जातीव्यवस्था आणि आंतरजातीय विवाह

  •  जातीव्यवस्था आणि आंतरजातीय विवाह

    जातीव्यवस्था आणि आंतरजातीय विवाह

    • 29 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 252 Views
    • 0 Shares
     जातीव्यवस्था आणि आंतरजातीय विवाह
     
    *   भारतातील सर्व धर्मांतील बहुसंख्य लोक-‘आंतरजातीय विवाह थांबवले पाहिजेत या विधानाशी सहमती दर्शवतात, हे ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येते. याचा अर्थ, समाजसुधारकांचे प्रयत्न फारच अपुरे ठरले? की आंतरजातीय विवाहांच्या प्रसारासाठी नव्या प्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे?
     
    *   ‘प्यू रिसर्च सेंटर’ ही वॉशिंग्टनमध्ये मुख्य कार्यालय असलेली संशोधन संस्था आहे. सामाजिक वास्तव काय आहे याचा शोध घेऊन तो लोकांसमोर मांडणे, हा या संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी ही संस्था सर्वेक्षणावर आधारित संशोधन करून त्याचे निष्कर्ष वेळोवेळी प्रकाशित करत असते. या संस्थेने २०२० साली भारतामध्ये २९,९९९ नागरिकांचे सर्वेक्षण करून धर्मविषयक काय कल्पना आणि रीतिरिवाज सध्या भारतीयांमध्ये आहेत, याचा अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष माध्यमांतून नुकतेच प्रकाशित झाले आहेत. त्यातील काही माहिती अपेक्षित असली तरी नेमकेपणाने पुढे आली आहे, काही नवी आणि अनपेक्षित आहे. उदाहरणार्थ :
     
    (१) भारतामधील प्रत्येक धर्मातील ७८ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना इतर धर्मांचा आदर करणे असे आपल्या धर्मात सांगितले आहे आणि ते आपले कर्तव्य आहे असे वाटते.
     
    (२) ‘दुसर्‍या धर्माबद्दल मला पुरेशी माहिती आहे’ असे म्हणणार्‍यांचे प्रमाण कुठल्याच धर्माच्या नागरिकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही.
     
    (३) हिंदी भाषक प्रांतांमध्ये ८० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, भारताचा नागरिक असणे याचा एक आवश्यक पैलू ‘हिंदी भाषा येणे’ असा आहे.
     
    (४) धर्म बदलण्याचे प्रमाण भारतात सर्वच धर्मांच्या बाबतीत एक टक्क्याहून कमी आहे. ज्यांच्यावर  बालपणी दुसर्‍या धर्माचे संस्कार झाले, पण जे आता हिंदू आहेत त्यांचे प्रमाण ०.८ टक्के आहे; आणि ज्यांच्यावर बालपणी हिंदू धर्माचे संस्कार झाले, पण आता जे दुसर्‍या धर्मात आहेत त्यांचे प्रमाण ०.७ टक्के आहे. म्हणजे एकूण हिंदूंतून जाण्याचे प्रमाण हे हिंदूंमध्ये येण्याच्या प्रमाणापेक्षा थोडे कमी आहे. मुसलमानांमध्ये ही दोन्ही प्रमाणे ०.३ टक्के आहेत, म्हणजे ना भर ना तूट. इतर धर्मांतून ख्रिस्ती होण्याचे प्रमाण ०.४ टक्के आहे आणि ते ख्रिस्ती धर्मातून दुसर्‍या धर्मात जाणार्‍यांच्या (०.१ टक्के) प्रमाणापेक्षा थोडेसे जास्त आहे.
     
    *   या संशोधनातून पुढे आलेल्या अशा अनेक बाबींबद्दल सांगता येईल; पण त्यांची जंत्री देणे हा या लेखाचा उद्देश नाही. एका प्रश्‍नाला नागरिकांनी दिलेल्या उत्तराने मला फार अस्वस्थ केले, त्याबद्दलच या लेखातील मांडणी मर्यादित आहे. प्रश्‍न होता : ‘तुमच्या समाजातील स्त्रियांना दुसर्‍या जातीतील पुरुषांशी लग्न करण्यापासून थांबवणे किती महत्त्वाचे आहे
     
    *   मुलाखत देणार्‍या २९,९९९ नागरिकांची धर्माप्रमाणे गटवारी करून त्यांचे या विषयावरचे काय मत लक्षात आले, ते लेखासह दिलेल्या तक्ता क्रमांक-१ मध्ये वाचायला मिळेल.
     
