मानसिकता

  •  मानसिकता

    मानसिकता

    • 21 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 340 Views
    • 0 Shares
     मानसिकता
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात मानवी हक्कया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात मानसिकताव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.  मानवी हक्क
    २.४ युवकांचा विकास - समस्या व प्रश्‍न (बेरोजगारी, असंतोष, अंमलीपदार्थाचे व्यसन, इत्यादी) शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम - आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामुहिक साधने, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड आंथ्रप्रेन्युरशिप, राष्ट्रीय युवा धोरण.
    २.७ वयोवृध्द लोकांचे कल्याण : समस्या व प्रश्‍न - शासकीय धोरण - कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि वयोवृध्दांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
     मानसिकता
     
    *   अशा घटना घडल्यानंतर केवळ त्या व्यक्तीचा खासगी प्रश्न नसून अनेक समजुती बदलण्यासाठीचे संकेत आहे ते संकेत समजून आपण सर्वांनी मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नव्हे तर त्याच्याशी आपले जीवनमूल्य आणि जीवन गुणवत्ता निगडित आहे. त्याकडे गंभीर विचार आणि वाटचाल करणे गरजेचे आहे.
     
    *   ‘तरुण मुलाची हत्या करून आत्महत्या केली’, मुलीला विषारी इंजेक्शन देऊन आत्महत्या केली’ अशा धक्कादायक बातम्या ऐकायला मिळाल्या की जे पालक स्वत:चा जीव पणाला लावून मुलांना वाढवतात त्यांनीच तरुणपणी त्या मुलांच्या जीवावर का उठावे, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. पालकांची ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
     
    *   ज्येष्ठांमध्ये अतिनैराश्याची अनेक कारणे असतात. स्वभाव दोष, मद्य आणि इतर अमली पदार्थांचे सेवन, आयुष्यातील सतत ताणतणाव किंवा नुकताच घडलेला वाईट प्रसंग याला करणीभूत असतो. मेंदूतले आजार, शरीरातील रासायनिक बदल हे सुप्त रूपांनी अतिनैराश्याची लक्षणे निर्माण करू शकतात. वृद्ध वयामध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असले तरी त्याची तीव्रता जास्त असते. नैराश्य महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. अतिनैराश्य अनुभवताना आत्महत्येचे विचार ज्येष्ठांमध्ये वारंवार येतात. हे विचार ते इतरांशी व्यक्तही करतात, पण आपण वयाचा थकवा आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. अशाप्रसंगी जर मुलांशी त्यांचे संबंध विसंगत असेल तर त्याचा अपाय होतो. ज्येष्ठ व्यक्ती विचार करते की आपला जर मृत्यू झाला तर आपले अपत्य या जगात राहू शकत नाही, त्याच्यावर विविध संकटे येऊ शकतात. या दृष्टिकोनातून ही वाईट परिस्थिती टाळण्यासाठी ते त्यांना संपविण्याचे ठरवितात. पालकांशी अतिजवळीक आणि परावलंबन असल्यामुळे मुले प्रतिकार करत नाहीत आणि दुर्दैवी प्रसंग घडतात.
     
        मूल कमकुवत असताना -
     
    *   आपले मूल सर्व विषयांत पुढे गेले पाहिजे, असे प्रत्येक पालकाला वाटते. नाही तर निदान स्वत:च्या पायावर उभे राहून आपले जीवन जगू दे, अशी त्यांची आशा असते. पण काही शारीरिक, मानसिक उणिवांमुळे असे घडू शकत नाही. तेव्हा पालकांना ‘आम्ही किती पुरे पडू हा प्रश्न पडतो. गंभीर मानसिक आजारांनी त्रस्त मुलांचे आई-वडील नेहमीच विचारतात, ‘डॉक्टर आम्ही असेपर्यंत ठीक आहे. पुढे काय याचीच काळजी वाटते.’ विभक्त कुटुंब पद्धतीत आतेभाऊ, मामेभाऊ  तसेच या मुलांचे सख्खे बहीण-भाऊ सुद्धा क्वचितच असतात. खासगी किंवा सरकारी संस्थांची लोकांना भीती असते. तिथे आपल्या पाल्याची नीट काळजी घेतली जाईल ना? त्याचे कसले हाल किंवा शोषण तर होणार नाही? आणि तिथे राहिल्याने त्याला आपण टाकून दिले असे तरी वाटणार नाही ना,” असे प्रश्न सतत मनात येत असतात.
     
