ज्ञान सिंह (डोगरी)
    2) जेठो लालवानी (सिंधी) 

    संस्मरण-
    1) मणिशंकर मुखोपाध्याय (बांग्ला) 

    महाकाव्य -
    1) एम. वीरप्पा मोइली (कन्नड)
     

    नंदा खरे : विविध विषयांवर ताकदीने लिहिणारे  लेखक -
    1) जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या ”उद्या ” या कादंबरीबद्दल 2020 साहित्य अकादमीचा पुरस्कार नंदा खरे यांना जाहीर झाला. पण 2016 पासून नंदा खरे हे पुरस्कार स्वीकारत नसल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारला.
     
    2) ‘उद्या’ या कादंबरीत, फक्त नफ्यातोट्याच्या हिशेबात निव्वळ बाजारपेठीय जगण्याशी नाळ जोडून घेणार्‍या मानवी आयुष्यात संवेदनशीलता, करुणा या मूल्यांचे महत्त्व तरी किती उरणार, याचा आगामी काळाचा अस्वस्थ करणारा वेध  मांडण्यात आला आहे.  
     
    3) मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

    नंदा खरे लिखित पुस्तकांची नावे -
    1) ज्ञाताच्या कुंपणावरून
    2) 2050 (भविष्यवेधी कादंबरी)
    3) अंताजीची बखर
    4) संप्रती
    5) जीवोत्पत्ती 
    6) दगडावर दगड विटेवर वीट
    7) नांगरल्याविण भुई
    8) कहाणी मानवप्राण्याची
    9) बखर अंतकाळाची
    10) वाचताना पाहताना जगताना
    11) उद्या  
    12) ऐवजी
    13) दगड-धोंडे

    नंदा खरे यांनी भाषांतरित केलेली पुस्तके -
    1) एडवर्ड विल्सन यांच्या ‘वारूळपुराण’ - या पुस्तकाला डॉक्टर माधव गाडगीळ यांची प्रस्तावना आहे. 
    2) डॉक्टर लक्ष्मण सत्या यांचे‘कापूसकोंड्याची गोष्ट’ 
    3) प्रणयलाल यांचे ‘इंडिका’ 

    नंदा खरे यांनी संपादित केलेली पुस्तके -
    1) ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ (रवीन्द्र रु.पं.सोबत)
    2) नेव्हील शूट यांचें ‘ऑन द बीच’
    3) अनिल पाटील यांचे ‘गावगाडा शतकानंतर...’ 

    विराप्पा मोइली -
    1) काँग्रेस नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोईली यांना भगवान बाहुबली यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम’ या महाकाव्याच्या निर्मितीबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. जैन तीर्थंकर श्री वृषभनाथ यांचा पुत्र श्री बाहुबली यांना जैनधर्मीयांत खूप मानाचं स्थान आहे. चक्रवर्ती भरतास पराभूत करणार्या बाहुबलीचा दिग्विजय अहिंसेच्या माध्यमातून कसा होतो हे भारतीयांना नव्हे तर जगातील सर्व जनतेला मोईलींच्या लेखनातून समजू शकेल. 
     
    2) विरापा मोईली हे राजकीय पटलावर दीर्घकाळ मुरब्बी राजकारणी म्हणून परिचित आहेत. डॉ. वीरप्पा मोईली यांनी आजवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, पर्यावरण मंत्री, विधी आणि न्याय मंत्री अशा अनेक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या असून त्यांनी कन्नड भाषेत अनेक कादंबर्‍या लिहिल्या आहेत. 
     
    3) 2007 मध्ये मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. 
     
    4) 2014 मध्ये मोईली यांना रामायणावरील संशोधनात्मक लेखनासाठी सरस्वती भूषण सन्मान मिळाला होता.
     

    साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कारप्राप्त मराठी भाषिक साहित्यिक 
     
    1) साहित्य अकादमी ने 1989 पासून हे पुरस्कार सुरु केले, त्यावेळी पुरस्काराची रक्कम 10 हजार रुपये होती, 2009 पासून ती 50 हजार रुपये करण्यात आली.
     
    2) पुरस्कारासाठी विचारात घेतलेल्या वर्षाच्या 5 वर्षापूर्वीा प्रकाशित झालेल्या मान्यताप्राप्त भाषेतील कोणत्याही साहित्यकृतीच्या भाषांतरासाठी सदर पुरस्कार दिला जातो.
     

