पुणे प्रार्थना समाज
- 07 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 4393 Views
- 13 Shares
पुणे प्रार्थना समाज
4 डिसेंबर 2020 रोजी शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव साजरा झाला. दीडशे वर्षांच्या कालावधीत प्रार्थना समाजाने हाती घेतलेल्या काही सुधारणा प्रत्यक्षात उतरल्या, काही उद्दिष्टे अजूनही साध्य व्हायची आहेत. बदलत्या काळानुसार काही नवी आव्हाने समोर उभी राहत आहेत. या काळात कितीतरी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे झाली. जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री- पुरुष समानता, शिक्षण, समाजकल्याण यासाठी काम करणार्या इतर अनेक संस्था स्थापन झाल्या, पुढे आल्या.
• हरिमंदिर पासोड्या विठोबाजवळ पुणे प्रार्थना समाजा ची 150 वर्षांचा वारसा असलेली वास्तू आहे.
• ही वास्तू न्या. म. गो. रानडे यांनी प्रार्थना समाजाला दिलेल्या 1700 चौरस मीटर जमिनीवर उभी आहे.
• हरिमंदिर उभारणीचे काम डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले.
• त्यासाठी राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनीही आर्थिक पाठबळ दिले होते.
• 1927 - पुण्यातल्या प्रार्थना समाजाच्या आवारात, पुणे प्रार्थना समाजाचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दगडी स्तूप उभारण्यात आला.
• इंग्रजी शिक्षणाचे वारे वाहू लागल्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जो सुशिक्षित वर्ग उदयाला आला, त्यांना आपल्या धर्मातील, समाजातील अनिष्ट रूढीपरंपरा, जातिभेद, स्त्रियांना मिळणारी वागणूक, कर्मकांडाचे स्तोम इत्यादी हिणकस भाग दूर करण्याची निकड वाटू लागली. त्यातून प्रार्थना समाजासारखी धर्मसुधारणेची चळवळ उभी राहिली.
प्रार्थना समाजाची उत्क्रांती
पाश्चात्त्यांचे राज्य भारतात स्थिरावल्यानंतर त्यांच्या धर्माचा, संस्कृतीचा व ज्ञानाचा संबंध सतत वाढत गेला. हिंदू धर्मांवर ख्रिस्ती मिशनर्यांचे वैचारिक हल्ले होऊ लागले. अनेक सुशिक्षितांवर नव्या शिक्षणाचा प्रभाव पडून हिंदू धर्माच्या परंपरेवरील त्यांची श्रद्धा ढळू लागली, परंपरेची बंधने शिथिल होऊ लागली. काही विचारी सुशिक्षितांना भारतीय समाजातील मूर्तिपूजा, बहुदेवतावाद, जातिभेद व इतर परंपरागत अनिष्ट चालीरीती यांच्या दुष्परिणामाची जाणीव होऊ लागली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणार्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. यामुळे धर्मांतराचा उपलब्ध मार्ग न धरता, येथील धर्माची व सर्व समाजाची नव्या कालानुरूप सुधारणा करावी, असा विचार दादोबा पांडुरंग तर्खडकर (1814-82), राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, तुकाराम तात्या, आत्माराम पांडुरंग तर्खडकर इ. नवसुशिक्षितांच्या मनात आला.
1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्याने पश्रि्चम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली होती. या धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याच्या जोडीला महाराष्ट्रात अस्पृश्यतेची पद्धत स्त्री शिक्षणा वरील बंदी अशा विविध कारणांमुळे हिंदू समाजात दुरावस्था माजली. अशावेळी सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणून सुरुवातीस मानवधर्मसभा, परमहंस सभा आणि त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रार्थना समाजाने आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अल्पवयीन विवाहाला विरोध, हुंडा प्रथेला बंदी आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत देशाच्या पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान दिले.
मानवधर्मसभा
1) 1844 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे दुर्गाराम मनसाराम मेहता यांच्या साहाय्याने मानवधर्मसभा स्थापन केली.
2) एक ईश्वर, एक धर्म, मानवाची एकता, माणसाची योग्यता जातीवरून न ठरवता ती गुणांवरून ठरवावी, विवेकाला अनुसरून कर्मे व भक्ती करावी, शिक्षणाचा प्रसार करावा ही मानवधर्मसभेची उद्दिष्टे होती.
3) मानवधर्मसभा व परमहंससभा यांची तत्त्वे व उद्देश एकच होते.
परमहंस सभा
1848 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी परमहंससभेची स्थापना केली.
1) बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी 1828 साली ब्राह्मोसमाजाची कलकत्ता येथे स्थापना करुन धर्मसुधारणेच्या चळवळीस प्रोत्साहन दिले होते, त्याची पार्श्वभूमी परमहंससभेच्या मागे होती. परंतु सभेच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे कारण ठरलेली घटना म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर व राम बाळकृष्ण यांची भेट. या भेटीतून परस्पर विचारविनिमय झाला.
2) परमहंस सभेचे पहिले व शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण हेच होते.
