अल बेरूनीचा भारत

  •  अल बेरूनीचा भारत

    अल बेरूनीचा भारत

    • 29 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 7 Views
    • 0 Shares
     अल बेरूनीचा भारत
     
    *   इतिहासाच्या ओघात अरबी इस्लामी आक्रमणासमोर पर्शिअन राजवट आणि संस्कृती हतबल झाली.
     
    *   खगोल-अभ्यासात नाव कमावून, ग्रीक तत्त्वज्ञानाची ओळख करून घेऊन मग भारतभूमीवर आलेला दहाव्या शतकातला अल् बिरूनी हा या प्रदेशातले ज्ञान, त्यासाठीची भाषा, इथले लोक आणि त्यांच्या चालीरीती यांचेही निरीक्षण करतो आणि यांतले काय तर्कसंगत ठरते, हे स्पष्टपणे लिहितो
     
    *   गेल्या तीन दशकांत ‘प्राचीन भारतीय गणिता’ला निराळा उजळा मिळाला आहे. लक्षवेधी उदाहरण म्हणजे कलन- संकलन गणित (डिफरेन्शियल आणि इंटिग्रल कॅलक्युलस) पद्धतीचे श्रेय ना न्यूटनचे ना लायब्नीझचे. ते जाते आर्यभट भास्कराचार्य श्रीधराचार्य आणि माधवाचार्य या परंपरेच्या साखळीला! एवढेच नव्हे तर या परंपरेतले ग्रंथ आणि प्राचीन भारतीय गणिताच्या इतर अनेक पाऊलखुणा युरोपामध्ये आढळतात. हे ज्ञान असे दूरवर एका खंडातून दुसर्‍या खंडात पसरले कसे? याचे एक उत्तर आहे. ते नवीन नाही. दोघांमधला दुवा म्हणजे मध्यपूर्वेशी समुद्रमार्गाने अरब आणि ज्यू व्यापारी संपर्क! खेरीज बुद्धकालीन प्रभाव आणि संपर्कापासून रुढावलेली सध्याच्या अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि इराण भागांबरोबरची खुष्कीमार्गाने चालत आलेली देवाणघेवाण! अरब, ज्यू आणि अन्य प्रवासी तसेच व्यापार्‍यांमुळे हे ज्ञानभांडार फैलावले.
     
    *   इतिहासाच्या ओघात अरबी इस्लामी आक्रमणासमोर पर्शिअन राजवट आणि संस्कृती हतबल झाली. तेथील धर्म, भाषा पालटली. अरबी भाषा आणि लिपी त्यांच्या कपाळी आली. मूळ भाषा काहीशा मुक्या झाल्या. अरबी-इस्लामी प्रभावाखालच्या अनेक विद्वानांनी हिन्दोस्तानातील अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. ते युरोपातल्या ख्रिस्ती अभ्यासक धर्मोपदेशक यांच्यातही पसरले. अगदी धर्मयुद्ध काळातदेखील लपूनछपून चालू राहिलेले हे दळणवळण होते. या अरबी प्रवासी व्यापारी आणि विद्वानांचा एक विशेष नमुनेदार प्रतिनिधी आहे. त्याचे नाव अल् बिरूनी. याने ‘हिन्दोस्तान’बद्दल ‘फि तहकीक मा लि अल हिन्द’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याचे ‘अल् बिरूनीज इंडिया’ असे इंग्रजी भाषांतर सहजी मिळते (‘अल बेरूनीचा भारत’- मराठी अनुवाद : यु. म. पठाण, प्रकाशक : साहित्य अकादमी’ मात्र हल्ली मिळत नाही). ग्रंथाचे मूळ संपूर्ण लांबलचक शीर्षक आहे  ‘फि तहकीक मा लि अल हिन्द मिन कुला मकबुला फिअल अक्ल अव मर्दूल’  म्हणजे ‘भारतीय प्रतिपादनावरील संशोधन त्यातले तर्काला ग्राह्य काय आणि काय नाही’!
     
    *   अल् बिरूनीने भारतातील समाजाच्या अनेक पैलूंबद्दल टीकाटिप्पणी केली आहे. बहुपेडी ज्योतिष व्यासंगामुळे बुखारा आणि गीमान दरबारात आणि कालांतराने अल् बिरूनी हा महम्मद गझनीकडे रुजू झाला. गझनीच्या काबूलवरील स्वारीत तो सामील होता. महम्मद गझनीने १०२२ साली भारतावर पहिली स्वारी केली. त्याच्याबरोबर तो भारतात आला. त्यानंतर तो बराच काळ भारतातच राहिला. किती काळ राहिला याचा निश्रि्चत पुरावा नाही.
     
