बार्से’ वन्यजीव अभयारण्य

  • बार्से’ वन्यजीव अभयारण्य

    बार्से’ वन्यजीव अभयारण्य

    • 14 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 143 Views
    • 1 Shares
     'बार्से' वन्यजीव अभयारण्य
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात जैविक बहुविधता व तिचे संवर्धनया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ‘बार्से’ (सिक्कीम) वन्यजीव अभयारण्यव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) -
        जैव विविधतेमधील र्‍हास, जैव विविधतेच्या र्‍हासाची धोके, मानव-वन्य जीव संघर्ष,नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    ‘बार्से’ (सिक्कीम) वन्यजीव अभयारण्य
     
    *   भारताच्या ईशान्य भागात निसर्गसौंदर्यानं नटलेलं महत्त्वाचे राज्य म्हणजे सिक्कीम. भारतातील पहिलं ‘सेंद्रिय’ राज्य. भौगोलिक रचनेमुळे या राज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या पश्रि्चमेला नेपाळ, उत्तरेला आणि ईशान्य दिशेला चीन आणि पूर्वेला भूतान हे देश आहेत, तर सिक्कीमच्या दक्षिणेला पश्रि्चम बंगाल या राज्याची सीमा आहे. चीनच्या शेजारामुळे बर्‍याचदा चर्चेत राहिलेलं असं हे राज्यं; पण खरं सांगायचं तर निसर्गदेवतेनं आपल्या रंगांची इथं मुक्तहस्ते उधळण केली आहे.
     
    *   सिक्कीममध्ये चार जिल्हे आहेत. पूर्व सिक्कीम, पश्रि्चम सिक्कीम, उत्तर सिक्कीम आणि दक्षिण सिक्कीम. तसं बघायला गेलं तर बहुतेक पर्यटक सामान्यतः पूर्व सिक्कीम म्हणजेच गंगटोक आणि उत्तर सिक्कीम म्हणजे ‘ला चुंग’ वगैरे ठिकाणांना मोठ्या प्रमाणावर भेट देतात; पण पश्रि्चम सिक्कीममध्ये असलेली ओखरे, बार्से आणि युक्सम ही ठिकाणं म्हणजे अलौकिक निसर्गसौंदर्याची उदाहरणं. यातील बार्से आणि युक्सम ही ‘होम स्टे’ची सुविधा पुरवणारी गावं. सभोवताली पसरलेलं दाट जंगल, भरपूर धबधबे आणि असंख्य पक्ष्यांची विविधता हे युक्समचं वैशिष्ट्य. बागडोगरापासून सुमारे सहा तासांवरच्या या गावातून ‘कांचनजंगा राष्ट्रीय उद्याना’कडे जाण्याचा मार्ग आहे. नैसर्गिक विविधतेसाठी प्रसिद्ध असणार्‍या या गावाला परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. ट्रेकिंग, हायकिंग आणि पक्षी-निरीक्षण असं सगळंच इथं करता येऊ शकतं.
     
    *   ‘तिस्ता’ आणि ‘रंगीत’ या सिक्कीममधून वाहणार्‍या दोन महत्त्वाच्या नद्या. चांगल्या पर्जन्यमानामुळे या दोन्ही नद्यांना मुबलक पाणी असतं. हिमालयाच्या शेजारामुळे थंडीही सिक्कीममध्ये चांगलीच पडते. तापमान इतकं खाली उतरतं की या नद्यांचं पाणीही गोठून जातं. सिक्कीमच्या एकूण भूभागाच्या ८० टक्के भूभाग हा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. सिक्कीममध्ये एक राष्ट्रीय उद्यान आणि सहा वन्यजीव अभयारण्यं आहेत. या सात संरक्षित क्षेत्रांनी सिक्कीमच्या एकूण भूभागाच्या ३० टक्के भाग व्यापला आहे. सन १९१४ मध्ये सिक्कीमच्या तत्त्कालीन महाराजांनी निसर्गाच्या संरक्षणासाठी विशेष पावलं उचलली आणि आणि अनेक जंगलांना संरक्षण दिलं. सिक्कीममधील जनतेच्या लाकडाच्या गरजा आणि पाळीव प्राण्यांच्या चराईसाठी काही खास वनं ठेवण्यात आली आणि बाकी उर्वरित जंगलांमध्ये निसर्गाच्या संवर्धन-संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात आले. सन १९७५ मध्ये सिक्कीम भारतात विलीन होईपर्यंत याच कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असे.
     
