पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट

  • पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट

    पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट

    • 26 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 28 Views
    • 0 Shares
     पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतीय राजकारणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोरव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ७.  पक्ष आणि हितसंबंधी गट :
        * भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप
        * राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष - विचारप्रणालीसंघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधारमहाराष्ट्रातील प्रमुख हितसंबधी गट

    ८.  निवडणूक प्रक्रिया :
        * निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये
        * लोकसभा व राज्य विधीमंडळासाठी निवडणुका

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर
     
    *   राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. त्याचं श्रेय प्रशांत किशोर यांचंच. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय.   
     
    *   पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून हे काम अनेक वर्षं केलंय. खूप कष्टाचं काम आहे हे. मी माझी बायको आणि मुलाला भेटून महिने लोटलेत. मी माझी कंपनी आयपॅक सोडतो आहे. कंपनीत माझ्याशिवायही अनेक सक्षम सहकारी आहेत. ते सांभाळतील. गेली आठ नऊ वर्षं हेच काम करतोय. पुष्कळ झालं. आता माझं आयुष्य मला कुठे घेऊन जातं ते बघूया.
     
    *   पश्‍चिम बंगालमधे ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधे एमके स्टॅलिन यांना विजय मिळवून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे वेगवेगळ्या टीवी चॅनलवर टिपिकल बिहारी टोनच्या इंग्रजीत हे सांगत होते. त्याने राजकीय वर्तुळात बॉम्बगोळाच पडला. भाजपने बंगालमधे १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी माझं काम सोडेन, अशी प्रतिज्ञा प्रशांत किशोर यांनी केली होती. तसं काहीच घडलं नाही. पण त्यांचं भाकीत खरं ठरूनदेखील त्यांनी विजयाच्या शिखरावर असताना स्ट्रॅटेजी आखण्याच्या कामातून संन्यास घेतलाय. 
     
    *   आजपर्यंत ४४ वर्षांच्या आयुष्यात अशी अनेक वळणं पचवून प्रशांत किशोर स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने आजमावून बघत आलेत. त्यांचं मूळ गाव बिहारमधल्या रोहतास जिल्ह्यात आहे. पण वडील श्रीकांत पांडे डॉक्टर म्हणून शेजारच्या बक्सर जिल्ह्यात जाऊन राहिले. तिथेच प्रशांत किशोर यांचं शिक्षण झालं. सार्वजनिक आरोग्य हा लहानपणापासून जवळून अनुभवलेला विषय घेऊनच त्यांनी करियरची सुरवात केली. संयुक्त राष्ट्रात पब्लिक हेल्थ प्रोफेशनल म्हणून आठ वर्षं काम केलं. आफ्रिकेतल्या चाड या छोट्या देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या कामात योगदान दिलं.
     
    *   तिथेच काम करत असताना त्यांनी एक संशोधनपर निबंध सादर केला होता. भारतातल्या तुलनेने विकसित राज्यांत मुलांच्या कुपोषणाची समस्या मोठी आहे. गुजरात त्यात आघाडीवर आहे, असं त्यांनी मांडलं होतं. त्यामुळे ते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असणार्‍या नरेंद्र मोदींच्या नजरेत भरले. काही जण म्हणतात की असं काहीच घडलं नाही, तर मुंबईच्या एका बिल्डरने त्यांची मोदींशी गाठ घालून दिली. यातलं खरं खोटं करणं कठीण आहे. पण हे मात्र खरं आहे की ते वयाच्या अवघ्या ३३ वर्षी २०११मधेच टीम मोदीचा भाग बनले. एका वर्षाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या नवनव्या कल्पनांनी ओसंडून वाहणार्‍या सुपीक डोक्याची झलक पहिल्यांदा दिसली. पण एक नम्र, शांत आणि तरीही अतिशय तल्लख असा पडद्यामागे काम करणारा तरुण अशीच त्यांची ओळख होती.
     
    *   पण २०१४मधे नरेंद्र मोदींनी भाजपचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार म्हणून प्रचाराची कमान हाती घेतली तेव्हा प्रशांत किशोर म्हणजेच पीके हे नाव देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनू लागलं. सिटिझन्स फॉर अकाऊंटेबल गवर्नन्स म्हणजे कॅग या नावाने त्यांनी देशभरातल्या २०० प्रोफेशनलना एकत्र आणून एक एनजीओ सुरू केली होती. तिच्यामार्फत मोदींसाठी त्यांनी चाय पे चर्चा, रन फॉर युनिटी, मंथन अशा एकामागून एक धडाकेबाज प्रसिद्धी मोहिमा आखल्या. सोशल मीडियाच्या मदतीने मोदींच्या भव्यदिव्य प्रतिमानिर्मितीचा खेळ रचला. त्या काळात प्रचाराच्या बाबतीत ते मोदींचे सगळ्यात जवळचे सहकारी मानले गेले. २००७मधे पत्रकार करण थापर यांनी घेतलेला एक टीवी इंटरव्यू सोडून मोदी निघून आले होते. तो इंटरव्यू प्रशांत किशोर यांनी मोदींना ३० वेळा पाहायला लावला होता म्हणे.
     
