सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकट

  • सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकट

    सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकट

    • 10 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 35 Views
    • 0 Shares
     सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकट
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आरोग्यया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकटव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.४ आरोग्य -
        जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) - उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम.
       भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम. भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा. भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी. भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या (कुपोषण, माता मर्त्यता दर, इ.).  जननी-बाल सुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय)

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंकट
     
    *   १९ व्या शतकात औद्योगिक क्रांतीचा दुसरा टप्पा सुरू झाला होता व या क्रांतीचे तंत्रज्ञान विज्ञानाच्या भक्कम आधारावर उभे होते. जीवनाच्या सगळ्या शाखांत विज्ञानाचा हळूहळू शिरकाव होत होता. सार्वजनिक आरोग्य हे त्याला अपवाद नव्हते. वैयक्तिक आरोग्य सुधारायचे असेल तर सार्वजनिक आरोग्य चांगले असले पाहिजे, याची जाणीव झाली होती. सार्वजनिक आरोग्य ही एक कला आणि विज्ञान आहे, असा विज्ञानवंतांचा विचार होता. रोगांचा प्रतिबंध आणि माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विकास हे दोन्ही सार्वजनिक आरोग्याचे महत्त्वाचे उद्देश ठरले. आरोग्यरक्षणार्थ घ्यायची खबरदारी, सार्वजनिक स्वच्छता आणि संसर्गाने होणार्‍या रोगांचा प्रतिबंध हे या उद्देशपूर्तीचे घटक आहेत, याची या वैद्यकीय विज्ञानशाखेने समाजाला जाणीव करून दिली. पण जाणीव करून वैद्यकीय विज्ञान थांबत नाही. त्या दिशेने संशोधन व विज्ञानविवेकाचा प्रसार सुरू होतो.
     
    *   ’इंटरनॅशनल जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ या जगन्मान्य विज्ञानपत्रिकेला २०२०च्या शेवटास १०० वर्षे पूर्ण झाली. ’स्विस स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेतर्फे ही विज्ञानपत्रिका प्रकाशित होते. स्वित्झर्लंड येथील बर्न या शहरात ’सोशल अँड प्रिवेण्टिव्ह मेडिसीन युनिव्हर्सिटी ऑफ बर्न’ यांचा या विज्ञानपत्रिकेशी संबंध आहे. भारतासारख्या अल्पउत्पन्न देशातील सार्वजनिक आरोग्यावरील संशोधननिबंध प्रकाशित करण्यास प्राधान्य देणे हे या १०० वर्षीय आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेचे वैशिष्ट्य आहे. भारत जरी उष्णकटिबंधीय देश असला तरी जगप्रसिद्ध ’स्विस ट्रॉपिकल पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट’ स्वित्झर्लंडमध्ये आहे. या संस्थेचासुद्धा या विज्ञानपत्रिकेशी संबंध आहे. १८ देशातील ४९ संपादक या विज्ञानपत्रिकेच्या संपादकीय मंडळावर आहेत. यातील ४१ टक्के संपादक महिला आहेत. जानेवारी २०२१ पासून ही विज्ञानपत्रिका ’ओपन अ‍ॅक्सेस’ करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यातील शोधनिबंध कोणालाही वाचता यावेत, हा या मागचा उद्देश आहे. नवीन ज्ञानाचा प्रसार हेच विज्ञानपत्रिकांचे ध्येय असते. मानवी वर्तन चांगल्या दिशेने बदलण्याचा हा एक मार्ग आहे. या करोना संकटकाळात सार्वजनिक आरोग्य या विज्ञानशाखेत काय नवीन ज्ञान तयार होत आहे ते पाहू.
     
        सांडपाणी आणि कोविड-१९ -
     
    *   सांडपाणी म्हणजे शहरभरचा मैला वाहून नेणारे पाणी. ते प्रक्रिया केंद्रात जाते. तेथे प्रक्रिया होऊन ते समुद्रात सोडले जाते. हे सांडपाणी हा सार्वजनिक आरोग्याबद्दलच्या माहितीचा खजिना असतो. यातून समाजाच्या आरोग्याबाबतच्या मिळणार्‍या सूक्ष्म आणि सखोल माहितीच्या शक्यता अनेक आहेत. गेली ४० वर्षे विविध देशांत सांडपाण्यावर संशोधन चालू आहे. संशोधक सांडपाण्याचे परीक्षण करून पोलिओ, इन्फ्लुएन्झा, गोवर, काविळ-हेपॅटायटीस यांचे विषाणू शोधून समाजात या रोगांचे प्रमाण कितपत आहे याचा अंदाज बांधतात. हे प्रमाण वाढते असेल तर समाजात या आजारांची लक्षणे दिसू लागण्याआधीच धोक्याच्या सूचना मिळू शकतात. करोनासंकटामुळे सांडपाण्यातून करोनाचा विषाणू शोधून काढणार्‍या प्रकल्पाला गती आली. सांडपाण्यात करोना विषाणू शोधून कोविड-१९वर लक्ष ठेवणार्‍या करणार्‍या प्रकल्पाचे नाव आहे ’कोविडपूप्स-१९’. जगातील ५४ देशांत हा प्रकल्प चालू आहे. या देशांतील दोन हजार २०० मॉनिटरिग साइट्सच्या डॅशबोर्डावर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक डोळ्यांत तेल घालून नजर ठेवत आहेत. दक्षिण आफ्रिकेने हा प्रकल्प चांगल्या तर्‍हेने राबवला. याची दखल ’नेचर’ या जगन्मान्य विज्ञानपत्रिकेने घेतली आहे.
     
