शाश्‍वत विकास

  • शाश्‍वत विकास

    शाश्‍वत विकास

    • 15 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 1683 Views
    • 0 Shares
     शाश्‍वत विकास
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आर्थिक वृद्धी व विकासया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात शाश्‍वतव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : समग्रलक्षी अर्थशास्त्र

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.२ वृद्धी आणि विकास :
        शाश्‍वत विकास - विकास आणि पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, शाश्‍वत विकास उद्दिष्ट्ये

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    *   जून २०२१ मध्ये भारतातील शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) प्रगतीचा आलेख  नीती आयोगाने प्रसिद्ध केला. वास्तविक शाश्वत विकास ध्येय हा संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी स्वीकारलेला समान अजेंडा आहे. त्यातील १७ उद्दिष्ट्ये समान असून, प्रत्येक देशाची स्वत:ची अशी काही उद्दिष्ट्ये आहेत, आणि सद्यस्थितीच्या आधारावर त्यांचा मागोवा घेतला जातो. भारताच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांक २०२१ मध्ये देशात सकारात्मक वातावरण असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
     
    *   एसडीजी भारत निर्देशांक आणि अहवाल प्रसिद्ध करण्यास २०१८ मध्ये सुरुवात झाली. यामध्ये, विविध क्षेत्रांत भारताची कशी प्रगती होते आणि ती कशा रितीने साध्य होत आहे, याबाबत दरवर्षी माहिती देण्यात येते. या अहवालाद्वारे दोन गोष्टी साध्य करता आल्या. एक म्हणजे विविध क्षेत्रावर लक्ष ठेवण्याबरोबरच प्रत्येक राज्याच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला जातो. शाश्वत विकास ध्येय- २ मध्ये कुपोषण, कृषी उत्पादन, शाश्वत शेती, वैविध्यपूर्ण शेती, बाजारपेठ आदी घटकांसह पोषण आणि शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. भारताच्या बाबतीत विचार केल्यास, निर्देशक निवडताना अन्न आणि भूक, २०३० पर्यंत अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कृषी उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करणे यांचा विचार केला जातो. याचा काय अर्थ होतो ?
     
    *   निर्देशांकात विशेषत: देशभरातील कृषी उत्पादकतेचा आढावा घेतला जातो. २०१५-१६ च्या आधारभूत किमतीच्या आधारावर, धान्योत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय निश्रि्चत करताना तांदूळ आणि गहू या पिकांना गृहीत धरण्यात आले आहे. यानुसार, २०३० पर्यंत ५ हजार ३२२ किलो प्रति हेक्टर उत्पादनाचे ध्येय निश्रि्चत करण्यात आले आहे.
     
    *   तांदूळ आणि गव्हाला प्रमुख धान्य म्हणून समजले जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात घेतल्या जाणार्‍या कापूस, सोयाबीन, डाळी आणि पोषण तृणधान्य यासारख्या धान्यांना निर्देशांकाच्या मोजमापात गृहीत धरलेले नाही. याउलट पंजाब आणि हरयाणातील शेतकरी हे धान्योत्पादन दुप्पट करण्याच्या ध्येयनिश्रि्चतीच्या जवळ आहेत. दोन्ही राज्यांतील उत्पादन पाहता ध्येय साध्य करण्यास त्यांना फारशी अडचण येणार नाही, असे दिसते. २०१८-२९ या वर्षात दोन्ही राज्यांत तांदळाचे ४६९३.२४ किलो प्रती हेक्टर तर गव्हाचे ४२७२.४२ किलो प्रती हेक्टर उत्पादन झाले आहे. या धान्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात उलट स्थिती असून याच वर्षात १९६७ किलो प्रती हेक्टर उत्पादन झाले आणि ते २९९५ किलो प्रती हेक्टर या सरकारी सरासरीपेक्षा कमी आहे.
     
