काळाची अनोळखी पोकळी

  •  काळाची अनोळखी पोकळी

    काळाची अनोळखी पोकळी

    • 14 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 14 Views
    • 0 Shares
     काळाची अनोळखी पोकळी
     
    *   महाराष्ट्राचा आणि म्यानमारचा (एकेकाळचा ब्रह्मदेश काही जण बर्मा असेही म्हणतात) ऐतिहासिक संबंध आहे. तिथला राजा थिबा मिन हा महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये अनेक वर्षे ब्रिटिशांच्या नजरकैदेत होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्यानमारमधील मंडाले इथं कैदेत होते. ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात ठेवले होते. ब्रह्मदेशचा संपूर्ण किनारपट्टीचा भाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असताना काही भाग मात्र सार्वभौम होता. तेथील थिबा राजा विस्तीर्ण अशा ग्लास पॅलेसमध्ये मंडाले येथे राहत होता.
     
    *   मात्र १८८५ मध्ये ब्रिटिशांनी त्याचा पराभव करून त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबासह त्याला भारतात काही दिवस मद्रासमध्ये ठेवण्यात आले. काही काळानंतर त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले. तेथे घरातच त्याला स्थानबद्ध केलेले होते. त्याच्यासाठी तेव्हा ३० खोल्यांचा बंगला बांधलेला होता. आजही ती वास्तू थिबा पॅलेस म्हणून ओळखली जाते. थिबा राजाचे १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय म्यानमारला परत गेले. लोकमान्यांनी मंडाले येथे सजा भोगली. या कैदेच्या कालखंडात त्यांनी ‘गीतारहस्य’ हा महान ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेतील कर्मयोगाचे तत्त्व त्यांनी या ग्रंथात विशद केले आहे. तत्कालिन तरुण रूढी आणि धर्माच्या पगड्याखाली परदेशी सत्ता राहणारच म्हणून उदासीन झाले होते त्यांच्यावर कोरडे ओढून टिळकांनी कर्मयोगाचे महत्त्व पटवून दिले. लोकमान्यांना शिक्षा सुनावल्यावर त्या न्यायमूर्तींना लोकमान्य जे म्हणाले ते आजही लक्षात राहावे असे आहे. ते म्हणाले या जगाचे नियंत्रण करणारी नियती नावाची जी एक शक्ती आहे तिला असे वाटत असेल की माझ्या लेखणीपेक्षा आणि वाणीपेक्षा माझे हाल आणि कष्टच मी ज्यांच्यासाठी लढत आहे त्यांना ते प्रेरणा देतील.
     
    *   पुण्यातील टिळकांच्या वाड्याला मी जेव्हा भेट दिली तेथील त्यांच्या वस्तू बघितल्या तेव्हा मला खूप मोठी प्रेरणा मिळाली. त्यातूनच मी ए मॉडर्न इंटरप्रिटेशन ऑफ लोकमान्य तिलकस् गीतारहस्यहे पुस्तक लिहिले. २०१७ मध्ये ‘सकाळप्रकाशनाच्या वतीने ते प्रसिद्ध झाले. माझ्या पुस्तकांपेकी ते माझे आवडते पुस्तक आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या समारंभात लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक यांची आणि माझी भेट झाली. त्यांनी मला प्रेमानं आलिंगन दिले. या आलिंगनात काळाचा खूप मोठा अवकाश बंदिस्त झाला असे मला वाटते.
     
