लोकसंख्याशास्त्र व माल्थस

  • लोकसंख्याशास्त्र व माल्थस

    लोकसंख्याशास्त्र व माल्थस

    • 29 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 691 Views
    • 0 Shares
     लोकसंख्याशास्त्र व माल्थस
     
    *   कोविड-१९ मुळे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम झालेला आहे. त्याचप्रमाणे कोविड-१९ने विज्ञानाच्या प्रत्येक शाखेला आव्हान दिले असून, प्रस्थापित सर्व सिद्धान्तांची पुनर्पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण केली आहे. लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्याविज्ञान (पॉप्युलेशन सायन्स) हीसुद्धा विज्ञानाचीच एक शाखा आहे. या शाखेमध्येसुद्धा कोविड-१९ने प्रचलित सर्व सिद्धान्तांना आव्हान दिले आहे. करोनाकाळात लोकसंख्येचा आकार, वितरण आणि रचनेत झालेल्या बदलांमुळे जागतिक पातळीवर प्रजनन (फर्टिलिटी), मृत्यू (मोटलिटी)आणि स्थलांतरण (मायग्रेशन) या लोकसंख्याशास्त्राच्या तीन मूलभूत स्तंभांवर परिणाम झाला असल्याचे संशोधकांनीदेखील स्पष्ट केले आहे. आर्थिक, सामाजिक आणि प्रादेशिक नियोजनाचे मूलभूत साधन म्हणून गणल्या जाणार्‍या लोकसंख्येचे प्रक्षेपण (पॉप्युलेशन प्रोजेक्शन) किंवा अंदाजांवरसुद्धा कोविड-१९चा मोठा प्रभाव पडला आहे.
     
    *   आजपर्यंत लोकसंख्याशास्त्र क्षेत्रातील विविध शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी लोकसंख्याविषयक विविध सिद्धान्त देऊन लोकसंख्येतील बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ‘माल्थसचा लोकसंख्या सिद्धान्त’ हा वरचढ ठरलेला, सर्वाधिक लोकप्रिय झालेला आणि तेवढीच टीकाही झालेला सिद्धान्त आहे. थॉमस रॉबर्ट माल्थस (सन १७६६-१८३४) हा एक सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि लोकसंख्याशास्त्रज्ञ होता. सन १७९८ मध्ये, माल्थसने ‘अ‍ॅन एसे ऑन दी प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन’ या पुस्तकातून लोकसंख्याविज्ञानातील एक सिद्धान्त मांडला; त्यास ‘माल्थसचा लोकसंख्या सिद्धान्त’ म्हटले जाते. या सिद्धान्ताद्वारे त्याने लोकसंख्येचा भार सहन करण्याच्या पृथ्वीच्या क्षमतेविषयी अनुमान मांडले आहे. त्याने असा युक्तिवाद केला की, जर दोन विरोधी लिंगांमधल्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढत राहिली, तर ती इतकी वाढेल कीअन्नधान्यांचा तुटवडा निर्माण होईल. माल्थसच्या मताप्रमाणे, कोणत्याही देशाची लोकसंख्या नेहमी भूमितीय गुणोत्तराने वाढत जाते (उदाहरणार्थ : २, , , १६, ३२, ६४, १२८), तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अशा अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणितीय गुणोत्तरानेच वाढू शकते (उदाहरणार्थ : २, , , , १०). सोप्या शब्दांत सांगायचे तर, लोकसंख्यावाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे दोन प्रकारची नियंत्रके सांगतो. पहिली सकारात्मक नियंत्रके (माल्थसीअन आपत्ती) आणि दुसरी म्हणजे प्रतिबंधात्मक नियंत्रके. ही दोन्ही नियंत्रके मिळून वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे काम करतात. सकारात्मक नियंत्रके ही युद्ध, दुष्काळ, रोग, उपासमार, साथीचे रोग आणि इतर नैसर्गिक आपत्ती असू शकतात. ही सकारात्मक नियंत्रके मानवी मृत्युदर वाढवण्यास जबाबदार राहतील व त्यामुळे लोकसंख्या कमी होईल. लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनांमधील समतोल पुनस्र्थापित होईल. याउलट, प्रतिबंधात्मक नियंत्रके म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी मनुष्याने केलेले प्रयत्न. जसे की, गर्भनिरोधकांचा वापर, ब्रह्मचर्याचे पालन, लग्नयोग्य वय वाढवणे, लग्न आणि पहिले मूल यांतील अंतर वाढवणे, कुटुंबनियोजन, इत्यादी.
     
