राजमाता जिजाऊ

  • राजमाता जिजाऊ

    राजमाता जिजाऊ

    • 19 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 312 Views
    • 0 Shares
    राजमाता जिजाऊ
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात मराठ्यांचा इतिहासया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात राजमाता जिजाऊव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास

        राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    *   मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    १७ जून : राजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन  
     
    *   ६ जून १६७४ ला झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बरोबर बाराव्या दिवशी म्हणजे १७ जून रोजी जिजाऊ अनंतात विलीन झाल्या. रयतेसाठी त्यांनी आपला शिवबा या मातीला दिला होता.. असा शिवबा, ज्याचं अस्तित्व कितीही वर्षे निघून गेली तरी काळाच्या ओघात मिटणारे नव्हते. यासाठी जिजाऊंना खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जिजाऊंनी जो संघर्ष केला त्याला इतिहासात तोड नाही.
     
        अष्टपैलू व्यक्तिमत्त्व -
     
    *   जिजाऊंचे चरित्र मांडताना केवळ महान माता म्हणून त्यांची थोरवी वर्णन करणे म्हणजे केवळ एकाच पैलूचे रेखाटन करणे होय. जिजाऊ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी आहेत. त्यांचं हे व्यक्तिमत्त्व पुन्हा अभ्यासण्याची आणि त्यांच्या कार्याचा पुन्हा शोध घेण्याची गरज आहे. कवी परमानंदाने’ शिवभारत’मध्ये जिजाबाईंचे फार सुंदर वर्णन केले आहे.’ जिजू: जागर्ति जगतीतले!’ अशी उपाधी देऊन
     
    *   मालोजीराजे यांचे पुत्र शहाजी राजे यांची पत्नी असलेली महासाध्वी, विजयवर्धिनी जिजू (जिजाऊ) ही पृथ्वीतलावर जागृत आहे! अशा शब्दात त्यांनी गौरव केला आहे. शिवरायांच्या वेळी जिजाऊंना लागलेल्या डोहाळ्याचे वर्णन परमानंदाने फार सुंदर केले आहे. ते म्हणतात - पर्वतावर चढून जावे, हत्तींच्या पाठीवर बसावे, वाघांच्या पाठीवर बसावे, सोन्याच्या सिंहासनावर स्थीरपणाने आसीन व्हावे, डोक्यावर शुभ्र छत्र धरले जावे, युद्धकर्मे करावी, शक्ती नावाचे शस्त्र, खड्ग, चिलखत ही युद्धसाधने धारण करावीत, किल्ले जिंकून घ्यावेत, मोठमोठी दाने देण्यात आनंद मानावा असे डोहाळे जिजाऊंना लागले होते. जिजाऊंचे हे डोहाळे पुढील क्रांतीची जणू नांदी होती. ही केवळ कविकल्पना नव्हती हे सिद्ध करणारा अत्यंत महत्त्वाचा पुरावा शिवराय अडीच महिने पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडले असता जिजाऊंनी जे पाऊल उचलले आणि जी भाषा उच्चारली ती या कृतीत दिसून येते.
     
    *   जिजाऊंना माहेराहून पण संपन्न वारसा लाभला होता. जाधवांच्या प्रसिद्ध कुळातील मातब्बर सरदार लखुजीराव जाधव आणि अतिशय करारी व्यक्तिमत्त्वाच्या म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊ जन्मल्या. १२ जानेवारी १५९८ रोजी पौष पौर्णिमेला सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. तेव्हा लखुजीरावांनी हत्तीवरून साखर वाटली होती आणि मुख्य म्हणजे मुलगा-मुलगी असा भेद न करता जिजाऊंना तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारी चे शिक्षण दिलं होतं. लखुजीरावांनी ज्या पद्धतीने जिजाऊंना घडवले ती पद्धत, ते संस्कार प्रत्येक वडिलांनी मुलीवर करण्याची गरज आहे.
     
        निर्माणक्षम जिजाऊ -
     
    *   ज्यावेळी जिजाऊ लहानशा शिवबाला घेऊन पुण्याला आल्या तेव्हा मुरार जगदेवाने पुणे जहांगिरीवर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि ही भूमी जो कुणी कसेल त्याचा निर्वंश होईल अशी अफवा पसरवून टाकली. अशा अफवांना भीक घालणार्‍या जिजाऊ नव्हत्याच मुळी. त्यांनी बुद्धी वापरली आणि रयतेलाच प्रश्न विचारले, ’भूमी कधी शाप देते का? ती तर आपली काळी आई. तिची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. घाबरू नका, मी माझ्या शिवबाच्या हातून त्यावर नांगर फिरवते आहे आणि जमीन कसण्याचा शुभारंभ करते आहे. काहीही विपरीत होणार नाही. विश्वास ठेवा.’ अशा तर्‍हेने घालून दिलेल्या भीतीला भीक न घालण्याचे मोठे कार्य जिजाऊंनी त्याकाळी केले. त्यामुळेच या घटनेची नोंद इतिहासात मुरार जगदेवने लोखंडी पहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यात जिजाबाईंनी सोन्याचा नांगर फिरवला अशी आहे.
     
