कोरोनाची तिसरी लाट

  • कोरोनाची तिसरी लाट

    कोरोनाची तिसरी लाट

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 35 Views
    • 0 Shares
     कोरोनाची तिसरी लाट
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आरोग्यया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात तिसर्‍या लाटेचे भय आणि वास्तवव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.४ आरोग्य -
        भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम. भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा. भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    तिसर्‍या लाटेचे भय आणि वास्तव
     
    *   जगभरात सर्वत्र पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत खूपच नुकसान झाले आहे. ब्रिटनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे तिसर्‍या लाटेची चाहूल लागली आहे. हे लक्षात घेता भारतात लसीकरणाला गती देतानाच पुढील एक वर्ष तरी मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल काय? हा प्रश्न भारतामध्ये सर्वाधिक चर्चिला गेला.
     
        भारतातील पहिली लाट  -
     
    *   भारतात पहिली लाट साधारणपणे एप्रिल २०२० मध्ये सुरू झाली आणि तिचा अत्युच्च बिंदू १७ सप्टेंबर २०२० रोजी होता त्या दिवशी सर्वाधिक ९६,००० कोरोना रुग्ण आढळले आणि ११७० मृत्यू नोंद केले गेले होते. साधारणपणे ऑक्टोबर २०२० पासून ही नवीन संसर्गित कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेली. यालाच लाट ओसरायला सुरुवात झाली, असे म्हटले गेले. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना रुग्णसंख्या दरदिवशी ९००० पर्यंत खाली आली.
     
        भारतातील दुसरी लाट  -
     
    *   मार्च २०२१ पासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढायला सुरुवात झाली आणि ६ मे २०२१ ला आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या (४,१४,००० ) नोंदली गेली, तर सर्वाधिक मृत्यूची संख्या सुमारे ४५५५ ही १८ मे रोजी नोंदली गेली. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत कोरोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत चालली आहे. पहिल्या लाटेत अंदाजे १ कोटी कोरोना रुग्णसंख्या नोंदली गेली तर १,२५,००० मृत्यू नोंदले गेले. दुसर्‍या लाटेचा आजपर्यंतचा विचार केला तर १.९० कोटी कोरोना रुग्णसंख्या नोंदली गेली तर २,३५,००० एवढे मृत्यू नोंदले गेले. दुसर्या लाटेत सलग ६४ दिवस १ लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. अशा स्थितीत जेव्हा सरासरी दररोजची कोरोना रुग्णसंख्या ५००० पर्यंत खाली येईल तेव्हाच खर्या अर्थाने दुसरी लाट संपली, असे म्हणता येईल.
     
        जागतिक परिस्थिती  -
     
    *   जगातील इतर देशांचा म्हणजेे मुखत्वेकरून अमेरिका, युरोपियन देश (इटली, स्पेन, जर्मनी, पोलंड, फ्रान्स आणि इंग्लंड) ब्राझील, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको येथे या दोन्ही लाटांदरम्यान नेमके काय घडले हे पाहूया. कारण या देशांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्वच देशांत भारतसारखीच परिस्थिती पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत होती. याला अपवाद ब्राझीलचा आहे. ब्राझीलमध्ये पहिली किंवा दुसरी लाट अशी काही  नाही तर तो देश अजूनही पहिल्या लाटेतच आहे. ती लाट अद्यापही ओसरलेली नाही. जुलै २०२० पासून तेथील रोजची कोरोना रुग्णसंख्या फारशी बदललेली नाही; मात्र मृत्यूचे प्रमाण जानेवारी २०२१ पासून वाढतच आहे. युरोपमधील पोलंड या देशाची परिस्थिती एकदमच वेगळी झाली. सुरुवातीचे ६ महिने अगदीच नगण्य रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते; मात्र ऑक्टोबर २०२० पासून परिस्थिती एकदमच बदलली आणि एप्रिल २०२१ पर्यंत तिथे मृत्यूचे थैमान सुरू होते. असे काही अपवाद वगळता जगभरात सर्वत्र पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत खूपच नुकसान झाले आहे. साधारणपणे पहिल्या लाटेत अर्थव्यवस्थेचे नुकसान खूप झाले आणि दुसर्या लाटेत मनुष्यहानी खूप झाली. जगभरातील अनेक देशांत हीच परिथिती राहिली.
     
        तिसर्‍या लाटेची चाहूल -
     
    *   जगातील इतर देशांचा विचार करता त्यांच्याकडे दुसरी लाट भारताच्या आधी आली आणि आधी ती कमी झाली. युरोपियन देशांचा विचार करता तिथे जी परिस्थिती असते, त्यासारखीच परिस्थिती ४५ ते ५० दिवसानंतर भारतामध्ये निर्माण होते. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या वेळी हाच पॅटर्न दिसून आला आहे. सध्या अमेरिका आणि युरोपच्या परिस्थितीचा विचार केला तर दुसरी लाट ओसरून परिस्थिती साधारण होत चालली आहे. इंग्लंडमध्ये मात्र तिसर्या लाटेची चाहूल दिसू लागली आहे. गेले दोन महिने नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर असताना अचानक गेल्या दोन आठवड्यांपासून त्यामध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. यामागे कोरोना व्हायरसचा ‘डेल्टा’ हा नवा व्हेरियंट कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच संपूर्ण इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत नसून काही भागामध्येच तिची वाढ मर्यदित दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये पण तिसरी लाट सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती; पण सध्या तेथील रोजची रुग्णसंख्या कमी होत आहे. अमेरिकेत सध्या तरी तिसर्या लाटेची कोणतीही चाहूल दिसत नाही. यामागे अमेरिकेत तरुणांच्यात वेगाने झालेले लसीकरण कारणीभूत आहे.
     
