पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभाल

  • पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभाल

    पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभाल

    • 15 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 23 Views
    • 0 Shares
     पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभाल
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात कृषीया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभालव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : भारतीय अर्थव्यवस्था, कृषि

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.१०  कृषी :
    १.  राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व -
        कमी उत्पादनक्षमतेची कारणे - राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता
        शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे,
        कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणा आणि जमीन वापर, मृद आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण,

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    पिकांचे सातत्य अन् जमिनीची देखभाल
     
    *   बाजारभावाच्या आमिषाने किंवा उत्पादनाच्या आशेने अनेक शेतकरी दरवर्षी तेच ते पीक घेतात. पिकाच्या या सातत्यामुळे जमिनीची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून हळूहळू उत्पादकता कमी होत जाते. पीक रोगाला बळी पडते अशा नाना अडचणी निर्माण होतात.
     
    *   मराठवाडा, विदर्भ परिसरात सोयाबीनचे पीक गेल्या ३० वर्षांपासून घेतले जाते. तुरीचे पीक तर किमान १०० वर्षांपासून घेतले जात असावे. खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकापासून शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळू लागल्याने सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ झाली आहे. डाळीसाठी म्हणून तुरीचा पेरा घेतला जातो. त्यातही गेल्या काही वर्षांपासून भर पडते आहे. ज्या शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेता येतात, ते शेतकरी रब्बी हंगामात घेतलेल्या पिकामुळे बेऊड करून पुन्हा दुसर्‍या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन, तूर पीक घेऊ शकतात. मात्र ज्या शेतकर्‍यांना केवळ एकच पीक घ्यावे लागते, त्यांना जमिनीत फेरपालट करता येत नाही व दरवर्षी तेच ते पीक घ्यावे लागते. पिकाच्या या सातत्यामुळे जमिनीची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून उत्पादकता कमी होते, पीक रोगाला बळी पडते अशा नाना अडचणी निर्माण होतात.
     
    *   पूर्वीच्या काळी खरीप हंगामातील पिके व रब्बी हंगामातील पिके ठरलेली होती. खरीप हंगामात घेतलेल्या पिकानंतर त्यावर रब्बी हंगामात कोणते पीक घेतले पाहिजे म्हणजे दुसर्‍या वर्षी पीक घेताना अडचण येणार नाही याचे ठोकताळे होते. गावोगावी तसे नियम पाळले जात असत. मात्र शेतीत केलेला पेरा व मिळणारे उत्पादन, त्याचे पैसे याचे गणित घालून नव्या पिढीने शेती करण्यास सुरुवात केली आणि फायद्याच्या पिकांकडे कल वाढला. गेल्या काही वर्षांत राज्यभर सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ होत आता राज्यात सुमारे ४३ लाख हेक्टरवर हे पीक घेतले जात आहे. देशात सोयाबीनचा हा पेरा १२५ लाख हेक्टरवर होतो. सोयाबीनसारखे हक्काचे पैसे देणारे खरीप हंगामात दुसरे पीक नसल्याने दरवर्षी या पिकाच्या अडचणी सोडवत शेतकरी सोयाबीनचाच पेरा घेतो आहे. कृषी विभागाच्या वतीने पर्यायी पिकाचे संशोधन झाले असले तरी पर्यायी पिकातून मिळणार्‍या उत्पादनातून सोयाबीनइतके पैसे मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीन उत्पादनापासून बाजूला होत नाही. आगामी २० ते २५ वर्षे खरीप हंगामात सोयाबीनला पर्याय दिसत नाही.
     
    *   तीच स्थिती काही प्रमाणात तुरीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची आहे. हलक्या जमिनीत, कमी पाण्यात हे पीक येते. कमी-अधिक प्रमाणात उत्पादन झाले तरी किमान शेतकर्‍यांची गरज भागते त्यामुळे तुरीच्या पेर्‍यातही फारशी घट होत नाही. गतवर्षी लातूर जिल्हयात सुमारे १ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा झाला मात्र जवळपास २५ टक्के तुरीला मर रोगाचा फटका बसला. त्यातून सप्टेंबर महिन्यातच अनेक शेतकर्‍यांच्या शेतात तुरीचे खराटे दिसू लागले. वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी व बदनापूर येथील तूर संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन तुरीची पाहणी केली. नजर पाहणीतच त्यांना मर रोगामुळे ही स्थिती झाल्याचे लक्षात आले. प्रयोगशाळेत जाऊन त्यांनी यावर संशोधन केले व मर रोगामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
     
