शेतीचे पर्यावरण

  • शेतीचे पर्यावरण

    शेतीचे पर्यावरण

    • 04 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 1570 Views
    • 0 Shares
     शेतीचे पर्यावरण
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’शेती’ या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’शेतीचे पर्यावरण’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

    २.४ आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) :
    *   शेती - महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप, उच्च उत्पन्न देणार्‍या जाती, शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्‍वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण.

    ३.१ कृषि परिसंस्था :
    *   पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी

    एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    शेतीचे पर्यावरण
     
    *   शेतीचे म्हणून एक पर्यावरण असते. जमीन, हवा, पाणी, तिथल्या वनस्पती, कीटक अशा अनेक गोष्टींचा संबंध शेती आणि त्यातून उत्पादित होणार्‍या उत्पादन आणि दीर्घकालीन शेत जमिनीशी येत असतो. हे पर्यावरण राखले तर त्याचा दीर्घकालीन फायदा शेतीत दिसून येतो.
     
    *   राज्यभरात सर्वसाधारणपणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर खरिपाच्या पेरणीस प्रारंभ होतो व त्यापूर्वी किमान १५ दिवस शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करण्यात मग्न असतो. कमी श्रमात अधिक नफा मिळावा, कमी वेळेत अधिक लाभ व्हावा हा नव्या पिढीचा स्वभाव बनतो आहे. त्याची साथ सर्वच क्षेत्रात पसरत असून शेतीतही कमी काळात अधिक उत्पादन व्हावे याकडे कल वाढतो आहे. पूर्वी वर्षांतून एकच पीक घेतले जाई तर काही ठिकाणी दोन पिके घेतली जात. आता वर्षांतून चार पिके घ्यावीत असे प्रयोगही अनेक जण करत आहेत. उपजाऊ जमिनीचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या मात्र वाढते आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्याला पर्याय नाही.
     
    *   पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने केली जायची. रासायनिक खतांचा वापर कमी व सेंद्रिय खताचा वापर अधिक होत होता. हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर सुरू झाला व सेंद्रिय खताचा लोकांना विसर पडू लागला. पेरणीच्या वेळी रासायनिक खते वापरायची सवय लोकांना लागली आहे. जमिनीचा प्रकार कुठला, वापरावयाचे खत कोणते, याचा फारसा विचार न करता सरसकट रासायनिक खते वापरली जात असल्याने ३० टक्केपेक्षा अधिक रासायनिक खत वाया जाऊन आपले मोठे राष्ट्रीय नुकसान होते. रासायनिक खताच्या कंपन्यांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असल्याने यात त्यांचे नुकसान होत नाही, मात्र शेतकर्‍यांचे अकारण नुकसान होते.
     
    *   आपल्याकडे जमिनीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार सांगितले जातात. त्यात हलकी, मध्यम व भारी अशी वर्गवारी केली जाते. प्रत्यक्षात जमिनीचे आठ ढोबळ प्रकार आहेत. काळी, लाल मातीची, वाळूमिश्रित माती, पांढरी माती, खडकाळ माती असे ते आणखी प्रकार आहेत. कोणते पीक घ्यावयाचे आहे त्यानुसार जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश घटकाचे प्रमाण तपासून त्याची मात्रा दिली पाहिजे. जमिनीत खत वापरताना माती परीक्षण करूनच खत वापरले पाहिजे. मात्र अजूनही देशातील केवळ पाच टक्के शेतकरीच माती परीक्षण करतात व ९५ टक्के शेतकरी रामभरोसे शेती करतात.
     
