काकोरी कट

  • काकोरी कट

    काकोरी कट

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 555 Views
    • 0 Shares
     काकोरी कट
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
     
    १.६ ब्रिटिश शासनविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव -
     
    १.६.२ -  क्रांतिकारी चळवळी - बंगाल व पंजाब मधील क्रांतिकारी चळवळी
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    काकोरीचा कट
     
    *   भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काकोरी घटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही अशी घटना होती की त्यानंतर देशातील क्रांतिकारकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलू लागला आणि ते पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय होऊ लागले.
     
    *   भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर संशोधन करणार्‍या डॉ. रश्मी कुमारी यांनी लिहले आहे की,१८५७ च्या क्रांतीनंतर, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चापेकर बंधूंनी आर्यस्टन आणि रँड यांच्या हत्येपासून सुरू झालेल्या सैनिकी राष्ट्रवादाचा हा काळ होता. तो महात्मा गांधी यांचे नेतृत्व राष्ट्रीय पटलावर येण्यापर्यंत तसाच सुरू होता. परंतु फेब्रुवारी १९२२ मध्ये चौरा-चौरीच्या घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले तेव्हा तरुणांमध्ये एक प्रकारची निराशा पसरली होती. ती काकोरी घटनेने दूर झाली.
     
    *   १९२२ मध्ये जेव्हा असहकार चळवळ देशात शिगेला पोहचली होती तेव्हा त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात ’चौरा-चौरी’ घटना घडली. गोरखपूर जिल्ह्यातील चौरा-चौरीमध्ये काही आंदोलनकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून पेटवून दिले आणि त्यात २२-२३ पोलिसांचा मृत्यू झाला. या हिंसक घटनेने दु:खी होऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली, ज्यामुळे संपूर्ण देशात प्रचंड निराशेचे वातावरण पसरले. स्वातंत्र्याच्या इतिहासातील असहकार चळवळीनंतर काकोरी घटनेला एक अतिशय महत्वाची घटना म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण त्यानंतर ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या अपेक्षेने सर्वसामान्य जनता या क्रांतिकारकांकडे पाहू लागली.
     
    *   ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरीमध्ये क्रांतिकारकांनी ट्रेन लुटली. ही घटना ’काकोरी घटना’ म्हणून ओळखली जाते. रेल्वेतून सरकारी तिजोरी लुटून शस्त्रे खरेदी करणे हे क्रांतिकारकांचे उद्दीष्ट होते जेणेकरुन इंग्रजांविरूद्धच्या युद्धाला आधिक बळकटी मिळू शकेल. काकोरी ट्रेन दरोड्यात संपत्ती लुटणारे क्रांतिकारक देशातील प्रसिद्ध क्रांतिकारक संस्था ’हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन’ (एचआरए) चे सदस्य होते.
     
    *   एचसीआरची स्थापना १९२३ मध्ये शशिंद्रनाथ सान्याल यांनी केली होती. या क्रांतिकारक पक्षाचे लोक आपली कामे करण्यासाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने दरोडे टाकत असत. या दरोडेखोरींमध्ये पैसा कमी मिळत होता आणि निष्पाप लोकांचे जास्त बळी जात होते. या कारणास्तव सरकार क्रांतिकारकांना चोर आणि डाकू म्हणुन बदनाम करीत असे. हळूहळू क्रांतिकारकांनी लूट करण्याची रणनीती बदलली आणि सरकारी तिजोरी लुटण्याची योजना आखली. या योजनेचा क्रांतिकारकांचा पहिला मोठा प्रयत्न म्हणजे काकोरी ट्रेन दरोडा.
     
    *   असे म्हटले जाते की जेव्हा काकोरी कट रचनेबाबत एचआरए टीमची बैठक झाली तेव्हा अशफाक उल्ला खान यांनी ट्रेन दरोड्याचा विरोध केला आणि ते म्हणाले, ’आपण या दरोड्याने सरकारला नक्कीच आव्हान देऊ, पण येथून पक्षाचा शेवट सुरू होईल. पक्ष इतका संघटित आणि दृढनिश्‍चयी नसल्यामुळे आता सरकारविरोधात थेट आघाडी उघडणे योग्य होणार नाही. पण अखेरीस या बैठकीत काकोरी येथे रेल्वे लुटण्याची योजना बहुमताने संमत झाली.
     
    *   या रेल्वे दरोड्यात एकूण ४६०१ रुपये लुटले गेले. या दरोड्याचा तपशील देत लखनौचे पोलिस कॅप्टन मि. इंग्लिश यांनी ११ ऑगस्ट १९२५ रोजी सांगितले, ’दरोडा टाकणार्‍या लोकांनी (क्रांतिकारक) खाकी शर्ट आणि हाफ पँट परिधान केलेल्या होत्या. त्यांची संख्या २५ होती. ते सर्व सुशिक्षित दिसत होते. पिस्तूलमध्ये सापडलेल्या काडतुसे बंगालच्या राजकीय क्रांतिकारक घटनांमध्ये वापरल्या गेलेल्या कडतुसासारखेच होते.
     
