कॅनडा

  • कॅनडा

    कॅनडा

    • 14 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 37 Views
    • 0 Shares
     कॅनडा
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पर्यटन व जागतिक भूगोलया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  कॅनडा देशाबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.४ आर्थिक भूगोल :
    *   पर्यटन - पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    कॅनडा
     
    *   १३ एप्रिल २०२१ रोजी ‘यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट’ या संस्थेनं ‘बीएव्ही ग्रुप’ आणि ‘व्हार्टन विद्यापीठा’च्या संयुक्त विद्यमाने २०२१ मधल्या सर्वोत्कृष्ट देशांच्या रॅँकिंगविषयीचा अहवाल जाहीर केला. या रँकिंगनुसार ‘एकूणच सर्वोत्कृष्ट देश’चा किताब २०२१ मध्ये कॅनडानं पटकावला आहे. सन २०१६ मध्ये पहिला क्रमांक जर्मनीनं मिळवला होता, तर सन २०१७ ते २०२० मध्ये सलग चार वर्षं हा पहिल्या क्रमांकाचा किताब स्वित्झर्लंडकडे होता. भारत या यादीत सलग दोन वर्षं २५ व्या क्रमांकावर आहे. थोडक्यात, जागतिकीकरणामुळे आपल्या भौतिक सीमांच्या पलीकडेही सर्वच देशांचं अस्तित्व आणि महत्त्व आता वाढलेलं आहे.
     
        २०१६ पासून नियमितपणे ७८ देशांचं सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणात  पुढील मापदंडांचा समावेश आहे -
    १)  चपळता (Agility),
    २)  उद्योजकता (Entrepreneurship),
    ३)  जीवनविषयक गुणवत्ता (Quality of Life),
    ४)  मूव्हर्स (Movers),
    ५)  सामाजिक उद्देश (Social Purpose),
    ६)  सांस्कृतिक प्रभाव (Cultural Influence),
    ७)  व्यवसायासाठी प्रोत्साहन (Open for Business),
    ८)  सत्ता (Power),
    ९)  साहस (Adventure)
    १०) वारसा (Heritage)
     
    *   कॅनडात प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातं व स्वातंत्र्यही असतं, त्यामुळे जगातील भरपूर लोक तिथं स्थलांतरित होत आहेत. विशेष म्हणजे, तरुणांसाठी तर या देशानं गेल्या काही वर्षांपासून त्यांची दारं कायम उघडी ठेवली आहेत. शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठीचं सर्वोत्तम पर्यावरण कॅनडात आहे.
     
    *   ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी असून लोकसंख्या आहे ३.७६ कोटी. इंग्लिश व फ्रेंच या प्रमुख भाषा आहेत. ९० टक्के लोकसंख्या ही अमेरिकी सीमांच्या सरासरी १०० किलोमीटर अंतरावर वास्तव्य करते. कॅनडामध्ये बहुसांस्कृतिक समाज राहतो, ज्यात ब्रिटिश, फ्रेंच, आशियाई आणि जगातील जवळपास सर्व ठिकाणचे लोक कमी-अधिक प्रमाणात राहतात. ‘इंडो-कॅनेडियन’ लोकसंख्येचा विचार केला तर १४ लाख लोक तिथं आहेत. म्हणजेच भारतीय वंशाचे किंवा भारतीय असे एकूण लोकसंखेच्या ४ टक्के लोक तिथं आहेत, या चार टक्क्यांपैकी २ टक्के लोक पंजाबी आहेत. बहुसंख्य भारतीय हे टोरांटोत राहतात. कॅनडामध्ये कुठंही मोकळंढाकळं जगता येतं हे त्या देशाचं वैशिष्ट्य. कॅनडानं स्वत:ची प्रतिष्ठा जपत एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे.
     
    *   कॅनडातील युकॉनमधील क्लुआने नॅशनल पार्कच्या हिमनदीपासून ते नोव्हा स्कॉशियाच्या केप ब्रेटन हायलँडपर्यंतचं तिथलं नैसर्गिक सौंदर्य आफाट आहे. नायगारा धबधब्याचे नयनरम्य दृश्य, व्हिसलरचा पर्फेक्ट स्की स्पॉट, जागतिक वारसास्थळांच्या यादीतलं क्यूबेक हे ‘ओल्ड टाउन’, जलक्रीडाप्रेमींचं टोफिनो, रात्री सुंदर दिसणारी टोरांटोची स्कायलाइन, बे ऑफ फंडी, कॅपिलिनोचा हलता पूल, बँफ राष्ट्रीय उद्यान, प्रिन्स एडवर्ड आयलंड, व्हँकुव्हर शहर... अशी ‘एक से बढ़कर एक’ पर्यटनस्थळं कॅनडात आहेत.
     
    *   काळ्या व ग्रिझली अस्वलांसह इतर वन्य प्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. ट्रेकिंगसाठी व इतर साहसी खेळांसाठीही बरीच ठिकाणं आहेत.
     
    *   ब्रिटिश कोलंबियन नानिमो शहरात दरवर्षी ‘बाथटबची शर्यत’ असते. ठरवून दिलेलं अंतर बाथटबपासून तयार केलेल्या बोटींमधून वेगानं पार करायचं असतं.
     
    *   विविध प्रकारच्या वाईन्स, समुद्री खाद्य, फ्रेंच पदार्थ ‘पुतीन’ व ‘मेपल सरबत’ हा तिथल्या दैनंदिन खाद्यसंस्कृतीचा भाग आहे.
     
    *   मानवी विकास निर्देशांकह जास्त असणारा कॅनडा हा देश अतिशय मोठा असून निसर्गसौंदर्याची समृद्ध अशी ती भूमी आहे. तिथं सर्व ऋतू अनुभवता येतात. अत्यंत विकसित, प्रगत अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान तिथं आहे.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 37