भविष्यातील अन्नस्रोत?

  • भविष्यातील अन्नस्रोत?

    भविष्यातील अन्नस्रोत?

    • 15 Jul 2021
    • Posted By : vaishali
    • 20 Views
    • 0 Shares
     भविष्यातील अन्नस्रोत ?
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आर्थिक व्यवसायया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात भविष्यातील अन्नस्रोत ?” व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (1) : आर्थिक भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
         आर्थिक व्यवसाय -
    *    शेती - शेतीची आधुनिक तंत्रे, शाश्वत शेती

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    भविष्यातील अन्नस्रोत?
     
    *   अनेक पाश्चात्य देशांमध्ये पशुखाद्य व मानवी खाद्यान्नासाठी कीटकांची शेती सुरू करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या या उद्योगात गुंतवणूक करत आहेत. हा उद्योग दरवर्षी वाढत असून सन २०३० पर्यंत ७.९ दशकोटी डॉलरचा होईल, असे मेटिक्युलस रिसर्च या संस्थेने आपल्या अहवालात प्रसिद्ध केले आहे.
     
    *   कीटकांची शेती म्हणजे कीटकांचे प्रजनन करून त्यांची पैदास व संगोपन करणे. आपल्या देशामध्ये उपयुक्त मधमाशा, रेशीम किडे, लाखेचे किडे यांचे पालन करून मध, रेशीम आणि लाख यांसारख्या उपयुक्त वस्तू मिळविल्या जातात. परंतु पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अनेक विविध कीटकांची शेती केली जाते व त्यांच्यापासून विविध घटक मिळवले जातात.
     
    *   कीटकांच्या शेतीसाठी खाद्य किडे (Mealworms), म्हैस किडे (Buffalo worms), कोचिनील किडे (Cochineal), रातकिडे, झुरळे, मेन पतंग (Wax moths), काळ्या सैनिकी माशा, नाकतोडे, वनस्पती ढेकूण (Bugs) व भुंगेरे (Beetle$s) यांसारखे अनेक कीटक वापरले जातात. एकदा का मोठ्या प्रमाणात कीटकांची निर्मिती झाली, म्हणजे प्रथम विविध अवस्थांमधील कीटक गोळा करून, गाळणीत ठेवून, पाण्यात बुडवून स्वच्छ करतात. त्यांच्यावरील सूक्ष्म कचरा, विष्ठा, सूक्ष्मजीव निघून जातात. तत्पूर्वी चार अंश सेल्सिअस तापमानाला एक दिवस हे कीटक अन्नपाण्याविना साठवून त्यांना निष्क्रिय केले जाते. नंतर या कीटकांना पुरेशी उष्णता देऊन त्यांच्या पोटातील सूक्ष्म जिवाणू मारले जातात. त्यामुळे उत्पादन सुरक्षित राहते. हे कीटक वाळवून पाण्याचा अंश काढून टाकल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. त्यांच्यात स्निग्ध पदार्थांचे ऑक्सिडेशन होऊन असंपृक्त मेदाम्लांचे प्रमाण वाढते.
     
    *   या कीटकांपासून प्रथिनयुक्त पशुखाद्य तसेच मानवासाठी सकस खाद्यपदार्थ तयार करतात. कीटकांचा उपयोग औषधे व सौंदर्यप्रसाधनांतही केला जातो. कोचिनील किड्यांपासूनन कार्माइन कोचिनील हा लाल रंग तयार करतात. त्याचा वापर सौंदर्यप्रसाधने, अन्न आणि कपड्यांमध्ये करतात. एक किलो रंग तयार करण्यासाठी एक लाख कीडे लागतात. फ्रान्स हा जगातील सर्वात अधिक कर्माइन रंग आयात करणारा देश आहे. चीनमधील महा झुरळ फार्ममध्ये झुरळापासून पोटदुखीवरील औषधे तयार केली जातात. पुरातन काळापासून माणूस कीटक खात असल्याचे दाखले आहेत. परंतु आधुनिक काळात काही कीटकांची पौष्टिक अन्नामध्ये गणना केली जाते. उदाहरणार्थ पास्तामध्ये रातकिडे दळून घालतात किंवा प्रोटीन पावडर करण्यासाठी त्यांचा वापर करतात. बाजारात पूरक अन्न म्हणून त्याची विक्री होते.
     
    *   कीटक शेतीतून मानवासाठी प्रथिने, जीवनसत्वे, क्षार, फायबर, लोहयुक्त पौष्टिक अन्न मिळते. अनेक ठिकाणी पशुखाद्य म्हणून झुरळे, पतंग, घरमाशा व त्यांच्या अळ्या वापरतात. त्यात भरपूर अमिनो आम्ले असतात. प्रदूषणरहित उच्च प्रतीचे प्रथिन अन्न म्हणून माणूस व इतर प्राण्यांसाठी ते उपयुक्त असते. त्याचप्रमाणे कीटकांपासून मोठ्या प्रमाणात विटॅमिन बी१२, रिबोफ्लाविन व्हिटॅमिन ए व लोह मिळते. इतर पशुधनासाठी भरपूर चारा, खाद्य व जमीन लागते. ते मिथेन, हरितगृह वायूंची निर्मिती करतात. त्यामुळे जागतिक तापमानवाढीला हे प्राणी हातभार लावतात. परंतु कीटक शेतीमध्ये नगण्य प्रमाणात हरितवायूंचे उत्सर्जन होते. त्यांच्या पैदाशीसाठी कमी खर्च येतो. कीटकांना फार कमी खाद्य व जागा लागते. त्यांचे प्रजनन व वाढ वेगाने होते. ते मोठ्या प्रमाणात अंडी घालतात.
     
    *  कीटक शेती शाश्वत असून पर्यावरणाला त्यामुळे बाधा नसते. कीटक हे भविष्यातील शाश्वत अन्नस्रोत ठरतील, असा दावा संयुक्त राष्ट्रांनीदेखील केला आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    ४ जुलै  २०२१ / प्राचार्य डॉ . किशोर पवार

Share this story

Total Shares : 0 Total Views : 20