CSAT पेपर तयारी : भाग (3)

  • CSAT पेपर तयारी : भाग (3)

    CSAT पेपर तयारी : भाग (3)

    • 16 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 423 Views
    • 0 Shares
    आकलनाची कसोटी
          एमपीएससी गेल्या 2 परीक्षेत या घटकावर 80 पैकी 40 प्रश्न म्हणजे निम्मा भर होता. हा घटक तसा विद्यार्थ्यांच्या परिचयाचा असतो,कारण अगदी 4 थी पासून ते पदवीपर्यंतच्य मराठी व इंग्रजी या भाषा विषयांच्या पेपरमध्ये उतार्‍यावरील प्रश्न सोडविणे हा एक अनिवार्य घटक असतो.
     
          आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजणे, त्यातील भावार्थ कळणे, शब्दांमागील किंवा वाक्यांमागील मथितार्थ कळणे. हा शब्द तसा व्यापक आहे. आकलनक्षमता जोखण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो. साधारणपणे कल चाचण्यांमध्ये हा शब्द ‘वाचनाची आकलनक्षमता’ म्हणजे 'Reading Comprehension' या अर्थानंच वापरला जातो. या घटकांवरील प्रश्नात एक परिच्छेद दिलेला असतो आणि त्या परिच्छेदावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. इथे भाषेचे तांत्रिक ज्ञान फारसे महत्त्वाचे नसून परिच्छेदातील भावार्थ व परिच्छेदातून निघणारा निष्कर्ष महत्त्वाचा असतो.

    1) आकलनाची व्याप्ती व स्वरूप 
          सीसॅटच्या पेपरमध्ये सर्वसामान्य आकलनाचा घटक मध्यवर्ती असून येथे अनोळखी उतार्‍यावरील प्रश्नांच्या आधारे उमेदवाराची आकलनक्षमता तपासली जाते. येथे संबंधित उतार्‍यातून भाषिक कौशल्ये तपासण्याबरोबरच विद्यार्थी उतारा योग्यरीतीने वाचू शकतो का? त्यातील आशय योग्यरीतीने लक्षात घेतो का? उतार्‍यातील विविध संदर्भ, दाखले आणि उदाहरणांचा समर्पक अर्थ लावू शकतो का? म्हणजे एकंदर उतार्‍यातील विषयाचे नेमके आकलन करू शकतो का? या बाबींची तपासणी केली जाते. म्हणजे वाचन, विश्लेषण आणि अर्थनिर्णयन या मूलभूत क्षमतांची कसोटी पाहिली जाते.
     
          आकलनात खालील घटकांचा समावेश असतो - 
    1)      परिच्छेदातील मध्यवर्ती संकल्पना समजून घेणे.
    2)      परिच्छेदाचा सरळ अर्थ कळणे.
    3)      परिच्छेदातील मध्यवर्ती संकल्पना वापरून न कळणार्‍या इतर शब्दांचा, वाक्यांचा अर्थ कळणे.
    4)      पूर्वानुभवाचा व सद्य घडामोडीचा वापर करुन परिच्छेदाचा अर्थ लावणे.
     
          प्रश्नपत्रिकेतील उतारे हे उमेदवाराचे सामान्य तसेच प्रशासकीय सेवा पदासाठी अत्यावश्यक आकलन तपासणारे असल्यामुळे विविध विषय उतार्‍यात हाताळले जातात-पर्यावरण, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक समस्या, महत्त्वपूर्ण व्यक्तींची आत्मचरित्रे व चरित्र, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, साहित्य, अशा विविध संदर्भावर आधारित अथवा संदर्भातून उतारे निवडले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा कस लागतो.
     
          आकलनावरील उत्तरे शोधताना लक्षात ठेवा -
    उतार्‍यांमधून उमेदवाराची विषय समजून घेण्याची क्षमता लक्षात घेतली जाते. 
     
    उतारा कोणत्या भाषेत वाचला जातो हे जास्त महत्त्वाचे नसून उतार्‍यामध्ये मांडलेले मुद्दे, विवेचन उमेदवारास समजून घेता येते का? त्यावरील प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून शोधता येतात का? हे तपासून बघितले जाते. 
     
    उतारे जास्त गुंतागुंतीचे विषय मांडणारे, आशयघन, क्वचित किचकट अशा स्वरूपाचे असतात. हे उतारे जास्त लांबीचे व साधारणतः 4 ते 5 प्रश्न असणारे असतात. 
     
