मे ११ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

  • मे ११ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

    मे ११ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

    • 15 May 2021
    • Posted By : Study circle
    • 433 Views
    • 0 Shares
     मे ११ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणार्‍या विविध परीक्षात विज्ञान व तंत्रज्ञानया विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. दरवर्षी ११ मे रोजी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवसाचा संबंध  मुख्यत्त्वे भारताच्या आण्विक तंत्रज्ञानाच्या प्रगतीशी आहे. येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाशी संबंधित उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

     
       राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात भारताचा आण्विक कार्यक्रमया विषयाअंतर्गत पुढील उपविषय नमूद आहेत -
     
    १)  आण्विक तंत्रज्ञान - मूलभूत माहिती
    २)  आण्विक वीजनिर्मिती - तत्त्व, रचना, कार्य
    ३)  भारताचा आण्विक कार्यक्रम - सुरुवात, आवश्यकता व ठळक वैशिष्ट्ये
    ४)  भारतातील आण्विक औष्णिक वीजनिर्मिती
    ५)  आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग -
        १) ग्राहकोपयोगी आण्विक उत्पादने
        २) अन्न आणि शेती उत्पादने
        ३) वैद्यकीय औषधे
    ६)  आण्विक वीजप्रकल्पाच्या पर्यावरणविषयक बाबी - आण्विक कचरा व आण्विक अपघात
    ७)  आण्विक धोरणे व आण्विक चाचण्या
    ८)  जागतिक स्तरावरील आण्विक करार व संघटना
     
         ११ मे रोजी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती, कारण ११ मे १९९८ रोजी पोखरण-२ अंतर्गत भारताने ३ अण्वस्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. याच दिवशी बंगळूरच्या राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळेने विकसित केलेल्या हंसा-३ या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली गेली होती. त्याशिवाय डीआरडीओने याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली होती.
     
       ११ मे २००० - भारताच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. दिल्लीच्या राष्ट्रीय जनगणना आयोगाच्या, लोकसंख्या घडयाळानुसार, ११ मे २००० रोजी, १ अब्ज हा आकडा आला तेव्हा, १२ वाजून ३२ मिनिटांनी दिल्लीत कुमारी आस्था अशोककुमार अरोरा या ‘अब्जाव्या’ भारतीय नागरिकाचा जन्म झाला आणि ती कन्या होती हे विशेष, भारताची लोकसंख्या अधिकृतपणे १ अब्ज झाली.
     
       ११ मे १९९९ रोजी पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
     
         राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची थीम -
       प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवशी अनेक ठिकाणी परिसंवाद व विविध संशोधक व शास्त्रज्ञांची चर्चासत्रे आयोजित करुन राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. तसेच दरवर्षी तंत्रज्ञान दिनानिमित्त एका विशिष्ट संकल्पनेवर (थीम) भर दिला जातो.  त्यापैकी काही महत्त्वाच्या संकल्पना -
     
    १)  २०२१ मध्ये ‘ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर’ ही थीम
    २)  २०२० मध्ये ‘ रिबुटिंग इकॉनॉमी थ्रो सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च ट्रान्सलेशन्स (रिस्टार्ट )’
    ३)  २०१९ मध्ये ’सायन्स फॉर पीपल अँड पीपल फॉर सायन्स ’
    ४)  २०१८ मध्ये ‘ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर’ ही थीम
    ५)  २०१७ मध्ये ‘ टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल अँड इनक्लुझिव्ह ग्रोथ’ ही थीम
    ६)  २०१६ मध्ये ’टेक्नॉलॉजी एनेबल्स ऑफ स्टार्ट अप इंडिया’
     
       विज्ञानाशी संबंध असलेले दिवस -
     
        विज्ञानाशी संबंध असलेले पुढील दिवस भारतात पाळले जातात -
    १)  २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस - २८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर रामन यांनी नोबेल पारितोषिक विजेता शोध लावला.
    २)  ११ मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस - ११ मे १९९८ रोजी पोखरण-२ या यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या.
    ३)  ३० ऑक्टोबरला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस- ३० ऑक्टोबर १९०९ हा, भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे.
     
       बुद्ध हसला (भारताची दुसरी अणुचाचणी) -
     
    १)  ११ मे १९९८ रोजी भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या येथे पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या.
        १) शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची,
        २) शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची,
        ३) शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती.
     
    २)  त्यानंतर १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. शक्ती-१ आणि शक्ती-२ या चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा बरीच कमी होती.
     
    ३)  वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. ११ मे १९९८ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे भारताने तीन यशस्वी अणु चाचण्या केल्या. या चाचणीचे सांकेतिक नाव होते, ’ऑपरेशन शक्ती.’ या अणुस्फोट चाचणीला बुद्ध हसला (बुद्धा स्माईल्ड) असे संबोधले गेले.
     