    *   सन १९७५ मध्ये भारतात विलीन झाल्यावर सिक्कीममध्ये या वनांच्या संरक्षणासाठी वनविभागाची निर्मिती करण्यात आली. वनविभागाच्या उत्कृष्ट कारभारामुळे आजही मोठ्या प्रमाणावर जंगलभाग इथं टिकून आहे. आज आपण यापैकी ‘बार्से’ या वन्यजीव अभयारण्याची माहिती घेणार आहोत. सुमारे १०४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्याला ‘बार्से रोडोडेंड्रॉन अभयारण्य’ या नावानंही ओळखलं जातं. ‘कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान’ आणि पश्रि्चम बंगालमधील ‘सिंगलीला राष्ट्रीय उद्यान’ यांना एकमेकांशी जोडण्यात बार्से वन्यजीव अभयारण्य ‘कॉरिडॉर’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतं.
     
    *   ‘रोडोडेंड्रॉन’ या एप्रिल महिन्यात फुलणार्‍या वनस्पतीसाठी प्रसिद्ध असलेलं हे अभयारण्य. या वनस्पतीपासून स्थानिक लोक सरबत आणि दारू तयार करतात. वन-उपजांचा पाहिजे तेवढाच वापर इथल्या लोकांकडून होतो. याशिवाय या अभयारण्यात अनेक प्रजातींची आमली (ऑर्किड), नेचे आणि दगडफुलं पाहायला मिळतात. या अभयारण्यात ४ ते ४.५ किलोमीटरचा ‘नेचर ट्रेल’ आहे. अत्यंत सुंदर पद्धतीनं तयार केलेला असा हा ‘नेचर ट्रेल’. साधारणतः दर एक-दीड किलोमीटर अंतरावर बसण्याची सोय केलेली आहे. याच्या शेवटच्या भागात आपण पोहोचलो की कांचनजंगा शिखराचं सुरेख दृश्य दिसतं.
     
    *   नजरेचा आणि शरीराचा दोहोंचा शीण घालवणारं असंच ते दृश्य असतं. या ठिकाणी फायर-टेल्ड् मायझॉरनिससारख्या काही सुंदर पक्ष्यांचं दर्शन घडतं. इथं वनविभागाचं एक विश्रामगृह आहे. या विश्रामगृहातही निवासाची सोय आहे; पण बहुतांश पर्यटक गावातील ‘होम स्टे’मध्ये राहण्याचा पर्याय निवडतात. या अभयारण्यात पक्ष्यांच्या विविधतेची अगदी रेलचेल आहे. ‘ट्रेल’च्या सुरुवातीला असलेल्या कॅफेटेरियाच्या आजूबाजूला ब्लॅक-फेस्ड् लाफिंग थ्रश, स्पॉटेड लाफिंग थ्रश, व्हाईट-ब्राऊड् फुलव्हेटा असे अनेक पक्षी असतात. ओढ्यांच्या बाजूनं ब्राऊन डीपर आणि फोक्ड्र्-टेल यांसारखे पक्षी आढळतात. हे पक्षी इथं आढळणं म्हणजे उत्तम ओढे आणि भरपूर पाणीसाठा यांचं ते द्योतक आहे. सिक्कीमचा राज्यप्राणी असणारा ‘रेड पांडा’ इथं अर्थातच मोठ्या संख्येनं आढळतो. याशिवाय बिबट्या, लेपर्ड कॅट आदी सस्तन प्राण्यांची संख्याही चांगली आहे. तिबेटी लांडगा आणि रानकुत्रा या प्राण्यांचीही नोंद या भागात झालेली आढळते.
     
    *   पृथ्वीवरील या नैसर्गिक नंदन‘वना’चं महत्त्व इथल्या लोकांनी अचूक जाणलं आहे. भारताच्या शिरपेचातल्या या निसर्गरूपी तुर्‍याची देखभाल इथल्या प्रशासनाकडून अगदी व्यवस्थित राखली जाते. राज्यात जवळपास प्रत्येक गावात ‘इको-डेव्हलपमेंट कमिटी’ स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या कमिट्यांचं कामकाजही अत्यंत सुसूत्रतेनं सुरू असतं.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    १६ मे २०२१ / अनुज खरे

Share this story

Total Shares : 1 Total Views : 143