    *   शेतकर्‍यांच्या शेतात बलावर वापरली जाणारी यंत्रे आणि आता ट्रॅक्टरवरील आधुनिक साधने आहेत. त्याची देखभाल केली पाहिजे हे शेतकर्‍याला लक्षात येते. मात्र ज्या जमिनीतून वर्षांनुवष्रे तो उत्पादन घेतो आहे त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल केली पाहिजे याकडे त्याचे म्हणावे तसे लक्ष असत नाही. माती परीक्षणासाठी पुरेशा प्रयोगशाळा देशात उपलब्ध नाहीत. शासनाने काही पिकांच्या अनुदानासाठी माती परीक्षण बंधनकारक केल्याने प्रमाणपत्र जोडण्यासाठी म्हणून परीक्षण न करताच पसे देऊन कागद मिळविला जातो. केंद्र शासनाने मृदा आरोग्यपत्रिका मोहीम सुरू केली असली तरी त्याची गती मात्र अद्याप म्हणावी तशी नाही.
     
    *   अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, रशिया, जर्मनी या देशात वर्षांनुवष्रे माती परीक्षण करून शेती केली जाते व तेथे खतांवरील होणारा वायफळ खर्च कमी केला जातो. आपल्याकडे जमिनीचे क्षेत्रफळ कमी आहे. अल्पभूधारक शेतकर्‍याांचे प्रमाण तर प्रचंड आहे. त्यातच शेतकर्‍यांमध्ये माती परीक्षण करण्याची सवय नाही.
     
    *   जमिनीचे केवळ एकदा माती परीक्षण करून चालत नाही, तर किमान दोन ते तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून त्यानुसार खतांची मात्रा दिली गेली पाहिजे. रासायनिक खतांच्या दुष्परिणामाबद्दल मोठय प्रमाणावर चर्चा होते. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे कर्करोगासारखे आजार हातात हे सांगितले जाते, मात्र जैविक खते उपलब्ध करून देण्यासाठी जी तरतूद करायला हवी त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही.
     
    *   गावपातळीपासून ते मोठय शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी कचर्‍याची मोठी समस्या आहे. अनेक शहरात वर्षांनुवष्रे कचरा साचलेला असतो. कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने अनेक ठिकाणी उन्हाळयत कचर्‍याच्या ढिगाला आगी लावल्या जातात. वास्तविक या सर्व ठिकाणच्या कचर्‍याचे नीट वर्गीकरण केले व त्याची खतनिर्मिती केली तर संपूर्ण देशाची जैविक खताची गरज भागवता येईल एवढा कचरा आपल्या देशात जमा होतो. मात्र या प्रदीर्घकाळ शेतीची योग्य दिशा देणार्‍या विषयाकडे लक्ष दिले जात नाही. त्यातूनच शेतीची उपेक्षा होते आहे.
     
    *   १ हेक्टर जमिनीवर १ मीटर जर पाणी मुरले तर एका पावसाळयत २५ लाख लिटर पाणी जमिनीत राहू शकते. आपल्याकडे अशी क्षमता असणार्‍या जमिनी होत्या, मात्र पाणी साठवून ठेवण्याची क्षमता विविध कारणाने कमी होत चालल्याने जमिनीत पाणी मुरत नाही. दोन पावसातील अंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत वाढत राहिल्याने त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो आहे.
     
    *   माती परीक्षणातील प्रमुख तीन घटकांबरोबरच सूक्ष्मद्रव्याची तपासणीही आवश्यक आहे. सूक्ष्मद्रव्याची माहितीही शेतकर्‍याला दिली गेली पाहिजे. ज्यांना ही माहिती असते असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे शेतकरी योग्य पध्दतीने शेती करतात व त्याचा त्यांना लाभही मिळतो.
     
    *   पेरणीनंतर लगेच शेतकर्‍याच्या समोर समस्या असते ती शेतात वाढलेले तण कमी करण्याची. गेल्या काही वर्षांत सरसकट प्रत्येक पिकासाठी तणनाशकाचा वापर केला जातो आहे. खुरपण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे तणनाशकाचा वापर अपरिहार्य असला तरी अनेक तणनाशकांमुळे शेतीतील जिवाणू नष्ट होण्याचे प्रमाण वाढते आहे. पिकाच्या मुळाशी असणारे जिवाणू कीटकनाशक व तणनाशकामुळे नष्ट झाले तर त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
     
    *   शेतीचे म्हणून एक पर्यावरण आहे. या पर्यावरणात सर्व प्रकारचे घटक वर्षांनुवष्रे एकत्र राहतात. त्याची एक साखळी तयार होते. ती साखळी तोडण्याच्या घटना वारंवार घडत गेल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो व त्यामुळेच आपल्याकडील पिकाच्या उत्पादकतेत घट होते आहे.
     
