ऊर्जा विज्ञान

  • ऊर्जा विज्ञान

    ऊर्जा विज्ञान

    • 18 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 1728 Views
    • 1 Shares

     ऊर्जा विज्ञान

    अक्षय ऊर्जा 
     
     
            न संपणार्‍या आणि पुन्हा वापरता येणार्‍या ऊर्जेच्या स्रोतांना अक्षय ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. अक्षय ऊर्जा स्रोतांनाच नवीकरणीय किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणूनही संबोधले जाते. अक्षय ऊर्जा ही हरित ऊर्जा असून ती प्रदूषणकारी नसल्यामुळे आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत असल्यामुळे या ऊर्जेचे महत्त्व वाढत आहे. तसेच अक्षय ऊर्जा स्रोत हे पर्यावरणपूरक असल्यामुळे इतर पारंपरिक ऊर्जा स्रोतांपेक्षा भविष्यात या स्रोतांचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार आहे.

    • अक्षय ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार -
    1) जैविक ऊर्जा(वनस्पती व प्राण्यांच्या मृतावशेषांपासून निर्मित ऊर्जा), 
    2) पवन ऊर्जा, 
    3) सौर ऊर्जा, 
    4) जलविद्युत, 
    5) सागरी लाटांपासून निर्मित ऊर्जा 
    6) भूऔष्णिक ऊर्जा 

    • अक्षय ऊर्जा निर्मितीचे विविध प्रकार -
    1) बायोगॅस : प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती केली जाते. या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस, पाणी गरम करणे व दिवे प्रकाशित करणे यासाठी केला जातो.

    2) पवन ऊर्जा : पवन ऊर्जा निर्मितीसाठी वार्‍याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असावा लागतो. वार्‍याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरून गतीज ऊर्जा निर्माण होते आणि या गती ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यत चाळकेवाडी येथे पवन ऊर्जा प्रकल्प आहे.

    3) सौर ऊर्जा : सूर्यापासून मिळणार्‍या प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपातील ऊर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यावर अवलंबून असते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सौर ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. सौर ऊर्जा वापरामध्ये भारतातील तमिळनाडू राज्य अग्रेसर आहे. अलीकडील काळात लदाखमध्ये जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे सोलर फार्म तयार होत आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यतील साक्री येथे सौर ऊर्जा प्रकल्प आहे. भारत सध्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्समध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

    4) जलविद्युत : वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करून निर्माण झालेल्या ऊर्जेला जल ऊर्जा म्हणतात. जल ऊर्जेचा वापर करून जल विद्युत निर्मिती केली जाते.

    5) सागरी ऊर्जा : सागरी लाटा व भरती ओहोटी या सागर जलाच्या हालचाली आहेत. या हालचालीमुळे निर्माण झालेल्या लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून गतीज ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. भारतासारख्या द्वीपकल्पीय देशात या ऊर्जेचा योग्य वापर होऊ शकतो.

    6) भू-औष्णिक ऊर्जा : पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान प्रत्येक 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने वाढते. या भू-औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करता येते. हिमाचल प्रदेशमधील मणिकरण येथे असा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

    7) कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती : मोठया शहरात व महानगरात निर्माण होणार्‍या जैविक कचर्‍यापासून वायुनिर्मिती केली जाते आणि या वायूपासून विद्युत निर्मिती केली जाते.

    • जागतिक पातळीवरील काही महत्त्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प -
     
    1) अग्वा कॅलिएंट सोलर प्रोजेक्ट : अरिझोना, संयुक्त संस्थाने
    2) कॅलिफोर्निया व्हॅली सोलर युनिट : कॅलिफोर्निया, संयुक्त संस्थाने
    3) गोलमुड सोलर पार्क : चीन
    4) चरंक सोलर पार्क : पाटण, गुजरात
    5) वेलस्पन एनर्जी प्रोजेक्ट : मध्य प्रदेश

    • 20 ऑगस्ट हा दिवस भारतात दरवर्षी अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो.