    उतार्‍यांचे ढोबळमानाने दोन प्रकारे वर्गीकरण करावे -
    1) उतार्‍याची लांबी व प्रश्नसंख्येनुसार : मोठा, मध्यम किंवा छोटा उतारा
    2) उतार्‍याच्या विषयानुसार-सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, वैज्ञानिक, इ.
     
    सर्व उतार्‍यांचे ढोबळ वर्गीकरण करता येते - 
    1) सोपा, 
    2) मध्यम,
    3) अवघड. 
     
    माहितीपूर्ण उतारे - या उतार्‍यांमध्ये फक्त माहिती दिलेली असते, कोणत्याही किचकट संकल्पना मांडलेल्या नसतात असे उतारे सर्वांत आधी सोडवावेत. 
     
    उतार्‍यांच्या विषयात वैविध्य असू शकते. उतार्‍याचा विषय आपल्या आवडीचा/माहितीचा असल्यास त्याचे आकलन सुकर होते. 
     
    उतार्‍यामधील तोच तोच भाग पुन्हा पुन्हा वाचल्यास मनातील गोंधळ तर वाढतोच पण त्याचबरोबर खूप जास्त वेळ खर्च होतो. उतारा वाचताना यावर मात करण्याचा सराव करावा.

    2) आकलनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे 
          सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी केलेले वाचन सीसॅटमधील सामान्य आकलनासाठी उपयुक्त ठरते. कोणताही संदर्भ वाचताना त्यातील मूलभूत संकल्पना, दृष्टिकोन, मध्यवर्ती विचार वा विषय, वैचारिक भूमिका, त्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उपयोजलेली उदाहरणे आणि दिलेले दाखले, संदर्भातील एखादा महत्त्वपूर्ण शब्द, शब्दप्रयोग अथवा वाक्याचा मथितार्थ आणि संकेतार्थ या महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळे आपले वाचन व विचारक्षमतेचा विकास व विस्तारच आकलनासाठी उपयुक्त असते.
     
          स्वाभाविकच, सामान्य आकलनात दिलेल्या उतार्‍याचे बारकाईने वाचन करणे अत्यावश्यक ठरते. एखादा उतारा वाचून त्यातील माहिती शोधणे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे अशी अपेक्षा नसते. वस्तुत: उतार्‍यावरील एखादा प्रश्नच माहितीप्रधान असू शकतो. म्हणजे काही प्रश्न उतार्‍यातील मध्यवर्ती संकल्पना, विचार वा विषयाच्या आकलन व विश्लेषणासंबंधी असू शकतात. त्यामुळे उतार्‍यातील एखाद्या विषयात लेखकाला कोणता मुद्दा वा मत मांडायचे आहे, हे करताना उतार्‍याची रचना कशी केली आहे, व आपल्या मताच्या समर्थनार्थ कोणती उदाहरणे वा संदर्भ दिलेले आहेत, या महत्त्वपूर्ण बाबींचा शोध घेणे गरजेचे ठरते. म्हणजे अतिशय विचारपूर्वक उतार्‍याचे वाचन करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी उतारा वाचताना महत्त्वपूर्ण मुद्दे, शब्दांना व दाखल्यांना अधोरेखित करावे. अनेक प्रश्नांंचे उत्तर आपल्याला ज्या शब्दात सुचेल त्या शब्दात दिलेले नसते. त्यामुळे सुचलेल्या उत्तराच्या अर्थाजवळ जाणारा नेमका कोणता पर्याय आहे, याचा निर्णय घेता येणे ही बाब तितकीच महत्त्वाची ठरते. त्यासाठी पर्यायाचा तुलनात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे.
     
          बर्‍याचदा उतार्‍यातील एखाद्या शब्दातून विशिष्ट संदेश, मत वा अर्थ सांकेतिक पातळीवर अथवा मथितार्थाच्या पातळीवर मांडलेले असते. उतार्‍यातील मध्यवर्ती विचारासंदर्भात अशा शब्दाचा सुसंगत म्हणजे नेमका अर्थ लावणे महत्त्वपूर्ण ठरते. अशारीतीने उतार्‍यातील विषय मांडताना लेखक-लेखिका अथवा निवेदकाला जे प्रतिपादन करायचे असते त्याचे योग्य व नेमके आकलन होण्यासाठी त्यांच्या मनोभूमिकेत जाणे उपयुक्त ठरते.  
     
