इस्राईल

  • इस्राईल

    इस्राईल

    • 14 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 27 Views
    • 0 Shares
     इस्राईल
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पर्यटन व जागतिक भूगोलया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  इस्राईल देशाबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.४ आर्थिक भूगोल :
    *   पर्यटन - पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    इस्राईल
     
    *   ज्यू समाज परंपरा, संस्कृती, भाषा व खाद्यसंस्कृती याबद्दल प्रेम बाळगणारा आहे. अस्मिता सतत जागती ठेवून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू असते. कायम प्रयोगशील असणारे हे लोक आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन. नावीन्याचा व पूर्वजांचा शोध घेणारे हे लोक आहेत.
     
    *   कॅनडा-अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडपर्यंत ज्यू समाज पसरलेला आहे. त्या सगळ्यांसाठी सन २०१८ पासून ‘लॉ ऑफ रिटर्न’ हा नियम तयार करण्यात आला असून जगभरातील ज्यूंसाठी इस्राईलची दारं कायम खुली आहेत. इस्राईलमध्ये हजारो मराठी-भारतीय ज्यूबांधव राहतात. ‘बेने इस्राईल’  म्हणून ओळखले जाणारे अनेक ज्यूबांधवही भारतात वास्तव्याला आहेत.
     
        जगभरात विखुरलेल्या ज्यू  समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्ती -
     
    १)  ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग
    २)  ‘ओरॅकल’ कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन
    ३)  अमेरिकेतील प्रसिद्ध राजकारणी व ‘ब्लूमबर्ग’ कंपनीचे संस्थापक मायकल ब्लूमबर्ग
    ४)  ‘गूगल’चे संस्थापक सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज
    ५)  ‘डेल’ कंपनीचे संस्थापक मायकल डेल
    ६)  जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग
    ७)  प्रसिद्ध गायक बॉब डॅलन
    ८)  बास्केटबॉलपटू ओम्री कॅस्पी
     
    *   १४ मे १९४८ रोजी इस्राईलला  ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळालं. सन १९४९ मध्ये या देशाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत विविध राष्ट्रांच्या धोरणांशी किंवा विचारसरणींशी अनेकानेक प्रसिद्ध ज्यू व्यक्ती संबंधित राहिल्या आहेत; परंतु माणूस नेहमी स्वत:चं कूळ अन् मूळ शोधत असतो.
     
    *   डेव्हिड बेन-गुरियन यांनी, ज्यूंचा वेगळा देश असावा का, तो कुठं असावा, कसा असावा इत्यादी मुद्द्यांवर प्रबोधन व चळवळी उभ्या केल्या, त्यातूनच १९४८ ला इस्राईलची निर्मिती झाली. कट्टर समाजवादी असलेले, ज्यू असण्याचा अभिमान बाळगणारे; पण धार्मिक नसलेले डेव्हिड बेन-गुरियन हे या देशाचा चेहरा ठरले व पुढं १५ वर्षं पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. या सर्व प्रक्रियेला ‘ज्यूंचं पुनरुज्जीवन’ असंच म्हणावं लागेल. गेल्या सात-आठ दशकांपासून ते आजपर्यंत आपण इस्राईल-पॅलेस्टाइन हा संघर्ष पाहत आहोत. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये हा वाद विकोपला गेला आहे.
     
    *   आशिया खंडातील इस्राईलची राजधानी जेरुसलेम ही असून त्या देशाची लोकसंख्या  सुमारे ७९ लाख आहे. प्रमुख भाषा हिब्रू व अरबी आहे. भारत-इस्राईलचे विविध कारणांमुळे वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. भारतासारखंच इस्राईलमध्ये उत्तरेत बर्फ पडतं, तर दक्षिणेत वाळवंटी जमीन आहे. इस्राईलनं कृषिक्षेत्रात खूपच प्रगती केली असून, यासंबंधात भारताशी काही करार झाल्यामुळे त्याचा भारताला फायदा झाला. शेतीतील प्रयोग, जोडव्यवसाय व तंत्रज्ञानाची साथ यांमुळे भारतात शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली.
     