    सोलर पॅनेल -
    1) भारताला 100 गिगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. परंतु, सोलर पॅनेल तयार करण्याची क्षमता विकसित झालेली नाही. 
    2) चीनमध्ये सोलर पॅनेल स्वस्तात उपलब्ध आहेत. भारताच्या सौरऊर्जा निर्मितीच्या क्षमतेपैकी दोन तृतीयांश चिनी सोलर पॅनेलच्या सहाय्याने उभी राहिली आहे. 
    3) आत्मनिर्भरतेच्या जोशात सरकारने जून  2020 महिन्यात जाहीर केले की, चिनी सोलर पॅनेलवर 25 टक्के अधिक आयातशुल्क लावण्याचा विचार असून, ते 40 टक्क्यांवर जाऊ शकते. आत्मनिर्भर सौरऊर्जेसाठी 40 टक्के अधिक पैसे.

    तिसरी वैश्‍विक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक
            26 ते 28 नोव्हेंबर 2020 दरम्यान तिसरी वैश्‍विक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्स्पो (Global Renewable Energy Investors Meet  Expo) RE-Invest 2020  ही आभासी परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केले होते. पहिली व दुसरी परिषद  अनुक्रमे 2015 व 2018 मध्ये भरली होती.

    •• या परिषदेच्या आयोजनामागील उद्दिष्टे -
    1) अक्षय ऊर्जा साधनांचा विकास, वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना भारतीय ऊर्जा क्षेत्राशी संलग्न करणे.
    2) अक्षय ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे 

    •• संकल्पना -
    ‘शाश्‍वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन’ ही ‘री-इन्व्हेस्ट 2020’ ची संकल्पना होती. 

    •• भारताचे उद्दिष्ट -
    भारताने अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांना पूर्णत: हरित बेटे करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. या बेटांच्या सर्व ऊर्जा गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण केल्या जातील.

    •• ठळक नोंदी -
    1) भारताची अक्षय ऊर्जा क्षमता सध्या 136 गीगा वॅट्स असून ती आपल्या एकूण ऊर्जा क्षमतेच्या सुमारे 36% आहे.
    2) जगातील चीन, अमेरिका व ब्राझीलनंतर चौथी सर्वात मोठी अक्षय ऊर्जा क्षमता आहे. 
    3) अक्षय ऊर्जेच्या वापरामध्ये चीन, अमेरिका, जर्मनी व ब्राझीलनंतर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. 
    4) भारत सरकारने 2022 च्या अखेरीपर्यंत 175 गीगा वॅट्स तर 2030 पर्यंत 450 गीगा वॅट्स अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
     
    ऊर्जा संवर्धन
     
     
            देशामध्ये 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा होतो.  ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता जरी वेगळे असले तरी दोन्हीच्या माध्यमातून ऊर्जा बचतच होते.
     ऊर्जा संवर्धन 
     
    ••• आज वाचवलेल्या वीजेचा फायदा आजच होवू शकतो, यालाच ‘ऊर्जा संवर्धन’ म्हणतात. 
    1) 1 मेगॅवॅट वीजनिर्मितीसाठी कोट्यवधी रूपयांची गरज असून, त्याच्या उभारणीसाठी बरीच वर्षे लागतील. आपण तेवढीच वीज कमीत कमी खर्चामध्ये त्वरीत वाचवू शकतो. 
    2) 1 मेगॅवॅट वीज वाचवली म्हणजे अंदाजे 1.50 मेगॅवॅट वीज निर्माण केल्यासारखे आहे. 
    3) एसीचे स्थिर तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढविल्यास वीज वापरामध्ये 6% बचत होते. 
    4) खोलीमध्ये एसी वापरताना कमीतकमी 24 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान स्थिर ठेवणे तसेच 27 अंश सेल्सिअसपर्यंत खोलीमधील तापमान स्थिर ठेवल्यास वीज बचत होते.

    ••• ऊर्जेचा कमीतकमी वापर म्हणजे तिची अप्रत्यक्षरीत्या निर्मितीच असते. म्हणून कमीतकमी वीज खेचणार्‍या उपकरणांवर भर, कमी वीज लागणार्‍या इमारती उभारणे काळाची गरज आहे. 
    ••• गरज नसेल तर दिवे-पंखे बंद करणे, इमारतीमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व हवा याची व्यवस्था करणे. रिमोटवरील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्टॅण्डबाय पॉवर मोडमध्ये कमीतकमी वेळ ठेवणे म्हणजेच ऊर्जा संवर्धन. अन्यथा, वीजेचा अपव्यय होतो. तसेच 
    ••• बहुतांश वीजनिर्मिती कोळश्यापासून होत असल्याने हरितगृह वायूचे मोठ्या प्रमाणामध्ये होणारे उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचा र्‍हास टाळता येईल. 

