महात्मा बसवेश्वर

  •  महात्मा बसवेश्वर

    महात्मा बसवेश्वर

    • 18 May 2021
    • Posted By : Study Circle
    • 1731 Views
    • 5 Shares
    महात्मा बसवेश्वर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”समासुधारक, भक्ती चळवळ व संतांचे योगदान” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. 14 मे रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी झाली. त्यांचे कार्य, विचार आणि लिंगायत धर्म  याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (1) : इतिहास व भूगोल
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : 
     
    1.3.2 सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी -
     
    1.7   अस्पृश्यता निर्मूलनाचे इतर प्रयत्न.
     
    1.13 महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) - महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाङमय व संत वाङमयाचा प्रभाव - भक्ती वाङ्मय
     
      (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    महात्मा बसवेश्वर महाराज (1105-1165)
     
      14 मे 2021 रोजी बसवेश्वर जयंती साजरी झाली. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिन आणि श्रावण शुद्ध पंचमी हा त्यांचा ऐक्य दिन मानला जातो. श्रावण शुद्ध पंचमी ही ’बसव पंचमी’ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी वैशाखातील अक्षय्य तृतीयेला बसवजयंती साजरी केली जाते.
     
      कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी ही त्यांची ’जन्मभूमी’ आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तसेच महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही ’कर्मभूमी’ आहे. बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम ही बसवेश्वरांची ’ऐक्यभूमी’ आहे. कर्नाटक सरकारने कुडलसंगम क्षेत्राला राष्ट्रीय पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे.
     
      भारतीय ज्ञानपीठ सन्मानित डॉ. व्ही. के गोकाक महात्मा बसवेश्वरांविषयी म्हणतात, ‘बसवेश्वर हे आजच्या आधुनिक विचारवंतांपेक्षाही अधिक आधुनिक होते.’ भारतीय समाजामध्ये समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन यांचा रचनात्मक व दिशादर्शक प्रारंभ महात्मा बसवेश्वरांपासून झालेला आहे.
     
      महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.
     
      संत महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. आधुनिक भारतामधील सामाजिक परिवर्तनाच्या आणि धार्मिक जागृतीच्या संदर्भात महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणुकीला विशेष महत्त्व आहे.
     
     
      शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात 1105 साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला.
     
     
      त्यांचे वडील मादीराज ऊर्फ मादरस हे बागेवाडी अग्रहराचे प्रमुख होते. त्यांची पत्नी मादंबा बागेवाडीच्या नंदीश्वर या ग्रामदेवतेची परमभक्त होती.  बसवेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव अक्कनागम्मा. नागम्माने बसवेश्वरांच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सक्रिय भाग घेतला. त्यांचे मामा बलदेव हे राजा बिज्जलचे कोषाधिकारी होते. 
     
     
      बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या 8 व्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी 12 वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. जातवेदिमुनी (ईशान्य गुरू) हे कूडलसंगम या विद्याक्षेत्राचे स्थानपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वरांचे अध्ययन झाले.
     
     
      त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी (गंगांबिके) झाला, तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते 31 वर्षे राहिले. बालसंगय्य हे त्यांच्या मुलाचे नाव होते, असा उल्लेख आढळतो.
     
     
      मंगळवेढ्यातील वास्तव्यात बसवेश्वर यांनी अधिकार व प्रतिष्ठा प्राप्त केली. त्यांचे मामा बलदेव यांच्या पश्चात कोषाधिकारी या पदासाठी अत्यंत योग्य उत्तरदायी व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली.  बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता. त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती.
     
     
      बसवेश्वर हे वेदशास्त्रात, धनुर्विद्येत व इतर कलांत पारंगत असल्याने आणि ते हुशार व चाणाक्ष असल्याने ते कर्नाटकातील ’बसवकल्याण’ या एका विस्तारित राज्याचे काही दशके पंतप्रधान होते. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.
     
        अनुभव मंटप -
      बसवेश्वरांनी बसवकल्याण येथे लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले. बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून  लोकशाही मूल्याची सुरूवात केल्याचे, वचनसाहित्यातून दिसून येते. त्यांनी वचनसाहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त,सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहे. बसवेश्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही; परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली.
     
        बसवेश्वर यांचे कार्य -
      भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठी त्यांनी ’अनुभव मंटप’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. तेथे जातीभेदाला थारा नव्हता. प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.
     
      समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. त्यांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्मयाचा विकास झाला.  त्यांनी लिहिलेल्या वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.
     
      बसवेश्वरांनी अनेक शिवमंदिरे बांधली. रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या. त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली.
     
      ”मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना” हे त्यांच्या ”कायकवे कैलास ” सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
     
      श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह) मांडल्यामुळे बसवेश्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते.
     
      दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
     
      बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.
     
      बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.
     
      त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले.
     
      तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने 12 व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.
     
      त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृशयांच्या घरी जाऊन भोजन केले होते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली.
     
