कृत्रिम रेतन

  • कृत्रिम रेतन

    कृत्रिम रेतन

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 555 Views
    • 0 Shares
     कृत्रिम रेतन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात विज्ञान-तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनासाठी लिंगवर्गीकृत वीर्यमात्रांचा वापरव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

           राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.४.८  जैवनैतिकता - आरोग्यसेवेत जैवनैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, प्रत्यारोपण तंत्रज्ञान.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    कृत्रिम रेतनासाठी लिंगवर्गीकृत वीर्यमात्रांचा वापर 
     
    *   लिंगवर्गीकृत वीर्यमात्रांचा वापर एकदा कालवड किंवा पाडी जन्मल्यानंतर आपण तिचा आहार किंवा व्यवस्थापन यामध्येच सुधारणा करू शकतो; परंतु तिच्या अनुवांशिकतेमध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही. दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी शेतकर्‍याच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यामध्ये कृत्रिम रेतनापासून जास्तीत जास्त कालवडी मिळाव्यात, त्यांच्यापासून अधिक दूध मिळावे, त्या दुधाचे फॅट व एसएनएफचे प्रमाण चांगले असावे, यांचा समावेश होतो.
     
    *   १७८० मध्ये  कृत्रिम रेतनाद्वारे पशुपैदास करण्यास प्रथम इटली या देशामध्ये सुरुवात करण्यात आली. त्यावेळी स्पॅलान्झानी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम कुत्र्यांमध्ये कृत्रिम रेतनाद्वारे पैदाशीचा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला.
     
    *   १९८० च्या दशकात महाराष्ट्रामध्ये गायी-म्हशींमध्ये लिक्विड सिमेन वापरून कृत्रिम रेतनास  सुरुवात करण्यात आली.
     
    *   १९८४ मध्ये फ्रोजन सिमेन वापरास सुरुवात झाली. त्यामुळे सर्वोत्कृष्ट वळूंचे वीर्य द्रवनत्र पात्रांमध्ये वाहतूक करणे सुलभ झाले तसेच ते वीर्य अनेक वर्षे साठवून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यभरातील गायी-म्हशींना उत्कृष्ट वळूंचे वीर्य वापरून कृत्रिम रेतनास सुरुवात करण्यात आली.
     
    *   राज्य शासनाने पुणे, औरंगाबाद व नागपूर या तीन ठिकाणी गोठित वीर्य प्रयोगशाळा स्थापन केल्या. त्यामध्ये दरवर्षी सरासरी ३० ते ३५ लक्ष वीर्यमात्रा तयार करण्यात येतात. कृत्रिम रेतनाच्या या सर्वदूर प्रसारामुळे राज्यात काही भागात दुधाचा धंदा मोठ्या प्रमाणावर विकसित झाला व त्यायोगे शेतकर्यास स्वयंरोजगार व आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. परंतु, याकरिता जे वीर्य वापरण्यात येत आहे त्यामुळे निसर्ग नियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरे जन्मतात.
     
    *   २०१७ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये प्रजननक्षम गायी-म्हशींची एकूण संख्या ८९.०४ लक्ष असून, यापैकी दरवर्षी साधारणत: २२ ते २५ लक्ष पैदासक्षम गायी-म्हशींमध्ये सरासरी एकूण ४७ ते ४८ लक्ष कृत्रिम रेतने करण्यात येत आहे. या कृत्रिम रेतनांपासून दरवर्षी सरासरी १२ ते १३ लक्ष वासरांची पैदास होते.
     
    *   ४ मार्च, २०१५ पासून महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने, शेतीकामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणार्‍या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत आहे.
     
    *   नर वासरांची पैदास न्युनतम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने पारंपरिक वीर्यमात्रांऐवजी लिंगनिदान वीर्यमात्रा या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केल्यास, त्यापासून जवळपास ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
     
    *   लिंगनिदान केलेल्या वीर्यमात्रांची सरासरी किंमत रू.१,००० ते १,२०० प्रती लिंगनिदान वीर्यमात्रा एवढी जास्त असल्याने, तसेच, निश्‍चित गर्भधारणेसाठी सरासरी ३ कृत्रिम रेतने करावी लागत असल्याने पशुपालकांमध्ये त्याबद्दल उत्साह नव्हता. हे तंत्रज्ञान जगामध्ये केवळ दोन कंपन्यांकडे उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमत जास्त होती.
     