    साहित्य अकादमी भाषा सन्मान 
     
    1) साहित्य अकादमी द्वारा मान्यता प्राप्त 24 भाषातील उत्कृष्ट अनुवादासाठी पुरस्कार दिले जातात, पण देशात मान्यता नसलेल्या अनेक भाषा असून त्यांच्याशी संबंधित कामगिरीसाठी /अनुवादासाठी दरवर्षी भाषा सन्मान दिला जातो. त्याची सुरुवात 1996 साली झाली. 
     
    2) 2009 सालापासून सदर पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये करण्यात आली. 1996 साली ती 25 हजार रुपये होती.
     
    3) सध्या दरवर्षी 6 भाषा सन्मान 2 विभागात दिले जातात - 2 भाषा सन्मान अभिजात व मध्ययुगीन साहित्यात योगदान दिलेल्या साहित्यिकासाठी, तर उर्वरित 4 पुरस्कार बिगरमान्यता भाषेतील साहित्याच्या विकासासाठी योगदान दिलेल्या लेखक, विद्वान, संपादक, संकलक, अनुवादक यांना दिले जातात.

    1996 साली भाषा सम्मानाने गौरवित पहिले साहित्यिक -
    1) भोजपुरी भाषेतील साहित्यासाठी धारीक्षन मिश्रा,
    2) पहाड़ी (हिमाचली) भाषेतील साहित्यासाठी बंसी राम शर्मा व एम. आर. ठाकुर
    3) तुलु भाषेतील साहित्यासाठी मंदरा केशव भट व के. जथप्पा राय 
    4) कोकबोरोक भाषेतील साहित्यासाठी चंद्र कांता मुरा सिंह

     बालसाहित्य पुरस्कार 2020 
     
    1) 2010 सालापासून साहित्य अकादमीने बाल साहित्यासाठी पुरस्कार सुरु केला.
    2) जळगाव येथील आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार 2020 जाहीर झाला.
    3) ‘आबाची गोष्ट’ या लघुकथेतून लेखकाने ग्रामीण जीवनातील मुलांचे भावविश्व अलगदपणे उलगडत नेले आहे. 
    4) साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारांच्या निवड समितीमध्ये  चंद्रकांत पाटील, कौतिकराव ठाले-पाटील, कृष्णात खोत हे तिघे परीक्षक होते.

    आबा गोविंदा महाजन -
    1) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये सालदाराच्या घरात जन्मलेल्या आबा गोविंदा महाजन यांनी शिक्षक, नायब तहसीलदार ते तहसीलदार पदापर्यंत मजल मारली. त्यांनी  बालसाहित्यात राज्य पुरस्कारांची हॅट्ट्रिक केल्यानंतर ’आबांची गोष्ट’ या कथासंग्रहावर बालसाहित्यातील साहित्य अकादमीची मोहोर उमटली. या कथासंग्रहात पारंपरिक बोधकथा किंवा संस्कार कथा याचे स्वरूप नसून परिस्थितीशी दोन हात करणार्‍या, प्रतिकूल अवस्थेत धडपडणार्‍या, प्रामाणिक, जिद्दी मुलांच्या संघर्षकहाण्या मांडण्याचा प्रयत्न केला. यातील स्कॉलरशिप नावाची कथा वाचून पालकांना रडू आले.
     
    2) शिक्षक असताना साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा लळा लागल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याचे मनी ठाणले. 
     
    3) ’आबांची गोष्ट’मधील 17 कथांपैकी निम्म्या कथा एरंडोलच्या वातावरणातील, खान्देशी बोलीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. नोकरी लवकर मिळण्यासाठी त्यांनी डी. एड. केले. जामनेर व एरंडोल तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. तेथे साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचा लळा लागला. स्वत:ही मुलांसाठी लिहावे, असे वाटू लागले. तेथून बालसाहित्याचा प्रवास सुरू झाला. 
     
    4) 1993-94 मध्ये पहिली कविता किशोर मासिकात प्रसिद्ध झाली.
     
    5) 2001 मध्ये ”गमतीच्या राज्यात’ हे पहिले पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाले. त्यालाही अनेक पुरस्कार मिळाले.
     
    6) खान्देशात ना. धों. महानोर, अशोक कोतवाल यांच्यानंतर राज्य शासनाचा पुरस्कार मिळवणारा तिसरा साहित्यिक. राज्य शासनाच्या पुरस्कारांची हॅट्ट्रिक झाली. सन 2008-09, 2010-2011, 2013-14 असे तीन पुरस्कार बालसाहित्यात बालकवितेमध्ये मिळाले. 
     