    *   या घटनेनंतर देशाच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू झालं. काकोरी ट्रेन दरोड्यात केवळ १० जणांचा सहभाग असला तरी ४० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. इंग्रजांच्या या अटक सत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. जवाहरलाल नेहरू, गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासारख्या मोठ्या लोकांनी तुरूंगातल्या क्रांतिकारकांची भेट घेतली आणि त्यांच्या बाजूने खटला लढण्याची तयारी दर्शवली. खटला वकील सुप्रसिद्ध वकील गोविंद वल्लभ पंत यांनी लढावा अशी क्रांतिकारकांची इच्छा होती. परंतु त्यांची फी जास्त असल्यामुळे अखेर हा खटला कोलकाताच्या बी. के. चौधरी यांनी लढवला.
     
    *   काकोरी घटनेचा ऐतिहासिक खटला लखनऊच्या कोर्ट रिंग थिएटरमध्ये सुमारे १० महिने चालला. सध्या या इमारतीत लखनऊचे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आहे. या खटल्यावर सरकारने दहा लाख रुपये खर्च केले.
     
    *   ६ एप्रिल १९२७ या दिवशी खटल्याचा निकाल देताना न्यायाधीश हॅमिल्टन यांनी कलम १२१ ए, १२० बी आणि कलम ३९६ नुसार क्रांतिकारकांना शिक्षा सुनावली.
     
    *   रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग आणि अशफाक उल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचीन्द्रनाथ सान्याल यांना काळ्या पाण्याची तर मन्मथनाथ गुप्त यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदिलाल जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, रामकृष्ण खत्री यांना प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. विष्णुशरण विष्णुशरण दुब्लिश आणि सुरेशचंद्र भट्टाचार्य यांना प्रत्येकी सात वर्षे आणि भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी आणि प्रेमकिशन खन्ना यांना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
     
    *   फाशीची बातमी समजताच लोकांनी आंदोलन सुरू केले. लखनऊ मुख्य न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात शचीन्द्रनाथ सान्याल सान्याल आणि भूपेंद्रनाथ सान्याल वगळता इतर सर्वांनी अपील दाखल केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. राजेंद्रनाथ लाहिरी यांना प्रथम १७ डिसेंबर १९२७ रोजी गोंडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या मित्राला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले’असे दिसते आहे की देशाच्या बलिदानाला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू म्हणजे काय? आयुष्याच्या दुसर्‍या दिशा शिवाय काहीही नाही. जर यामुळे इतिहास बदला तर मला वाटते की आमचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, सर्वांना शेवटचा नमस्कार.’
     
    *   १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर तुरूंगात फाशी देण्यात आली. आपल्या आईला एक पत्र लिहून त्यांनी देशवासियांना संदेश पाठवला. फाशीच्या ठिकाणी जाताना ते ’भारत मातेचा जयघोष करत होते.  फाशी देण्याच्या ठिकाणावर पोहचल्यानंतर बिस्मिल म्हणाले; ’मला ब्रिटीश साम्राज्याचा नाश हवा आहे.’ नंतर त्यांनी प्रार्थना करत त्यांनी जप केला. त्यानंतर ते फासावर चढले. गोरखपूरच्या लोकांनी त्याचा मृतदेह घेऊन जाऊन शहरात त्यांची सन्मानपूर्वक अंतयात्रा काढली.
     
    *   काकोरी घटनेतील तिसरे शहीद ठाकूर रोशन सिंह होते, त्यांना अलाहाबादमध्ये फाशी देण्यात आली. आपल्या मित्राला पत्र लिहून ते म्हणाले होते की, ’हे आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलेले आहे की, धर्मयुद्धात बलिदान देणारा माणूस जंगलात राहून तपश्‍चर्या करणार्यांप्रमाणेच असतो.’
     
    *   अशफाक उल्लाह खान हे काकोरी घटनेचा चौथे शहीद होते. त्यांना फैजाबादमध्ये फाशी देण्यात आली. फाशीवर जाताना त्यांनी फाशीच्या तख्तेचे चुंबन घेऊन उपस्थित लोकांना सांगितले की, ’माझे हात मानवी रक्ताने कधीही डागले नाहीत, माझ्यावर लादलेले आरोप खोटे आहेत. देवाजवळच आता मला न्याय मिळेल. १९ डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह रेल्वे मालगाडीतून शाहजहांपूरला नेत असतांना लखनऊ बालामाऊ स्टेशनवर गाडी थांबली. जेथे एक साहेब सूट-बूटमध्ये गाडीच्या आतमध्ये आले आणि म्हणाले, ’आम्हाला शहीद-ए-आजम पहायचे आहे. त्यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांनी कफन बंद करण्यास सांगितले. मी आता येतो असे ते म्हणाले. ’हे साहेब दुसरे कोणीही नव्हते तर ते होते चंद्रशेखर आझाद.
     
    *   काकोरी घटनेला चंद्रशेखर आझाद यांनाही जबाबदार धरण्यात आले होते. ब्रिटीशांनी त्यांचा बरेच दिवस शोध घेतला. परंतु चंद्रशेखर आझाद हे ओळख आणि वेष बदलून इंग्रजांना चकवा देण्यात यशस्वी झाले होते. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे इंग्रजांचा सामना करत असताना ते त्यांच्याच बंदुकीतील गोळीमुळे ते शहीद झाले.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक सकाळ
    ११ जून २०२१ /  योगेश कानगुडे

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 555