    *   अल् बिरूनी स्वत: ‘एकमेव अल्ला आणि त्याचा अंतिम प्रेषित मुहम्मद’ अशी गाढ श्रद्धा असणारा म्हणजे ‘मोमीन’ होता. रोमन साम्राज्याचे पाठबळ मिळाल्यावर ख्रिस्ती प्रचारकांना खेडवळ मूर्तिपूजक ऊर्फ ‘पगानां’बद्दल एक प्रकारचा तुच्छभाव वाटे; त्याच धर्तीचा भाव त्याला हिंदुस्तानातील लोकांबद्दल वाटत असे. त्याचे लिखाण सर्वव्यापी किंवा खूप सखोल नाही. परंतु बहुस्पर्शी आणि स्पष्टवक्तेपणाचे आहे. भारतीय तत्त्वज्ञान, ज्योतिषविज्ञान, भाषा, जातिसंस्था, सण, उत्सव याबद्दल पुरेशी तपशीलवार माहिती त्याच्या वर्णनात आणि विवेचनात आहे. त्याला ग्रीक संस्कृती तत्त्वज्ञान इतिहास यांची चांगलीच ‘जान-पहचान’ होती.
     
    *   त्याचे भारतातील वास्तव्य गझनीच्या आक्रमणाने बळकावलेल्या प्रदेशाच्या आसपासच झाले. या आक्रमणामुळे लोक हबकले, तेथील मूळ जीवन उजाड बकाल झाले, लुटीमुळे समृद्धी लोपली. दहशतीमुळे लोक परागंदा झाले. तो स्वत:च लिहितो, “महम्मदाच्यामुळे या प्रदेशाची समृद्धी नष्ट झाली. त्याच्या तलवारीने गाजविलेल्या पराक्रमापुढे वाकून हिन्दू धुळीसारखे पांगले. त्यामुळे त्यांना सगळ्याच मुसलमीनांबद्दल अतीव तिटकारा वाटतो. यामुळेदेखील आपल्या ताब्यात आलेल्या प्रदेशातून हिन्दू ज्ञानविज्ञान दूर अन्यत्र निघून गेले आहे. जिथे आपला अद्याप हात पोहोचलेला नाही अशा ठिकाणी जाऊन वसले आहे. तिथेही त्या लोकांना सगळ्याच विदेशी लोकांबद्दल वैमनस्य वाटते. राजकीय आणि धार्मिक स्रोतांतून त्या वैमनस्याला आणखीच बळ मिळते.
     
    *   त्याचा वास्तव्याचा काळ सुमारे आठ ते दहा वर्षे इतका दीर्घ असावा. त्याने या काळात तेथे राहिलेल्या पंडितांकडून, अन्य दरबारी जाणकारांकडून संस्कृत पुरेसे शिकून घेतले. उपलब्ध ग्रंथांचे अनुवाद केले. उदा. पतंजली योगसूत्र, भगवद्गीता. संस्कृत शिकणे सहजी उपलब्ध नसावे. त्याबद्दलचे सामाजिक संकेत आणि अडसर असणारच. पण अल् बिरूनी ‘जेत्यांपैकी’ होता. त्याचे दडपण त्याच्या कामी आले. खेरीज कोणत्याही दुर्मीळपणाचा बांध तोडणारी काही एक किंमत सहसा असतेच. ती मोजली की दारे खुली होतात. तिथल्या मागे उरलेल्या स्थायिक जाणकार आणि पंडितांशी तो चर्चा करीत असे. त्यांच्याशी बोलून ग्रंथांचा अन्वयार्थ उमजून घेत त्याचे अरबीमध्ये भाषांतर लिहीत असे. ज्योतिषविज्ञानाची ओढ असल्याने त्याने ब्रह्मगुप्त आणि वराहमिहिराच्या ग्रंथांचे परिशीलन केले. वैज्ञानिक धांडोळा घेताना फक्त तर्क आणि निरीक्षणाचीच कास धरावी याबद्दल तो आग्रही होता. ‘हिन्दू लोकांचे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यांच्या निश्रि्चत दिवस आणि वेळा सांगणारे गणित’ त्याला ‘थोर आणि भुलविणारे’ वाटत होते; पण हे ‘वैज्ञानिक गणिती’ अडाणी-भोळ्या समजुतींनादेखील आपल्या ग्रंथात थारा कसे देऊ शकतात असे तो संतापाने लिहितो. परंतु त्याच जोडीने लोकसमजुतीला चुचकारले नाही तर विचारी वैज्ञानिकांवर लोकांचा मोठा रोष ओढवेल. ‘हा लोकरोषाचा जीवघेणा घोर नको’ या भयापोटी ते असे करतातहेही त्याने नोंदले आहे. एवढेच नव्हे तर सॉक्रेटिसवर काय ओढवले याचा तो उल्लेख करतो आणि सॉक्रेटिसची भलामण करतो!
     