    *   कोरोना महासाथीच्या काळात हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे कोरोनामुळे आपले आयुष्य पूर्ण बदलून गेले आहे. अनेक अज्ञात गोष्टी आणि विचित्र असे काही योगायोग जुळून येत आहेत. थिबा राजा जसा असहाय्य होता तसे कोरोना महासाथीमुळे अनेक जण हतबल आणि हताश झाले आहेत. कोरोना महामारीमुळे मानवी जीवन अत्यंत दुःखदायक झाले आहे त्याचबरोबर असंघटित कामगारांच्या आयुष्याची मोठी शोकांतिका झाली आहे, की त्याबद्दल ते बोलूही शकत नाहीत. महामारी चालू असतानाच पूर आणि पावसामुळे अनेक ठिकाणी लोक बेघर झाले. त्यांना त्यांचे राहते घर सोडावे लागले. सध्याचे जग म्हणजे एक उपचार ठरत आहे. या सगळ्यावर एक क्रूर विनोद ठरेल अशी गोष्ट म्हणजे सरकारकडून मदतीसाठी जाहीर केली जाणारी विविध स्वरूपाची पॅकेजस्. एखादी आपत्ती आली, की विविध राज्य सरकारे केंद्राकडे अब्जावधी रुपयांची मदत मागतात आणि केंद्र काही लाखांमध्ये ही मदत देत असते. खर्‍या अर्थाने जो बेघर झाला आहे किंवा आपत्तीचा ज्याला फटका बसला आहे त्याच्यापर्यंत ही मदत पोचते की नाही याबद्दल शंकाच आहे. पुरासारख्या आपत्ती नियंत्रित करण्यासाठी अशा स्वरूपाचे पॅकेज हे कधीच उपयुक्त ठरू शकणार नाहीत. पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणून आपण जर शेतीला उत्तेजन दिले आणि त्यात प्रगती केली तर अन्नाची आपली समस्या संपुष्टात येऊ शकेल.
     
    *   थिबा राजाचा उल्लेख वर आलाच आहे. राजेरजवाड्यांचा काळ आता संपला असे कोणाला वाटेल; पण असे अजिबात झालेले नाही. या नव्या जगात नव्या पद्धतीचे राजे तयार झाले आहेत. नुकतेच मी मी वेब यांचे ‘द बिग नाईनहे पुस्तक वाचले. यामध्ये ऍमेझॉन, गुगल, फेसबुक, अलिबाबा यांसारख्या जगातील महाकाय कंपन्यांचे काम कसे चालते व या कंपन्या जगभरातील अब्जावधी लोकांना कसे नियंत्रित करतात त्याबद्दल लिहिले आहे. लोकमान्यांनी सांगितलेल्या स्वराज्यासाठी आपण काय करू शकतो हा आजचा खरा प्रश्न आहे. कार्पोरेट जगतातील या अशा मोठ्या कंपन्या संपूर्ण व्यवस्थाच नियंत्रित करत आहेत. मानवता किंवा मानवासाठी काही प्रेरणादायी काम यापेक्षा स्वतःचा फायदा आणि आपली संपत्ती कशी वाढेल यासाठीच या कंपन्या काम करत आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक मात्र हतबल होत आहेत. श्रीमंत आणि अगदी अतिश्रीमंत लोकदेखील सध्याच्या काळात आपल्या जीवनावरचे आणि व्यवसायावरचे नियंत्रण वेगाने गमावत आहेत. ज्या पालकांना त्यांच्या मुलांनी सोडून दिले आहे त्यांचीही अवस्था थिबा राजापेक्षा वेगळी नाही. तेही असेच सत्ताहीन आणि हतबल असे झाले आहेत.
     
    *   बायबलमध्ये शॉलोमन नावाच्या राजाने एकदा असे उद्गार काढले होते, की ‘ सूर्याच्या अधिपत्याखाली या जगात नवे असे काहीही नाही. आता जे काही होईल, ते पुन्हा-पुन्हा होईल.’ ही काही जीवनशैलीविषयीची तक्रार नव्हती, तर मानवी आयुष्यातील एक कठोर सत्य होते. मानवी आयुष्य आणि मानव स्वतःसाठी कितीही योजना आखत असला, तरी निसर्ग आपले चक्र बनवत असतो. निसर्गाचा प्रवास एक वर्तुळ पूर्ण करत असतो. कोरोना महामारीच्या काळात जिवंत राहताना एक मोठी पोकळी आपल्यासमोर दिसत आहे. या अज्ञात पोकळीचा विचार करताना किंवा कृत्रिमपणे झोप घेताना आपण मानवी आयुष्य आणि मानवता याला विसरून चालणार नाही. कोरोना महासाथीमुळे निसर्गचक्रातील अज्ञात पोकळीचा आणि एका अज्ञात अशा वर्तुळाचा आपण सामना करीत आहोत.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    ४ जुलै २०२१ / अरुण तिवारी

Share this story

Total Shares : 0 Total Views : 14