    ४)  ५८ किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.
     
    ५)  या चाचण्यांचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. या चाचण्यांचे शिल्पकार होते -  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. के. संथानम.
     
    ६)  १९९८ मध्ये केंद्रात सत्ताबदल होऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. सरकार स्थापनेनंतरच्या २ महिन्यात व पहिल्या अणुचाचणीनंतर २४ वर्षांनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतातील वैज्ञानिक, इंजिनिअर, आणि तंत्रज्ञाच्या महत्वाकांक्षी कामगिरीवर दुसरी अण्वस्त्र चाचणी घेऊन इतिहास घडून आणला. 
     
    ७)  या चाचणीनंतर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीननंतर भारत सहावा अण्वस्त्रधारी देश बनला.
     
    ८)  भारताने दुसरी अण्वस्त्र चाचणी घेताना कमालीची गुप्तता पाळली होती. जगातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारी अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएला भारताने शंका सुद्धा येऊ दिली नाही. अमेरिका टेहळणी उपग्रहांमार्फत जगावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते. अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने आपले अपयश मान्य करत गुप्तहेरीचे स्रोत बदलणे, ह्युमन इंटलिजन्स वर लक्ष देणे आवश्यक असल्याचे कबूल केले होते.
     
      पहिली अण्वस्त्र चाचणी -
     
    १)  १८ मे १९७४ रोजी भारताने इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पहिली यशस्वी अणुस्फोट चाचणी घेतली  होती.  परंतु त्यावेळी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले नव्हते.
     
    २)  १९६० साली सायरस अणुभट्टीसाठी, जड पाणी देताना अमेरिकेने अशी अट घातली होती की त्या भट्टीत निर्माण झालेले प्लुटोनियम-२३९, अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरले जाणार नाही. ते अण्वस्त्र चाचणीसाठी वापरले गेले म्हणून अमेरिकेने भारताच्या सर्वच अणुप्रकल्पांना असहकार दर्शविला, परंतु भारताने आपले प्रकल्प, स्वबळावर यशस्वी केले.
     
    ३)  १९९५ मध्ये  पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली दुसरी अणूचाचणी घेण्याची तयारी करण्यात आली होती परंतू अमेरिकेला याची कुणकुण लागली आणि त्यांनी भारतावर प्रचंड दबाव आणण्यास सुरवात केली व त्यामुळे अण्वस्त्र चाचणी थांबविण्यात आली.
     
    ४)  भारताने अण्वस्त्र चाचणी घेऊ नये यासाठी अमेरिका आणि पश्रि्चम युरोप यांचा भारतावर प्रचंड दबाव होता. हा दबाव भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी टाकण्यात येत होता. या करारावर १३७ देशांनी स्वाक्षरी केली होती. भारताने या करारावर स्वाक्षरी न करता  अण्वस्त्र चाचणी घडवून आणली.
     
    तंत्रज्ञान विकास मंडळाचे राष्ट्रीय पुरस्कार २०२१
         किफायतशीर आणि स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. १९९९ पासून तंत्रज्ञान विकास मंडळाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा सन्मान व प्रोत्साहन दिले आहे.
     
      २०२१ साठीच्या तंत्रज्ञान विकास मंडळाच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी तीन श्रेणींमधून १५ विजेत्यांची निवड झाली -
     
        श्रेणी १ : स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशस्वी व्यावसायिकरणाबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार -
    १)  बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड, मुंबई - बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेडने विविध प्रकारच्या सौरकाचांची निर्मिती करणारे अद्ययावत तंत्र विकसित केले. २ मिमी जाडीच्या या काचा पूर्णपणे टेंपर्ड काचा असून उच्च-शक्तीच्या काच-काच व्दिपृष्ठीय प्रकारांसाठी त्यांचा वापर होतो.
     
    २)  रैना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई - या कंपनीने टीआरसी म्हणजेच टेक्सटाईल रिइन्फोर्सड काँक्रीट तयार केले असून, बांधकाम क्षेत्रासाठी त्याच्या साच्यांच्या उत्पादन आणि विक्रीचे काम ही कंपनी करते.
     
        श्रेणी २ : एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योगांच्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार -
     
    १)  प्लस ऍडवान्सड टेक्नॉलॉजिज गुरुग्राम- औषधनिर्मिती क्षेत्रात वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल अशी स्वदेशी बनावटीची ’सेलशुअर’ नामक तापमान-नियंत्रित पेटी या कंपनीने तयार केली आहे. ठराविक नियंत्रित तापमान कायम राखणारे फेज चेंज मटेरियल तंत्रज्ञान हा त्या प्रणालीचा गाभा होय.
     