        अंधश्रद्धेला थारा न देणार्‍या -
     
    *   जीवनात कुठल्याही वाईट प्रथा आणि अंधश्रद्धांना जिजाऊने थारा दिलेला नव्हता. तेव्हा सती प्रथा होती. सती जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाई. पण शहाजीराजांनंतर सती न जाता त्यांनी शिवबांना आधार दिला. त्यांच्या आई म्हाळसाबाई आणि सासूबाई उमाबाई या सुद्धा सती गेल्या नव्हत्या. सती प्रथा बंद करणार्‍या या महान स्त्रिया आहेत. रूढी-परंपरांना धुडकावून लावण्याची ताकद आजही फार कमी स्त्रियांमध्ये आहे. सोयराबाईंचा राजाराम पालथा जन्माला आला होता. पालथं मूल जन्माला आलं तर त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे कोणतेही नैसर्गिक संकट येऊ नये म्हणून धार्मिक कर्मकांड केली जात. पण ’ जन्माला आलेलं बाळ ते निष्पाप असतं. कुठलेही धार्मिक विधी करायचे नाहीत. तो निजामशाही पालथी घालेल असे का समजू नये असे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. असं म्हणतात की अंधश्रद्धा स्त्रीच्या पायांनी घरात येतात आणि तिच्या बुद्धीने जिवंत असतात. म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचं काम फक्त स्त्री आणि स्त्रीच मोठ्या प्रमाणात करू शकते. त्याकाळी जिजाऊ त्यांच्या विचारांतून व कृतीतून पावलोपावली अंधश्रद्धांना हादरे देत होत्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून होत्या.
     
        स्त्री सन्मान शिकवणार्‍या जिजाऊ -
     
    *   जिजाऊ या स्त्रियांचा सन्मान करणार्‍या एक संवेदनशील स्त्री होत्या.आपल्या आया-बहिणींची यवनांकडून लुटली जाणारी अब्रू त्यांना पाहवली नाही. त्यांच्या किंकाळ्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यासाठीच त्यांनी स्वराज्याचे बीज शिवरायांच्या मनात पेरले. स्त्रियांवर बलात्कार करणार्‍या आप्तस्वकीयांना सुद्धा अशी शिक्षा की जी बघून कोणी तसे करण्यास धजावणार नाहीत. गरीब शेतकर्‍याच्या तरुण मुलीला उचलून नेणार्‍या रांझ्याच्या पाटलाचे हात कलम करणे असो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाची वागणूक देणे असो किंवा रात्रीच्या वेळी तान्ह्या लेकराच्या ओढीने खडतर बुरूज उतरून लेकराला कवटाळणार्‍या हिरकणीचा साडीचोळी देऊन सन्मान करणे असो आणि त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव देणे असो या सर्वांची बीजं जिजाऊंच्या संस्कारात आढळतात, जिजाऊंच्या सुजाण पालकत्वात दिसतात.
     
        बहुभाषक बहुआयामी जिजाऊ -
     
    *   जिजाऊ बहुभाषक होत्या. संस्कृत भाषेचे ज्ञान सुद्धा त्यांना होतं. म्हणूनच सईबाईंच्या मृत्यूनंतर केवळ दोन वर्षांच्या संभाजींचा त्यांनी फक्त आजी पालकत्व निभावून सांभाळ केला नाही तर संस्कृत भाषेचे असे ज्ञान दिले की वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत ’बुद्धभूषण’ हा राजा व राज्य न्यायनीती वर आधारित विद्वत्ताप्रचुर ग्रंथ लिहिला.
     
        धर्मनिरपेक्ष जिजाऊ -
     
    *   शिवाजी महाराजांच्या सैन्यात महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम सैनिक होते. त्यांनी महाराजांच्या जिवाला जीव देऊन स्वराज्य निर्माणाच्या कार्यात सहकार्य केले. कारण जिजाऊंनी आणि शिवबांनी कधीच हिंदू-मुस्लिम असा भेद केलेला दिसत नाही. जिजाऊंनी मता नावाच्या एका मुसलमान कलावंतिणीच्या म्हातारपणाची अडचण ऐकून तिला दरबाराकडून वेतन देण्याची सोय केली होती. अफजलखानाच्या वधानंतरही शिवाजी महाराजांचा अंगरक्षकांनी खानाचे शीर धडावेगळे केले आणि जिजाऊ साहेबांच्या भेटीसाठी पाठवले तेव्हा जिजाऊंनी ते धड सन्मानपूर्वक एका कोनाड्यात ठेवायला सांगितले आणि ते शीर प्रतापगडाच्या एका बुरूजाखाली दफन करण्यात आले आणि कबर बांधण्यात आली. एवढेच नव्हे तर त्या कबरीतील दिवाबत्तीसाठी नेहमीकरता व्यवस्थाही केली. आजही ते ठिकाण ’अफजलखान बुरूज’ म्हणून प्रसिद्ध आहे.
     
