सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन

  •  सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन

    सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन

    • 21 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 28 Views
    • 0 Shares
     सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात कृषीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  कीड व्यवस्थापनव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : कृषी

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.१०  कृषी :
    १.  राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व -
        कमी उत्पादनक्षमतेची कारणे - राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता,

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन
     
    *   सोयाबीन हे सध्याचे सर्वाधिक पसंतीचे पीक ठरले आहे. या पिकाची लागवड दिवसेंदिवस राज्यात मोठया प्रमाणात होत आहे. मात्र या वाढत्या पिकाबरोबर त्यावर येणार्‍या नवनव्या किडींचे संकटही वाढत आहे. सोयाबीनवर येणार्‍या या किडींच्या व्यवस्थापनासंबंधी..
     
    *   गेल्या दोन दशकापासून राज्यात सोयाबीनचे पीक नगदी पीक म्हणून मोठया प्रमाणात घेतले जात आहे. खाद्यतेलासाठी सोयाबीनचा प्रामुख्याने वापर होत असल्याने बाजारात हमी भावापेक्षा जादा दर शेतकर्‍यांना यावर्षी मिळाला. गेल्या तीन महिन्यापासून खाद्यतेलामध्ये झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन बाजारात मागणी वाढणारे हे स्पष्ट आहे. यामुळे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रामध्येही वाढ झाली आहे. मात्र या पिकावर ‘चक्री भुंग्या’चे आक्रमण झाले तर उत्पादनामध्ये ३० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. यामुळे सोयाबीनला फुलकळी येण्याअगोदरच कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
     
    *   ‘चक्री भुंगा’ ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.
     
    *   या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकर्‍यांनी पुढील उपाय योजना करणे आवश्यक ठरते. पेरणी जुलैच्या दुसर्‍या आठवडयाच्या आत पूर्ण करावी. पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेथे चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट (दाणेदार) १० टक्के १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा १५ दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्री भुंगा या किडीमुळे होणार्‍या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसात ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के  झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
     
        खोडमाशी कीड व्यवस्थापन -
     
    *   खोडमाशीची प्रौढअवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजेच २ मि.मी. असते. या किडीची अंडयातून निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असून ही अंडयातून बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून या फांदीचा किंवा खोडाच्या आतील भाग पोखरून खातात. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अळी किंवा कोष आढळतो.
     
    *   या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर १० ते १५ दिवसाचे पीक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुद्धा काम करू शकते व अशाप्रकारे रोपावस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशीने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
     
    *   या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकर्‍यांनी पुढील उपाय योजना कराव्यात. जेथे या किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट (दाणेदार) १० टक्के १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हेक्टर २५ पिवळे चिकट सापळे लावावेत. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आद्र्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरूक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत. पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थायमेथोक्झामची बीजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पिक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन ५० टक्के - ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के - ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
     
    *   याशिवाय सोयाबीनच्या पिकावर असलेले कीटक खाण्यासाठी पक्षीही येत असतात. या पक्षांना पिकामध्ये काठी उभी करून बसण्यास जागा केली तर काही प्रमाणात कीटकांचा बंदोबस्त होऊ शकतो. तसेच प्रकाशसापळे, कामगंध सापळे यांचाही वापर करता येऊ शकतो. सर्वसाधारण एकरी उत्पादन सात ते आठ क्विंटल असते. जर कीड व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने केले तर उत्पादन दहा क्विंटलपर्यंत वाढू शकते.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी
    १३ जुलै २०२१ / दिगंबर शिंदे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 28