    २)  इंटॉट टेक्नॉलॉजिज,कोची- बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेली डिजिटल रेडिओ प्रक्षेपण तंत्रे, डिमॉड्युलेशनसारख्या विविध गुंतागुंतीच्या प्रक्रियांसाठी चिपचा वापर करतात.
     
    ३)  ओलीन लाईफ सायन्सेस, चेन्नई- या कंपनीने आल्याच्या अर्काची जिनफोर्ट ही भुकटी तयार केली असून त्यावर ट्रेडमार्कही मिळवला आहे. या भुकटीत अधिक प्रमाणात जिंजेरॉईड (२६% एकूण जिंजेरॉल्सच्या तुलनेत) असते. पेटन्ट असलेले अक्वेसोम तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले.
     
        श्रेणी ३ : तंत्रज्ञान स्टार्ट अप श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार -
     
    १)  प्रॉफिशिअंट व्हिजन्स सोल्युशन्स, खरगपूर - या कंपनीने क्लिअर व्हिजन नावाचे उत्पादन तयार केले आहे. चित्रफितींमधील पाऊस आणि धुके इत्यादी हवामान घटकांना त्याच वेळी (रियल टाइम) काढून टाकण्यासाठी हे काम करते.
     
    २)  आयरॉव्ह टेक्नॉलॉजीज, केरळ - ही कंपनी आयरॉव्ह-टुना हे दुरून चालविता येणारे वाहन वापरून पाण्याखालील तपास आणि निरीक्षण यासाठी सेवा पुरविते. आयरॉव्ह-टुना हे जलमग्न पदार्थांच्या सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे सूक्ष्म आरओव्ही आहे.
     
    ३)  फॅबहेड्स ऑटोमेशन, चेन्नई - उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वयंचलितता आणून स्वदेशी बनावटीच्या कार्बन फायबर लेअप तंत्रज्ञानाने उत्पदनातील अडचणी सोडविल्या जातात.
     
    ४)  प्लाबेल्टेक ऑटोमेशन, भोपाळ - या कंपनीने ग्लाय टॅग मंचाची निर्मिती केली आहे. या शिसेयुक्त प्रतिपिंड-औषध-दुव्यांमुळे दृग्गोचर होणार्‍या अँटी प्रोलिफ्रेटिव्ह क्रियाशीलतेमुळे स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारात मदत होते.
     
    ५)  ब्रीद अप्लाइड सायन्सेस, बेंगळुरू - कार्बनडाय ऑक्साईडचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करण्याची प्रयोगशाळेतील प्रक्रिया ब्रीदने यशस्वीरीत्या प्रायोगिक (पायलट) तत्त्वापर्यंत आणली आहे.
     
    ६)  सायरन एआय सोल्युशन्स, दिल्ली - या कंपनीने एकमेवाद्वितीय असे ’बुद्धी एआय डीआयवाय किट’ शोधून काढले असून त्याचे पेटंटही घेतले आहे. बुद्धी हा इंग्रजी अद्याक्षरांवरून बनवलेला शब्द असून बुद्धी म्हणजे- मानवसदृश बुद्धिमत्तेची उभारणी, आकलन, रचना आणि उपयोग- होय.
     
    ७)  थेरानौटिलस, बेंगळुरू - दातांमधील दंडगोलाकारनलिकांमध्ये शिरून काम करणार्‍या नॅनो रोबोना मार्गदर्शन करण्यासाठीचे उपकरण या कंपनीने तयार केले आहे.
     
    ८)  सिनथेरा बायोमेडिकल, पुणे - या कंपनीने जैविक दृष्ट्या सक्रिय असणारे पोरोसिन हे अस्थिकलम तयार केले आहे. अपघात, आजार वगैरे कारणांनी उद्भवलेल्या अस्थिभंगावरील  शस्त्रक्रियांमध्ये अस्थींच्या पुनर्निर्माण व दुरुस्तीसाठी हे उपयुक्त ठरते.
     
    ९)  मल्टी नॅनो सेन्स टेक्नॉलॉजीज, नागपूर - या कंपनीने स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन सेन्सर्स बनविले आहेत. हे स्थायू अवस्थेतील विद्युतरासायनिक सेन्सर्स असून हायड्रोजन हुडकून काढण्याच्या अनेक अवघड ठिकाणी त्याचा उपयोग होतो.
     
    १०) नोकार्क रोबोटिक्स, पुणे - या कंपनीने पूर्णपणे देशी बनावटीचा त ३१० आयसीयू व्हेंटिलेटर (जीवरक्षक प्रणाली) बनविला असून त्यासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील केंद्राचे सहकार्य त्यांनी घेतले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी त्यांनी याचे पूर्ण व्यापारीकरण केले आहे. क्लिनिकल दृष्टीने हे व्हेंटिलेटर वैध ठरले असून आयइसी ६०६०१-१ दर्जानुसार ते प्रमाणित आहेत.
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 433