सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखाली

  • सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखाली

    सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखाली

    • 21 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 42 Views
    • 0 Shares
     सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखाली
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात फलोत्पादनया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखालीव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

         सामान्य अध्ययन पेपर (४) : कृषी

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास :
        फलोत्पादन

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सीताफळाच्या ४२ जाती एकाच छत्राखाली
     
    *   मराठवाडयाचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या बार्शीची आता ‘सीताफळाचे क्लस्टर’ म्हणून ओळख होत आहे. याचे सारे श्रेय डॉ. नवनाथ कसपटे यांना जाते. बार्शी तालुक्यातील गोरमाळे परिसरात त्यांनी घडवलेल्या सीताफळ उत्पादनातील या क्रांतीची गोष्ट.
     
    *   सोलापूर हा कधीकाळी दुष्काळी समजला जाणारा जिल्हा आज फलोत्पादनात आघाडीचा म्हणून ओळखला जातो. ३०-३५ वर्षांपूर्वी पारंपरिक दुष्काळी समजल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा, माळशिरस यासारख्या भागात जिद्दी शेतकर्‍यांनी प्रतिकू ल परिस्थितीवर मात करून फळबागांचा यशस्वी प्रयोग केला. द्राक्ष, डाळिंब, बोर, केळी इत्यादी फळांबरोबरच सीताफळांसाठी सोलापूर जिल्ह्याची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या प्रवासातच बार्शीचे डॉ. नवनाथ कसपटे यांनी सीताफळांवर केलेले नवनवे प्रयोग हे शेतक र्‍यांसोबतच अभ्यासकांनाही वेध घ्यायला लावत आहेत.
     
    *   सोलापूरची फलोत्पादनाची ओळख ही आता सर्वत्र रुजली आहे. यामागे तत्कालीन शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या शंभर टक्के अनुदानाचा खर्‍या अर्थाने मोठा वाटा आहे. दुसरीकडे केवळ फळबागा लावत उत्पादन घेण्यासोबत काही शेतक र्‍यांनी संशोधनाची कास धरत नवनवे मानदंड प्रस्थापित केले. यात नानासाहेब काळे (द्राक्ष), प्रभाकर चांदणे, विश्वास कचरे (डाळिंब), ज्योतिराम गायकवाड (शबरी बोर), साधू बोडके, सुरेश वागदरे (रोपवाटिका) आणि अनेक शेतकर्‍यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उठविली आहे. यातच आता डॉ. कसपटे यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. डॉ. कसपटे यांनी बार्शी तालुक्यातील गोरमाळे परिसरात सीताफळाचे उत्पादन घेताना अहोरात्र परिश्रम घेत सीताफळाच्या तब्बल ४२ जाती जोपासल्या आहेत. या माध्यमातून इतर हजारो शेतकरी लखपती, करोडपती झाले आहेत. ‘एनएमके-१’ (गोल्डन) सीताफळाचे जनक डॉ. कसपटे यांची ही किमया !
     
    *   यंदा बहुसंख्य फळांच्या दराचे उच्चांक मोडत ‘एनएमके- १’ ( गोल्डन) या वाणाच्या सीताफळाने ठोक बाजापेठेत भाव खाल्ला आहे. प्रति किलो २८० रुपयांपर्यंतचा दर प्रत्यक्ष शेतकर्‍याला मिळाला आहे. हाच दराचा मुद्दा शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने अल्पावधीत करोडपती करणारे फळ म्हणून एनएमके-१ (गोल्डन) सीताफळाकडे पाहिले जात आहे.
     
        ४२ वाणांची जोपासना -
     
    *   डॉ. कसपटे यांनी १९८५ सालापासून सीताफळाचे विविध वाण संकलन करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे ४२ वाणांची प्रत्यक्ष लागवड असून, २००२ मध्ये हा ‘प्रात्यक्षिक प्लॉट’ तयार करण्यात आला. यापैकी २२ वाणांच्या फळाचे त्यांनी पृथ:करण केले आहे. त्यापैकी बहुतांश वाण फळावर विकसित आहेत.
     
    *   डॉ. कसपटे यांनी २०१८-१९ मध्ये ‘क्रॉस पॉलिनेशन’चा प्रयोग केला आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ३२ वाणांच्या फुलांमधील पुके सर संकलन करून त्याचे ‘क्रॉस पॉलिनेशन’ केले आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या फार्मवरील ३० कर्मचार्‍यांची यंत्रणा तयार करून दररोज पहाटे पुके सर संकलन केले आणि त्याचे ३२ वाण ‘क्रॉस’ केले. ‘क्रॉस’ केलेल्या फु लांना ‘टॅग’ लावून त्यांचे ‘कोड नंबर’ची नोंदणी संगणकामध्ये करून ठेवली आहे. त्या फुलांना आलेल्या फळांचे संकलन करून त्यांची नोंदणीनुसार रोपे तयार केली आहेत. तयार केलेल्या सुमारे २५०० रोपांची नऊ  एकर क्षेत्रावर लागवड केली असून ती सध्या प्रयोगावस्थेत आहे. यातून सीताफळाचे शेकडो नवीन वाण निर्माण होतील, असा डॉ. कसपटे यांना विश्वास वाटतो. त्यांचे हे काम कृषी विद्यापीठालाही प्रेरणा देणारे आहे.
     
