तंत्रज्ञान विकास

  • तंत्रज्ञान विकास

    तंत्रज्ञान विकास

    • 08 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 11 Views
    • 0 Shares
    इथेनॉल
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ऊर्जा निर्मितीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात इथेनॉल : नवी इंधन संजीवनी’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ३.१ ऊर्जा विज्ञान :
        पारंपारिक ऊर्जा स्रोत - जिवाश्म इंधन आणि ज्वलन
        अपारंपारिक ऊर्जा स्रोत -  जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपारिक ऊर्जा स्रोत, उदा. ऊस पिक इत्यादीचे उपउत्पादने

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    इथेनॉल : नवी इंधन संजीवनी
     
    *   पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी सरकारने १ एप्रिल २०२३ हा दिवस मुक्रर केला आहे. त्या दिवसापासून देशभरातील पेट्रोलपंपांवरील पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जाईल. यामुळे भारताचा तेल आयातीवरील खर्च ३० हजार कोटी रुपयांनी कमी होईल, असा अंदाज आहे. तेलाच्या वाढत्या किमती पाहता हा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. यातून सरकारचे बहुमूल्य परकीय चलन वाचणार आहे. हाच पैसा अन्य विकासकामांवर खर्च करता येईल, यापेक्षा सतत अस्थिरतेच्या सावटाखाली असलेल्या देशातील साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्यही मिळून जाईल.
     
    *   ऊठसूट सरकारकडे मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत. इथेनॉलच्या रूपाने परकीय चलन वाचविण्याची आणि साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची संजीवनी बुटीच सरकारला मिळाली आहे. एका अर्थाने याला इंधन संजीवनीही म्हणू शकतो. इंधन तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असेल. मात्र हे लक्ष्य गाठणे एवढे सोपे नाही. कारण सध्या देशातील इथेनॉलची उत्पादनक्षमता ४२५ कोटी लिटर इतकी आहे. आतापर्यंत ३२० कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे करार तेल कंपन्यांनी इथेनॉल कंपन्यांशी केलेले आहेत. २०२२ मध्ये १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे लक्ष्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी आणखी ५० कोटी लिटर पेट्रोलची गरज आहे. ती या वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे लक्ष्य पूर्ण होईल. मात्र त्यानंतरच्या वर्षभरात आणखी ४२५ कोटी लिटरची उत्पादनक्षमता कशी साध्य करणार हा मोठा प्रश्न आहे.
     
    *   तो सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून पर्यावरणदिनी इ-१०० या इथेनॉलशी संबंधित १०० केंद्रांचे उद्घाटन केले आणि इथेनॉलनिर्मिती साध्य करण्यासाठीचा रोडमॅप जाहीर केला.
     
    *   २०१४ पर्यंत पेट्रोलमध्ये केवळ १ ते १.५०  टक्का इथेनॉल मिसळले जात होते. उत्पादनही केवळ ३८ कोटी लिटर इतकेच होत होते. सध्या हे उत्पादन ३२० कोटी लिटरवर गेले आहे. २०२१ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाणही ८.५०  टक्क्यांवर गेले. म्हणजेच इथेनॉल उत्पादनात जवळजवळ आठपट वाढ झाली आहे.
     
    *   इथेनॉल ही हरित ऊर्जा आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. हे लक्षात आल्यानंतर २०१८ साली केंद्र सरकारने इथेनॉलविषयी स्वतंत्र धोरण जाहीर केले. त्यानुसार नव्या इथेनॉल प्रकल्पांना विविध सोयी सवलती देऊ केल्या. इथेनॉल खरेदीचे दर निश्रि्चत करून इथेनॉल प्रकल्पांना खरेदीची हमी दिली. तसेच २०२५ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, मात्र यात मिळणारे यश पाहता हे उद्दिष्ट दोन वर्षे आधीच गाठण्याचे सुधारित लक्ष्य सरकारने तेल कंपन्या आणि साखर उद्योगाला दिलेले आहे. पंतप्रधानांनी पर्यावरणदिनी केलेल्या भाषणात २०२५ मध्येच २० टक्के लक्ष्य गाठण्याचा उल्लेख केला.
     
    *   पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्याने त्याचा वाहनांवर काही परिणाम होतो काय, हे पाहणे गरजेचे आहे. सध्याची म्हणजेच बीएस ६ मानांकन असलेल्या वाहनांच्या इंजिन्सची क्षमता पेट्रोलमध्ये केवळ १३ टक्के इथेनॉल सामावून घेण्याची आहे. त्याचे प्रमाण वाढविले तर या इंजिन्समध्येही आवश्यक ते तांत्रिक बदल करावे लागतील. चालू वाहनांसाठी लवकर पर्याय सापडला नाही तर प्रत्येक पेट्रोल पंपावर २० टक्के इथेेनॉलमिश्रित आणि जुन्या वाहनांसाठी १० टक्के इथेनॉलमिश्रित अशी व्यवस्था करावी लागेल.
     
    *   या इथेनॉलमुळे साखर उद्योगाला मिळणारी आर्थिक स्थिरता. दरवर्षी सुमारे ५० ते ६० लाख टन साखर अतिरिक्त होत आहे. हेच लक्ष इथेनॉलकडे वळविले तर साखर कारखान्यांनाही हमखास उत्पन्नाचा एक नवा मार्ग मिळेल. यातून सुमारे ७०० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. राहिलेले ४०० कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यापासून बनवण्याचे सरकारचे धोरण आहे, यामुळे वाया जाणारे धान्यही वाचेल आणि शेतकर्‍यांनाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल. म्हणूनच इथेनॉल ही एक नवी इंधन संजीवनी आहे.
     
     सौजन्य व आभार :  दैनिक लोकमत
     ७ जून २०२१

Share this story

Total Shares : 0 Total Views : 11