          अनेकदा उतार्‍यातील मध्यवर्ती संकल्पना थेट वा स्पष्टपणे मांडलेली वा व्यक्त केलेली असेलच असे नाही. किंबहुना ती अप्रत्यक्ष, अध्याहृत वा संकेताच्या पातळीवरील व्यक्त केलेली असते. कधी हा विचार प्रारंभी, उतार्‍याच्या मध्यभागी वा शेवटी व उदाहरणाद्वारे मांडलेला असतो. त्यामुळे संपूर्ण उतार्‍याचे सूक्ष्म वाचन अत्यावश्यक ठरते.

    3) आकलनावरील प्रश्नांचे स्वरूप  
          आकलनक्षमतेवरील प्रश्नांचा योग्य सराव केला, तर जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील उतारा वाचून त्याचे योग्य आकलन करावे आणि त्याआधारित बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे अपेक्षित असते. प्रत्येक विद्यार्थ्यांने दहावी इयत्तेपर्यंत मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी यांतील एखाद्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारच्या उतार्‍यावरील प्रश्नांचा सामना केलेला असतोच. त्यामुळे हा घटक पूर्णत: नवा नाही. मात्र प्रशासकीय सेवा पदासाठी आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धात्मक परीक्षेतील उतार्‍याची काठिण्य पातळी अधिक असते.
     
          आकलनाच्या कसोटीत उतार्‍याखाली दिलेल्या प्रश्नांचेही काळजीपूर्वक वाचन करणे महत्त्वाचे आहे. प्रश्न वाचण्यात घाई केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने आकलन केल्यास एकतर आपण चुकीचे उत्तर शोधू अथवा पर्याय वाचून मनात गोंधळ निर्माण होऊन आपला वेळ खर्ची पडेल. पर्यायांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. प्रत्येक पर्यायाचे स्वतंत्र वाचन व आकलन, आवश्यकता भासल्यास तुलना व त्यातील नेमक्या व अचूक पर्यायांची निवड हे टप्पे अंगीकृत करावेत. एखादा पर्याय बरोबर वाटल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी उर्वरित पर्याय का व कसे चुकीचे आहेत याची खातरजमा करावी. थोडक्यात बरोबर तसेच चुकीच्या पर्यायांची उलटतपासणी करून अचूक पर्यायाची खातरजमा करावी. अशाप्रकारच्या तुलनात्मक पद्धतीमुळे आकलनातील अचूकता वाढवता येईल. कोणत्याही विषयाच्या उतार्‍यावरील सर्व प्रश्न हे थेट आणि माहितीप्रधानच असतील आणि उतार्‍याच्या एका वाचनाआधारे सोडवता येतील असे नाही. काही विचारपूर्वक प्रश्नांच्या बाबतीत उतारा पुन्हा वाचणे अथवा त्यातील काही भाग पुन:पुन्हा वाचणे गरजेचे ठरते. अशावेळी महत्त्वाचे शब्द वा वाक्यरचना अधोरेखित केल्यास अत्यंत उपयुक्त ठरते. हे सर्व करण्यासाठी परीक्षेत विपुल वेळ नसतो, हे लक्षात घेऊन वाचन व अर्थनिर्णयनाची गती वाढविल्यास सीसॅटचा सर्व पेपर पूर्ण करता येतो. उतार्‍याचा भरपूर सराव हेच यावरील उत्तर आहे. 
     
          उतार्‍यावरील प्रश्नांची तयारी करताना त्यात नेमकेपणा व परीक्षाभिमुखता येण्याकरता प्रत्येक उतार्‍याबाबत काही मूलभूत प्रश्न मनात ठेवून त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्या उतार्‍यात लेखक/लेखिकेने कोणता विषय मांडला आहे, संबंधित विषयाबाबत कोणती भूमिका वा मत मांडले आहे, उतारा लिहिण्यामागे त्याचा हेतू कोणता, उतार्‍यावरील मध्यवर्ती संकल्पना कोणती आणि उतार्‍याला कोणते शीर्षक समर्पक ठरेल, हे प्रश्न प्रामुख्याने विचारात घ्यावेत. या मूलभूत प्रश्नांच्या आधारे कोणत्याही उतार्‍यातील मध्यवर्ती संकल्पना व त्याविषयी लेखनकर्त्यांच्या दृष्टिकोनाचा शोध घेता येतो. 