        लसीकरण आणि तिसरी लाट -
     
    *   कोरोना व्हायरसच्या पहिल्या दोन्ही लाटा सुरू होताना जगापुढे लॉकडाऊन हा एकच पर्याय होता आणि बहुतांश देशांनी तोच पर्याय स्वीकारला. जानेवारी २०२१ मध्ये मात्र लसीकरणाचा अजून एक पर्याय मिळाला. यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इंग्लंड या देशांनी आघाडी घेतली. या जोडीने माध्यमांत कोणतीही वाच्यता न करता दररोज २ कोटी लोकांना लस देऊन चीनने सुद्धा यामध्ये आघाडी घेतली आहे. ज्या देशांनी लसीकरण वेगाने केले आहे त्या देशांतील रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी झाला आहे. इंग्लंडमध्ये २० वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला आणि ४५ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळूनसुद्धा तेथील रुग्णसंख्या वाढू लागली आहे, मात्र मृत्यू दर कमी होत आहे किंवा काही दिवसांपूर्वी शून्य मृत्यू नोंदवला गेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की लसींमुळे कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्ण थांबवता येत नाही; मात्र कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखता येतोय. तरीसुद्धा इंग्लंडमध्ये डिसेंबर २०२१ पर्यंत लसीचा तिसरा डोस देण्याचेही नियोजन चालू आहे. साधारण अशीच परिस्थिती अमेरिकेमध्येसुद्धा असून युरोप-अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्या कोरोना रुगणांमध्ये ९९ टक्के असे रुग्ण आहेत ज्यांनी लस घेतलेली नाही. भारतामधील काही मेडिकल रिपोर्टस्चा अभ्यास केला तर अशीच परिस्थिती दिसून येतेय.
     
        नवीन भारतामध्ये काय परिस्थिती असेल ?
     
    *   जगातील ज्या देशांनी वेगाने लसीकरण केले आहे त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून असे दिसून येते आहे की, लसीच्या एका किंवा दोन डोसमुळे तिसरी लाट रोखता आली नाही तरी तिची तीव्रता कितीतरी पटीने कमी करता येते.भारत, ब्राझील, मेक्सिको, तुर्की आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यांची परिस्थिती एकसारखीच आहे. त्यामुळे या देशांमध्ये दुसरी लाट कमी होण्यामागे लॉकडाऊन हेच कारण आहे. तर युरोपमधील काही देश आणि अमेरिकेत दुसरी लाट कमी होण्याला लसीकरण कारणीभूत ठरताना दिसते. या देशांमध्ये तिसरी लाट येईल का हे सर्वस्वी ज्या देशांमध्ये लसीकरण झाले नाही त्या देशांवर अवलंबून असेल. उदाहरणच द्यायचे झाले तर भारतामध्ये दुसरी लाट येण्यास जो कोरोना व्हायरसचा स्ट्रेन कारणीभूत होता त्याच्यामुळेच इंग्लंडमध्ये तिसरी लाट येताना दिसतेय, कारण या स्ट्रेनवर लसीसुद्धा कमी प्रमाणात प्रभावी ठरताहेत. जर अशीच परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली तर कदाचित इतर देशांच्या मानाने भारतामधील तिसरी लाट लवकर येईल किंवा दुसरी लाट न संपता पुन्हा रुग्णसंख्या वाढून तिसरी लाट सुरू होईल. भारताचे आजचे लसीकरण पहिले तर फक्त  पाच टक्क्यांच्या आसपास लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत; तर ज्यांनी दुसर्या लाटेवर नियंत्रण मिळविले आहे त्यांची सरासरी ३० टक्क्यांच्या आसपास आहे. याबरोबरच अजून एक भीती सर्व भारतीयांमध्ये आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचे उत्तर होय असू शकते. कारण, भारतामधील अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. याचबरोबर जर एखादा कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आणि तो लस दिलेल्या लोकांनाही वेगाने संसर्गित करीत असेल तर तो लहान मुलांना पण नक्कीच वेगाने संसर्गित करेल.
     
        तिसरी लाट रोखण्याचा काय उपाय आहे का ?
     
    *   लसीकरण हाच खात्रीशीर उपाय होता; पण तो आपण अमलात आणू शकलो नाही आणि पुढच्या एक-दोन महिन्यांत ७० टक्के भारतीयांना किमान एक तरी डोस मिळेल याची शक्यता नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी ठेवण्यासाठी इतरच नावीन्यपूर्वक योजना राबवाव्या लागतील. महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांनी अधिकची खबरदारी घेतली पाहिजे. जर कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा विचार केला तर फक्त २० ते २५ टक्के असे लोक आहेत ज्यांचा मृत्यू फक्त कोरोनामुळे झाला आहे तर ८० टक्के लोकांना कॅन्सर, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होते. त्यामुळे या लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यांना सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तिसर्‍या लाटेत आपण मृत्यू दर कमीत कमी ठेवू शकतो. याचे प्रत्यक्ष उदहारण म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी हे आहेत. याचबरोबर लहान मुलांना इतर पर्यायी लसी देऊन (फ्लू किंवा गोवर) त्यांची प्रतिकारशक्ती अजून चांगली करू शकतो. याचबरोबर पुढील एक वर्ष तरी मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळणे फारच गरजेचे आहे. कारण व्हायरसच्या नवीन स्ट्रेनचे उगमस्थान असे कार्यक्रमच असतात. 
     
    सौजन्य व आभार :  दैनिक  पुढारी
    १२ जून २०२१ / डॉ. नानासाहेब थोरात

Share this story

Total Shares : 0 Total Views : 35