मधमाशीपालन

  • मधमाशीपालन

    मधमाशीपालन

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 36 Views
    • 0 Shares
     मधमाशीपालन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात कृषी अर्थव्यवस्थाया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात शेतीपूरक मधमाशीपालनव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : कृषी अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास :
    *   वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन विकास.

    २.१०  कृषी :
    १.  राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व -
    *   शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    शेतीपूरक मधमाशीपालन
     
    *   पारंपरिक शेती करण्याबरोबरच कृषीपूरक व्यवसायांकडेही शेतकरी मोठया संख्येने वळू लागले आहेत. यामध्ये सर्वात कमी भांडवल आणि जागा लागणारा व्यवसाय म्हणून मधमाशीपालनाची ओळख आहे. जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची प्राचीन परंपरा आहे. अत्यंत कमी भांडवली खर्च लागणारा मधमाशीपालन हा कृषिपूरक व्यवसाय अगदी कमी जागेतही करता येतो. दुसरीकडे पर्यावरणासाठीही हा व्यवसाय जास्त उपकारक ठरतो.
     
    *   मधमाशी ही फुलातील रसाला/परागाला रसात बदलत असते. त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. आहारशास्त्र आणि आयुर्वेदात मधाला विशेष महत्त्व आहे. ‘शुद्ध मधा’च्या उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मध सेवनाने आरोग्य उत्तम राहते.
     
    *   परागीकरण करण्यासाठी मधमाश्या महत्त्वाची भूमिका पार पडतात. जगातील एकूण वनस्पतींपैकी बहुतांश  प्रजातींचे परागीभवन केवळ या मधमाश्या करत असतात.
     
    *   मधामध्ये , बी, सी जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन याचा समावेश असतो.
     
    *   निसर्गात ठरावीक ऋतूनुसार झाडांना बहर येत असतो. त्यामुळे नैसर्गिक मधाचे उत्पादन देखील ऋतूनुसार होत असते. नैसर्गिक मधात कायम विविधता आढळून येते. याच कारणामुळे दरवेळी प्रत्येक ऋतूमधील फुलोर्‍यानुसार उपलब्ध झालेला मध हा वेगवेगळ्या रंगाचा, चवीचा, गंधाचा, स्वादाचा व घनतेचा असतो. प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर मध हा मधमाश्यांनी एकाच प्रकारच्या फुलोर्‍यापासून बनवला आहे की अनेक प्रकारच्या फुलोर्‍यापासून तयार केला आहे हे ओळखणे शक्य झाले आहे. सह्याद्री रांगामध्ये डिसेंबर महिन्याच्या दरम्यान निसर्गात फुलोरा यायला सुरूवात होते. तेव्हा मधाचा हंगाम सुरू होतो. तो पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहतो.
     
    *   पुण्याच्या राष्ट्रीय मधमाशी प्रशिक्षण संस्थेत मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले जाते.
     
    *   शासनाचे मधमाशी पालन व्यवसायाला केंद्र व राज्याचे खादी ग्रामोद्योग मंडळ, राज्याचे कृषी विभाग आणि आत्मा विभाग अशा चार ठिकाणाहून अनुदान मिळू शकते.
     
        मधमाशी व मधाचे प्रकार -
     
    १)  आग्या मोहोळ  : उंच इमारती, वड -पिंपळ यासारखे वटवृक्ष यावर आग्या मोहोळ असतो. यापासून वर्षांकाठी १५ किलो मध मिळू शकतो.
    २)  फुलोरा (फ्लोरिया) : या प्रकारात कमी उंचीच्या झाडांवर मधमाश्यांचा संचार असतो. वर्षांकाठी सुमारे अडीचशे ग्रॅम मध यापासून मिळतो.
    ३)  सातेरी : यामध्ये सलग सात ते आठ पोळ्या ओळीने असतात.
    ४)  ट्रायगोला/पोया  : हा आणखी एक प्रकार. याच्या मधमाश्या डंख विरहित असतात; पण त्यापासून खूपच कमी म्हणजे अवघा शंभर ग्रॅम मध मिळत असतो. त्याच्यात औषधी गुणधर्म अधिक असल्याने त्याची किंमत हजार ते दोन हजार रुपये किलो अशी असते.
    ५)  युरोपीय मधमाशी : पाचवा प्रकार हा पाळीव मधमाश्यांचा मानला जातो. त्याला ‘युरोपीय मधमाशी’ असेही म्हटले जाते. सूर्यफूल, मोहरी, बाजरी अशा मोठया आकाराच्या शेतीमध्ये अशा प्रकारचे मधमाशी पालन केले जाते.
     
        मधमाशी पालनातील धोके -
     
    *   मधमाशीपालन व्यवसायात अस्वल या जंगली प्राण्याचा उपद्रव मोठी डोकेदुखी आहे. निसर्गत: मधमाश्यांचा संचार कोठे आहे याचे आकलन असल्याने झाडावरील मधाच्या पोळ्या मटकावण्यात तो पटाईत आहे. मधमाशी पालनासाठी ठेवलेल्या पेटया फोडून खाण्यातही तो सराईत झाला आहे. परिणामी अस्वलाचा संचार अधिक असलेल्या ठिकाणी मधमाशी पालन कमी प्रमाणात केले जाते.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १५  जून २०२१ / दयानंद लिपारे

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 36