ऑनलाईन शिक्षण

  • ऑनलाईन शिक्षण

    ऑनलाईन शिक्षण

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 122 Views
    • 0 Shares
     ऑनलाईन शिक्षण
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात शिक्षणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ऑनलाईन शिक्षण पद्धतीव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न  याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १०. शिक्षण पद्धती :
    *   शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर : एनएमइआयसीटी, इ-पाठशाला, इ-पीजी पाठशाला, स्वयम

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.२ शिक्षण :
        मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जा वाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी) समस्या आणि प्रश्‍न.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    ऑनलाईन शिक्षण पद्धती
     
    *   १५ जून २०२१ रोजी २०२१ चे शैक्षणिक वर्ष सुरु झाले. पण कोरोनाच्या तिसर्या लाटेत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याच्या व्यक्त होणार्या शक्यतेने पुन्हा एकदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईनने झाली.
     
    *   दरवर्षी १५ जून म्हटले की, शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा ठरलेला असतो. शाळेची पायरी पहिल्यांदाच चढणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प-चॉकलेट देऊन स्वागत, मुलांचे मनोरंजन हा कार्यक्रम ठरलेला असतो. परंतु २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाने हे चित्र बदलून टाकले.
     
    *   प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याच्या पद्धतीला तात्पुरता पर्याय म्हणून स्वीकाराव्या लागलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला मर्यादा आहेत, हे मान्य करूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्याचे आणि अभ्यासक्रमातील विवेचनात्मक भाग बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे किमान काम झाल्याचे श्रेयही तिला द्यावे लागेल.
     
    *   मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाल्यानंतर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आणि ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. भारतीयांना ऑनलाईन शिक्षण तसे नवीन आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये ऑनलाईन शिक्षणावरच भर दिला जातो. आपल्याकडे ते एखाद्या कार्यक्रमापुरते किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनपुरतेच मर्यादित होते. परंतु; कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल आणि विद्यार्थी शिक्षणापासून दुरावतील याचा विचार करून शिक्षण विभागाने नाईलाजास्तव का होईना गेल्या वर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू केले.
     
    *   राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारित २१ हजार शाळा आहेत. याशिवाय केंद्रीय अभ्यास मंडळ, आंतरराष्ट्रीय अभ्यास मंडळ आणि अन्य मंडळांच्या शाळांची संख्याही उल्लेखनीय आहे. या सर्व शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भवितव्याचे काय, हा शिक्षक आणि पालकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्‍न ऑनलाईन साधनाने तात्पुरता का होईना सोडविला.
     
    *   इंटरनेट संवादाची माध्यमे वापरून ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. परीक्षा होतील तेव्हा होतील; पण लॉकडाऊनमुळे मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान तरी टळले. यामुळे पालक आणि शाळा आश्वस्त झाल्या. अगदी वेळापत्रक लावून शाळेप्रमाणेच शिक्षकांचे अध्यापन सुरू झाले. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्न देणे, वेगवेगळे उपक्रम देणे, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे, विविध उपक्रमांद्वारे त्यांचे मूल्यमापन करणे, त्यांना प्रात्यक्षिक देणे, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करणे, या सर्व गोष्टी घडू लागल्या.
     
    *   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला राबविण्यात आली. यामध्ये शाळा बंद; पण शिक्षण सुरू, या उपक्रमांतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध घटकांवरील लिंक्स दैनिक अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत शेअर करण्यात आल्या. ही अभ्यासमाला २०७ दिवस सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात आली. या माध्यमातून ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेअभावी अभ्यासमाला उपलब्ध झाल्या नाहीत. अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले.
     
    *   खासगी टीव्हीच्या माध्यमातून तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण १२ शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांसाठी रेडिओवरील आधारित कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
     
    *   नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून डीडी सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यात आले. यासह गुगल क्लासरूम, डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन, गोष्टींचा शनिवार, मैत्री विज्ञान व गणिताशी आदी २९ उपक्रमांच्या माध्यमातून २०२० मध्ये ऑनलाईन शिक्षणाचे कार्य पूर्ण केले असल्याचा दावा विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आला.
     
    *   कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाची कास धरावी लागली तरी हे शिक्षण विद्यार्थ्यांच्या पचनी पडणारे नाही. त्यामुळे परिस्थिती निवळल्यानंतर आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर लयबद्ध संवाद निर्माण करून त्यांच्या समस्या आणि शंका समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना शाळांचा अवकाश कसा मिळवून देणार? हा प्रश्न आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षणाने केवळ विवेचन झाले. परंतु; अनेक विद्यार्थ्यांना विषयांचा आशयच समजलेला नाही. ग्रामीण भागात तर विजेचे भारनियमन आणि मोबाईल नेटवर्कची अडचण यामुळे अनेक अडथळेच आले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून ठिक. परंतु; तोच शिक्षणाचा मुख्य पर्याय होऊ नये यासाठी शिक्षणाची ही कोंडी फोडण्याचे आव्हान आहे. कोरोनाचे भय आहेच. पंरतु; या भयापोटी विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीपोटी अनेक नानाविध समस्या निर्माण व्हायला लागल्या आहेत. यातून शिक्षण व्यवस्थेचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे ऑनलाईनकडून ऑफलाईन शिक्षणाकडे वळणे गरजेचे आहे.

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 122