सुपर कॉम्प्युटर

  • सुपर कॉम्प्युटर

    सुपर कॉम्प्युटर

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 10 Views
    • 0 Shares
     सुपर कॉम्प्युटर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात माहिती तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात सुपर कॉम्प्युटरसाठी चढाओढव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान :
    *   परिचय - संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अ‍ॅक्सेसरीज.
    *   नविनतम साधने आणि तंत्रज्ञान - क्लाऊड काँप्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आभासी वास्तव / संवर्धित वास्तव (व्हीआर/एआर), कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग (एआय/एमएल)

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सुपर कॉम्प्युटरसाठी चढाओढ
     
    *   सुपर कम्प्युटर बनविणार्‍या चीनच्या तीन कंपन्या आणि तेथील नॅशनल सुपर कम्प्युटिंग सेंटरच्या चार शाखांवर निर्बंध आल्यामुळे चीन-अमेरिका संबंधांमधील कटुता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सुपर कम्प्युटरसाठी चाललेली शर्यत आणि त्यात भारताचे स्थान याचा धांडोळा घ्यायला हवा.
     
    *   अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीनबरोबर अमेरिकेच्या संबंधांमध्ये जो तणाव निर्माण झाला होता, तो जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सौम्य होईल असे मानले जात होते. विशेषतः गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि चीनमध्ये जे व्यापार युद्ध सुरू आहे, ते बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु; बायडेन प्रशासनाने काही दिवसांपूर्वी चीनच्या सुपर कम्प्युटर संशोधन प्रयोगशाळेवर आणि सुपर कम्प्युटर निर्मात्यांवर प्रतिबंध घातले तेव्हा या आशेवर पाणी पडले. चिनी सुपर कम्प्युटिंग प्रयोगशाळांवर आणि कम्प्युटर निर्मात्यांवर अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढणार आहे. अधिकांश बाबतीत नरमाईचे धोरण स्वीकारणार्या बायडेन यांनी याबाबतीत मात्र ट्रम्प यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे या निर्णयातून दिसते.
     
    *   हैराण करणारी बाब अशी की, चीन याच कंपन्यांनी तयार केलेल्या सुपर कम्प्युटर्सचा वापर लष्करासाठी करतो, असा आरोप बायडेन प्रशासनाने केला. या निर्बंधांमुळे अमेरिकी तंंत्रज्ञान मिळविणे चीनला अवघड होईल. यामागील एक मेख अशी आहे की, चीनच्या सर्व तंत्रज्ञान कंपन्या अमेरिका आपल्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्पर्धक मानते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांची नाकाबंदी अमेरिका नेहमी करते.
     
    *   परदेशी कंपन्यांना आपले तंत्रज्ञान वापरण्यास अमेरिकेने मज्जाव केल्यामुळे हुवावेचा १२३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक व्यवसाय धोक्यात आला. आता या विषयाची व्याप्ती सुपर कम्प्युटर्सपर्यंत पोहोचली आहे. सुपर कम्प्युटर बनविणार्‍या चीनच्या तीन कंपन्या आणि तेथील नॅशनल सुपर कम्प्युटिंग सेंटरच्या चार शाखांवर निर्बंध आल्यामुळे चीन-अमेरिका संबंधांमधील कटुता अधिकच वाढली. चीनच्या सुपर कम्प्युटर बनविणार्‍या ज्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले, त्या चीनच्या सुपर कम्प्युटिंग विकास योजनेचे प्रतिनिधित्व करतात आणि त्याचबरोबर चीनच्या ‘चिप आत्मनिर्भर’ योजनेत प्रमुख भूमिकाही बजावतात. आता निर्बंध लावल्याच्या स्थितीत या सातही चिनी कंपन्यांच्या समूहाला अमेरिकी तंत्रज्ञान मिळविण्यासाठी लायसेन्स घ्यावे लागेल. याचा अर्थ असा की, चिप तयार करणार्‍या इंटेल या अमेरिकी कंपनीकडूनसुद्धा या कंपन्यांना एखादे तंत्रज्ञान घ्यायचे असेल तर त्यासाठीही अमेरिकी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. परंतु; हे प्रकरण सुपर कम्प्युटर्सच्या विकासाशी निगडित असल्यामुळे काहीसे गंभीर बनले आहे.
     
    *   सर्वसाधारण कम्प्युटरच्या तुलनेत हजारो-लाखो पटींनी गतिमान काम करण्याची तसेच एका सेकंदात अब्जावधी गणना करण्याची क्षमता असल्यामुळे सुपर कम्प्युटर हा सर्वसाधारण कम्प्युटरपेक्षा खूप वेगळा असतो. हजारो प्रोसेसर एकमेकांना जोडून सुपर कम्प्युटर तयार होतो. हे प्रोसेसरच सुपर कम्प्युटरची काम करण्याची क्षमता वाढवितात. जगात अत्याधिक गतिमान सुपर कम्प्युटर्सची गरज भासू लागली आहे. चीन, रशिया, अमेरिका, जपान आदी देश गतिमान सुपर कम्प्युटर्सची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुपर कम्प्युटिंगमध्ये चीनसमवेत जपान, अमेरिका आदी अनेक देश आपला वरचष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु; येथेच एक महत्त्वाचा प्रश्‍न भारताच्या सुपर कम्प्युटर्सच्या सद्यःस्थितीबाबत निर्माण होतो.
     
    *   सुपर कम्प्युटरच्या बाबतीत भारताची स्थिती अशी आहे की, गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये देशाला प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर चालणारा सुपर कम्प्युटर मिळणार असल्याची बातमी आली होती. एनविडा या अमेरिकी कंपनीने आणि जोधपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) केलेल्या करारानुसार, हा कम्प्युटर लवकरच देशात स्थापित केला जाणार आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली असा हा डीजीएक्स-२ सुपर कम्प्युटर आयआयटीच्याच एका विशेष प्रयोगशाळेत ठेवण्यात येईल. या कम्प्युटरमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी भारतातील हालचालींना वेग येईल.
     
    *   सुमारे दीडशे किलोग्रॅम वजनाचा हा कम्प्युटर डीजीएक्स-१ या पहिल्या आवृत्तीपेक्षा इतका गतिमान आहे की, पहिल्या आवृत्तीचा कम्प्युटर जे काम १५ दिवसांत करतो, ते काम हा कम्प्युटर अवघ्या दीड दिवसांत करेल. या कम्प्युटरमुळे देशात सेल्फ ड्राईव्ह कारच्या चलनवलनास मदत होईल. जगातील पहिल्या पाचशे शक्तिशाली कम्प्युटर्समध्ये या कम्प्युटरचा क्रमांक २२ वा आहे, असाही दावा आहे. एकेकाळी आयटी आणि कम्प्युटिंग क्षेत्रातील आघाडीचा देश म्हणविल्या जाणार्‍या भारतासाठी एक चिंताजनक बाब अशी की, देशातील मोबाईल, कम्प्युटिंग आणि ई-कॉमर्सपासून अंतरिक्ष संशोधन आणि हवामान क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांच्या विकासाचे काम कम्प्युटिंगवर अवलंबून आहे आणि याबाबतीत आपल्या देशाची वाटचाल चीनच्या तुलनेत बरीच संथ आहे.
     
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १५ जून २०२१ / महेश कोळी, संगणक अभियंता

Share this story

Total Shares : 0 Total Views : 10