    ऊर्जा कार्यक्षमता 
           विद्युत उपकरणाचे आउटपूट न बदलता त्याला लागणारी वीज कमी करणे म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता. 
    ••• ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्शी (नवी दिल्ली) (बीईई) यांच्या सुचनेनुसार स्टार लेबल उपकरणाचा जास्तीतजास्त वापर आणि नियमित देखभाल करणे, म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता.
    ••• 60 वॅट बल्ब जेव्हा आपण 8 वॅट एलईडीने बदलतो त्यावेळी दोन्ही बल्बचा प्रकाश 800 ल्युमन्स मिळतो. परंतु एलईडी बल्बला 8 वॅट वीज लागते. तसेच कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जनही घटते. 

    ऊर्जा संवर्धन कायदा (ईसी कायदा) 2001
            ऊर्जेच्या कार्यक्षम वापराचे तंत्रज्ञान निरंतर विकसित होत असून, त्याची मागणीही वाढत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा बचत शक्य आहे. सध्याच्या प्रचलित उपकरणाची ऊर्जा कार्यक्षमता कमी असल्याने तिचा अपव्यय होतो. गरज नसतानाही ऊर्जेचा चुकीच्या पद्धतीने वापर होतो. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून भारत सरकारने ऊर्जा संवर्धन कायदा (ईसी कायदा-2001) केला. 

    ••• या कायद्यांतर्गत केंद्र सरकार ‘बीइइ’मार्फत देशात विविध योजना व उपक्रम राबविते. 
    ••• या योजना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत (महाऊर्जा) राबविल्या जातात. 
    ••• ‘महाऊर्जा’ने केलेल्या ऊर्जा परीक्षणानुसार तसेच ‘बीइइ’च्या आकडेवारीनुसार ऊर्जा संवर्धनासाठी पथदिवे व पाणीपुरवठा, घरगुती क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, कृषी आणि उद्योग क्षेत्र यांच्यात वाव आहे.
    ••• ‘महाऊर्जा’च्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ऊर्जा संवर्धन राबविल्यास अंदाजे 3700 मेगॅवॅट वीजबचत शक्य आहे किंवा तेवढी वीज इतरत्र उपयोगात आणता येईल. 
    ••• यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण, 2017 पारीत केले आहे.  
    ••• ऊर्जा संवर्धनासाठी ‘बीइइ’ने पुढील दोन योजनांचा समावेश केला आहे-
    1) एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी) 
    2) स्टॅण्डर्स अँड लेबलिंग (एस अँड एल)

    एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी) -
    ••• भारतामधील एकूण निर्मितीच्या 33% वीज सर्व प्रकारच्या इमारतीसाठी वापरली जाते. यामधील 8% वाणिज्यिक आणि 25% ऊर्जा रहिवासी इमारतीसाठी वापरली जाते. 
    ••• शहरीकरण व औद्योगिकीकरणाचा विकास दर लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये इमारतीचे बांधकाम करावे लागेल. ऊर्जा संवर्धनासाठी इमारतीच्या बांधकामाअगोदर ईसीबीसी कोडचा अभ्यास करून इमारतीची उभारणी करावी लागेल, जेणेकरून ऊर्जा बचत होईल. ज्या इमारतीमध्ये ऊर्जेचा ‘ईसीबीसी’च्या मानकापेक्षा जास्त वापर होईल त्यांना दंड द्यावा लागेल; ज्यांचा वापर कमी होईल त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळेल. हा कोड वाणिज्यिक आणि रहिवासी इमारतीसाठी वेगळा आहे. 

    स्टॅण्डर्स अँड लेबलिंग (एस अँड एल) -
    ••• बाजारमध्ये उपलब्ध एकाच प्रकारच्या उपकरणांचा उत्पादकानुसार वीजेचा वापर बदलतो. ग्राहक उपकरणे खरेदी करताना किंमत बघून खरेदी करतो, परंतू वीज वापराचा विचार करत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानच होते. उत्पादकाला नवीन उपकरणे कमी ऊर्जेवर चालणारी करावी लागतील. अन्यथा त्यांना विक्रीस मज्जाव करण्यात येतो. काही उपकरणे ही फक्त स्टार लेबल मार्क असेल तरच विक्री करता येणार आहेत. उदा. रेफ्रीजरेटर, टीव्ही, एलईडी आणि इतर अशी एकूण 10 उपकरणे आहेत. तसेच इतर काही उपकरणांसाठी स्टार लेबल तयार केली आहेत, परंतू अजून ती ऐच्छीक आहेत. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, इलेक्ट्रीक पंप्स्, संगणक व इतर उपकरणे. कालांतराने सर्व उपकरणांसाठी हे निकष असतील.