    *   हिन्दू लोकांवर त्याने केलेली काही निरीक्षणे आवर्जून पाहावी. त्याच्या मते हिन्दू लोक आपल्या धार्मिक समजुतीवर अढळ असतात. त्यांच्यामधे अनेक पंथ आहेत. परन्तु ते परस्परांशी अटीतटीने विवाद करताना दिसले तर फक्त शाब्दिक वाद. कुणी आपली संपत्ती, शरीर, आयुष्य पणाला लावताना आढळत नाहीत. याउलट ‘म्लेंच्छ’ परकीयांविरुद्ध ते चवताळून वागतात.  त्यांना अपवित्र अस्पृश्य मानतात. म्लेंच्छांशी रोटीबेटी व्यवहारच नव्हे तर त्यांच्या हातचे पाणी, अग्नीसुद्धा टाळतात. तसा संपर्क घडला तर आपण अपवित्र होऊ याची त्यांना जिवापाड भीती वाटते. परकीयांना ते स्वत:च्या धर्मामध्ये बिलकूल पत्करत नाहीत. आपल्या मुलाबाळांना ते त्याचे भय घालतात. बुद्धधर्मीय अणि ब्राह्मणांचे एरवी वितुष्ट आहे. परंतु परागंदा व्हायला लागल्यामुळे परकीय म्लेंछांबद्दल बुद्धधर्मीयांनाही तितकाच आकसाचा तिटकारा आहे.
     
    *   भाषेबद्दल तो म्हणतो हे लोक आपल्यापेक्षा अगदी टोकाचे भिन्न आहेत त्यांची भाषा, ती शिकण्याची रीत हे त्यांचे ज्ञान समजून घेण्यातले मोठे अडथळे आहेत. शब्द आणि त्यांची रूपे या दोन्ही बाबतीत त्यांच्या भाषेचा पल्ला अफाट आहे. एकाच गोष्टीसाठी, एकाच वस्तूसाठी अनेक नामे आहेत आणि (त्याच बरोबरीने) एकाच नामाने अनेकविध वस्तूंचापण निर्देश केला जातो. त्यामुळे त्यांचा भेदाभेद करताना इतर शब्दांचा विशेषांचा आधार आणि संदर्भ घेऊनच अर्थ उमगावा लागतो.”, “त्यांची सामान्यांमधली प्रचलित भाषा ही अभिजात भाषेपेक्षा निराळी आहे. अभिजात भाषा फक्त उच्चवर्गी आणि सुशिक्षितांपुरती सीमित आहे. त्याचे व्याकरणप्रचुर चलन, व्युत्पत्ती, अर्थविवाद पद्धती त्यांनाच फक्त अवगत असते. आपली टाळू आणि पडजीभ त्यांच्या काही व्यंजनांचे उच्चार सहजी करूच शकत नाही. ते अरबी/ फारसीपेक्षा अगदीच निराळे आणि अपरिचित आहेत. त्यामुळे त्यांची भाषा आपल्या लिपीत सहजी उतरत नाही. त्यासाठी निराळी आणि अधिक चिन्हे वापरावी लागतील.
     
    *   असे असले तरी बहुधा अल् बिरूनीच्या प्रभावाखाली नाणी पाडली गेली. बहुधा स्थानिक जनतेला राजवट जवळची भासावी म्हणून नाण्याच्या एका बाजूस ‘ला इल्लाह इलअल्लाह महमद रसूल इल्लाह’ हा अटळ अरबी ‘कलमा’ आणि दुसरे बाजूस त्याचे संस्कृत भाषांतर शारदालिपीत कोरले होते- अव्यक्तमेकम् मुहम्मद अवतार नृपति महमूद”!
     
    *   बिरूनीच्या सुदैवाने इतर उलेमांना संस्कृत उमगत नसावे! अशा सैल भाषांतराबद्दल- विशेष करून एरवी महमदाला अवतार म्हटल्याबद्दल- ‘काफिर’ म्हणून या विद्वानाला शंभर फटके पडले असते!
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १६  जुलै २०२१ / प्रदीप आपटे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 7