      बसवेश्वर हे एक समर्थ योगी असल्यामुळे त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाल्याचे व त्यांनी काही चमत्कार केल्याचेही उल्लेख आढळतात. उदा., पूर आलेला त्यांना कृष्णेने वाट करून दिली, त्यांनी बिज्जलाला गुप्त खजिना दाखविला, धान्यकणांचे रत्नांमध्ये रूपांतर केले इ. कथा सांगितल्या जातात. त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी व दरोडे घालण्यासाठी आलेले लोकही त्यांचे शिष्य बनले, यावरून त्यांचा प्रभाव ध्यानात येतो.
     
        लिंगायत धर्म चळवळ -
      बसवेश्वर यांनी जात, धर्म, पंथ, लिंग यांचा कोणताही अडसर येऊ न देता सर्वांना धर्माची द्वारे खुली करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून  त्यांनी शरण चळवळ विकसित केली. पुढे त्यांनी  वेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून ’लिंगायत धर्म’ स्थापन केला.
     
      बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातून लिंगायत धर्माची स्थापना केली व ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळ, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले. तेथे त्यांचा लिंगायात धर्म बर्‍यापैकी रुजला. लिंगायत लोक बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ = बैल) या नावावरून ते सूचित होते.
     
      बसवेश्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेत होती. या पार्श्र्वभूमीवर बसवेश्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘अँ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.
     
        लिंगायत स्वतंत्र धर्म आहे.
      तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्र्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्ये लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरु, धर्मसंहिता, धर्मचिन्ह, धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.
     
        लिंगायत धर्माची वैशिष्ट्ये -
    1)  धर्मगुरु - विश्वगुरु महात्मा बसवण्णा.
    2)  धर्मसंहिता - वचनसंहिता.
    3)  धर्मग्रंथ - समानता पटवून देणारे वचन साहित्य.
    4)  धर्मभाषा - लोकभाषा कन्नड.
    5)  धर्मचिन्ह -सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.
    6)  धर्माचे नाव - लिंगायत
    7)  धर्मक्षेत्र - बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.
    8)  धर्मसंस्कार - इष्टलिंग दीक्षा.
    9)  धार्मिक व्रत - शरण व्रत.
    10) प्रार्थना केंद्र - अनुभवमंटप.
    11) धर्मतत्वे - अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
    12) धर्माचा ध्वज - इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.
    13) धर्माचे ध्येय - जात, वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.
    14) धार्मिक सण आणि उत्सव - बसवादी शरणांचे स्मृती उत्सव
     
        लिंगायत धर्मातील संस्कार  -
      लिंगायत धर्मातले सर्व संस्कार हे अब्राम्हणी आणि अवैदिक पद्धतीने करतात. जंगमक्रियामूर्ती बोलावून विश्वगुरु बसवण्णांच्या साक्षीने हे संस्कार करतात-
    1)  गर्भधारणा संस्कार
    2)  नामकरण सोहळा
    3)  इष्टलिंग दीक्षा संस्कार
    4)  कल्याण महोत्सव (विवाह)
    5)  वाढदिवस
    6)  अंतिम संस्कार.
     
      गेल्या काही काळात लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले आहे. बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला होता. सध्या लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत.
     
      वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असून तो ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे.
     
      आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावेत म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी कन्नड भाषेतून आपला उपदेश केला. त्यासाठी त्यांनी आधीच प्रचलित असलेल्या वचननामक साहित्यप्रकाराचा अवलंब केला. शैलीदार, प्रभावी व अंतःकरणाला भिडणारा असा हा साहित्यप्रकार असल्यामुळे त्याला वचनभेद, वचनशास्त्र इ. नावे प्राप्त झाली आहेत. कन्नड साहित्याच्या क्षेत्रात बसवेश्वरांचे योगदान म्हणूनच अंत्यत महत्त्वाचे ठरले. बसवेश्वरांच्या पट्स्थलवचन, कालज्ञान, मंत्रगौप्य, शिखारत्नवचन या ग्रंथांना श्रेष्ठ धर्मग्रंथांचे अमरत्व कन्नडमध्ये प्राप्त झालेले आहे. कांचीचे शंकराराध्य (अठरावे शतक) यांनी संस्कृतमध्ये बसवपुराण नवाचा ग्रंथ लिहिला आहे.
     
      बसवेश्वरांनी धर्मसुधारणेचे कार्य करताना यज्ञयागांतील पशुहत्या, वर्णभेद, वर्गभेद व जातीभेद मान्य नव्हते. त्यामुळे सनातनी लोकांनी त्यांच्याविषयी बिज्जलाचे मन कलुषित केले. शेवटी बिज्जलाचे सैन्य व बसवेश्वरांचे अनुयायी यांच्यात झगडा सुरू झाला. तेव्हा या हिंसाचाराला कंटाळून ते कूडलसंगम येथे गेले व त्यांनी तेथे समाधी घेतली. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे.
     
     

     

Share this story

Total Shares : 5 Total Views : 1731