    *   पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने लिंगनिदान केलेल्या वीर्यमात्रा खरेदीसाठी जागतिक इच्छापत्रांद्वारे (Global Expression of Interest) अंतिम केलेल्या रु. ७५० प्रतिलिंगनिदान वीर्यमात्रा या दरास अंतिमत: वाटाघाटी करून रु. ५७५ प्रतिवीर्यमात्रा या दराने GENUS BREEDING INDI- PVT.LTD (ABS INDIA) जिनस ब्रीडींग इंडिया (अ‍ॅब्स इंडिया) यांच्याकडून खरेदी करून ५ वर्षांत एकूण ६,८०,००० रेतमात्रांचा वापर राज्यातील शेतकरी/पशुपालकाच्या दारात गायी-म्हशींना कृत्रिम रेतनासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार्या कृत्रिम रेतनाद्वारे जवळपास ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची (कालवडी) निर्मिती होऊन भविष्यात राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार  आहे.
     
    *   दुग्ध व्यवसायामध्ये दूध उत्पादनावर परिणाम करणार्‍या घटकांमध्ये ६० टक्के वाटा गायी/म्हशीच्या अनुवांशिक गुणधर्माचा असून, २० टक्के परिणाम चारा व त्याच्या गुणवत्तेमुळे होतो, तर उर्वरित २० टक्के परिणाम गोठा व व्यवस्थापनामुळे होत असतो. परंतु, सध्या शेतकरी यावर जो खर्च करत आहे त्यामध्ये ६५ टक्के खर्च चारा व पशुखाद्यावर, ३० टक्के खर्च गोठा व व्यवस्थापनावर व केवळ १ टक्का खर्च पैदाशीसाठी वापरण्यात येणार्या उच्च अनुवांशिकतेच्या गुणवत्तापूर्ण वीर्यासाठी करीत आहे.
     
    *   एकदा कालवड किंवा पाडी जन्मल्यानंतर आपण तिचा आहार किंवा व्यवस्थापन यामध्येच सुधारणा करू शकतो; परंतु तिच्या अनुवांशिकतेमध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही. दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी शेतकर्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये कृत्रिम रेतनापासून जास्तीत जास्त कालवडी मिळाव्यात, त्यांच्यापासून अधिक दूध मिळावे, त्या दुधाचे फॅट व एसएनएफचे प्रमाण चांगले असावे, यांचा समावेश होतो. एका लिंगनिदान केलेल्या वीर्यमात्रेची किंमत रु.५७५ असून, त्यापैकी रु.२६१ केंद्र शासनाचा हिस्सा, रु.१७४ राज्य शासनाचा  हिस्सा असून, उर्वरित रु.१४० पैकी रु.१०० दूध संघामार्फत व जेथे दूध संघ कार्यरत नाही, अशा ठिकाणी सदरचा खर्च महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या शेतकर्‍याच्या गाय/म्हशीमध्ये लिंगनिदान केलेल्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन केलेले आहे, अशा शेतकर्‍यास उर्वरित रु. ४० अधिक कृत्रिम रेतनासाठीचे शासनास देय असलेले सेवा शुल्क रु. ४१  असे फक्त रु. ८१ अदा करावे लागणार आहेत. म्हणजेच शेतकर्यांना ज्या लिंगनिदान केलेल्या वीर्यमात्रा रु. १,००० ते १,२००  दरांमध्ये उपलब्ध होत/होणार  होत्या, त्या आता रु. ८१ अदा करून उपलब्ध होणार आहेत.
     
    *   राज्यातील सहकारी/खासगी दूध संघांच्या सभासदांकडील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यासाठी संबंधित दूध संघांना लिंगनिदान वीर्यमात्रा मागणीप्रमाणे रु. १८१ प्रतिवीर्यमात्रा या दराने उपलब्ध करून देण्यात येतील. गायी-म्हशींमधील कृत्रिम रेतनापोटी शेतकरी / पशुपालकांकडून कोणत्याही परिस्थितीत प्रतिवीर्यमात्रा रु. ८१ पेक्षा जास्त सेवा शुल्क आकारणी दूध संघांना करता येणार नाही.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    १९ जून २०२१ / डॉ. धनंजय परकाळे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 555