    *   अशाच प्रकारचे जास्तीचे तीन प्रश्‍न ‘स्त्री’ऐवजी ‘पुरुष’ आणि ‘जात’ऐवजी ‘धर्म’ शब्द वापरून सर्वेक्षणात विचारण्यात आले. पण नागरिकांनी दिलेल्या उत्तरांमध्ये काहीही दखलपात्र फरक पडलेला दिसत नाही. म्हणजेच धर्म कुठलाही असो, स्त्रियांनी किंवा पुरुषांनी जातीबाहेर किंवा धर्माबाहेर लग्न करण्यापासून त्यांना थांबवणे महत्त्वाचे आहे, असेच बहुसंख्य नागरिकांचे मत आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध केला पाहिजे असे म्हणणार्‍यांमध्ये, सर्व धर्म आणि जातींत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थोडे (सरासरी १ टक्का) जास्त आहे.
     
    *   लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, मुसलमान पुरुषांना धर्माबाहेरील स्त्रीशी लग्न करण्यापासून थांबवणे ‘फार महत्त्वाचे आहे’ असे ७६ टक्के मुसलमानांना वाटते आणि ‘महत्त्वाचे आहे’ असे १० टक्के मुसलमानांना वाटते. मुसलमान पुरुषांना धर्माबाहेरील स्त्रीशी लग्न करण्यापासून थांबवणे ‘अजिबात महत्त्वाचे नाही’ असे फक्त ४ टक्के मुसलमानांना वाटते. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ करून धर्मप्रसार करावा, ते आपले कर्तव्य आहे हे निदान ८६ टक्के मुसलमानांना वाटत नाही. ४ टक्के मुसलमानांना तसे वाटते, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढता येणार नाही; आंतरधर्मीय विवाहाला विरोध करण्याची ‘अजिबात गरज नाही’ असे म्हणणे म्हणजे धर्मप्रसारासाठी हेतुत: आंतरधर्मीय विवाह करण्याचा आग्रह धरणे नव्हे, हेही सांगण्याची गरज आहे. पण तोही या लेखाचा मुख्य मुद्दा नाही.
     
    *   मुख्य मुद्दा आहे तो हा की, सर्व धर्मांतील बहुसंख्यांना जातीबाहेर लग्न थांबवणे हे महत्त्वाचे वाटते. मला ही फार चिंताजनक गोष्ट वाटते. ‘आंतरजातीय विवाहाला विरोध केला पाहिजे असे म्हणणार्‍यांचे हिंदूंमधील प्रमाण ८० टक्के आणि मुसलमानांमधील प्रमाण ८५ टक्के आहे. ख्रिस्ती आणि इस्लाममध्ये हिंदू धर्माप्रमाणे वर्णव्यवस्थेला आणि पर्यायाने जातींना धार्मिक अधिष्ठान नाही. ही भारतीय उपखंडात त्या धर्मांत झालेली विकृती आहे. कनिष्ठ जातींनी उच्च जातीयांच्या छळाला कंटाळून मोठ्या प्रमाणावर स्वेछेने इस्लाम स्वीकारला. या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांमधील जातीबाहेरील लग्नाला असलेला सर्वाधिक विरोध अधिकच चिंताजनक आहे. जातीबाहेरील लग्नांना विरोध ख्रिस्ती (६० टक्के) आणि बौद्ध (६५ टक्के) यांत दखलपात्र कमी आहे.
     
    *   जातिव्यवस्था तोडली पाहिजे आणि त्यासाठी आंतरजातीय लग्न हाच नेमका व प्रभावी मार्ग आहे, असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून आता शंभर वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून आंतरजातीय विवाहाला विरोध करण्याची अजिबात गरज नाही, असे म्हणणार्‍यांचे प्रमाण बौद्ध धर्मीयांमध्ये सर्वात जास्त, म्हणजे १९ टक्के आहे. हे चांगले आहे. पण तरीही बहुसंख्य (६५ टक्के) बौद्ध धर्मीयांचे, ‘आंतरजातीय विवाहाला विरोध करावा’ असेच मत आहे. ‘हेची फळ काय मम तपाला असे म्हणण्याची वेळ बाबासाहेब आंबेडकरांवर आली आहे!
     