3) एकेश्वरवादाचा पुरस्कार करून परमहंस सभेत सुरुवातीस व शेवटी प्रार्थना केली जाई.
4) रोटीबंदीचे बंधन तोडणे व जातिभेद मोडणे हे त्यांचे प्रमुख उद्देश समजले जात.
5) धर्मंविवेचन (1868) व पारमहंसिक ब्राह्मधर्म (1880) ही परमहंससभेचे विचार सांगणारी दोन पुस्तके दादोबा पांडुरंग यांनी तयार केली.
6) ह्या सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चाले. सभा नावारूपास आल्यावर समाजात एकदम प्रकट व्हावयाचे, असे त्यांनी ठरवले होते. परंतु मध्यंतरी त्यांच्या सभासदांची यादी कुणी पळवल्यामुळे सभेची मंडळी बरली व सभेचे अस्तित्व संपले.
7) 1860 मध्ये परमहंससभेची समाप्ती झाली. प्रतिकूल परिस्थितीत आपली मते ठामपणे मांडण्याची हिंमत सभासदांमध्ये नसल्याने परंपरावाद्यांच्या पुढे त्यांचा पराभव झाला.
8) परमहंससभेतूनच पुढे प्रार्थनासमाज निघाला. या समाजाच्या संस्थापनेत व संवर्धनात परमहंससभेच्या कित्येक सभासदांचा फार महत्त्वाचा भाग होता.
9) 1864 साली ब्राह्मोसमाजाचे बंगालमधील प्रवक्ते केवशचंद्र सेन यांची मुंबई व पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली. या व्याख्यानांमुळे चळवळीस नवी प्रेरणा मिळाली आणि प्रार्थनासमाज ह्या स्वतंत्र नावाने परमहंससभेचे पुढील कारणांमुळे दुसरे पुनरुत्थान झाले.
10) व्ही. के. नाईक यांच्या मते परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने प्रार्थना समाजाची स्थापना झाली.
प्रार्थना समाज
• 31 मार्च 1867 - प्रार्थना समाजाची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग या तर्खडकर बंधूंनी मुंबईत केली. अध्यक्ष - डॉ. आत्माराम पांडुरंग.
• 4 डिसेंबर 1870 रोजी पुणे आणि त्यानंतर नगर, सातारा येथे त्याच्या शाखा निघाल्या. पुढे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रार्थना समाजाचा पुष्कळ प्रसार झाला.
• सुरुवातीच्या काळामध्ये प्रार्थना समाजाला एकेश्वर उपासक मंडळी असे म्हटले जात होते. परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाशी मिळतेजुळते असले तरी महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्चित केली होती. प्रार्थना समाजाने समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा देवभोळेपणा या गोष्टी समाजातून दूर करण्याचा प्रयत्न केला.
• शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणार्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता.
• सुबोध-पत्रिका या नावाचे मुखपत्र प्रार्थना समाजाने चालविले होते.
• मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड (सँडहर्स्ट रोड) आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.
• 1876 - प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली. या शाळेत सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी वर्गात पोस्टमन, मोटर ड्रायव्हर, गिरणी कामगार, कारखान्यात काम करणारे कामगार, हमाल अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांना समावेश होता. विद्यार्थिवर्गासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली.
• प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले.
• 1878 - पंढरपूर येथे अनाथआश्रमाची स्थापना.
• 1876 ते 77 या काळात दुष्काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी विविध जनउपयोगी कामे प्रार्थना समाजाने हाती घेतली.
• 1882 - पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाजाची सुरुवात ही प्रार्थना समाजाच्या आश्रयाने झाली.
• 1888 - स्त्री शिक्षणाच्या उद्देश समोर ठेवून पुण्यामध्ये महिलांसाठी शाळा प्रार्थना समाजाने सुरू केली.
• 1927 - समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून द्वा. गो. वैद्य यांनी प्रार्थना समाजाचा इतिहास हा ग्रंथ शब्दबद्ध केला.
• प्रार्थना समाजाचे मान्यवर सभासद -
1) ग. ल. चंदावरकर
2) न्या. नारायण गणेश चंदावरकर
1) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
2) मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर
3) वासुदेव बाबाजी नवरंगे
4) सदाशिव पांडुरंग पंडित
5) मामा परमानंद
6) अभय पारसनीस
7) प्राच्यविद्यापंडित सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर
8) वामन आबाजी मोडक
9) सिद्धार्थ राजाध्यक्ष
10) न्या. महादेव गोविंद रानडे
11) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
12) बाळ मंगेश वागळे
13) सरोजिनी कराडे
14) विकास काटदरे
15) द्वा. गो. वैद्य
16) गुरुवर्य बाबुराव जगताप
• प्रार्थना समाजाची धर्मतत्त्वे :
1) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे.
2) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते.
3) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना.
4) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
5) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.
6) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.
• समाजाच्या प्रार्थना मंदिरात होणार्या सार्वजनिक उपासनेत 6 भाग असतात -
1) उदबोधन
2) स्तवन
3) ध्यान व प्रार्थना
4) उपदेश
5) प्रार्थना
6) आरती
• प्रार्थना समाज पुढील घटकावर भर देतो -
1) साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते.
2) विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात.
3) आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे.
4) सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा.
5) उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थना समाज मानतो.
• प्रार्थना समाजावरील प्रभाव -
1) प्रार्थना समाजावर ब्राह्मोसमाजाचा फार मोठा प्रभाव आहे.
2) भागवत धर्माचा कळस म्हणून ज्याचा उल्लेख होतो, ते संत तुकाराम हे मुख्यत्वे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक मानले जातात. प्रार्थना समाज ही प्रारंभापासून आध्यात्मिक चळवळ ठरते. हा समाज ब्रह्मवादी आहे; परंतु मायावादी नाही. उपासना व प्रवचने यांना तुकारामादी अनेक साधुसंतांच्या अभंगांची जोड देण्यात आली.
3) महाराष्ट्रातील रानडे-भांडारकर (न्या म. गो. रानडे व रा. गो. भांडारकर) यांच्यासारख्या स्वतंत्र प्रज्ञावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्याच्यावर जाणवतो आदी पदवीधर विद्वानांचा लाभ झाला.
4) न्या. रानडे यांनी यूरोपमधील मार्टिन ल्यूथरची धर्मसुधारणा व भागवत धर्म यांमधील साम्य विशद केले. प्रार्थनासमाजाची तत्त्वे रानड्यांनी निश्रि्चत केली.
5) भांडारकरांनी प्रार्थनासमाज हा अनिर्देश्य, अव्यक्त, अचिंत्य व कूटस्थ अशा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करीत नाही, तर तो सत्य, ज्ञान व आनंदस्वरूपी सगुण ईश्वराची उपासना करतो, असे स्पष्ट केले. प्रतिवर्षी एकदा वार्षिकोत्सव साजरा केला जातो.
• प्रार्थना समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये -
1) बुद्धिप्रामाण्यवाद आणि आंतरिक श्रद्धा - एका बाजूला बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसर्या बाजूला सर्व आचार-विचारांना सद्भावनेची, आंतरिक श्रद्धेची जोड हे प्रार्थना समाजाचे वैशिष्ट्य.
2) विविध विचारप्रवाहांचा स्वीकार
3) धर्मविचारांचे प्रवाहीपण
4) नावीन्याचे मनापासून स्वागत
5) सर्वांच्या कल्याणाची इच्छा
6) प्रतिकूल परिस्थितीतही टिकविलेला आशावाद
• प्रार्थना समाजाचे कार्य -
1) स्त्री शिक्षण, अनाथ आश्रमाची स्थापना, शिक्षणाचा विस्तार, विधवाविवाह, बालविवाह बंदी, ग्रंथ लेखनाला प्रोत्साहन, यासारख्या सामाजिक कार्यातून प्रार्थना समाजाने आपल्या कार्याची छाप निर्माण केली.
2) विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाचा विचार बहुजन समाजापर्यंत नेला. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतानिवारण, दलित उद्धार करण्यासाठी अनुयायांना नैतिक बळ दिले.
3) पंढरपूर व विलेपार्ले येथील बालकाश्रम; राममोहन हायस्कूल; प्रार्थना समाज हायस्कूल, विलेपार्ले; सर चंदावरकर मराठी शाळा वगैरे दर्जेदार शैक्षणिक संस्था व विविध प्रकारची समाजकल्याणपर कार्ये चालविण्यात प्रार्थना समाजाने यश मिळविले. मुलांच्या शिबिरात प्रार्थनेबरोबर गाणी, गोष्टी, खेळ, वैज्ञानिक प्रकल्प आणि प्रयोगांचाही समावेश असतो. मुलांच्या शिबिरात प्रार्थनेबरोबर गाणी, गोष्टी, खेळ, वैज्ञानिक प्रकल्प आणि प्रयोगावर भर दिला.
4) मुंबई, पुणे, वाई, खार येथील समाजाच्या शाखांनी यथाशक्ती योगदान दिले.
5) अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा नाहीसा करण्याच्या दृष्टीने प्रार्थनासमाजाने अनन्यसाधारण कार्य केले आहे.
6) प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास इ. मराठी तसेच स्पिरिच्युअल पॉवर हाउस यासारखे इंग्रजी ग्रंथ समाजाने प्रसिद्ध केले.
7) सुबोध-पत्रिका हे नियतकालिक बरीच वर्षे समाजाने चालविले होते.
• सनातनी वृत्तीची माणसे नेहमीच सुधारणावादी घटकांना टीकेचे लक्ष्य बनवितात प्रार्थना समाज देखील या सर्वसामान्य नियमाला अपवाद ठरला नाही. प्रार्थना समाजावर सुरुवातीपासूनच टीका होत असली तरी आपल्या अनुयायांना नैतिक सामर्थ्य देऊन कोणतीही जटील समस्या सोडवण्यासाठी न्यायमूर्ती रानडे व भांडारकर यांनी प्रवृत्त केले.