    ••• महाराष्ट्रातील रहिवासी वीज वापराचा अभ्यास केल्यास असे दिसते की, अंदाजे 60% ग्राहकांचे मासिक वीज वापर 150ज्ञथह (युनीट)पेक्षा अधिक आहे. ज्यांचा वीज वापर यापेक्षा जास्त आहे, त्यांची ऊर्जा बचतही त्याप्रमाणेच वाढत जाईल. ऊर्जा संवर्धनासाठी पंखा, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजरेटर, एलईडी बल्ब, टीव्ही यांसारखी उपकरणे स्टार लेबल आणि अतिकार्यक्षम वापरल्यास ऊर्जा बचत होवून, सहाजिकच देशसेवा साधली जाईल.

    ••• स्टार लेबलनुसार उपकरणाची निवड -
     
    1) प्रत्येक उत्पादनाचे ऊर्जा वापरानुसार स्टार एक ते पाचमध्ये वर्गीकरण 
    2) स्टार-1 म्हणजे कार्यक्षमपासून पुढे स्टार-5 म्हणजे अती कार्यक्षम असे वर्गीकरण 
    3) दैनंदिन वापरानुसार स्टार लेबलची निवड करावी. वापर जास्त असेल तर स्टार 4/5ची निवड करावी. 
    4) कमी वापर असला तरीही किमान स्टार 3ची उत्पादने फायदेशीर. 
    5) उपकरणे घेताना ऊर्जेचा वार्षिक वापर, स्टार लेबलची वैधता तपासावी. 
    6) स्टार लेबलमध्ये प्रत्येक वर्षी सुधारणा होत असतात.

    ••• भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17% आहे. परंतू इंधन साठ्याचा विचार करता भारतातील नैसर्गिक वायू 0.6%, तेल 0.4% कोळसा 7% साठा जगाच्या तुलनेत नगण्यच आहे. सध्या उपलब्ध इंधनसाठा व त्याचा वापर पाहता लक्षात येते की, आगामी 100 वर्षामध्ये हे सर्व संपणार आहे. त्यातच भारत खनिज तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे.
    एक्सटिंक्शन एमके 1 प्रिमियम इलेक्ट्रिक कार
     
     
            ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बंगळूरमधील ‘प्रावैग डायनॅमिक्स’ने आपली पहिली होमग्रोन इलेक्ट्रिक कार (एक्सटिंक्शन एमके 1 प्रिमियम इलेक्ट्रिक कार) सादर केली.  ही कार देशात ‘ईव्ही सेगमेंट’ म्हणजेच विजेवर चालणार्‍या वाहनांच्या क्षेत्रात तेजी आणू शकते. तिच्यामध्ये ‘बेस्ट इन क्लास सेफ्टी फिचर्स’ असल्याने जीवाश्म इंधनावर चालणार्‍या मोटारींमुळे जे प्रदूषण होते ते विजेवर चालणार्‍या या मोटारींमुळे होत नाही. 

    •• ठळक नोंदी -
     
    1) भारतात बनलेली ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटर अंतर धावू शकते. 
    2) या कारला 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ अर्धा तासाचा अवधी लागेल. कारमध्ये 96 केएचडब्ल्यूची बॅटरी आहे. 
    3) कार शून्यापासून ताशी 100 किलोमीटरचा वेग घेण्यासाठी केवळ 5.4 सेकंदांचा वेळ घेते. 
    4) कंपनीने दरवर्षी या कारचे 250 युनिटस् बनवण्याचे लक्ष्य आहे.

    मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क (एमओएफ) 
     
     
            ब्रिटनमधील लँकेस्टर विद्यापीठातील (जॉन ग्रिफिन, किरन ग्रिफिथ्स आणि नाथन हाल्कोविच) शास्त्रज्ञांनी स्फटिकासारखा पदार्थ ‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ (एमओएफ) पासून तयार केला असून या स्फटिकांमध्ये अनेक महिने सौरऊर्जा साठविता येते. यापूर्वी जपानमधील शास्त्रज्ञांनीही एमओएफ पदार्थांवर प्रयोग केले होते. त्यांनी त्याला ‘डीएमओएफ1’ असे नाव ठेवले होते. परंतु, त्यांनी त्या पदार्थांचा वापर ऊर्जा साठवणुकीसाठी करता येईल का, याचे प्रयोग केले नव्हते.  लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीच्या प्रयोगांवर भर दिला. 

    ••• ठळक नोंदी -
    1) ‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ (एमओएफ) पासून तयार केलेल्या स्फटिकासारख्या पदार्थात धातूंचे आयन कार्बनच्या रेणूंनी जोडले जातात. यातून त्रिमितीय रचना तयार होते. 
    2) एमओएफचे वैशिष्ट्य म्हणजे तयार झालेला पदार्थ हा सछिद्र असतो. त्यात इतर छोटे रेणू सामावले जाऊ शकतात. त्याचा या गुणाचा वापर करूनच त्यात ऊर्जा साठविण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांनी केले आहेत.  
    3) लँकेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एमओएफसोबत अ‍ॅझोबेन्झेन रेणूंचा संयोग घडवून आणला. अ‍ॅझोबेन्झेन हे संयुग मोठ्या प्रमाणावर प्रकाश शोषून घेते. त्याचे रेणू ‘फोटोस्वीच’प्रमाणे काम करतात. पाहिजे तेव्हा त्यातून ऊर्जा मिळवता येऊ शकते. 
    4) प्रयोगाच्या वेळी शास्त्रज्ञांनी हा पदार्थ अतिनील किरणांच्या प्रकाशात ठेवला. त्यामुळे अ‍ॅझोबेन्झेनच्या रेणूंनी त्यांचा आकार बदलला. याचाच अर्थ त्यात स्थितीज ऊर्जा दीर्घकाळ सर्वसामान्य तापमानाला (रूम टेंपरेचर) साठवता येऊ शकते. जेव्हा त्याला पुन्हा उष्णता देण्यात आली, तेव्हा त्या रेणूंमधील ऊर्जा बाहेर पडली. 
    5) याचा वापर इतर पदार्थ किंवा साहित्य उष्ण करण्यासाठी होऊ शकतो. किमान चार महिने अशा प्रकारे ऊर्जा साठविता येऊ शकते, असे सिद्ध झाले. 
    6) याआधीही फोटोस्वीचच्या माध्यमातून ऊर्जा साठविण्याचे प्रयोग झाले होते. मात्र, बहुसंख्य प्रयोगात फोटोस्वीच हे द्रवरूपात असणे गरजेचे होते. एमओएफ संयुगे घनरूपात उपलब्ध झाल्याने अनेक उपकरणांमध्ये त्याचा वापर करता येणे शक्य होणार आहे. 

    एमओएफचा वापर -
    ••• या ऊर्जा साठवणुकीच्या नव्या पद्धतीचा उपयोग अनेक उपकरणांमध्ये, दुर्गम भागांत किंवा घरांतही रोजच्या वापरासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा मिळविण्यासाठी होऊ शकेल. 
    ••• एमओएफचा वापर माहिती साठविण्यासाठी, औषधांमध्ये, ऊर्जा उपकरणांमध्ये होऊ शकतो. जास्त ऊर्जा साठवू शकणार्‍या एमओएफचा शोध घेण्याचे आव्हान असणार आहे.  
    ••• हे स्फटिक सर्वसाधारण तापमानाला साठवता येऊ शकतील आणि आवश्यकता भासेल तेव्हा त्यातील ऊर्जा वापरता येऊ शकेल. उन्हाळ्याच्या दिवसांत सौरऊर्जा साठवता येईल व थंडीच्या दिवसांत गरजेनुसार ती वापरता येऊ शकेल. 
    ••• एखाद्या इमारतीला या स्फटिकांचा तरल पडदा लावता येऊ शकेल किंवा मोटारीचे ‘विंडस्क्रीन’ या नव्या स्फटिकांचे तयार करता येऊ शकतील. या सगळ्यांद्वारे ऊर्जा साठविली जाऊ शकेल व कडाक्याच्या थंडीच्या काळात वापरता येईल. 

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 1728