बदलत्या वातावरणात शेती करताना

  •  बदलत्या वातावरणात शेती करताना

    बदलत्या वातावरणात शेती करताना

    • 16 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 178 Views
    • 0 Shares
     बदलत्या वातावरणात शेती करताना...

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्वया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  बदलत्या वातावरणात शेती करताना...व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.


    सामान्य अध्ययन पेपर (४) : भारतीय अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.  राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व -
        कमी उत्पादनक्षमतेची कारणे - राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता,
        शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे,
        कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणा आणि जमीन वापर, मृद आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण,
        सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी,
        कृषी कर आणि जीएसटी,
        आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषी विषयक विविध करार,
        पीक विमा योजना आणि त्यांची वाटचाल,
        भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) आणि महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद  (एमसीएइआर) यांची कृषी क्षेत्रातील कार्ये.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    बदलत्या वातावरणात शेती करताना...
     
    *   जलवायू परिवर्तन आणि तापमानवाढीचे गंभीर दुष्परिणाम शेतीवर जाणवू लागले आहेत. अनेक पिकांचे उत्पादन घटत चालले आहे, तर अवेळी पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जलव्यवस्थापन आणि संमिश्र शेतीचा अवलंब फायद्याचा ठरतो.
     
    *   आजच्या शेतीव्यवस्थेचा विचार करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. आज हवामानातील बदलांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. शेती उत्पादनामध्ये चढ-उतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी किंवा अत्याधिक पाऊस हेच आहे. याखेरीज अति आर्द्रता, असामान्य  तापमान, रोग आणि किडींचा प्रकोप, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट ही कारणेही आहेतच. गेल्या काही वर्षांपासून हवामानाचे चक्र सर्वांना स्तिमित करण्याइतके बिघडले आहे. अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही गोष्टी शेतीसाठी अभिशाप ठरल्या आहेत. 
     
    *   गेल्या दशकभरात खरिपाच्या पिकाला अवर्षणाचा फटका बसतो, तर रब्बीच्या पिकाने नुकसान भरून काढावे, तेव्हा अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करून जातो. या समस्येचा अभ्यास करताना कृषी शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, एक अंश तापमान जरी वाढले तरी गव्हाचे उत्पादन चार ते पाच कोटी टनांनी घटेल. त्याचप्रमाणे दोन अंश सेल्सिअस तापमान वाढले तर भाताचे उत्पादन प्रतिहेक्टर ०.७५ टन कमी होईल. कृषी विभागाच्या मते, अशा स्थितीत गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज ८२ दशलक्ष टन इतकाच राहील. जलवायू परिवर्तनामुळे फळांचेही उत्पादन घटेल. केवळ उत्पादनच घटेल असे नाही, तर त्यांची गुणवत्ताही कमी होईल. अन्नधान्यातील पोषक घटक आणि प्रथिने कमी होत जातील. परिणामी आहार संतुलित राहणार नाही आणि माणसाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येईल.
     
    *   भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी सर्वसाधारण पाऊसमान राहील, अशी भविष्यवाणी केली आहे. म्हणजेच सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस यंदा पडण्याची शक्यता आहे. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोतांचा अतिउपसा केल्यामुळे पर्यावरणात बदल घडत असून, त्याचा शेतीवर आणि पिकांवर प्रतिकूल परिणाम होणे निश्‍चित आहे. पावसाळ्याचे दिवस पूर्वी अधिक होते, ते आता कमी झाले आहेत. मात्र, एकाच दिवशी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. 
     