    7) 2010 मध्ये नायब तहसीलदार तोपर्यंत पारंपरिक, साचेबद्ध पद्धतीने बालसाहित्य लेखन.
     
    8) ”मन्हा मामानं गावले जावू” या पुस्तकात अहिराणी, मराठी असा द्विभाषिक प्रयोग केला. त्याला राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावे.
     
    9) ”मन्हा गावले ”अहिराणी बोलीतील पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. 

     
    राजकारणी साहित्यिक
     
            स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, राजगोपालचारी, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांनी त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान पुस्तक रूपात मांडले आहे. सरदार पटेल यांचे लेखन त्यांनी लिहिलेले लेख, पत्रे आणि त्यांची भाषणे यांचे संपादन पुस्तक रूपात प्रसिद्ध झाले आहे. अमोघ वाणीसाठी प्रसिद्ध असणारा डेमॉस्थँनिस खूप कमी लोकांच्या स्मरणात राहिला. पण प्लुटो, आर्किमिडीज, थिओफ्रेसिटसचे नाव लेखनामुळे आजही अजरामर आहे.
     
    1) माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी ’इनसायडर’ हे त्यांचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे भाषांतर ‘अंतस्थ’ या नावाने मराठीत प्रसिद्ध झाले आहे. 
     
    2) नरसिंह राव यांच्यानंतर पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी हे तर कवी. त्यांच्या राजकीय भाषणावर आधारित पुस्तिका आणि अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
     
    3) विश्वनाथ प्रताप सिंग आणि आय. के. गुजराल हे मूळचे काँग्रेसी. विश्वनाथ प्रताप सिंग यांचा काव्यसंग्रह व गुजराल यांचे राजकीय लेखन प्रसिद्ध आहे. 
     
    4) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ. जगातील अनेक विद्यापीठांत त्यांचे लेखन अभ्यासक्रमात आहे. त्यांच्या लेखनावर व संशोधकांनी विपुल लेखन केलं आहे. अभ्यासक्रमाशिवाय त्यांनी जे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषयावरील लेखन केलं आहे, त्यात प्रमुख आहे ’चेंजिंग इंडिया : 1950-2014’ हे पाच खंडांचे पुस्तक. यात डॉ. सिंग यांनी 1950 पासून 2014 पर्यंतचा प्रत्येक दशकाचा आढावा घेत या कालखंडातील भारताची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडण आणि त्यातील बदल याबद्दल मांडणी केली आहे. याशिवाय त्यांनी  ‘गुरु ग्रंथसाहिब’ या ग्रंथावर देखील भाष्य करणारे स्वतःचे आकलन मांडले  आहे. 
     
    5) भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी ”द ड्रॅमॅटिक डिकेड : द इंदिरा गांधी इयर्स“ या पुस्तकात 1971 ते 1981 या कालखंडातील राजकीय घडामोडींची माहिती दिली आहे. 
     
    6) माजी गृहमंत्री दिवंगत अर्जुन सिंग यांचे आत्मचरित्र हे खूपच विशेष म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे त्या आत्मचरित्राचे नाव ”ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाइम” म्हणजे ‘वाळूच्या घड्याळातील काळ मोजणार्या वाळूतील एक लहानसा कंकर’ असे स्वतःचे वर्णन या आत्मचरित्रात त्यांनी केले आहे. 1960 पासून भारतीय राजकारणातील अनेक घटनांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. 
     
    7) माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांच्या ‘’ वन लाइफ इज नॉट इनफ “ या आत्मचरित्राचे खूप सूचक असे नाव असून यात त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल आणि अनेक राजकीय घडामोडींबद्दल अगदी मनमोकळेपणे मांडणी केली आहे. पुस्तकातील इंग्रजी भाषा खूप शैलीदार आहे. 
     
    8) दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणजे, शीला दीक्षित त्यांचे ”सिटीझन दिल्ली : माय टाईम, माय लाईफ‘’ हे आत्मचरित्र सुंदर आहे. हे लेखन राजकीय अनुभव कथन नसून त्यास एक साहित्यिक मूल्य आहे. शालेय नि महाविद्यालयीन जीवन, शिक्षण, प्रेम, लग्न आणि लग्नात घडलेल्या गमतीशीर घटना खूप छान मांडल्या आहेत. 
     
