भारताची लोकसंख्या

  •  भारताची लोकसंख्या

    भारताची लोकसंख्या

    • 31 Jul 2021
    • Posted By : STUDY CIRCLE
    • 7594 Views
    • 18 Shares
     भारताची लोकसंख्या
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”लोकसंख्या भूगोल” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ”भारताची लोकसंख्या” व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (1) : आर्थिक भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
     

    2.5   लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) :

        लोकसंख्या विषयक सांख्यिकी साधने/माहिती सामग्री, घनता व वितरण, लोकसंख्या बदलाचे घटक-जनन दर, मर्त्यता दर, लोकस्थलांतर, जन्मदर, मृत्यू दर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
     भारताची लोकसंख्या
     
    *   लोकसंख्येबाबत भारताची काय स्थिती आहे आहे?
     
    1)  2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17 टक्के आहे. अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांग्लादेश या सर्व देशांची मिळून जेवढी लोकसंख्या होईल त्यापेक्षा अधिक भारताची लोकसंख्या आहे.
    2)  भारताची लोकसंख्या 2011 मध्ये 121 कोटी नोंदवली गेली असली तरी सध्या 2019 मध्ये ही लोकसंख्या 125 कोटीच्या पुढे गेली आहे. सेन्सस ऑफ इंडिया या जनगणना करणार्‍या संस्थेच्या अंदाजानुसार 2021 च्या जनगणनेत भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे जाईल.
     
    *   चीनला मागे टाकणार भारत
    1)  जागतिक पातळीवर सध्या सर्वाधिक लोकसंख्या चीनची आहे तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण भारत 2030 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. चीनची लोकसंख्या सध्या 130 कोटी आहे. भारताच्या तुलनेत चीनचा लोकसंख्या वाढीचा दर कमी असल्याने भारत चीनला मागे टाकेल.
    2)  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक घडामोडी विभागाच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये भारताचा लोकसंख्यावाढीचा दर 1.11 टक्के आहे तर चीनचा 0.39 टक्के म्हणजे भारतापेक्षा निम्म्याहून कमी आहे.
     
    *   लोकसंख्या वाढत असली तरी वाढीचा दर कमी होतोय
    1)  2001 ते 2011 या दशकभरात लोकसंख्या 17.6 टक्के एवढी वाढली. लोकसंख्या वाढीचे हे प्रमाण 1947 पासून सर्वात कमी होते. 1991 ते 2001 या दशकात लोकसंख्येत 21.5 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली होती.
    2)  त्यामध्ये 2011 पर्यंत मोठी घट झाली. दिवसेंदिवस लोकसंख्यावाढीचा वेग भारतामध्ये कमी होताना दिसतो आहे. या घडीला भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 1.1 टक्के आहे तो 2021 पर्यंत 0.9 टक्क्यांवर होईल असा सेन्सस ऑफ इंडियाचा अंदाज आहे.
     
    *   हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्या
    1)  भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येवरून हिंदुत्ववादी संघटना नेहमीच बोलत आल्या आहेत. मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या अधिक राहावी म्हणून हिंदूंनी किमान चार मुलांना जन्म द्यावा असा अनाहूत सल्लाही भाजप नेते साक्षी महाराज यांनी मागे दिला होता.
    2)  हिंदूंच्या लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा मुस्लिमांचा लोकसंख्या वाढीचा दर अधिक आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र ज्याप्रमाणे हिंदूंचा लोकसंख्यावाढीचा दर कमी होत आहे त्याचप्रमाणे मुस्लिमांमधील लोकसंख्या वाढीचा दरही कमी होत आहे. दिवसेंदिवस हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्यावाढीच्या दरातील अंतर कमी होत आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
     
