सुसंवादाशिवाय ‘थिएटर’ अशक्य

  •  सुसंवादाशिवाय ‘थिएटर’ अशक्य

    सुसंवादाशिवाय ‘थिएटर’ अशक्य

    • 12 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 13 Views
    • 0 Shares
     सुसंवादाशिवाय ‘थिएटर’ अशक्य
     
    *   भारताच्या तिन्ही सेनादलांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या विभागांची फेररचना करून त्यांचे रुपांतर तिन्ही सेनादलांच्या एकात्मिक किंवा समन्वित अशा विभागांमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन सेनादलांचे आपापले स्वतंत्र विभाग आहेत. त्यांची एकूण संख्या सतरा आहे. आता ते वेगवेगळे न ठेवता तिन्ही सेनादलांचे मिळून एकात्मिक असे विभाग स्थापन करायचे अशी ही ढोबळमानाने संकल्पना आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास अंदमानमध्ये देशाने आपला पहिला तिन्ही सेनादलांचा एकत्रित (ट्रायसर्व्हिसेस) तळ उभारला आहे. म्हणजेच शत्रूचा मुकाबला करताना या तिन्ही सेनादलांची एकत्रित उपलब्धता तसेच मुकाबला करण्यामध्ये अधिक सुसूत्रता व नेमकेपणा आणण्याचे यामागे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येते.
     
    *   याला सेनादलांचे ‘थिएटरायझेशन’ म्हणतात. तिन्ही विभागांचा मिळून एक तळ म्हणजे एक ‘थिएटर’ असे या संकल्पनेचे स्थूल स्वरूप आहे. अमेरिकेत याच धर्तीवर सेनादलांची रचना आहे. चीनमध्येही हीच प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतानेही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद निर्माण केले आहे. तेथे निवृत्त लष्करप्रमुख बिपिन रावत यांची नेमणूकही केली. त्यांच्याच देखरेखीखाली ही थिएटर्स स्थापण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया २०२२ किंवा उशीरा म्हणजे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये ढोबळमानाने पूर्व, पश्रि्चम, दक्षिण आणि उत्तर अशा चार विभागात त्यांची विभागणी असेल. या प्रक्रियेच्या प्रारंभीच रावत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काहीसा वाद निर्माण झाला आहे. त्याची प्रतिक्रियाही सेनादलांच्या आजी-माजी वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये उमटली
     
    *   भारतात सेनादले, त्यांचे अंतर्गत व्यवहार, संरक्षण विभाग यांचे स्वरूप पवित्र गायीसारखे करण्यात आले आहे. म्हणजे तेथे काही गोष्टी घडत असतील, त्या गैर असतील तर त्याबद्दल जाहीर चर्चा झाली तर भारतासारख्या लोकशाही देशात काही वावगे मानण्याचे कारण नसावे. परंतु राज्यकर्त्यांना अशा गोष्टी दबलेल्याच आवडतात. मग माध्यमांनी काही लिखाण केले की त्यांच्याविरुद्ध गदारोळ करण्याचा पायंडाच पडला आहे. रावत यांनी सेनादलांच्या कार्यात हवाई दलाची भूमिका साहाय्यकाची असल्याचे विधान नुकतेच केले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर हवाई दलाची भूमिका ही सेनादलांना ‘सपोर्टिंग आर्म’ म्हणजे ‘आधारासाठी हात देणे’ अशी असते. रावत एका अध्ययन संस्थेच्या परिसंवादात बोलत होते. त्यात हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हेही सहभागी होते. त्यांनी रावत यांचे मत खोडून काढले. युद्धाच्या एकात्मिक स्वरूपात हवाईदलाची भूमिका मोठी असते, असे सांगितले. गैरसमज टाळण्यासाठी त्यांनी हवाईदल थिएटरीकरण संकल्पनेस कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले. सेनादलांच्या अतिवरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये अशी जुगलबंदी होणे कितपत उचित आहे, याचा विचार त्यांनीच केलेला बरा!
     
        हवाई दलाची कामगिरी -
     
    *   एका प्रसंगाची आठवण होते. कारगिल संघर्षाच्या समाप्तीनंतर तत्कालीन वाजपेयी सरकारने त्या मोहिमेच्या ‘ऑपरेशन विजय’ या शीर्षकाने भारतीय सैनिकांच्या विजयगाथेवर आधारित सीडी प्रकाशित करण्याचे ठरविले. ती शाळा-कॉलेजांमध्ये दाखविण्याच्या योजना आखल्या. सीडी अर्थातच लष्करातर्फे तयार करण्यात आली. २६ जानेवारीला तिचे प्रकाशन करण्याचे ठरविले होते. त्याच्या दोन आठवडे आधी सीडीच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. साऊथ ब्लॉकमधील छोटेखानी खोलीतच प्रोजेक्टरवर ही सीडी पत्रकारांना दाखविली. हा दिवस सुटीचा असल्याने तीन किंवा चार पत्रकार उपस्थित होते. त्या वेळी तत्कालीन सेनाप्रमुख व नौदलप्रमुखही उपस्थित होते. सीडीमध्ये सेनेच्या पराक्रमाचा तपशिलाने उल्लेख होता, परंतु हवाई दलाच्या कामगिरीचा उल्लेख नव्हता.
     