    9) पी. चिदम्बरम हे भारताचे माजी गृहमंत्री तसेच माजी अर्थमंत्री. ते व्यवसायाने वकील आणि त्याचबरोबर अर्थकारण आणि कायदा यांचे अभ्यासक. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी ‘’ स्टँडिग गार्ड - ए इयर इन द ऑपोझिशन“ आणि ‘’ स्पिकीएंग ट्रूथ टू द पॉवर  : माय अल्टर्नेटिव्ह व्ह्यू‘ ही पुस्तकं विशेष महत्त्वाची आहेत. यात राजकारण, अर्थकारण, जीएसटी, भूमी अधिग्रहण सुधारणा, आस्फा हा कायदा आणि 2015 सालची बिहार निवडणूक याबद्दल लिहिले. त्यानंतर त्यांची ” फिअरलेस इन द ऑपोझिशन“ आणि ‘’ सेव्हींग द आयडिया ऑफ इंडिया“  ही पुस्तके महत्त्वाची आहेत. 
     
    10) जयराम रमेश हे काँग्रेस पक्षातील एक विद्वान व उच्चशिक्षित राजकारण्याचे नाव. बॉम्बे आयआयटीन असलेल्या रमेश यांनी इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहिले असून हे चरित्र इतर चरित्रापेक्षा खूप वेगळे आहे. यात त्यांनी प्रामुख्याने इंदिरा गांधी यांचा पर्यावरणविषयक दृष्टिकोन मांडला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतातील उदारीकरणानंतर झालेल्या बदलांविषयी “ ब्रिंक अँड द ब्लॅक : इंडियाज 1991 स्टोरी“ हे पुस्तक लिहिले आहे. 
     
    11) सॅम पित्रोदा त्यांनी “ ड्रिमिंग बिग“ या त्यांच्या आत्मकथनामधून प्रामुख्याने राजीव गांधी यांनी केलेल्या दूरसंचार आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतिकारी कार्याचा आढावा घेत त्यांनी आपला जीवनपट देखील शब्दबद्ध केला आहे.
     
    12) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले आत्मकथन “ इंडियाज सेंच्युरी“ या पुस्तकात मांडले आहे. भारतीयांची परंपरागत उद्योजकता आणि त्याला मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यातून भारतीय मानूस ‘जुगाड’ कसा करतो याची अनेक उदाहरणे यात आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यावर अभ्यासू मांडणी आहे. तंत्रज्ञानाने दिलेल्या दैनंदिन जीवनातील अनेक उपकरणांची उपयुक्तता भारतीय कसे वाढवतात याबद्दल खूप रंजक माहिती यात आहे.
     
    13) काँग्रेस नेते शशी थरूर हे प्रख्यात लेखक आहेत.
     
    14) माजी गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेस नेते वृत्तपत्रातून स्तंभलेखन करत असतात.
     
    15) भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी, के. आर. मलकानी, जसवंत सिंग हे चांगले लेखक.
     
    16) कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय, एस. ए. डांगे, बी. टी. रणदिवे, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, कृपलानी आदी नेत्यांनी विपुल राजकीय लेखन केले आहे.
     
    17) मधु लिमये यांनी ‘सौहार्द’ सारख्या पुस्तकातून अनुभव कथन मांडले आहे.
     
    18) कम्युनिस्ट नेते मोहित सेन यांचे ‘द ट्रॅव्हलर’ हे पुस्तक भारतीय राजकारणाचा पट सांगणारा दस्ताऐवज आहे. 
     
    19) सोमनाथ चटर्जी यांच्या “किपींग द फेथ : मेमॉयर्स ऑफ द पार्लमेंटेरियन“ या पुस्तकाचे मूल्य देखील याच स्वरूपाचे आहे.
     
    20) तृणमूल कॉग्रेसचे नेते डॉ. सुगता बोस यांचे  ‘’ द नेशन अ‍ॅज मदर “  हे पुस्तक भारतीय राष्ट्रवादावर वेगळा विचार करायला लावणारे आहे. 
     
    21) यशवंतराव चव्हाण यांचे विविध राजकीय व सामाजिक विषयावर विपुल लेखन आहे. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र महत्त्वाचे मानले जाते. 
     
    23) शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी ‘मार्मिक’ मध्ये अनुभव कथन करणार्या सदराचे लेखन केले होते. 
     

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 1939