व्हर्टीकल फार्मिंग

  • व्हर्टीकल फार्मिंग

    व्हर्टीकल फार्मिंग

    • 05 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 85 Views
    • 0 Shares
    व्हर्टीकल फार्मिंग
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पर्यावरण व परिस्थितिकीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.४ आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) :

    *   शेती - महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप, उच्च उत्पन्न देणार्‍या जाती, शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    व्हर्टीकल फार्मिंगद्वारे हळदीची लागवड
     
    *   हळद पीक म्हटले, की महाराष्ट्रातील कृष्णाकाठचा वाई आणि सांगलीचा परिसर डोळयांपुढे येतो. वाई तालुक्यात इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली. वाई तालुक्यात अनेक गावांत आजही पारंपरिक पद्धतीने हळदीची लागवड केली जाते.
     
    *   ’व्हर्टीकल फार्मिंग’ तंत्रज्ञानाद्वारे हळद लागवडीचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. यासाठी हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील ‘लॉकेडॉनंग’ या औषधी गुणधर्म व निर्यातक्षम बेण्याचा वापर केला आहे.
     
    *   हळद हे मसाले वर्गातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ टन इतकेआहे. जगातील हळदीच्या एकूण उत्पादनापैकी जवळजवळ ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. परंतु त्यापैकी केवळ १५ ते २० टक्के हळद निर्यात होते.
     
    *   देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड असा क्रम लागतो.
     
    *   महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० टन इतके होते.
     
    *   भौगोलिकदृष्टया हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशात हळद चांगली येऊ शकते. महाराष्ट्रात साधारणपणे सर्व भागात हळदीचे पीक चांगले येऊ शकते. ज्या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे किंवा ओलीताखालील क्षेत्र जास्त आहे त्या भागात हवेतील दमटपणा थोडा वाढतो आणि हा दमटपणा हळद पिकास अनुकूल असा असतो.
     
    *   हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत करणे चांगले. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. यासाठी एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवस वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात. हळदीच्या पिकानंतर कांदा, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ऊस यासारखी पिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा या पिकानंतर हळद लागवड करू नये. कारण या पिकांवर जमिनीतून उद्भवणारे सर्व रोग पुढे हळद पिकावर येतात.
     
    *   हळद लागवडीच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. यामध्ये सरी वरंबा पध्दत, रुंद वरंबा पध्दत, गादीवाफे किंवा बेड पद्धत वापरली जाते.
     
    *   हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र याचे प्रमाण किती आहे, हे हळदीतील ‘कुरकूम’ नावाच्या घटकावर ठरते. ‘कुरकूम’ म्हणजे हळदीचा गंडा मोडल्यावर आत दिसणारा लालसर पिवळसर गोलाकार भाग होय. आपल्याकडच्या हळदीमध्ये हे प्रमाण २.५० ते ३ टक्के असते तर िहमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील हळदीमध्ये हे प्रमाण ५.५० ते ११ टक्के एवढे आहे. ‘लॉकेडॉनंग’ या हळद बेण्याचा औषधांसाठी म्हणून अधिक वापर होतो. या हळदीला परदेशात मोठी मागणी आहे. या हळदीपासून तयार केलेली पावडर ‘कॅप्सूल’ स्वरूपात खाण्यासाठी आणि सुगंधी तेल,आयुर्वेदिक औषधे, कीटक नाशकात वापरली जाते. 
     
    *   सांगली आणि वाई हे दोन्हीही प्रदेश हळद लागवडीसाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत. वाईमध्ये हळद लागवडीचे नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत. यातच सध्या येथील काही शेतक र्‍यांनी इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात केली आहे. ५ गुंठे जागेत हळद लागवडीसाठी ‘पॉलिहाऊस’ उभारले आहे. यासाठी हिमाचल प्रदेशमधून हळदीचे बेणे आणले आहे. या हरितगृहाच्या आत ६० फूट लांब आणि २ फूट उंचीच ६ कप्प्यांचे एकेक थर उभारले. या दोन थरांमध्ये ३ मीटर अंतर ठेवून असे ९  थर उभे केले आहेत. २ फूट उंचीच्या कप्प्यामध्ये दीड फूट माती भरलेले आहे. या मातीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केलेला आहे. या प्रकल्पातील लागवडीसाठी ५.५० क्विंटल बेणे वापरले आहे. ठाण्यातील एस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा लिमिटेड कंपनीबरोबर ५ शेतकर्‍यांनी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला आहे. ‘ग्रीन हाऊस’ अंतर्गत मातीपासून सगळी सामुग्री या कंपनीने पुरवली आहे. यामध्ये माती, रचना, बी बियाणे, सेंद्रिय खते, मजूर हे कंपनी पुरवते. शेतकर्‍यांनी कंपनीबरोबर सहा वर्षांचा करार केला आहे. यातून उत्पादित होणारे सर्व उत्पादन कंपनी घेणार असून याद्वारे दरवर्षी ५० टक्के परतावा कंपनी शेतकर्‍यांना देणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारी सर्व हळद निर्यात केली जाणार आहे.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक लोकसत्ता
    १ जून २०२१ /  विश्‍वास पवार

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 85