    *   दरवर्षी तेच बियाणे व तीच जमीन पेरणीसाठी वापरली जात असेल, तर जमिनीत ‘फ्युजारियम ऑक्सिसफोरम’ नावाची हानीकारक बुरशी वाढते. ती जमिनीत राहते व दरवर्षी वाढते. खरीप हंगामातील तुरीवर व रब्बी हंगामातील हरभर्‍याच्या मुळावर ती घाला घालते. प्रारंभी जमिनीतून ती मुळात वाढते. मुळातून खोड व पानांपर्यंत वाढत जात झाडाला मिळणारी अन्ननलिकाच बंद करून टाकते त्यामुळे तूर किंवा हरभरा शेंडयापासून मुळाकडे वाढत येतो. काही ठिकाणी शेतकरी याला ‘तूर उंबळली’ असा शब्दप्रयोग करतात. इंग्रजीत त्याला ‘विल्ट’ असा शास्त्रोक्त शब्द वापरला जातो तर प्रचलित शब्द मर रोग आहे.
     
    *   दरवर्षी तेच ते पीक घेतल्याने जमिनीत वाढणारी ही बुरशी नष्ट करण्याला पर्याय नाही. शेतकरी संपूर्ण जमीन स्टरलाईज करू शकत नाही. त्यामुळे ‘ट्रायकोडर्मा’चा वापर शेतीत केला पाहिजे. मुळात तेच ते बियाणे न वापरता दरवर्षी बियाणात बदल केला पाहिजे. पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया केली तर मुळाच्या कक्षेच्या सान्निध्यात बुरशी वाढणार नाही. जुलै ते ऑगस्ट महिन्यात तुरीच्या पट्टयांना फवारणीच्या पंपाचे नोजल काढून पंपामध्ये ट्रायकोडर्माचे मिश्रण द्रवरूपात करून त्याची धार दिली तर मुळापर्यंत ते पाणी पोहोचून त्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. दोन, तीन वर्षे सलग ही उपाययोजना केली तर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
     
    *   कृषी विद्यापीठाने असे प्रयोग केले आहे व त्यात त्यांना यश आले आहे. दुधापासून दही तयार करताना जेवढे विरजण लागते तितकेच औषध बुरशी नष्ट करण्यासाठी गरजेचे आहे. सलग तीन वर्षे हा प्रयोग केला तर तुरीचे उत्पादन किंवा रब्बी हंगामात हरभर्‍याचे उत्पादन घेण्यास शेतकर्‍याला अडचण येणार नाही.
     
    *   कृषी विद्यापीठाच्या वतीने मराठवाडयातील सर्व आठ जिल्हयांत ‘ट्रायकोडर्मा’ घन व द्रवरूपात मुबलक प्रमाणात शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करण्यात आले असून त्याला लागणारे पैसेही फार कमी आहेत. शेतकर्‍यांनी याचा वापर शेतीत केला तर त्याचे होणारे नुकसान टळेल. सोयाबीनचा पेरा गेल्या ३० वर्षांपासून मराठवाडा व विदर्भात वाढतो आहे. भुईमूग व सूर्यफूल या दोन तेलबियांचे उत्पादन एके काळी मोठया प्रमाणात घेतले जात होते मात्र या ना त्या कारणाने शेतकर्‍यांनी या दोन्ही तेलबियांना फाटा देत सोयाबीनचा पेरा वाढवला आहे. सोयाबीनमुळे जमिनीला अधिकचे नायट्रोजन मिळते. केवळ पोटॅश, फॉस्पेट जमिनीला देण्याची गरज असते.
     
    *   शेणखताचा वापर पूर्वी मोठया प्रमाणात होत होता. आता पशुधनाची संख्या कमी झाल्याने शेणखत उपलब्ध होत नाही मात्र अल्पप्रमाणात का होईना शेतकर्‍यांनी सेंद्रिय खताचा वापर करण्याची गरज आहे. सोयाबीनच्या अनेक जाती आता विकसित झाल्या आहेत. दरवर्षी विविध जातीच्या बियाणांचा प्रयोग करत राहायला हवा. वर्षांनुवर्षे बाजारातून बियाणे खरेदी करण्याची सवय लागलेल्या शेतकर्‍यांना गतवर्षी दुबार, तिबार पेरणीचा फटका बसला. कंपन्यांचे बियाणे खरेदी करूनही उगवणक्षमता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. या वर्षी उन्हाळी हंगामात खरिपासाठी लागणारे बी तयार करण्यासाठी सोयाबीनचा पेरा करावा, अशी भूमिका घेत कृषी विभागाच्या वतीने राज्यभर प्रयोग करण्यात आले व त्याला प्रतिसाद मिळाला. घरचे बियाणे वापरा ही मोहीम राबवण्यात आली. या वर्षी आणखीन पूर्ण पेरणी झालेली नसली, तरी ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्यांना उगवणक्षमतेची अडचण आलेली नाही. आता शेतकरी सजग होतो आहे.
     