    *   शुद्ध बीजाची उपलब्धता हीच पेरणीच्या वेळी शेतकर्‍यासमोरील मोठी समस्या असते. सर्वच ठिकाणी सरसकट भेसळ होत असल्याने बियाणांमध्येही भेसळ वाढली आहे. त्यातून दुबार व तिबार पेरणीचे प्रसंग शेतकर्‍यांवर ओढवतात. साधे वाण, सरळ वाण व सुधारित वाण यातील खरेदी करताना दुकानदार जे सांगतो त्यावर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांना खरेदी करावी लागते. आपल्याच घरचे बियाणे वापरण्याची पूर्वी असलेली पद्धत आता नामशेष होत असल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची पाळी येते आहे. शेतकरी, कृषी विभाग, विद्यापीठे, कृषी शास्त्रज्ञ या सर्वाच्याच एकत्रित कृतीची गरज आहे.
     
    सौजन्य व आभार :  लोकसत्ता
    १ जून २०२१/  प्रदीप नणंदकर
     
    पीक नियोजन
     
    *   पुरेसा पाऊस हा केवळ शेतीला चांगला फायदा मिळवून देत नाही तर त्याचबरोबर वेळोवेळी कृषी विकासालाही पोषकही ठरत असतो. मान्सूनचा अंदाज घेऊन शेतकर्‍यांनी योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक असते.
     
    *   भारतीय हवामान खाते (आयएमडी) हे देशभरातील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि अन्य गैरसरकारी संस्थांमार्फत हवामानाची माहिती पुरवते. चांगल्या मोसमी पावसाचा अंदाज असताना अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीचे अचूक नियोजन उपयुक्त ठरते. २०२१ मध्ये महाराष्ट्र खरीप हंगामाबाबत आशावादी असून विक्रमी उत्पादनाची अपेक्षा बाळगली जात आहे.
     
    *   भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) देशभरातील खरीप हंगामासाठी मार्गदर्शक सूचना जारी करताना महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन, भुईमूग, ऊस, धान, वाटाणे आणि केळी, आंबा, डाळिंबांसह अन्य पीक घेताना काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचनांचा समावेश केला आहे-
     
    *   कापूस उत्पादक शेतकर्‍यांना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ जूननंतर लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यात पेरणीपूवर्ी प्रति हेक्टरी १० टन सेंद्रीय खत वापरावे, असे सांगण्यात आले आहे.
     
    *   ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पिकाचे पांढर्‍या माशीपासून संरक्षण करण्यासाठी सिंचन व्यवस्थापनाबरोबरच क्लोरपायरीफॉस किंवा फिंग्रोनिलचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
     
    *   सोयाबीनचे पिक घेणार्‍यांना पेरणी करण्याअगोदर बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचा सल्ला दिला आहे. चांगल्या प्रतीचे बियाणे जे ७० टक्क्यांपेक्षा अधिक विकसित होतात, त्याचा पेरणीत वापर करण्यास सुचविण्यात आले आहे. त्याबरोबरच, सुधारित वाणांच्या बियाणांचा उपयोग करण्याचा देखील शेतकर्‍यांना सल्ला दिला आहे.
     