    *   इस्राईलमध्ये  वर्षभरात कुठल्याही काळात पर्यटन करता येण्याजोगं असतं. इस्राईल आणि पॅलेस्टाईन या देशांत पवित्र धार्मिक स्थळं, पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू, भव्य शहरं आणि उल्हसित करणारं निसर्गसौंदर्य आहे. कलात्मक गोष्टी, व्यवसायासाठी लिबरल हब्ज्, लांबच लांब समुद्रकिनारे आणि आध्यात्मावरचे देखावे ही तिथली काही ठळक वैशिष्ट्यं. अरब आणि ज्यू संस्कृतीतील बर्‍याच गोष्टी इथं पाहायला मिळतात. जेरुसलेम येथील जुन्या शहराचं चार भागांत (Four Quarters) विभाजन केलं गेलेलं आहे. अर्मेनियन (Armenian), ख्रिश्चन (Christian), ज्यूईश (Jewish) आणि मुस्लिम (Muslim). सन १९८१ मध्ये या जुन्या शहराचा समावेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला. दुर्दैव म्हणजे List of World Heritage in Danger मध्येदेखील त्याचा समावेश आहे.
     
    *   जेरुसलेम इथला सोन्याचा चमकदार डोम ऑफ द रॉक (Dome of the Rock), शहराच्या थोडासा बाहेर असलेला मर सबा मठ (Mar Saba Monastery), द वेस्टर्न वॉल (The Western Wall), चर्च ऑफ द होली सेपलकर (Church of the Holy Sepulchre), टेम्पल माऊंट (Temple Mount), टॉवर ऑफ डेव्हिड, अल्-अक्सा मशीद (Al-aqsa Mosque), जुन्या शहराचं प्रवेशद्वार - दमास्कस गेट (Damascus Gate), वॉल्स ऑफ जेरुसलेम, द इस्राईल म्युझियम (The Israel Museum) व अशी इथं बरीच प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासारखी आहेत.
     
    *   इस्त्राईलचं दुसरं महत्त्वाचं शहर म्हणजे तेल अवीव (Tel Aviv). तिथं सुंदर समुद्रकिनारे आणि जबरदस्त नाईटलाईफ आहे. The city that never sleeps, असे तेल अवीवचं वर्णन केलं जातं.
     
    *   धार्मिक स्थळांना भेट देण्यात काही पर्यटकांना तितकीशी रुची नसते. अशांसाठी काही निसर्गस्थळं आहेत, त्यांपैकीच एक ‘मृत समुद्र’ (Dead Sea). या समुद्रात कुणी बुडत नाही. त्यामुळे इथं डुबक्या मारण्याचा आनंद मनमुराद घेता येतो. या मृत समुद्राचं वर्णन World's most wacky natural wonder Lowest place on earth असं केलं जातं. हा समुद्र खनिजसमृद्ध व अतिखारट आहे. या अशा पाण्यात तरंगत राहणं हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो.
     
    *   याशिवाय, अक्को (Akko), मसाडा (Masada), सी ऑफ गॅलिली (Sea of Galilee), वाळवंटी टिम्ना पार्क (Timna Park), बेथलेहेम (Bethlehem) व हैफा (Haifa) ही काही ठिकाणं व शहरं बघण्यासारखी आहेत. जेरुसलेममध्ये इतिहास आहे, तर तेल अवीव हे आधुनिक शहर आहे, म्हणून बहुसंख्य बजेट ट्रॅव्हलर्स हे उत्तरेतल्या हैफाला जाऊन काही दिवस निवांत घालवतात.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    १३ जून २०२१ /प्रज्ञेश मोळक

Share this story

Total Shares : 0 Total Views : 27