    *   मुलांमधील कमकुवतपणा जास्त गंभीर मानसिक आजार किंवा गतिमंदत्वामुळे आणि कमी प्रमाणात शारीरिक अपंगत्वामुळे आढळून येतो. माझ्या अनुभवामध्ये मुलांच्या आजाराकडे दोन टोकाचे दृष्टिकोन दिसून येतात- पहिले म्हणजे त्या मुलाबद्दल तिरस्कार, दुर्लक्ष करणे आणि दुसरे म्हणजे इतर सर्व गोष्टी सोडून त्या मुलाच्या मागे आपले जीवन आणि सर्व काही लावून टाकणे. पहिल्या उदाहरणाप्रमाणे झाले तर मूल आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दंगा-गोंधळ घालते आणि त्याला गप्प करण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात. मुलाला पूर्ण वेळ शाळेत किंवा संस्थेत भरती करून त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. असे मूल शरीराने लहान असेपर्यंत नियंत्रणात ठेवू शकतो, पण वाढीच्या वयात त्याची शक्ती वाढल्यावर ते कुटुंबावर आणि समाजावर आव्हान बनत राहाते. त्या उलट मुलाची अति सेवा करून त्याला स्वत:वर अवलंबून ठेवणे आणि कमी क्षमता लक्षात न घेता घरातील सर्व निर्णयसुद्धा ती मुले घेत असतात. एका प्रसंगी मी असे पाहिले की, रुग्ण मुलाने हट्ट करताना आपल्या अभियंता असलेल्या भावाला बेदम मारहाण केली, त्या वेळी आई-वडिलांनी त्याची बाजू घेऊन ‘तूच त्याला समजून घे’ असे सांगितले आणि अशीच वारंवार मारहाण करण्याची सवय मुलाला लागली. इथे खरे तर मुलाच्या कमकुवतपणाचा काहीही संबंध नाही. चुकीची वृत्ती आणि संगोपन यांमुळे या मुलाचे काही काळानंतर ओझे होते आणि मग ते प्रश्न सोडवणे खूपच कठीण होते.
     
        पालकांची मानसिकता -
     
    *   काही मुले सर्वसाधारण तर काही मुले प्रतिभाशाली असतात. पण पालक त्यांना सकारात्मक वागणूक देत नाहीत. हल्लीच्या काळी ‘आम्ही आमच्या मुलासाठी काय-काय करतो पाहा’ अशी स्पर्धाच असते! मुलांना वस्तू पुरवणे, त्यांची सर्व कामे स्वत: किंवा नोकरांकडून करून घेणे यातून सतत त्यांना जपले जाते. ती मुले भौतिकवादी आणि भावनात्मकरीत्या परावलंबी होतात. काही पालक खूप आक्रमक असतात. त्यामुळे मुले त्यांना घाबरूनच असतात आणि तेही एक प्रकारचे परावलंबन बनून जाते.
     
        शेवटी असे घडते -
     
    *   वेगवेगळ्या कारणांमुळे पालक आणि मूल यांचे नाते घडत असते. त्यात मुख्यत: मुलाचे पालकावर भावनिक अवलंबन वाढत जाते. यामध्ये जर पालक काही कारणाने अतिनैराश्याला बळी पडले, तर ही संवेदना मुलामध्येही येते. कधी नैराश्याची संवेदना नसली तरीही आपल्या पालकांबद्दलची जवळीक आणि सहानुभूतीमुळे त्यांच्या विचारांशी सहमती मुले करतात. ही मुले सहमत होतात.
     
        काय करावे?
     
    *   हे टाळण्यासाठी खूप काही करता येते. पण ते सर्व करण्यासाठी मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि मानसोपचार याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा आहे. आपल्यानंतर मुलाचे काय, हा प्रश्न सोडवण्यासाठी समाज आणि सरकारने काही तरतुदी केल्या आहेत. मुलांच्या प्रश्नांसाठी समुपदेशन, उपचार घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. मुलांच्या स्वभावानुसार त्यांना मार्गदर्शन कसे करावे हे समजून घेतले पाहिजे. जर आपल्या वागण्याकडे बघून बालरोगतज्ज्ञांनी त्यात बदल करा, असे सांगितले तर त्या सल्ल्याची दखल घेऊन पालकांनी बदलले पाहिजे. आपणहून जमले नाही तर समुपदेशकाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. वेळीच केल्याने पुढचे मोठे त्रास टाळतात.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १३ जुलै २०२१ / डॉ. वाणी कुल्हाळी

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 340