    *   आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार आंबेडकरांनी सुरुवातीपासून केला. महात्मा गांधींनी त्यांच्या उत्तरायुष्यात, म्हणजे १९४० सालानंतर आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. त्यानंतर सामान्यत: सर्व राजकीय पुढार्‍यांनी आणि समाज हितचिंतकांनी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार सातत्याने केला आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे देण्याच्या योजना बर्‍याच काळापासून चालू आहेत. २०१३ सालापासून, ज्या जोडप्यातील एक व्यक्ती दलित आहे आणि दुसरी नाही अशा जोडप्यांना रुपये अडीच लाख बक्षीस देण्याची नवी केंद्रीय योजना सुरू आहे.
     
    *   म्हणजे आंतरजातीय विवाह हा पुरस्कारयोग्य आहे, असे वातावरण तयार करण्यात आले. सर्वेक्षणातला सामान्य अनुभव असा आहे की, ‘जे उत्तर योग्य समजले जाईल’ तसेच उत्तर देण्याकडे उत्तर देणार्‍याचा कल असतो. म्हणजे मनात काहीही असो, उत्तर द्यायची वेळ आली की उत्तर देणारा आंतरजातीय विवाहाच्या विरोधात मत व्यक्त करण्याची शक्यता कमी होते. तरीही भारतातील सर्व धर्मांतील बहुसंख्य लोक आंतरजातीय विवाहांना विरोध केला पाहिजे, ते थांबवले पाहिजेत, या विधानाशी सहमती दाखवतात. म्हणजे समाजात फार मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाहांना विरोध आहे आणि समाजसुधारकांचे प्रयत्न फारच अपुरे ठरले आहेत.
     
    *   आंतरजातीय विवाहांना रुपये अडीच लाखाचे पारितोषिक देण्याची जी केंद्र सरकारची योजना २०१३ साली सुरू झाली, तिच्याअंतर्गत पुढील सात वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत फक्त १,२०,२०५ जोडप्यांनाच पुरस्काराची प्राप्ती झाली. म्हणजे दरवर्षी अंदाजे १७,२०० पारितोषिक विजेती जोडपी. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे! चिंतेची बाब म्हणजे, शेवटच्या दोन वर्षांत पारितोषिक मिळवणार्‍या जोडप्यांची संख्या कमी झालेली दिसते आहे.
     
        मग पुढे काय ?
     
    *   एक काळ असा होता की, निदान काही तरुण क्रांतीच्या वेडाने झपाटलेले होते. त्यांच्या युवक क्रांती दलसारख्या संघटनांमध्ये आंतरजातीय लग्न करणे हे महत्त्वाचे मानले जात होते, ती एक स्वागतार्ह गोष्ट होती. आज तशा चळवळी फारशा शिल्लक नाहीत. सम्यक क्रांती नाही तरी जातीअंताच्या लढ्यासाठी एकत्र येणार्‍या तरुण-तरुणींच्या चळवळी उभारण्याची आणि वाढवण्याची गरज आहे. कला, गिर्यारोहण यांसारख्या क्षेत्रात विविध जातींतील तरुण-तरुणींना एकत्र भेटण्याच्या अधिकाधिक संधी निर्माण झाल्या पाहिजेत. आंतरजातीय लग्न करणार्‍या जोडप्याला मूल झाले की, त्या मुलाला सामान्यत: वडिलांची जात मिळते. म्हणजे आंतरजातीय लग्न केले तरी मूल परत जातिव्यवस्थेचा भाग बनते, ही प्रथा बंद केली पाहिजे (ही प्रथा पुरुष-श्रेष्ठत्ववादी आहे, असाही एक मुद्दा आहेच). बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. शंभर वर्षांपूर्वीपेक्षा आजची परिस्थिती नक्कीच अधिक चांगली आहे. पण येथून पुढे काय, काय केले पाहिजे? माझ्याकडे प्रभावी आणि पुरशी उत्तरे नाहीत, पण ती शोधली पाहिजेत हे नक्की.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    १८  जुलै २०२१ / आनंद करंदीकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 252