    *   डॉ. कसपटे यांच्या या सीताफळांच्या शेतीला भेट देण्यासाठी देश-परदेशातून शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक गोरमाळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) गावाला भेट देत असतात. दररोज किमान शंभरच्यावर अभ्यागत इथे येत असल्याची नोंद आहे. पर्यटकांची ही वाढती संख्या लक्षात घेता ‘मधुबन फार्म’वर राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अभ्यागतांची संख्या जास्त असल्यास त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे प्रत्येक महिन्याला २०० प्रशिक्षणार्थींना एनएमके-१ ( गोल्डन) सीताफळाच्या लागवडीपासून काढणी व विठी व्यवस्थापनापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. ‘मधुबन फार्म’वर येणार्‍या शेतकर्‍यांमध्ये दक्षिण भारतातील शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांना सीताफळ लागवडीची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत सांगण्यासाठी दुभाषकाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलुगु, कन्नड, तामीळ, हिंदी व इंग्रजी या भाषेतील दुभाषिक मधुबन फार्मवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे संभाषणासाठी येणारी समस्या आता दूर झाली आहे.
     
    *   सीताफळ उत्पादन क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ भरीव योगदान दिल्याबद्दल राज्यातील विविध संस्थांनी डॉ. कसपटे यांना पुरस्कार देऊ न गौरविले आहे. २०१७ मध्ये त्यांना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे दिला जाणारा ‘प्लँट जिनोम सेवियार फार्मर अ‍ॅवार्ड २०१५’ हा पुरस्कार मिळाला. याशिवाय अन्य विविध १७ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ. कसपटे यांच्या सीताफळावरील या कामगिरीमुळे बेंगळुरू विद्यापीठाकडून २०१८ मध्ये मानद डॉक्टरेट ही पदवीही बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावी शिकलेला हा शेतकरी आता ‘सीताफळातील डॉक्टर’ म्हणून युवा शेतकर्‍यांसमोर आदर्श ठरला आहे.
     
    *   डॉ. कसपटे यांनी २००३ मध्ये अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाची स्थापना केली आहे. मागील १२ वर्षे ते या संघाचे अध्यक्ष असून या काळात त्यांनी सीताफळाच्या विकासासाठी राज्यातील ११०० हून जास्त सीताफळ उत्पादकांना संघाच्या छत्राखाली एकत्र आणले आहे. राज्यातील विविध भागात १२ राज्यव्यापी व अनेक विभागीय कार्यशाळा आणि सीताफळ परिषदेचे आयोजनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही सीताफळाचा विस्तार होत आहे, हे लक्षात घेऊ न त्यांनी अखिल भारतीय सीताफळ महासंघाचीही स्थापना केली आहे. या माध्यमातून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील सीताफळ उत्पादक शेतकर्‍यांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम, बौद्धिक कौशल्य आणि नियोजन यांचे हे फलित आहे.
     
    *   मराठवाडयाचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या बार्शीची आता ‘सीताफळाचे क्लस्टर’ म्हणून ओळख होत आहे. याचे सारे श्रेय डॉ. कसपटे यांना जाते. माळरानावरच्या, मराठवाडयाच्या बालाघाटासारख्या डोंगराळ भागात, बांधावरच्या या उपेक्षित फळझाडाला डॉ. कसपटे यांनी फळबागेच्या रांगेत बसवून खर्‍या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. पर्यायाने शेतकर्‍यांचीही पत वाढविली आहे.
     
        पहिले जागतिक पेटेंट -
     
    *   डॉ. नवनाथ कसपटे यांनी विकसित केलेल्या ‘एनएमके-१’ (गोल्डन) या सीताफळ वाणास जागतिक सामित्व हक्क (पेटेंट) प्राप्त झाले आहे. यामुळे कृषी विद्यापीठ स्तरावर मान्यता मिळण्याचा अडसर आता दूर झाला आहे. यामुळे भविष्यात रोपांच्या भेसळीमुळे शेतकर्‍यांची होणारी फसवणूक थांबणार असून, एनएमके-१’ (गोल्डन) वाणाच्या लागवडीला शासनाचे अनुदान मिळविण्यास मदत होणार असल्याचे डॉ. कसपटे यांचे चिरंजीव प्रवीण कसपटे सांगतात.
     
        कॅलिफोर्नियाच्या कंपनीशी करार -
     
    *   जर्मनीच्या बर्लिन येथे नुकत्याच झालेल्या ‘फ्रू ट लॉजिस्टिका’ या आंतरराष्ट्रीय फळ प्रदर्शनात डॉ. नवनाथ कसपटे यांच्या ‘एनएमके-१’ (गोल्डन) या सीताफळ वाणाला जागतिक ओळख मिळाली.  विशेषत: कॅलिफोर्नियास्थित एका कंपनीबरोबर प्रवीण कसपटे यांनी प्राथमिक करार केला असून, रॉयल्टी आणि पेटेंटच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी कंपनीचे चेअरमन आणि प्रमुख अधिकारी लवकरच ‘मधुबन फार्म’ला भेट देण्यासाठी येणार असल्याची माहिती कसपटे यांनी दिली
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १३ जुलै २०२१ / एजाजहुसेन मुजावर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 42