    *   सोयाबीनमध्ये केवळ १७ टक्के तेलाचे प्रमाण आहे. सर्वात कमी तेल सोयाबीनमध्ये असते. मात्र सोयाबीनचा वापर तेल काढण्यासाठी व त्याची पेंड काढून विकण्यासाठीच केला जातो. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रोटिनचे प्रमाण आहे. कुपोषण दूर करण्यासाठी सोयाबीनचा वापर वाढवला तर आपल्या देशातील कुपोषणाचे प्रमाणही झपाटयाने कमी करता येईल. सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ३५ ते ३८ टक्के आहे. त्याला योग्य भाव देण्याची यंत्रणा विकसित झाली, तर सूर्यफुलाचा पेराही काही प्रमाणात वाढेल. सोयाबीन पिकालाही दरवर्षी तेच ते पीक घेतल्याने अनेक रोगाला तोंड द्यावे लागते आहे. पेरणीपासून ते काढणीपर्यंत पान खाणारी अळी, शेंगा खाणारी अळी, बुरशी अशा अनेक रोगांचा सामना करावा लागतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन केले गेले, दर दोनतीन वर्षांने खोल नांगरणी केली गेली, तर शेतकर्‍याना किडीचा धोका कमी करता येईल. उत्पादन वाढवणे व आर्थिक लाभ व्हावा यासाठी ज्या शेतकर्‍याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना वर्षांतून दोनदा सोयाबीनचे उत्पादन घेता येईल. या वर्षी उन्हाळी सोयाबीन ज्या शेतकर्‍यानी घेतले त्यांना मोठा लाभ झाला. पुढील वर्षांपासून हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढेल.
     
    *   बी तयार करण्यासाठी केवळ महाबीज या शासकीय कंपनीवर अवलंबून न राहता शेतकरी गट मोठया प्रमाणावर आहेत, त्यांना बीजोत्पादनाची मोहीम राबवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. सोयाबीनच्या अत्याधुनिक जाती विकसित होत आहेत. विदेशातून येणार्‍या नव्या जातींवर आपल्याकडे विविध स्तरावर संशोधन होत आहे. या संशोधनाचा लाभ घेत सोयाबीनचा पेरा करायला हवा. सोयाबीनच्या काढणीसाठी होणारा खर्च टाळावा यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने ‘१६२’ ही जात विकसित केली आहे. ती उंच वाढते व यंत्राच्या साहाय्याने त्याची कापणी करता येते. महाराष्ट्र सरकार व भारत सरकार हे दोन्हीही सोयाबीनच्या विविध जातीच्या संशोधनावर लक्ष ठेवून असून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले पाहिजे. त्यांना फटका बसू नये यासाठी नवीन संशोधित वाण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयोग केले जातात. ‘७२६’ हे सोयाबीनचे वाण अतिशय उत्तम असले तरी त्याच्या काढणीचा कालावधी ११५ दिवस आहे. मराठवाडयात मान्सून लवकर परततो त्यामुळे शंभर दिवसांत निघणारेच सोयाबीन पेरणे शेतकर्‍याला लाभदायक आहे. त्यात ‘७३१’, ‘७२५’ असे वाण विद्यापीठाने विकसित केले आहेत व त्याचा लाभही शेतकरी घेत आहेत.
     
    *   वर्षांनुवर्षे तुरीचे पीक जमिनीत घेतल्याने विविध रोग उद्भवतात. प्रामुख्याने मर रोगाचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागतो आहे. याचे कायमचे उच्चाटन करणे अवघड नाही मात्र त्यासाठी सलग तीन वर्षे पेरणीपासून ते पिकाची वाढ होईपर्यंत शेतकर्‍यांना बीजप्रक्रिया व पेरणीनंतर दोन महिन्यांनी ट्रायकोडर्माचा डोस देणे आवश्यक आहे. जे शेतकरी हा प्रयोग करतील त्यांना निश्रि्चतच लाभ होईल.
     
    *   सोयाबीन पिकापासून शेतकर्‍याला चांगले उत्पादन मिळते आहे. सोयाबीनला पर्याय असणारे पीक अद्याप उपलब्ध नाही. असले तरी त्याला सोयाबीनसारखे पैसे मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतो आहे. शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादनात होणारी घट टाळण्यासाठी जागरूक राहायला हवे. बियाणांची निवड, पेरणी करताना बीजप्रक्रिया व पेरणीनंतर काढणीपर्यंत प्रत्येक वेळी योग्य अभ्यास करून त्यानुसार फवारण्या केल्या, माती परीक्षण करून खत दिले तर उत्पादनातील घट टाळता येऊ शकते. गरज आहे ती अभ्यासपूर्ण शेती करण्याची.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    ६ जुलै  २०२१ / प्रदीप नणंदकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 23