फाटलेले आभाळ अन् जाणारे जीव!

  • फाटलेले आभाळ अन् जाणारे जीव!

    फाटलेले आभाळ अन् जाणारे जीव!

    • 09 Aug 2021
    • Posted By : study circle
    • 23 Views
    • 0 Shares
     
     फाटलेले आभाळ अन् जाणारे जीव !

     
    *   महाराष्ट्राच्या गाववस्त्यात अतिवृष्टी मरणाची कफन लेवून थैमान घालते आहे. तापमानवाढीमुळे पावसाचा पॅटर्न गेल्या काही वर्षांत पुरता बदललाय. काही तासांत काही दिवसांचा पाऊस धबाधबा कोसळतोय. महाराष्ट्रात नगरनियोजनाची वाट लागलेली आहे, तिथे गावखेड्यांचे काय? पुण्यासारख्या संपन्न टापूतले माळीण गाव काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात डोंगराखाली गाडले गेले. तथापि प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राने त्यातून धडा घेतलाच नाही. खरे तर अशा धोकादायक गावांची यादी करून ती अन्यत्र हलवायला हवी होती. मरणाच्या सावलीत न जगता जीवनाचे लढे सुरक्षित होऊन द्या, असे गोरगरिबांना मायबाप सरकारने समजावून सांगणे आवशयक होते. पण या कामातून टक्केवारी नाही, त्यामुळे गुंठेवारी नोंदवणे, पट्टे करणे या कामात रस घेणारी महसुली यंत्रणा समाजहिताचे काहीच मनावर घेत नाही. गरिबाच्या जगण्याला त्यांच्या लेखी बहुधा मोल नसतेच! त्यामुळे माळीणची पुनरावृत्ती झाली.
     
        जगणे महाग, मृत्यू स्वस्त
     
    *   राज्यातल्या मुंबईजवळील रायगड, सातारा जिल्ह्याच्या पश्रि्चम पट्ट्यात, मुंबईच्या डोंगर टेकड्यांखालील झोपड्यात एकुणात शंभरच्या आसपास मृत्यू नोंदवले गेले. ज्या डोंगरांच्या आधाराने लोक जगायचे तेच खचले. वस्त्या चिरनिद्रा घेत्या झाल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे महानगर असलेल्या मुंबईत हे दरवर्षी होते. डोंगर भुसभुशीत होऊन दरडी कोसळतात, झोपड्या जमीनदोस्त होतात आणि माणसेही प्रतिवर्षीप्रमाणे मरतात. कोरोनाने काही हजार मृत्यू झाले, त्यात पावसाळी मृत्यूंची भर पडली. जगणे महाग आणि मृत्यू स्वस्त झालाय. सत्ताधार्‍यांना, प्रशासनाला अशा मृत्यूचे महत्त्व खानेसुमारीपलीकडे असते हे कळते का? सरकारने आभाळ फाटल्यावर ठिगळ लावण्याचे आणि पंचनाम्याचे उपचार करण्याची वेळ येण्याआधीच पुनर्वसन, स्थलांतर केले असते तर ही वेळ कदाचित आली नसती. पावसाचे आगमन ‘नाही रे’ वर्गासाठी चिंतांचे सावट आणते. तांडवी, माळीण गावे दरडीखाली गेली, तेव्हा बरीच कारणमीमांसा झाली. डोंगर पोखरून शेती करणे, त्याच्या खालील घरे हे सगळे धोकादायक असते. मानवी जीवन धोक्यात आल्याचे इशारे वैज्ञानिकांनी दिले. पण माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या काय? डोंगर, टेकड्यांखालील गावे, वस्त्या अन्यत्र हलवण्यासाठी उपाययोजना आखल्या काय? विस्थापन दु:खद खरेच, पण जगण्यासाठी अपरिहार्य असल्याचे स्थानिकांना सांगता आले असते. जगातले दरड कोसळून होणारे 18 टक्के मृत्यू भारतातले असतात. ते हिमालयातच नव्हे महाराष्ट्रातही घडतात.
     
        फक्त लढ म्हणा...
     
    *   कोकणातली परिस्थिती आणखी भीषण. पन्नास टक्के गावे डोंगरकपारीत वसलेली. गडचिरोलीच्या आदिवासी भागांचेही तसेच. तेथली गावे पाण्यात बुडाली तर दखलही घेतली जात नाही. सत्ता कुणाचीही असो... बांधिलकी जनतेशी हवी. भविष्याचा वेध घेत वर्तमानाशी सामना करणे हे ध्येय हवे. अतिवृष्टीने गेल्या वर्षी राज्यात शेतीचे नुकसान झाले. पाच हजार कोटींची तूट आली. लहरी हवामानाने कुठे खूप पाऊस, तर कुठे दुष्काळ निर्माण झाला. अस्मानी आपत्तीत मदत महत्वाची असते. पश्रि्चम घाटांतील बेसुमार जंगलतोडीमुळे अपरिमित नुकसान होत असल्याचे माधव गाडगीळ समितीने सांगितले आहे. त्यातले तथ्य शोधून उपाययोजना कराव्या लागतील. कृष्णेचे पाणी सांगलीत, तर पंचगंगेचे कोल्हापुरात थैमान घालते. अर्थव्यवस्थेची हानी होते, जगण्याचा प्रश्र्न उभा राहतो. केंद्र मदत करेल. बोटी, हेलिकॉप्टरद्वारे प्राण वाचवतील. पण ‘फक्त लढ म्हणा’ हे सांगण्यासाठी नेतृत्व गरजेचे असते.
     
        यंत्रणा गतिमान करावी
     
    *   दरवर्षी भिजून ठप्प पडणार्‍या मुंबईत नेतृत्व जाणवले नाही. आता राज्यात कस लागणार आहे. तौक्ते वादळाने रायगडला झोडपले. छपरे उडाली, संसार उघडे पडले. ना शेतीला मदत मिळाली, ना मासेमारांना. रायगडला पुन्हा निसर्गाने चपराक दिली आहे. शिवसेनेचा प्राण मुंबई, कोकणात वास करतो. हा सगळा परिसर नव्या निसर्गरचनेचा बळी ठरणार काय? असा प्रश्र्न आहे. या परिसरात तेलशुद्धीकरण प्रकल्प नको, उर्जा प्रकल्प नको, असे शिवसेनेला वाटते. शाश्र्वत विकासवाटांसाठी आव्हानाला अनुकूल पर्यावरणीय बदल करावे लागतील. जनतेला दिलासा द्यावा लागेल. सांगलीतल्या पुराच्या वेळी फडणवीस सरकारने मदतकार्याला दिरंगाई केल्याने जागा गेल्या. जनता हिशेब चोख ठेवत असते. म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेला सर्वार्थाने मदतीसाठी यंत्रणा गतिमान केली पाहिजे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    24 जुलै 2021 / मृणालिनी नानिवडेकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 23