    *   मात्र, माल्थसने आपल्या सिद्धान्तात ‘तंत्रज्ञानातील बदल’ आणि ‘समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थापनेत होणारे परिवर्तन’ या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. कृषी तंत्रज्ञानातील प्रगती आणि कृषी उत्पादनातील सुधारणा या बाबीसुद्धा त्याने आपल्या सिद्धान्तात पूर्णत: विचारात घेतल्या नाहीत. कोविड-१९ सारखे जागतिक साथीचे आजार तर आपल्याला माल्थसच्या सिद्धान्ताचा पुनर्विचार करण्यास भाग पाडतात. माल्थसने सांगितलेल्या प्रतिबंधात्मक नियंत्रकांची अंमलबजावणी करूनही जागतिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
     
    *   आजघडीला जगात सुमारे आठ अब्ज लोक राहतात, ज्यामध्ये सुमारे १.४ अब्ज योगदान हे केवळ एकट्या भारताचे आहे. अन्नधान्यांच्या उत्पादनातील तांत्रिक प्रगतीमुळे भूक निर्देशांक गेल्या काही वर्षांत कमी होत आहे, परंतु तरीही भारतासह अनेक विकसनशील देशांची भूक निर्देशांकामध्ये दयनीय अवस्था आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेला भारत, जागतिक भूक निर्देशांकामध्ये ९४व्या क्रमांकावर असून येथील लोकसंख्या ‘माल्थसीअन आपत्ती’च्या उंबरठ्यावर आहे, असे कोविड-१९ मुळे उघड होत आहे. २०२०च्या जागतिक भूक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, भारताची १४ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. पाच वर्षांआतील मुलांपैकी १७.३ टक्के मुलांमध्ये वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे, तर ३४.७ टक्के मुलांमध्ये वाढ खुंटणे या समस्या आहेत. या सर्व आकडेवारीवरून कोविड-१९चा भारतावर इतका बिकट परिणाम का झाला, हे लक्षात येते. भूक निर्देशांकाबरोबरच घटणारे सकल राष्ट्रीय उत्पादन आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे संकोचणे हे दारिद्र्याचे सूचक असून याद्वारे कोविड-१९ हा माल्थसचा ‘सकारात्मक नियंत्रक’ ठरत आहे.
     
    *   सकारात्मक नियंत्रके ही केवळ मानवी मृत्युदर वाढवत नाहीत, तर लोकसंख्या वाढीची कारणे- उदा. कृषिक्षेत्रातील प्रगती, औद्योगिकीकरण आदींवरही परिणाम करते. जसे कोविड-१९ मुळे बरेच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. कोविड-१९चा असा सर्व घटकांवर परिणाम होऊन प्रजनन क्षमता कमी होऊ शकते किंवा नाही, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. अनेक शास्त्रज्ञांचा असा तर्क आहे की, पती/ पत्नी किंवा अनेक जोडप्यांना टाळेबंदीमध्ये अधिक वेळ सोबत घालवता आला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जन्मदर वाढण्याची (बेबी बूम) शक्यता आहे. याउलट, बर्‍याच शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, नोकरीची अनिश्‍चितता आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे बरीच जोडपी बाळ न होऊ देण्याचा विचार करत आहेत. याला अनुसरूनच या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाचे संकल्पसूत्र होते : ‘जन्मदर वाढो वा घटो, हक्कआणि पर्याय हेच उत्तर आहे. सर्वांच्या हक्कांना आणि आरोग्याला प्राधान्य देण्यातूनच जन्मदर बदलला जाऊ शकतो.’
     
