चीनची ताकद टिकाऊ नाही

  •  चीनची ताकद टिकाऊ नाही

    चीनची ताकद टिकाऊ नाही

    • 15 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 18 Views
    • 0 Shares
     चीनची ताकद टिकाऊ नाही
     
    *   आपले महत्त्व वाढविण्यात चीन यशस्वी झाला असला तरी गेल्या काही वर्षांपासून चीनचे पवित्रे कमकुवत ठरू लागले आहेत. श्रीलंका, मालदीव आणि बांगला देशात याची लक्षणे दिसतात. चीनची आर्थिक शक्तीही निर्यातीवर आधारित आहे. जेव्हा व्यापाराचे नेटवर्क कमकुवत होईल, तेव्हा चीनची गतीही कमी होईल.
     
    *   चीनचा आर्थिक आवाका भारतापेक्षा पाचपट मोठा आहे, चीनची लष्करी ताकद भारतापेक्षा तीनपट अधिक आहे, प्रत्येक बाबतीत चीन भारतापेक्षा सरस आहे,  हे वास्तव आहे; परंतु चीनची ताकद टिकाऊ स्वरूपाची नाही, हेही तितकेच खरे आहे. चीनचे घरटे तकलादू आहे. हाँगकाँगमध्ये स्वायत्त लोकशाही व्यवस्थेची ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे, त्याचा थेट परिणाम तैवानमध्ये दिसून येत आहे. चीन हाँगकाँगवर हवा तेव्हा ताबा घेऊ शकतो, असे ऐंशीच्या दशकात जेव्हा चीनचे नेते डयेंगयांग पेंग यांनी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना सांगितले होते, तेव्हा थॅचर यांनी उत्तर दिले होते की, तुम्ही निश्रि्चतपणे तसे करू शकता; परंतु त्यामुळे जगाला तुमची मानसिकता कशी आहे, हेच दिसून येईल. हे ऐकून डेंग यांनी हाँगकाँगवर अतिक्रमण करण्याची योजना गुंडाळली होती.
     
    *   कदाचित ही बुद्धी चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे नाही. त्यांच्या मते, संपूर्ण जगाला कवेत घेण्याची ताकद चीनने प्राप्त केली आहे; परंतु हे चीनचे केवळ एक स्वप्नरंजनच आहे. पूर्व आशियातील शेजारी देशांचा एक हिंसक विरोधक म्हणून आज चीन ओळखला जातो. चीनच्या व्यवहारामुळे युरोपीय देश प्रक्षुब्ध आहेत. अमेरिकेचे प्रशासन हरप्रकारे चीनच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करीत आहे. रशिया हा अमेरिकेचा विरोधक म्हणून केवळ चीनसोबत आहे. अशा पार्श्वभूमीवर, भारताशी संघर्ष ओढवून घेतल्यास चीनला तो महागात पडेल. चीन भारतापेक्षा शक्तिशाली आहे हे मान्य केले तरी चीनच्या विश्वविजयाच्या योजनेत अशा संघर्षामुळे बाधा येऊ शकते. तिबेटचा मुद्दा उसळून वर येऊ शकतो. चीनची कमजोरी नेमकी तीच आहे. साम्यवादी चीनचे संस्थापक माओ त्से तुंग तिबेटचा उल्लेख ‘दंत शृंखला’ असा करीत असत. ही शृंखला भेदण्याची ताकद भारताकडे आहे. भारताने तसा प्रयत्न कधी केला नाही हा भाग वेगळा; परंतु आरपारचा प्रश्न उपस्थित झाल्यास भारताकडून तसे होणे शक्य आहे. तिबेटची चावी अद्याप भारताच्या हाती आहे. अमेरिका तर तिबेट प्रश्नावरून चीनला घेरण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच करीत आहे. गेल्या वर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये तिबेट प्रश्नावरून कायदेही झाले होते.
     
    *   काही दिवसांपूर्वी ‘ग्लोबल टाईम्स’ने एका व्यंगचित्रात भारताची तुलना एका थकलेल्या, कमकुवत हत्तीशी केली होती. महामारीमुळे जेरीस आलेल्या भारताचे ते प्रतीक होते. दुसरीकडे चीनने बांगला देशला इशारा दिला आहे की, बांगला देशने ‘क्वाड’शी संबंध जोडला तर त्याला घातक परिणामांना सामोरे जावे लागेल. वस्तुतः अशा घटनांमधून चीनचे मनसुबे स्पष्ट होऊ लागले आहेत.
     
    *   एकविसाव्या शतकातील अर्थव्यवस्थेत भारत चीनपुढे खुजा आहे, हे चीन सर्वांना सांगू इच्छित आहे. जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान दक्षिण आशियातील अन्य देशांसारखेच आहे. विशेषतः गेल्या वर्षी गलवान खोर्यात झालेला संघर्ष एखाद्या युद्धाचा ट्रेलर म्हणूनच झालेला होता; परंतु एक वर्षानंतरही चीनचे मनसुबे अपूर्णच राहिले. जिनपिंग बेचैन होऊन कधी नेपाळवर तर कधी श्रीलंकेवर दबाव टाकत आहेत.
     
    *   चीनची दादागिरी दक्षिण आशियात का चालू शकत नाही, याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक आणि लष्करी ताकद असूनसुद्धा चीनची तुलना अमेरिकेशी केली जाऊ शकत नाही. चीनची लष्करी व्यवस्था अमेरिकेपुढे थिटी आहे. अमेरिकेच्या तुलनेत अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या द़ृष्टीनेही चीन कमकुवत आहे. दक्षिण आशियाचा विषय पृष्ठभागावर येताच अमेरिकेची चर्चा का होते? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
     
    *   भारत-चीन संघर्षाबाबत विचार करतानाही अमेरिकेच्या शक्तीचा विचार करणे यथोचित ठरते. वस्तुतः आखाती देश आणि अफगाणिस्तानात अमेरिकेने आपले सैन्य आणि लष्करी व्यवस्था कमी केल्यानंतर अमेरिकेच्या शक्तीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जागतिक व्यवस्थेत स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी अमेरिकेकडे किमान एक तरी कारण असायला हवे आणि तोच रस्ता लोकशाहीमार्गे जातो. दक्षिण आशियात लोकशाहीचा सर्वांत मोठा रक्षक भारत हाच आहे. आपले महत्त्व वाढविण्यात चीन यशस्वी झाला असला तरी गेल्या काही वर्षांपासून चीनचे पवित्रे कमकुवत ठरू लागले आहेत. श्रीलंका, मालदीव आणि बांगला देशात याची लक्षणे दिसून येऊ शकतात. चीनची आर्थिक शक्तीही निर्यातीवर आधारित आहे. जेव्हा व्यापाराचे नेटवर्क कमकुवत होईल, तेव्हा चीनची गतीही कमी होईल.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    ६ जुलै २०२१ / प्रा. सतीश कुमार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक

Share this story

Total Shares : 0 Total Views : 18