    *   नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात मोठं पद मिळून त्यांच्या डोक्यातले विकासप्रकल्प राबवण्याची संधी मिळेल, असं प्रशांत किशोरना वाटत होतं, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. पण तसं घडलं नाही. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देणार्या अमित शहांचा राजकारणात नव्याने उदय झाला होता. आता तेच पक्षातले सर्वात यशस्वी पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट होते. प्रशांत किशोर यांचे पंख कापण्याचं काम सुरू झालं. परिणामी ते भाजपपासून वेगळे झाले. कॅग या त्यांचाय एनजीओची पुनर्रचना करत त्यांनी आयपॅक म्हणजे इंडियन पोलिटिकल ऍक्शन कमिटी या कंपनीची सुरवात केली.
     
    *   भाजप सोडल्यानंतर त्यांची पहिली असाइनमेंट होती बिहार निवडणूक. भाजपच्या विरोधात नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी एकत्र येऊन महागठबंधन उभारलं होतं. त्याची रणनीती प्रशांत किशोर आखत होते. अमित शहांच्या प्रचंड मोठ्या निवडणूक यंत्रणेला अंगावर घेत त्यांनी महागठबंधनला यश मिळवून दिलं. पुढच्या वर्षी पंजाब विधानसभेत त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी काँग्रेसला मोठं यश मिळवून दिलं. ही घोडदौड सुरू असताना उत्तर प्रदेशाने त्यांना ब्रेक लावला. तिथे ते काँग्रेसचे सल्लागार होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत ३०० प्लस जागा जिंकल्या आणि काँग्रेस अवघ्या सात जागांवर रखडली.
     
    *   या काळात त्यांच्यासोबत काम करणारा त्यांचा महाराष्ट्रातला एक सहकारी कोलाजशी बोलताना म्हणाला, ‘निवडणूक म्हटलं की पीकेंचा उत्साह प्रचंड असतो. पीकेंना कोणत्याही पक्षाशी किंवा विचारधारेशी घेणंदेणं नसतं. पण त्यांना एक प्रभावी नेता लागतो. ज्याच्यामार्फत ते आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात. असा नेता त्यांना भेटला, तेव्हाच ते यशस्वी झालेत. काँग्रेसमधे तसं कुणीही नव्हतं. त्यामुळे प्रियांका गांधींना मैदानात उतरवून आम्ही दिलेला १४ कलमी कार्यक्रम प्रत्यक्षात आलाच नाही.’
     
    *   यादरम्यान प्रशांत किशोर यांनी दोन यशस्वी निवडणुकांची आखणी केली. २०१९मधे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला तर २०२०मधे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. दिल्लीत तर त्यांचा सामना केंद्रीय गृहमंत्री झालेल्या अमित शहांशी झाला. पण ते या प्रचारात अगदी शेवटच्या टप्प्यात उतरले होते. २०१९मधेच विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं होतं. आदित्य ठाकरे यांना राज्यस्तरीय नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न बर्यापैकी यशस्वी झाला. 
     
    *   त्यानंतर आता २०२१च्या विधानसभा निवडणुकांत प्रशांत किशोर पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून प्रकाशात आले आहेत. तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या द्रमुकसाठी त्यांचं काम तुलनेनं सोपं होतं. पण कोणतीही निवडणूक सोपी नसते, हे त्यांचं त्यावरचं स्पष्टीकरण योग्यच होतं. या अतिशय गुंतागुंतीची समीकरणं असलेल्या राज्यात करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतरची ही निवडणूक एका नेतृत्वाच्या पोकळीत लढली गेली. त्यात एमके स्टॅलिन यांना राज्याचं सर्वोच्च नेतृत्व म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान प्रशांत किशोर यांनी यशस्वी पार पाडलं.
     
    *   पश्‍चिम बंगालमधे ममता बॅनर्जींसाठी तर त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. मोदी-शहांच्या प्रत्येक हल्ल्याला त्यांनी प्रतिहल्ल्याने उत्तर दिलं. ममता बॅनर्जींनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला होता. त्यामुळे तृणमूलमधले अनेक नेते नाराज होते. काहींनी तर पक्ष सोडताना प्रशांत किशोर यांना दोषी ठरवलं. पण दीदी आणि पीके ही टीम भक्कम राहिली. त्यांनी फार मोठा विजय मिळवला. धार्मिक ध्रुवीकरण आणि राक्षसी प्रचारयंत्रणेला हरवता येतं, हे दाखवून दिलं.
     
    *   गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाला निवडा, असं नितीश कुमारांना सांगणार्‍या प्रशांत किशोर यांनाही अनेकजण याच मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजर्यात उभं करतात. एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाला पंतप्रधान बनवण्याचं श्रेयही त्याच्या नावावर आहे. पण त्याचवेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सर्वाधिक वेळा हरवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. या बाबतीत देशातला एकही नेता त्यांच्या जवळपासही फिरकत नाही.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    २१ जून २०२१ / सचिन परब

Share this story

Total Shares : 0 Total Views : 28