    *   मात्र, कोविड-१९ हा सकारात्मक नियंत्रक असल्याचेच दिसते. कारण ही महामारी लाखोंच्या मृत्यूस कारणीभूत ठरली असून यामुळे लोकसंख्या आणि संसाधने यांच्यातील गुणोत्तरात समतोल साधला जाईल असे दिसते. कोविड-१९ने लोकसंख्येत, विशेषत: जास्त मृत्युदरामुळे वृद्धांच्या लोकसंख्येत घट होत आहे. कोविड-१९ प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणेसुद्धा बर्‍याच मृत्यूंना कारणीभूत ठरला आहे. जसे वैद्यकीय सेवा मिळविण्यातील असमर्थतेमुळे झालेले मृत्यू, आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध नसण्याने झालेले मृत्यू, मानसिक आरोग्य ढासळल्यामुळे झालेल्या आत्महत्या, इत्यादी. मृत्युदराव्यतिरिक्त, रोगांचा ताण किंवा भार मोजण्याचे प्रमाण असलेल्या ‘डिसॅबिलिटी- अ‍ॅडजस्टेड लाइफ इयर्स’मध्येही कोविड-१९ मुळे वाढ झाली आहे.
     
    *   केवळ कोविड-१९ ही एकमेव घटना नाही, जिने आपल्याला अतिलोकसंख्या आणि अन्नसुरक्षेबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. इतिहासात आपल्याला माल्थसीअन आपत्तीची किंवा सकारात्मक नियंत्रकांची अनेक उदाहरणे आढळून येतात. उदाहरणार्थ :
    (१) सन १३४६-१३५३ या काळात ‘ब्लॅक डेथ’ या नावाने ओळखला जाणारा ‘ब्यूबोनिक प्लेग’ (साथीचा रोग) आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये पसरला होता. मानवी इतिहासात ही सर्वात जास्त मनुष्यहानी करणारी महामारी म्हणून नोंदली गेली आहे.
    (२) बटाटा दुष्काळ : सन १८४५-१८५२ हा कालखंड आयर्लंडच्या इतिहासातील प्रचंड उपासमार व रोगराईचा काळ होता. या विध्वंसक दुष्काळामध्ये सुमारे एक दशलक्ष लोक उपासमारीने मरण पावले आणि दशलक्षाहून अधिक लोकांना देश सोडावा लागला, ज्यामुळे आयर्लंडची लोकसंख्या २०-२५ टक्क्यांनी कमी झाली.
    (३) स्पॅनिश फ्लू : यास १९१८ची इन्फ्लूएन्झा महामारी असेही म्हटले जाते. या महामारीने जगभरातील सुमारे पाच कोटी लोकांचा जीव घेतला. जगाच्या एकतृतीयांश लोकसंख्या या साथीने संसर्गित झाली होती.
    (४) पहिल्या महायुद्धादरम्यान झालेल्या मृत्यूंची संख्या १५-२० दशलक्ष इतकी होती, तर दुसर्‍या महायुद्धात ती ७०-८५ दशलक्ष एवढी प्रचंड होती.
     
    *   अशा घटनांशिवाय पूर, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, त्सुनामी, चक्रीवादळे आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीही अनेक मृत्यूंचे कारण बनतात आणि माल्थसच्या सकारात्मक नियंत्रकाप्रमाणे लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्यातील संतुलन पुन्हा स्थापित करतात.
     
    *   जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी १९८१ मध्ये म्हटले होते की, ‘माल्थसचे भूत अजून पुरले गेलेले नाही.’ कोविड-१९च्या उद्रेकानंतरही आपण या वाक्याचा पुनरुच्चार करू शकतो!
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १८  जुलै २०२१ / प्रगती उबाळे, बादल थुल
    (लेखिकाद्वय ‘आंतरराष्ट्रीय लोकसंख्याविज्ञान संस्था, मुंबई’ येथे संशोधक आहेत.)

Share this story

Total Shares : 0 Total Views : 691