          उतार्‍यावरील प्रश्नांचे प्रकार
          1) सर्वसमावेशक स्वरूपाचे (Generic Question) -
          अशाप्रकारचे प्रश्न म्हणजे उतारा संपूर्ण वाचल्यानंतर व त्याचा एक परिपूर्ण लिखित नमुना अशा संदर्भात विचार केल्यानंतर सोडविता येणारे प्रश्न. परीक्षेतील उतार्‍यावर हे प्रश्न पुनः पुन्हा विचारले जातात. उतार्‍याचा विषय कोणताही असेल, उतारा कितीही लहान मोठा असेल, तरीदेखील हे प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतात. शक्यतो हे प्रश्न पुढील प्रकारचे असतात -
     
    1)    हा उतारा कोणत्या विषयाच्या मोठ्या लिखाणाचा भाग होऊ शकतो?
     
    2)    उतारा लिहिण्यामागचा लेखकाचा मूळ हेतू कोणता?
     
    3)    उतार्‍यातील मध्यवर्ती संकल्पना कोणती? मध्यवर्तीसंकल्पनेबद्दल लेखकाचा दृष्टिकोन कसा आहे?
     
    4)    उतार्‍याचे योग्य शीर्षक कोणते असावे?
     
    •   वरील प्रश्नांचे एक वैशिष्ट्य असे की, उतार्‍याच्या एकदा केलेल्या वाचनावर अवलंबून या प्रश्नांची उत्तरे देता येतात. मात्र त्यासाठी खूप सरावाची गरज असते. या प्रश्नांची उत्तरे, वाचणार्‍याच्या उतार्‍याविषयीच्या एकंदरीत आकलनात दडलेली असतात. उतारा संपूर्ण वाचल्यानंतर वाचकाच्या आकलनावरून आणि उतार्‍याविषयी तयार झालेल्या मतांमधून हे प्रश्न सोडविता येतात.
     
    •   असे प्रश्न सोडविण्यासाठी उतार्‍याकडे एक स्वतंत्र लिखाणाचा नमुना म्हणून पाहावे. परिणामी असे प्रश्न संपूर्ण उतारा एकदा वाचल्यानंतरही सोडवता येतात. 
     
    •   कोणताही उतारा वाचत असताना, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायचीच आहेत असे गृहीत धरून उतारा वाचावा. यामुळे, आपल्याला उतार्‍याचे आकलन होते आहे की नाही यावर सतत लक्ष दिले जाते व उतार्‍यातील काही भाग समजत नसल्यास जास्त एकाग्रतेने उतारा वाचला जातो. उतार्‍यामध्ये एकंदरीत काय म्हटले आहे, हे समजून घेण्यासाठी प्रश्न मदत करतात.

          2) विशिष्ट माहितीवरील प्रश्न (Specific Question) -
          हे प्रश्न सोडविण्याकरिता उतार्‍यामधील काही भागामधील माहिती पुरेशी ठरते, कारण ते उतार्‍यातील एखाद्या विशिष्ट घटनेच्या अथवा एखाद्या ठरावीक मुद्यांशी संबंधित असतात.  
     
    •   सर्वसमावेशक स्वरूपाच्या आणि ठरावीक माहितीवर आधारित असणार्‍या प्रश्नांमधील मूलभूत फरक समजून घेणे, त्या प्रश्नांसाठी योग्य उत्तराची निवड करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 
     
    •   सर्वसमावेशक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे एका वाचनात देता येऊ शकतात. ठरावीक माहितीवर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मात्र उतार्‍याचा पुन्हा एकदा आधार घ्यावा लागतो. उतार्‍यामध्ये अनेक वेगवेगळे  मुद्दे, वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले असतात. उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, उतार्‍यात नेमकी कुठे दिलेली आहे,  हे समजण्याकरिता उतार्‍याचे संपूर्ण वाचन गरजेचे ठरते. 
     
    •   अशा प्रश्न प्रकारासाठी उत्तम शब्दसंग्रह असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर वाचनाचा वेगही चांगला असायला हवा. वाचनाचा वेग आणि वाचनाशी निगडीत सवयी या गोष्टी सुधारता येतात. त्यासाठी काही नियोजनबद्ध तयारी करण्याची व कष्ट घेण्याची गरज आहे.

          3) शीर्षकासंबंधी प्रश्न -
    •   याप्रकारचा प्रश्न कोणत्याही प्रकारच्या उतार्‍यावर येऊ शकतो.
     