    *   शेतीकामात मदत करणारे जनावरे उच्च तापमानामुळे सैरभैर राहू शकतात. म्हणून जनावरांची अधिक काळजी घ्यायला हवी. त्यांना वाढत्या तापमानाचा अधिक त्रास होऊ नये यासाठी गोठ्याच्या छताला पांढरा रंग लावायला हवा. त्याचवेळी छतावर वाळलेले गवत आणि ऊसाचे चिपाडाचे आच्छादन करायला हवे. पाण्याची फवारणीही करायला हवी आणि या उपाययोजनांमुळे गोठा थंड राहील. याशिवाय जनावरांसाठीच्या चार्‍याची देखभाल करायला हवी. साठवणूक योग्य करावी आणि पावसामुळे ओला होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. केवळ चाराच नाही तर धान्याची सुरक्षा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.धान्यांना कीड लागू नये आणि पावसापासून बचाव करण्यासाठी त्याची सुरक्षितपणे साठवणूक करणे आवश्यक आहे. कीड रोखण्यासाठी कडुनिंबाच्या पिशव्यांचे पिकांवर आच्छादन करायला हवे.
     
    *   पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेळ्यांसह अन्य जनावरांचे लसीकरण करायला हवे. ही लस त्यांना सुरक्षित ठेवेल आणि विविध आजार टाळण्यासाठी मदत करेल. अलीकडच्या काळात हवामान बदलाच्या विपरीत परिणामामुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. पण या हवामान बदलाचा परिणाम हा स्थानिक वातावरणावर होतो आणि शेतीलाही अडथळे येतात. याशिवाय बदलत्या हवामानामुळे नवीन रोग आणि कीटक तयार होतात. हवामानाबाबत तत्पर आणि योग्य अंदाज व्यक्त करणारी माहिती मिळाल्यास पावसाळ्याबरोबर येणार्‍या नवीन रोग आणि कीटकांबाबत माहिती मिळू शकते.
     
    *   पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ किंवा कृषी उपकेंद्र यासारख्या संस्था शेतकर्‍यांना जागरूक राहण्याचा सल्ला देतात. त्यामुळे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासाठी आपत्कालीन योजनाही राबविली जाते. यामध्ये डाळी, तेलबिया आणि पोषक धान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याबरोबरच पाण्याचा आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करता येईल, या गोष्टींचा अंतर्भाव असतो.
     
    *   कोरडवाहू पीक आणि पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचे अधिकाधिक उत्पादन व्हावे यासाठी हवामानाचा अंदाज महत्त्वाचा असतो. मात्र या कोरडवाहू पिकांना बाजारात अधिक मूल्य मिळावे यासाठी धान्योत्पादनास व्यावहारिक रूप देण्याची आवश्यकता आहे. तसेच, मान्सूनचा पाऊस अनियमित पडल्यास बचावाचा मार्ग म्हणून कापूस आणि डाळींबरोबर सूर्यफूल, सोयाबीन किंवा तिळाचे आंतरपीक घेत तेलबियांचे उत्पादन वाढवण्याची योजना राबवता येऊ शकते.
     
    *   कोरोना संसर्गाचा काळ पाहता यंदा शेतीकामांसाठी मजुरांची कमी संख्या हा दुसरा चिंतेचा विषय आहे.त्यामुळे शेतकर्‍यांवर ताण येण्याची शक्यता आहे. परंतु गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असतानाही कृषी आणि कृषीसंबंधी व्यवहारांमध्ये वाढ झाल्याची सकारात्मक बाब दिसून आली. यावर्षी देखील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. शेतीकामे करताना कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. हवेतून विषाणू पसरत असल्याचे पुरावे अलीकडेच आढळून आले असून शेतीची कामे करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्क घालणे गरजेचे आहे.
     
    *   गेल्या वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना अधिक फायदा होण्यासाठी ‘विकेल तो टिकेल’ हे बाजार आणि मूल्य साखळीवर आधारलेले मॉडेल विकसीत केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सध्याचा बाजाराचा कल पाहून पीक घेण्याची गरज आहे. पावसाचे नियोजन आणि बाजारपेठ या दोन घटकाच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था ही आगामी काळातील चांगल्या मान्सूनला आणि कृषी हंगामाला सामोरे जाऊ शकते.
     
    सौजन्य व आभार : दैनिक  सकाळ
    ३०  मे २०२१ / जयश्री बी.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1570