लस उत्पादन

  • लस उत्पादन

    लस उत्पादन

    • 04 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 37 Views
    • 0 Shares
     लस उत्पादन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’लसीकरण व सार्वजनिक आरोग्य’ या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’भारतातील लस व औषध उद्योग’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

    ३.४   जैवतंत्रज्ञान -

    ३.४.६ लसी - परंपरागत व आधुनिक जैवपद्धतीच्या लसी.

    ३.४.१० एकाधिकार (पेटंट) : पेटंटिग प्रक्रिया, पेटंट कायदा - प्रक्रिया व उत्पादन

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    कोरोनाच्या ‘संकटातली संधी’ भारताने का गमावली?
     
    *   जगभरात स्वस्त दरात आणि मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध करून देणारा देश - ‘वर्ल्डस् फार्मसी’- म्हणून भारताचा उल्लेख होतो. अनेक जेनेरिक औषधनिर्मिती कंपन्या भारतात कार्यरत आहेत आणि जगभरात वापरल्या जाणार्‍या जेनेरिक औषधांपैकी २०% आणि लसींचा ६०% पुरवठा आपल्या देशातून होतो (कोविड-१९ लसीव्यतिरिक्त).
     
    *   कोविड-१९ चा जागतिक संसर्ग सुरू झाल्यापासून सर्वांची नजर भारताकडे लागलेली होती. कोरोनाच्या खोल दरीतून बाहेर पडण्याचा लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे हे सर्वांनाच माहिती होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या रूपाने जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक उद्योग भारतात आहे आणि सर्वप्रथम लसीच्या चाचण्या सुरू करणारी ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस सीरम बनविणार ही फार गर्वाची, आनंदाची बाब होती.
     
    *   लसनिर्मितीची अफाट क्षमता आणि स्वस्त औषधांची वर्ल्डस् फार्मसी या दोन्ही भक्कम खांद्यांनी भारताची मान वर्षानुवर्षे उंचावून ठेवली होती. कोरोनारूपे भारताला जणू काही एक संधी चालून आली होती. फक्त विकसनशील आणि गरीबच नाही, तर युरोपातील श्रीमंत देशांच्या सुद्धा भारताकडून खूप अपेक्षा होत्या. सीरमचे मालक अदर पूनावाला २०२० मध्ये म्हणाले होते, जगभरातून अनेक देश प्रमुखांचे सातत्याने फोन येत आहेत आणि सर्वांनाच लस हवी आहे.
     
    *   रेमडेसिविरला कोविड-१९ उपचारासाठी मान्यता मिळाल्यानंतर लगेचच गिलियाड या अमेरिकन कंपनीने भारतातील डॉक्टर रेड्डी, मिलान, सिप्ला अशा ५-६ जेनेरिक कंपन्यांना रेमडेसिविर बनविण्याची परवानगी दिली. अमेरिकेत ३ हजार डॉलर, म्हणजेच जवळपास २.५० लाख रुपयांना मिळणारे रेमडेसिविर भारतात मात्र फक्त ४-५ हजार रुपयांत उपलब्ध झाले आणि नंतर ही किंमत हजार रुपयांपर्यंत खाली आली. ही पार्श्वभूमी पाहता, कोरोनाच्या साथीमध्ये भारताची तयारी भक्कम असायला हवी होती, जगाचे तारणहार म्हणून आपल्या देशाची मान उंच झाली असती. भारतासाठी खरेतर ‘कोरोना’ ही एक संधी होती. पण वस्तुस्थिती या सर्वांच्या अगदी विरुद्ध आहे. लसीकरणाचा वेग मंदावलाय आणि रेमडेसिविर मूळ किमतीच्या २५ पट पैसे देऊनही वेळेवर उपलब्ध होत नाही. लसीकरण सध्याच्या मंद गतीने होत राहील तर तिसरी लाट अटळ आहे. वर्ल्डस् फार्मसी असलेल्या भारतात जेनेरिक औषधांचा आणि लसींचा तुटवडा व्हावा याहून मोठं दुर्दैव असू शकत नाही.
     
    *   भारताच्या ड्रग कंट्रोलरने जानेवारी २०२१ मध्ये २ लसींना परवानगी दिली- कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन. कोविशिल्डच्या पुरेशा चाचण्या युरोपमध्ये आधीच झालेल्या असल्याने सर्व माहिती जगासमोर होती. कोव्हॅक्सिनची चाचणी अर्धवट असताना तिला मान्यता देण्यात आली. म्हणूनच म्यानमार, मंगोलियासारख्या राष्ट्रांनीसुद्धा भारताने देऊ केलेली कोव्हॅक्सिन घेण्यात उत्साह दर्शविला नाही. सीरमची कोविशिल्ड लस युरोपमध्ये देण्याचा करार त्या राष्ट्रांनी अगोदरच २०२० मध्ये गुणवत्ता सिद्ध होण्याआधीच केलेला होता. आपल्या केंद्र सरकारने ती दूरदृष्टी न ठेवता गुणवत्ता सिद्ध झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये सीरमसोबत खर्‍या अर्थाने करार केला. आज सीरमला युरोपमध्ये लस पाठविण्यास केंद्राकडून विरोध होतो आहे. करारानुसार माल पुरवठा न केल्याने युरोपियन राष्ट्रांनी सीरमवर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू केली आहे.
     
    *   यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट इंग्लंडमध्ये २४० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठा लस उद्योग उभा करणार अशी माहिती आली आहे. याचप्रकारे जेनेरिक कंपन्यांवरसुद्धा रेमडेसिविर निर्यातीस बंदी आणली जात आहे. एकीकडे आवश्यक औषधांचा तुटवडा भारताला जाणवतो आहे. मात्र, मागच्या वर्षी पतंजलीने गुणवत्ताशून्य कोरोनील विकून विक्रमी कमाई केली. दुसरीकडे केंद्र सरकारच्या समर्थनाने नामांकित संस्था एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) गायत्री मंत्र पठणाने कोरोनावर उपचार होऊ शकतो का, यावर संशोधन करीत आहे, असे म्हणतात. विज्ञानवादी नेतृत्वाचा अभाव हे आजच्या भारताचे खरे दुखणे आहे!
     
    सौजन्य व आभार : लोकमत
    ३० मे २०२१ /  डॉ. विजय मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, पीटीसी थेरप्युटिक्स, अमेरिका

Share this story

Total Shares : 0 Total Views : 37