    *   उत्तर विरुद्ध दक्षिण
    1)  भारताच्या लोकसंख्येत सर्वाधिक वाटा हा उत्तरेकडील राज्यांचा आहे. राज्यांनुसार पाहिले तर लोकसंख्येत सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा असून या राज्याची लोकसंख्या 19 कोटी आहे. टक्केवारीत पाहिले तर 2011 च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशचा वाटा 16 टक्के, बिहारचा वाटा 8 टक्के, मध्य प्रदेशचा वाटा 5 टक्के तर राजस्थानचा वाटा 5 टक्के आहे.
    2)  तुलनेत दक्षिणेतील राज्यांचा वाटा कमी असून या राज्यांचा लोकसंख्या वाढीचा दर कमी असल्यानं दक्षिणेतील राज्यांचा लोकसंख्येतील वाटा दिवसेंदिवस कमी होत असून उत्तरेचा वाटा वाढत चालला आहे.
     
    *   मुलींचं प्रमाण कमी होतंय
    1)  भारताच्या लोकसंख्येत मुला-मुलींचे असंतुलित प्रमाण हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. काही राज्यांमध्ये तर हा फरक खूपच मोठा आहे. गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण वाढत चालले आहे आणि मुलांच्या तुलनेत मुलींची आकडेवारी कमी होत चालली आहे.
    2)  2011 च्या जनगणनेनुसार एक हजार मुलांमागे 914 मुली आहेत. तर 2001 मध्ये एक हजार मुलांमागे 927 मुली होत्या. 2011 चा आकडा हा 1947नंतर सर्वांत जास्त असमानता दाखवणारा आकडा ठरला आहे. स्त्रीभ्रूण हत्या हे एक महत्त्वाचे कारण यामागे मानले जाते.
     
    *   वाढती लोकसंख्या विकासाला उपयुक्त ठरेल
    1)  लोकसंख्या वाढ ही भारतापुढचे आव्हान असले तरी या काळ्या ढगांना एक चंदेरी किनारही आहे. भारतीय लोकसंख्या ही प्रामुख्यानं तरूण लोकसंख्या आहे. म्हणजे भारताच्या वाढत्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण मोठे आहे. चीनच्या तुलनेत पाहिल्यास भारताची लोकसंख्या खूपच तरुण आहे.
    2)  भारतीय लोकसंख्येचे मेडियन एज म्हणजे लोकसंख्येच्या वयाचा मध्यबिंदू 26.7 वर्षं आहे तर चीनचा 37 वर्षं आहे. तरुणांची ही मोठी फौज देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकते.
     
    *   पण आव्हानं मोठे आहेत
    1)  तरुण लोकसंख्या ही चंदेरी किनार असली तरी या तरुण हातांना काम देणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे लोकसंख्या केवळ तरूण असून उपयोगाचं नाही, तर त्या लोकसंख्येला रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे. नाही तर ही वाढती लोकसंख्या मोठीच समस्या होऊन जाते. अधिक प्रमाणात लोकांना अन्नधान्य पुरवणे, मोठ्या लोकसंख्येमुळे व्यवस्थेवर येणार ताण, प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत संधीचे अत्यल्प प्रमाण ही आव्हान मोठी ठरतात.
     
    *   लोकसंख्या आणि स्थलांतर
    1)  वाढती लोकसंख्या स्थलांतरावरही मोठा परिणाम टाकत असते. ज्याठिकाणी रोजगारांच्या संधी कमी आहेत त्याभागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. हे स्थलांतर प्रामुख्यानं दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे या महानगरांमध्ये होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं रोजगाराच्या संधी कमी आहेत.
    2)  त्यामुळे या राज्यांमधून रोजगारासाठी बाहेर जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. महानगरांमध्ये स्थलांतरामुळे वाढणार्‍या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालले आहे. पर्यायाने वाढत्या लोकसंख्येचा मोठा ताण महानगरांच्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. यातून स्थानिक भूमीपुत्र विरूद्ध स्थलांतरित असा वाद होऊन तो राजकीय मुद्दा होतानाही दिसत आहे.

Share this story

Total Shares : 18 Total Views : 7594