    *   सोमवार हा केपटाऊन या दक्षिण आफ्रिकेच्या शहरातील सांडपाण्याचे नमुने गोळा करण्याचा दिवस. एक महिलासंशोधक संरक्षित कपडे घालून शुद्धीकरण केंद्रात ५०० मिलिच्या बाटल्यांत अशुद्ध सांडपाणी गोळा करते. इथॅनॉलने बाटली बाहेरून साफ करून तो नमुना बर्फात ठेवते. हे नमुने दक्षिण आफ्रिकेच्या ’मेडिकल रिसर्च काऊन्सिल’च्या प्रयोगशाळेत नेले जातात. कोविड-१९च्या विषाणूंची ’क्वांटिटेव्ह आरटीपीसीआर’ ही चाचणी केली जाते. यावरून या विषाणूंचे प्रमाण किती आहे याची नोंद घेतली जाते. शहराच्या ज्या भागातून हे सांडपाणी आले आहे, त्यात करोनाचे विषाणू किती आहेत याचा अंदाज येतो. त्यावरून लक्षणे दिसू लागण्याआधी सात ते १४ दिवस त्या भागात कोविड-१९चा प्रादुर्भाव होणार आहे, असा अंदाज बांधता येतो. या सांडपाण्यात सापडलेल्या करोना विषाणूंचा जनुकीय आराखडा तयार केला जातो. त्यामुळे विषाणूंच्या जनुकांमध्ये कोणती उत्परिवर्तने झाली आहेत हे कळते. यावरून विषाणूचा हा प्रकार अधिक धोकादायक आहे का, याबाबत कयास बांधता येतो.
     
    *   एखाद्या लोकसमुहात विषाणूंचे प्रमाण किती हे शोधण्याचा सांडपाण्याच्या चाचण्या हा तसा सोपा मार्ग आहे. कारण यात समुहातील व्यक्तीला सहभागी करून घ्यावे लागत नाही. तसेच एका नमुन्यातून अनेक जिवाणू-विषाणूंचा शोध घेता येतो. म्हणून ही पद्धत खर्चफलदायी आहे. पण भारतासारख्या विकसनशील देशात सांडपाण्याचा निचरा करणार्‍या वाहिन्या, सांडपाण्याची शुद्धीकरण केंद्रे सर्व शहरांत नसतात. कित्येक गावातून, छोट्या शहरातून शुद्धीकरण न केलेले सांडपाणी नदी-नाल्यांत सोडले जाते. अशा ठिकाणी नदीच्या पाण्याच्या चाचण्या करता येतात. सांडपाण्याच्या चाचण्या हा सार्वजनिक आरोग्याचे मूल्यमापन करण्याचा, व त्यावर लक्ष ठेवण्याचा एक महत्त्वाचा वैज्ञानिक मार्ग विकसित होत आहे.
     
        सार्वजनिक स्वच्छता व बुरशीचे संक्रामण -
     
    *   म्युकरमायसेटिस या बुरशीपासून म्युकरमायकोसीस हा आजार करोना झालेल्या काही विशिष्ट रुग्णांना होतो. ज्या करोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती अशक्त झाली आहे अशांना हा रोग होतो. पण ही बुरशी येते कोठून हे पाहिले पाहिजे. मातीत, ओल्या कचर्‍यात, कुजणार्‍या सेंद्रीय कचर्‍यात, शेणात, प्राण्यांच्या पडलेल्या विष्ठेत, कुजत असलेल्या झाडांच्या पानात ही बुरशी वाढत असते. तिची बिजाणे वार्‍याने हवेत उडतात आणि सर्वदूर पसरतात. ही बिजाणे मानवी शरीरावर येऊन बसू शकतात. श्‍वासाबरोबर नाकात जाऊ शकतात. ज्यांची प्रतिक्षमता यंत्रणा कमकुवत झाली आहे, यांना म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता असते. आजूबाजूच्या परिसरात कचर्‍याचे ढीग, कुजणारा सेंद्रीय कचरावगैरे असेल तर अशा बुरशीची वाढ होऊन तिची बिजाणे वातावरणात पसरण्याचा धोका असतो. तेव्हा परिसर स्वच्छ ठेवून कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे असते. बुरशीची संक्रमणे कमी करण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. सार्वजनिक स्वच्छता ही वैयक्तिक स्वच्छतेइतकीच महत्त्वाची असते, कारण प्रत्येक माणसाचे शरीर हा या पर्यावरण व्यवस्थेचा भाग असतो हे विसरून चालणार नाही.
     