    •   कुठल्याही शब्दसमूहाला ‘शीर्षक’ बनण्यासाठी एका विशिष्ट साच्यात रूपांतरित व्हावे लागते. म्हणून शीर्षक यामध्ये अंतर्भूत होऊ शकेल असा पर्याय निवडावा.
     
    •   मध्यवर्ती संकल्पना अथवा मूळ हेतू या मुद्याचा सर्वंकषपणे आढावा घेणारे शीर्षक निवडावे. 
     
    •   उतार्‍यामधील एखाद्या वाक्यात आलेला शब्दसमूहच शीर्षक असण्याची शक्यता अतिशय कमी असते. 
     
    •   शीर्षकासाठी वापरलेल्या सर्व शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर उत्तर अतिशय काळजीपूर्वक निवडावे. 
     
    •   शीर्षकाचे प्रश्न कायम कठीण स्वरूपाचे असतात. 
     
    4) परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा 
          उतार्‍यावर आत्तापर्यंत कशाप्रकारचे प्रश्न आले आहेत हे लक्षात घेऊन परीक्षेतील उतारे वाचण्याची सवय लावावी. प्रश्नपत्रिकेतील काही उतारे आकाराने लहान आणि अधिक प्रश्न असणारे तर काही उतारे मोठे आणि कमी प्रश्न असणारे असू शकतात. काही क्लिष्ट वा गुंतागुंतीचे तर काही तुलनेने सुलभ असतील अशा प्रकारच्या उतार्‍यांच्या सरावाआधारेच यातील कोणते उतारे आधी सोडवायचे आणि कोणते नंतर हे ठरवावे. यासंदर्भात संबंधित उतारा सोडवण्यास लागणारा वेळ आणि त्यास परीक्षेत निर्धारित केलेले गुण या बाबींचा विचार करावा. 
     
          विविध विषयांवरील नियमित वाचन, त्याविषयी चिंतन व विचार आपली विचारक्षमता व पर्यायाने आकलनक्षमता वृद्धिंगत करेल आणि अशा उतार्‍यांचा सराव आपल्या तयारीत अचूकता व नेमकेपणाची हमी देते. भरपूर सरावाच्या आधारेच आकलनक्षमता विकसित करता येईल. वाचनाबरोबरच टिपणे काढणे वा तयार करणे, उतार्‍यातील मध्यवर्ती मुद्दे शोधणे, महत्त्वाच्या शब्दांच्या शब्दार्थाबरोबरच मथितार्थ शोधण्याची सवय अंगीकृत करणे व उतार्‍यांचा सारांश तयार करणे या पद्धतीचा अवलंब करून आकलनक्षमता वृद्धिंगत करता येते.

          आकलन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी खालील बाबीकडे लक्ष द्यावे -
    1)   वाचनवेग व वाचनकौशल्यांचा विकास करायला हवा. त्यासाठी भरपूर वाचनाची सवय करायला हवी. 
     
    2)   वाचनाशी संबंधित आकलनक्षमतेमध्ये आपल्या पूर्वानुभवाचा म्हणजे पूर्वीच्या वाचनाचा फार उपयोग होतो. परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना समजण्यास त्यामुळे मदत होते. परिच्छेद हा आपल्याला पूर्णत: नवीन असतो, पण पूर्वी भरपूर वाचन केलेलं असेल, तर परिच्छेदातील शब्द अन् वाक्ये नवीन असली. तरी त्यातील मध्यवर्ती कल्पना आपल्या ओळखीची असण्याची शक्यता वाढते. पटापट उत्तरे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. गरजेपुरते वाचण्याची मानसिकता सोडून द्यावी. आपले व्यक्तिमत्त्व चतुरस्र करावे.
     
    3)   परिच्छेदाचे काही महत्त्वांच्या भागांमध्ये मानसिक स्तरावरच विभाजन करावे म्हणजे परिच्छेदाची संरचना आपल्याला नेमकी कळते.
     
    4)   परिच्छेद वाचताना वाक्यातील फक्त महत्त्वाच्या शब्दांखाली अधोरेखन करावे. हे फक्त सरावाच्या सुरुवातीला करावे. नंतर मानसिक स्तरावर महत्त्वाच्या शब्दांची नोंद घ्यावी.
     
    5)   परिच्छेद वाचण्याच्या दोन पद्धती असतात -
          (अ) एका पद्धतीत आधी परिच्छेदाखालील प्रश्न पटकन वाचून नंतर प्रत्यक्ष परिच्छेद वाचला जातो. म्हणजे परिच्छेद वाचताना प्रश्नांचे भान राहते.  
          (ब) दुसर्‍या पद्धतीत आधी परिच्छेद वाचून मग प्रश्नांकडे वळतात. 
     