    *   सेनाप्रमुखांना त्याबद्दल विचारणा केल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यांनी तत्काळ सीडी तयार करणार्‍यांना बोलाविले. त्यांनी तत्काळ त्यात सुधारणा करून हवाईदलाचा भागही समाविष्ट करेपर्यंत ही सीडी प्रकाशित होणार नाही असे बजावले. ही विचारणा करण्याचे धारिष्ट्य पत्रकारांनी अशासाठी दाखविले की, कारगिल संघर्षातील पहिल्या टप्प्यात केवळ हवाईदलानेच अतिशय उंचावरील भारतीय ठाणे बळकावलेल्या पाकिस्तानी घुसखोरांवर हल्ले केले होते. तशा पद्धतीने त्यांच्या जागा शोधणे आणि शक्यतोवर ती नष्ट करणे हा प्राथमिक टप्पा हवाईदलानेच पार पाडला होता. कारण लष्कराच्या तुकड्यांना तेथे पोहोचण्यास वेळ लागणार होता. घुसखोरांना प्रारंभिक दणका देणे, त्यांची रसद तोडणे हे प्रकार पहिल्या टप्प्यात पार पाडल्यानंतर लष्कराने ती ठाणी कबज्यात घेतली.
     
    *   रावत यांनी हवाईदलाच्या भूमिकेबाबत केलेल्या निवेदनामुळे ही आठवण येणे स्वाभाविक होते. तिन्ही सेनादलांमध्ये समन्वय आणि सहकार्य आवश्यक असते. परंतु त्यासाठी नेतृत्व करणार्‍यांनी म्हणजेच वरिष्ठ सेनाधिकार्‍यांमध्ये समन्वय आणि एकवाक्यताही आवश्यक असते. ज्या वेळी ही थिएटर उभारण्याची संकल्पना चर्चेत आली, त्या वेळी सुरुवातीला लष्कराला केंद्रस्थानी ठेवूनच त्यांची निर्मिती करण्यावर विचार झाला होता. तसेच चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन एक पूर्णपणे चीनकेंद्रित थिएटर उभारण्यावरही विचार करण्यात आला. परंतु ताज्या माहितीनुसार सेनादलाचा उत्तर विभाग आहे तसाच कायम ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. पश्रि्चम थिएटर हे प्रामुख्याने पाकिस्तान केंद्रित असेल. पाकिस्तानला हाताळण्याच्या दृष्टीने त्याची रचना असेल. पूर्व थिएटरमध्ये पूर्व, ईशान्य भारत व त्याच्या सीमाभागाचा समावेश असेल. याखेरीज दक्षिण भारताचा जो द्वीपकल्पीय भाग आहे; जेथे एका बाजुला अरबी समुद्र, दुसरीकडे हिंद महासागर आणि तिसरीकडे बंगालचा उपसागर आहे.
     
    *   या भागासाठी दक्षिण थिएटर उभारण्यात येईल. विविध थिएटर्स उभारण्याच्या या संकल्पनेत ‘एअर डिफेन्स कमांड’, ‘मॅरिटाइम कमांड’ उभारणे आहे. सोप्या भाषेत हवाईदल आणि नौदलाची देखील स्वतंत्र मुख्यालये उभारायची. सध्या उपलब्ध माहितीप्रमाणे हवाईदल कमांडसाठी नागपूर, तर नौदलासाठी कारवारचा विचार सुरू आहे. थिएटर व्यवस्थेमध्ये तिन्ही सेनादलांनी आपापल्या साधनसंपत्तीची देवाणघेवाण करणे अपेक्षित आहे. ती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाणार काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कारण कोणतेही दल आपल्या साधनसंपत्तीचे अधिकार सहजासहजी अन्य दलाकडे सोपविण्यास तयार होणे अवघड आहे. याबाबत समन्वयाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या सर्व हालचालींचा अर्थ एवढाच आहे की ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. उच्चस्तरीय अधिकार्‍यांनी वादग्रस्त विधानांनी ती अधिक जटिल करू नये. संरक्षण हे संवेदनशील क्षेत्र असते, त्याची जाणीव ठेवली तरी पुरेसे!
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
    ५ जुलै २०२१ / अनंत बागाईतकर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 13