    *   सईबाई चा भाऊ बजाजी निंबाळकर यास जबरदस्तीने मुसलमान बनवले होते. हिंदू धर्मातून बाहेर पडणार्‍या माणसाला धर्ममार्तंडांनी पुन्हा प्रवेश नाकारला होता. अशा परिस्थितीत जिजाऊंनी बजाजींना मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश दिला. एवढेच नाही तर बजाजीच्या मुलाला आपली नात देऊन त्यांना सोयरे बनवून घेतले आणि धर्माच्या नावाखाली तयार केलेल्या केलेले नियम पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे आणि त्यातच मानव जातीचे कल्याण आहे हा संदेश दिला.
     
        न्यायनिवाडा करणार्‍या जिजाऊ -
     
    *   शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर असायचे तेव्हा राज्याचा सर्व कारभार जिजाऊ अतिशय दक्षतेनं सांभाळायच्या. कुणावरही त्या अन्याय होऊ देत नसत. न्यायनिवाडा करताना त्या अतिशय दक्ष असत. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी दिलेला निर्णय सुद्धा त्यांनी फिरवला होता आणि गणो गबाजी तबीब वरील अन्याय दूर केला होता. गणू गबाजीला पुणे परगण्यातील बेहारवडे येथील जमीन इनाम मिळाली होती. काही कारणास्तव शिवाजी महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. तोही सरळ पुण्याच्या लाल महालात जिजाबाईंना कडे न्याय मागण्यासाठी आला. त्याच्यावर अन्याय झाला आहे हे लक्षात आल्यावर सरळ ’चिरंजीव राजेश्री सीऊबाचे खुर्दखताचा उजर न करणे’ असे स्पष्ट शब्दात लिहून त्याला त्याचे इनाम परत केले आणि त्यावर त्यांचा ’जिजाऊ-वलिदा-इ-राजा शिवाजी’ हा फारशी शिक्काही दिलेला दिसतो. पण जेथे अन्याय झालेला दिसताच तेथे जिजाबाई कठोरपणे वागताना दिसतात. त्याचप्रमाणे जेजुरीच्या गुरवाचा निवाडाही जिजाबाईंनी स्वतः केला होता. यावरून जिजाऊ किती न्यायनिष्ठ होत्या हे दिसून येते.
     
        प्रेरणादायी जिजाऊ -
     
    *   खरेच कुठले जीन्स आणि डीएनए असतील जिजाऊं मध्ये? स्वराज्याच्या आणि स्त्री सन्मानाच्या आड येणार्‍यांच्या खांडोळ्या खांडोळ्या करीन अशी परखड भूमिका घेणार्‍या जिजाऊ वज्राहूनही कठीण होत्या. जिजाऊ मूर्तिमंत पौरुष होत्या आजही जिजाऊंच्या चरित्राचे पारायण पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे.कितीही कठीण प्रसंग येऊ देत पण पोथ्यापुराणांचा, कर्मकांडांचा आधार न घेता आपल्या बुद्धी कौशल्यानं उपाययोजना शोधणार्‍या जिजाऊ खरोखर धन्य आहेत. आजही स्त्री अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, बळीराजा आत्महत्या करतोच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुन्हा पुन्हा जिजाऊ आठवाव्या लागतील. जिजाऊंच्या माहेरी, जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघाने जिजाऊ सृष्टी उभारून खूप मोठे काम केलंय. जिजाऊंच्या या प्रेरणास्थळी जाऊन आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास स्मरून त्यानुसार कृती करण्याची आज गरज आहे.जिजाऊंच्या चरित्रावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर पुन्हा एकदा संशोधन होण्याची गरज आहे. नागपुरातील बळिराजा संशोधन केंद्र यासारखे केंद्र याबाबत पुढाकार घेतील आणि सिंदखेड राजाला जाण्यासाठी सर्वांना सोयीची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनही पुढाकार घेईल असा विश्वास वाटतो. जिजाऊंच्या कर्तृत्वाचा पुनर्शोध हा आजच्या स्त्रियांसाठी जीवनाकडे पाहण्याचा एक विशाल आणि क्रांतिप्रवण मार्ग बनू शकतो यात तिळमात्र शंका नाही. जिजाऊंना त्रिवार मुजरा.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    ८  जून २०२१ / डॉक्टर लीना निकम

Share this story

Total Shares : 0 Total Views : 312