    *   महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतल्या जाणार्‍या पिकांचा शाश्वत विकास निर्देशांकात समावेश केला तर निश्रि्चतच राज्याच्या विकास ध्येयाच्या निर्देशांकांच्या स्थितीत फरक पडेल आणि विकासाचे वास्तव चित्रही दिसेल. अन्य निर्देशक म्हणजे, कृषी क्षेत्रातील नक्त मूल्यांत झालेल्या वृद्धीशी (ग्रॉस व्हॅल्यू डेड- जीव्हीए) जोडलेला असून प्रत्येक मजुराला सरासरी १.२२ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचे ध्येय निश्रि्चत केले आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील नक्त मूल्य वृद्धी ही ०.६५ लाख प्रती मजूर असून हा आकडा राष्ट्रीय सरासरी ०.७१ लाख पेक्षा कमीच आहे. याशिवाय अहवालात महाराष्ट्राच्या ‘जीव्हीए’त मागच्या वर्षीच्या ०.६९ वरुन झालेली घसरणही दिसते.
     
    *   महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी २०३० चे ध्येय गाठण्याची गरज असून विशेषत: लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न येत्या दहा वर्षात दुप्पट करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. बाजारपेठेवर सजगपणे लक्ष ठेवणे आणि चांगली किंमत पदरात पाडून घेणे, या आधारावर लहान शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
     
    *   एसडीजी- १ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विकास समजून घेण्याचा आणखी एक मार्ग आहे. यामध्ये गरिबीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. मागील अहवालातील आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्राने या क्षेत्रात फार मोठी प्रगती केली आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीसाठीच्या निर्देशकांमध्ये मनरेगा, कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या व्यक्तींची संख्या, दारिद्य्ररेषेखाली राहणार्‍यांची संख्या यांचा समावेश होतो. या सर्व बाबतीत महाराष्ट्राचा गुणफलक हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा सरस आहे. या विकासात ग्रामीण भागातील गरिबी आणखी कमी करण्याची क्षमता आहे. सध्या राज्यात गरिबीचे १७.३ टक्के प्रमाण आहे आणि ते आपल्याला २०३० पर्यंत १०.९ टक्क्यांवर आणायचे आहे. याशिवाय मनरेगाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून ग्रामीण भागातील प्रत्येकाला त्यात सामावून घेणे ही आदर्श स्थिती राहू शकते. सध्याच्या काळात ग्रामीण भागातील सुमारे ८४ टक्के नागरिक या योजनेंतर्गत रोजगार मिळवितात. याशिवाय आरोग्याविषयीच्या योजना आणि विमा कवच या गोष्टी देखील वैद्यकीय आणि उपचारापोटी होणार्‍या खर्चामुळे किंवा मृत्यूमुळे निर्माण होणार्‍या आर्थिक अडचणीपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. विमा आणि आरोग्याविषयी योजना राबवण्याबाबतीत भारतातील काही राज्य वगळता अन्य राज्यांची संख्या खूप नाही. महाराष्ट्रात योजना राबवण्याचे प्रमाण केवळ पंधरा टक्केच आहे. म्हणून सर्व लोकांना आरोग्य आणि विमा कवच मिळणे हेच सर्वांचे ध्येय आहे.
     
    *   शाश्वत विकासाचे ध्येय गाठणारी शहरे आणि समुदायाच्या क्षेत्राचा विचार केल्यास महाराष्ट्राने चांगली प्रगती नोंदवली असून देशात आघाडींच्या राज्यात स्थान मिळवले आहे. परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जेच्या एसडीजी-७ मध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे तर राज्यातील प्रत्येक घरांचे विद्युतीकरण झाले आहे. त्याचबरोबर एलपीजी जोडणीदेखील लक्षणीय आहे. एकुणात आरोग्याचा निर्देशांक पाहता महाराष्ट्राने मुलांच्या लसीकरणात तसेच संस्थात्मक प्रसूतीच्या संख्येत सुधारणा झाल्याचे दिसून येते. या निकषावर महाराष्ट्र देशात दुसर्‍या स्थानावर आहे. या सर्व गोष्टी ग्रामीण भागातील राहणीमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे आहे. या आधारावर अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचा वेग वाढवल्यास राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची भरभराट होण्यास निश्रि्चतच हातभार लागेल.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    १३ जून २०२१ / जयश्री बी.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1683