    *   पर्यावरणातील अनेक बदल शेतीवर थेट परिणाम करणारे आहेत. सरासरी तापमानातील वाढ हा पहिला बदल होय. गेल्या काही दशकांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १७८० पासून आतापर्यंत पृथ्वीच्या तापमानात ०.७ अंशांची वाढ झाली आहे. अनेक वनस्पतींच्या प्रजातींना वाढीसाठी विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. वातावरणाचे तापमान वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेत प्रचंड घट होते. उदाहरणार्थ, आज गहू, जवस आणि बटाट्याची शेती ज्या ठिकाणी केली जाते, त्या ठिकाणी तापमान वाढल्यानंतर ही शेती होऊ शकणार नाही. कारण, या पिकांना थंड हवामान लागते. अशा प्रकारे जलवायू परिवर्तन झाल्यामुळे स्थानिक जैवविविधतेत बदल होऊन ते पिकांच्या र्हासास कारणीभूत ठरते. तापमान अधिक वाढल्यास मका, ज्वारी आणि भात अशा पिकांच्या उत्पादकतेत घट होऊ शकते. कारण, या पिकांमध्ये दाणे तयार होण्याची प्रक्रिया विशिष्ट तापमानातच  होते. तापमान वाढल्यास दाणे कमी प्रमाणात तयार होऊन उत्पादन घटते. तापमान असेच वाढत राहिल्यास ही पिके घेणे अवघड होऊन बसेल. पाऊस कमी पडल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते. जमिनीच्या तापमानात सतत चढ-उतार होत राहिल्यास अपक्षयाची प्रक्रिया सुरू होते. तापमानवाढीमुळे दुष्काळाची परिस्थिती वारंवार उद्भवते आणि हळूहळू वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू होते.
     
    *   पावसाचे प्रमाण आणि स्वरूपात झालेला बदल हाही पिकांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस कमी पडल्यास जमिनीतील ओलावा नष्ट होत जातो, तर एकाच वेळी अधिक पाऊस पडल्यास मातीची धूप होऊन जमीन नापीक बनू लागते. पाऊस तर शेतीसाठी महत्त्वाचा आहेच; पण तो वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणेही आवश्यक आहे. 
     
    *   तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकर्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. जमिनीची धूप रोखण्याबरोबरच पावसाचे पाणी उपयोगात आणण्यासाठी जलसंवर्धन हा दुहेरी उपयोगाचा मार्ग ठरतो. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांतून आपण पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयोगात आणू शकतो. शिवाय, त्यामुळे मातीची धूपही थांबते. त्याच वेळी साठलेले पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होते. त्याचा पुन्हा शेतीसाठी उपयोग होतो. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करणे आता काळाची गरज बनली आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीच्या उत्पादकतेत घट करणारी ठरली आहेत. तसेच त्यामधील विषारी घटक अन्नसाखळीत समाविष्ट होऊन अन्नावाटे पोटात जाऊन आरोग्याचेही गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे रासायनिक शेतीतून हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे निसर्गाचे चक्र आणखी बिघडते. त्यामुळे आपल्याला जैविक आणि संमिश्र शेतीचा अवलंब यापुढील काळात करावा लागणार आहे. एकल शेतीऐवजी समग्र शेतीतंत्राचा वापर करण्यामुळे जोखीम कमी होते. समग्र शेतीत अनेक पिकांचे उत्पादन एकाच वेळी घेतले जाते. नैसर्गिक प्रकोपामुळे एखादे पीक हातचे गेले तरी इतर पिकांमधून शेतकर्याला उत्पन्न मिळू शकते.
     
    *   जलवायू परिवर्तनाचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता पीक उत्पादनात नवनवीन पद्धतींचा अवलंब यापुढे करावा लागणार आहे. पेरणीच्या वेळेतही यापुढे बदल करावा लागेल. शेतकर्याने आपले पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्राच्या समन्वयातून संकटावर मात करायला शिकले पाहिजे. संमिश्र शेती आणि आंतरपिके घेऊन जलवायू परिवर्तनामुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून काही प्रमाणात बचाव करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्वच शेतकर्यांना पिकाचा विमा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. जलवायू परिवर्तनाच्या दुष्टचक्रापासून बचाव करण्यासाठी सर्वांत आधी आपण उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा काटकसरीने आणि न्यायसुसंगत वापर करायला शिकले पाहिजे. त्यासाठी भारतीय जीवनशैली आणि पारंपरिक ज्ञानाचा वापरच फलदायी ठरणार आहे. शेतीमध्ये पर्यावरणस्नेही पद्धतींचा वापर यापुढील काळात करणे गरजेचे बनले आहे. असे क ल्यास आपण जमिनीची उत्पादकता वाढवून ठेवण्याबरोबरच नैसर्गिक स्रोतांचेही रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    ३ जुलै  २०२१ / विलास कदम

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 178