          सराव करताना या दोन्ही पद्धती वापरून पाहाव्यात व कोणती पद्धत आपल्याला मानवते, ते ठरवावे. युपीएससीद्वारे घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे अवलोकन केले असता असे दिसते की, एखादा परिच्छेद देऊन त्यावरून काय निष्कर्ष काढता येईल, असा एकच प्रश्नही विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाचे उत्तर त्या परिच्छेदात सरळसरळ नसते, तर परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पनेच्या अवलोकनाद्वारे ते आपल्याला शोधायचे असते.

    •   उतार्‍यावरील प्रश्न सोडवण्याची पद्धत -
          दिलेल्या उतार्‍याचे बारकाईने वाचन करून प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. उतार्‍यांमधून माहिती शोधणे इतके या घटकाचे स्वरूप सीमित न राहता उतार्‍याद्वारे लेखकाला कुठला मुद्दा मांडायचा आहे, तो मुद्दा मांडत असताना लेखकाने उतार्‍याची संरचना कशी केली आहे या व अशा अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक असते. त्यासाठी खालील क्रम लक्षात घ्यावा -
     
    1) उतारा वाचन
     
    2) प्रश्न वाचणे
     
    3) उतार्‍याचा आधार घेऊन उत्तर शोधणे.
     
    4) पर्याय वाचणे
     
    5) पूर्ण खात्री असल्यास उत्तर निश्चित करणे.
     
    6) उतारा आणि पर्याय यांची पडताळणी करणे.
     
    7) उत्तर निश्चित करणे. 
     
    •   किमान 1 किंवा 2 प्रश्न तरी प्राथमिक वाचनावर सोडविता आले पाहिजेत. 
     
    •   खूप मोठा आणि 1 व 2 च प्रश्न असणारा उतारा हा स्पर्धापरीक्षेमध्ये सर्वात सुरुवातीला सोडविणे हे वेळेच्या दृष्टीने फारसे योग्य नाही. साधारण मध्यम लांबीचा व किमान 4-5 प्रश्न असणारा उतारा हा दिलेल्या वेळेला योग्य न्याय देऊ शकतो.  
     
    •   उतारा वाचल्यानंतर त्यावरील सर्व प्रश्न उतार्‍याचा पुन्हा आधार न घेता सोडवणे अशक्य असते. 
     
    •   दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ज्या शब्दांमध्ये सुचते त्याच शब्दात पर्याय उपलब्ध असेलच असे नाही. अशावेळेस आपल्याला बरोबर वाटणारे उत्तर पर्यायामध्ये नेमके कोणत्या शब्दात मांडलेले आहे हे शोधून काढायचे असते. येथे या घटकाची काठिण्य पातळी वाढते. 
     
    •   प्रश्नांचे स्वरूप व प्रश्नांची उत्तरे देण्याची पद्धत वेगळी या दृष्टीने, शाळा कॉलेजमधील Unseen Passages आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधील उतार्‍याचे आकलन व त्यावरील प्रश्न  या घटकांमध्ये अनेक मूलभूत फरक आहेत. शाळा कॉलेजपेक्षा काठिण्य पातळी जास्त आहे.
     
    •   ‘लहान उतारे सोडवायला सोपे असतात आणि मोठे अवघड’ हा एक सामान्य गैरसमज आहे.
     
    •   उतारा वाचल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला खरं तर पर्यायाशिवायही देता यायला हवीत. 
     
    •   पर्याय न वाचता उतार्‍यावरील प्रश्नाचे उत्तर देणे - दिलेल्या उतार्‍याच्या साधारण आकलनावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मनात तयार करता यायला हवे. अशाप्रकारे विचार करून उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीचा एक मोठा फायदा आहे. तो म्हणजे, पर्याय वाचून बर्‍याचदा आपला गोंधळ उडतो. बर्‍याचवेळा पर्यायांच्या अर्थाच्या छटा एकसारख्या असतात व त्यांच्यामध्ये असलेला फरक ओळखणे, जर आपल्या मनात उत्तम तयार असेल, तर तुलनेने फारच सोपे जाते. आपल्याला जे योग्य उत्तर वाटत आहे, ते पर्यायांमध्ये कोणत्या शब्दात मांडले आहे, इतकेच शोधावे लागते. 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 423