महापूर

  • महापूर

    महापूर

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 665 Views
    • 2 Shares
     महापूर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’‘महाराष्ट्रातील हवामान व पाऊसया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात महापुराचा धोकाव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.२ हवामानशास्त्र :
    *   महाराष्ट्रातील मोसमी वारे (मान्सून) - पर्जन्यवृष्टीचे वितरण, अवर्षण, महापूर आणि त्याच्या समस्या

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    महापुराचा धोका
     
    *   हवामान खात्याने २०२१ मध्ये सरासरीपेक्षा जादा पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही राज्यावर आणि प्रामुख्याने कृष्णा-भीमा-गोदावरी नदी खोर्‍यांवर महापुराचे सावट आहे. महापुरासारखी आपत्ती ही प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती असते. कारण, कमी वेळेत प्रमाणापेक्षा जादा पाऊस झाला की महापूर येतो.
     
    *   २००५ आणि २०१९ सालचा अनुभव विचारात घेता महापुरासारख्या आपत्तीला मानवी चुकाही कारणीभूत ठरलेल्या दिसतात. या दोन वर्षांत महापुराने जे थैमान घातले, त्याला निसर्गाच्या बरोबरीनेच मानवाने म्हणण्यापेक्षा राज्यातील जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता, हे स्पष्ट झाले आहे. धरणातील पाणीसाठ्याच्या बाबतीत पूर्वापार प्रचलित नियम न पाळल्यामुळे महापुराचे सावट गडद व्हायला हातभार लागला होता.
     
        धरणातील पाणी साठविण्याची पद्धत -
     
    *   धरणांमध्ये पाणी साठविण्याची एक परंपरागत अशी पद्धत आहे. ३१ मेअखेर धरणांमध्ये साठवण क्षमतेच्या केवळ १० टक्के इतकाच पाणीसाठा असायला हवा. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ३१ जुलैअखेर धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा असायला हवा. त्यानंतर साधारणत: १५ ऑगस्टपर्यंत धरणामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ७७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असायला हवा. त्यानंतर पावसाचे प्रमाण आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी साठवत वा सोडत राहायचे आणि पावसाळ्याच्या उत्तरार्धातील पाऊस, परतीचा पाऊस आणि पाणलोट क्षेत्रातील पाझराच्या पाण्यावर १५ ऑक्टोबरपर्यंत धरण पूर्णक्षमतेने भरून घ्यायचे, अशी धरणातील पाणी साठविण्याची पद्धत. मात्र, गेल्या काही वर्षांत धरणातील पाणी साठविण्याच्या या प्रचलित पद्धतीला बगल दिली जाताना दिसते.
     
    *   आजघडीला राज्यात मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून एकूण ३,२६७ धरणे आहेत. या सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता १७१५ टीएमसी. धरणातील पाणी साठविण्याच्या परंपरागत मानांकनानुसार जून महिन्यात या सर्व धरणांमध्ये मिळून कमाल १७० टीएमसी पाणी असायला हवे होते. मात्र, जून २०२१ मध्ये राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ५२४ टीएमसी म्हणजे एकूण क्षमतेच्या ३० टक्के इतका, म्हणजे मानांकनापेक्षा सर्व धरणांमध्ये  ३५४ टीएमसी जादा पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की, धरणातील पाणीसाठा सोडून द्यावा लागते, पडणारा पाऊस आणि धरणातील सोडलेले पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून धरणांच्या खालच्या भागात महापुराची स्थिती उद्भवू शकते.
     
    *   २०२० आणि २०२१ लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील हजारो कारखाने बंद होते. त्यामुळे पाण्याची औद्योगिक मागणी कमी होती. तशातच यंदा ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी लागणार्या पाण्याचीही मागणी कमी झाली. त्यामुळे यंदा धरणांमध्ये मानांकनापेक्षा जादा पाणीसाठा शिल्लक राहिल्याचा बचाव जलसंपदा विभागातील अधिकार्यांकडून केला जाऊ शकतो, तो जरी मान्य केला तरी काही सतावणारे प्रश्‍न उभे राहतात. हा बचाव मान्य केला तरी आपत्ती व्यवस्थापनावर तो बोट ठेवणारा आहे. कारण, नियमाला अपवाद असला तरी नियम हे अपवादासाठी नसतात.
     
    *   पाणीसाठ्याच्या मानांकनाची पहिली अट मोडली गेली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेला सरासरीपेक्षा १०३ टक्के पाऊस पडण्याचा, राज्यात ढगफुटीचे प्रमाण वाढण्याचा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज आणि वेळेआधीच सुरू झालेल्या पावसाने उभे केलेल्या प्रश्‍नाचे उत्तर कोणाकडे आहे?
     
    *   एक घटक प्रामुख्याने कृष्णा-भीमा खार्‍यातील महापुराला कारणीभूत ठरतो आणि तो म्हणजे कर्नाटकातील अलमट्टीचे धरण! २००५ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आणि नेमक्या त्याच वर्षापासून या भागात महापुराचा धोका दिवसेंदिवस वाढत गेलेला दिसतो आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१७ मीटरपेक्षा जादा वाढली की, या पाण्याचा फुगवटा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या सीमांना भिडतो. त्यामुळे हा सगळा भाग महापुरात अडकून पडतो. याचा प्रत्यय तीन-तीनवेळा आलेला आहे. यावर उपाय म्हणून मागील वर्षापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील धरणांमधील पाण्याच्या विसर्गांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समिती कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या समन्वय समितीत सुसंवाद साधला जाताना दिसत नाही.
     
    *   २०२० मध्ये महापूर कोल्हापूर-सांगलीच्या पार कंठाशी आल्यानंतर आणि महाराष्ट्राने मिनतवार्या केल्यानंतर कर्नाटकने अलमट्टीतून पाणी सोडले आणि मग इथल्या महापुराचे सावट दूर झाले.
     
    *   कृष्णा-भीमा नदीखोर्‍यातील महापुराची कारणे आणि उपाययोजना सुचविण्यासाठी २०१९ साली नंदकुमार वडनेरे समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीने महापुराच्या कारणांचा अपुरा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. त्यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र-कर्नाटकात समन्वय ठेवणार्या समितीने या पार्श्वभूमीचा विचार केला असेल तर स्वागतच. मात्र, त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. अलमट्टीसह राधानगरी, वारणा, कोयना धरणांच्या पाणीसाठ्याचे आणि त्याच्या नियोजन, समन्वयाचा आराखडा जनतेसाठी स्पष्ट करावा, आणि संभाव्य पूरस्थितीचे व्यवस्थापन वेळीच करावे.

Share this story

Total Shares : 2 Total Views : 665