२ - डीजी औषध

  • २ - डीजी औषध

    २ - डीजी औषध

    • 09 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 14 Views
    • 0 Shares
     २ - डीजी औषध
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आरोग्य आणि औषधेया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’कोरोनावर उपयुक्त २ डीजी ’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विकास

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.४ आरोग्य -
    *   भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम. भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा. भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    कोरोनावर उपयुक्त २-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी)
     
    *   मे २०२१ मध्ये ‘२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी)’ या औषधाला भारतीय औषध महानियंत्रकांनी करोना रुग्णांसाठी आपत्कालीन स्थितीत वापर करण्यास परवानगी दिली.
    *   ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीयर मेडिसिन अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस)’ या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केले आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोविड-१९ झालेल्या रुग्णांमध्ये आपत्कालीन स्थितीत अनुयोगी (अ‍ॅडजंक्ट) उपचार म्हणून या औषधाचा उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) मंजुरी दिली. ‘डीआरडीओ’मधील प्रयोगशाळा हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजच्या सहयोगाने कर्करोगावरील ‘रेडिएशन थेरपी’संदर्भात या औषधाचा अभ्यास करत आहे.
     
        हे औषध नेमके काय आहे ?
     
    *   ‘२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज’ या औषधाच्या चाचण्या कर्करोगावरील उपचारांच्या दृष्टीने सुरू होत्या, त्यावेळी  कोविड-१९ आजारावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. हे औषध पावडर स्वरूपात सॅशेमध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पाण्यात विरघळवून तोंडावाटे रुग्णाला दिली जाते.
     
    *   विषाणूप्रभावित पेशींमध्ये हे औषध साचते आणि विषाणू संश्‍लेषण (व्हायरल सिंथेसिस) व ऊर्जानिर्मिती थांबवून विषाणूच्या वाढीला आळा घालते. प्रादुर्भावित पेशींमध्येच साचून राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे हे औषध अनन्यसाधारण ठरते.
     
    *   या औषधाच्या मूलभूत यंत्रणेमध्ये ग्लायकोसिस प्रतिबंधित करण्याचा किंवा पेशी ऊर्जानिर्मितीसाठी ग्लुकोजचे विभाजन करण्यासाठी जे मार्ग वापरतात त्यांपैकी एखादा मार्ग प्रतिबंधित करण्याचा समावेश होतो. कर्करोगाच्या पेशींद्वारे होणारी ऊर्जानिर्मिती थांबवून त्यांना नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत प्रतिकृती निर्मितीसाठी ग्लायकोसिसवर अवलंबून असलेल्या विषाणूग्रस्त पेशींबाबतही वापरली जाऊ शकते.
     
    *   भारतात कोविड साथीचा उद्रेक झाला तेव्हा, हे औषध कोविड-१९ बरा करण्यासाठी वापरले जाऊ शकते का, याची शक्यता तपासून बघण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी)’ मध्ये गेल्या वर्षी झालेल्या चाचण्यांत असे आढळून आले की, हे औषध विषाणूग्रस्त पेशींना नष्ट करत आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या.
     
    *   एप्रिल २०२० मध्ये ‘आयएनएमएएस’ने ‘सीसीएमबी’च्या मदतीने हैदराबादमध्ये या औषधाचे प्रायोगिक परीक्षण सुरू केले. त्यानंतर मे २०२० मध्ये ‘सेण्ट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)’ आणि भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी संयुक्तपणे दुसर्‍या टप्प्यांतील चाचण्यांसाठी परवानगी दिली. मे ते ऑक्टोबर २०२० या काळात कोविड-१९ रुग्ण या औषधाला कसा प्रतिसाद देत आहेत याच्या प्रारंभिक चाचण्या इन्स्टिट्यूटने सुरू केल्या. या औषधाचा उत्तम परिणाम दिसून आला, कोणतेही ‘साइड-इफेक्ट्स’ दिसून आले नाहीत आणि रुग्ण जलदगतीने बरे झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकात चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांतून अनुकूल निष्पत्ती प्राप्त झाली.
     
    *   ‘क्लिनिकल ट्रायल्स’च्या निष्पत्तीतून असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जलदगतीने बरे होण्यात हा रेणू उपयुक्त ठरतो, तसेच यामुळे रुग्णाचे पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होते. कोविड-१९ आजार झालेल्या रुग्णांसाठी हे औषध खूपच गुणकारी ठरेल असे यातून स्पष्ट झाले. परिणामकारकतेबद्दलच्या सांख्यिकीनुसार, २-डीजी औषध देण्यात आलेल्या रुग्णांमधील आजाराची लक्षणे तुलनेत जलदगतीने नाहीशी झाली. तिसर्‍या दिवसापर्यंत हे रुग्ण पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वापासून मुक्त झाले. याचा अर्थ हे औषध ऑक्सिजन थेरपीची गरज किंवा त्यावरील अवलंबित्व जलदगतीने कमी करत आहे. अर्थात, हे औषध खबरदारी पाळून घेतले जाणे अत्यावश्यक आहे. कोविड-१९ आजारावरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सूचनेशिवाय घेतले जाऊ नये. याशिवाय औषधाचा साठा करून ठेवणे हा गुन्हा आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    ६ जून २०२१ / डॉ. राहुल पंडित

Share this story

Total Shares : 0 Total Views : 14