    सौजन्य व आभार :  महाराष्ट्र टाइम्स
    २८ जून २०२१ / डॉ. आनंद जोशी
     
    करोनाचे गूढ उकलेल ?
     
    *   करोना विषाणू चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतून बाहेर आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येते; पण त्यासाठी चीनकडून सहकार्याची अपेक्षा आहे. तशी शक्यता नसल्याने कदाचित या प्रश्‍नाचे खरे उत्तर जगाला कधीच मिळणार नाही.
     
    *   करोनाचा फैलाव सुरू होऊन दीड वर्ष झाल्यानंतर या विषाणूचा उगम कसा झाला, या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. सुरुवातीला हा विषाणू प्रयोगशाळेतून आल्याच्या किंवा हे जैविक अस्त्र असल्याच्या शंका व्यक्त झाल्या; पण काही नामवंत शास्त्रज्ञांनी ’नेचर’, ’लॅन्सेट’सारख्या प्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकांतून ते दावे खोडल्याने चर्चा वाढली नाही. आता दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पूर्वी गप्प बसलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी ही शक्यताही पडताळण्याची मागणी केली आहे. हा विषाणू प्रयोगशाळेतून आल्याचा प्रत्यक्ष पुरावा नसला, तरी त्याच्या उगमाविषयीचे प्रश्‍न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत.
     
    *   विषाणूच्या आगमनाविषयी सर्वप्रथम प्रश्‍न उपस्थित केला, तो अमेरिकी संशोधक अलिना शानने. मूळच्या सिंगापूरच्या आणि अमेरिकेतील ब्रॉड इन्स्टिट्यूटमधे काम करणार्‍या अलिनाने कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील शिंग झान या संगणकतज्ज्ञाची मदत घेऊन करोना वर्गातील विषाणूंच्या जिनोमचा अभ्यास केला. त्यात २००३ मधील साथीचे विषाणू, वुहानमधील जिवंत प्राण्यांच्या बाजारातील विक्रेते-कामगार आणि तेथील प्राणी या सर्वांतील विषाणूंच्या जिनोमचा क्रम होता. या अभ्यासातून त्यांना आढळलेले निष्कर्ष चक्रावणारे होते. २००३ मध्ये साथ पसरल्यानंतर हळूहळू विषाणूमध्ये माणसाच्या शरीरात वाढण्यासाठी पोषक बदल झाले. म्हणजेच, दुसर्‍या प्राण्यातून आलेला विषाणू हळूहळू माणसांच्या शरीराशी स्वत:ला अनुकूल करून घेत गेला. या उलट २०१९च्या साथीतील विषाणू सुरुवातीपासूनच माणसाच्या शरीरातच वाढण्यासाठी तयार झालेला असावा, असे दिसत होते. त्यामुळे त्याचा उगम कसा आणि कुठे झाला, हे प्रश्‍न उभे राहिले.
     
    *   आज रेण्वीय जीवशास्त्र इतके प्रगत आहे, की त्याआधारे प्रयोगशाळेत विषाणूमध्ये केलेले बदल व नैसर्गिक बदल यातील फरक शोधणे जवळपास अशक्य आहे. तरीही, करोनाबद्दल काही गोष्टी नजरेत खुपतात. माणसाच्या पेशीत शिरण्यासाठी करोनाचा विषाणू ’स्पाइक’ प्रथिनाचा वापर करतो. हे प्रथिन मानवी पेशींच्या पृष्ठभागावरील ’अ‍ॅसिटिल कोलिन रिसेप्टर’च्या दरवाजाचे कुलूप उघडण्यासाठी किल्ली म्हणून वापरले जाते. किल्ली फिट बसली, की कुलूप उघडते आणि विषाणू पेशींच्या आत जातो; पण हे सोपे नाही. ’स्पाइक’ प्रथिन अजस्र आहे आणि कुलपात फिट झाले, की त्याचे तुकडे व्हावे लागतात. त्यासाठी माणसाच्या शरीरातली एन्झाइम कात्रीसारखी वापरली जातात. इतर विषाणूंमधील त्या कात्र्या इतक्या अचूक नसतात, त्यामुळे विषाणूंच्या पेशीप्रवेशाचे प्रमाण नगण्य असते. करोना विषाणूत हे काम ’फुरीन’ नावाचे एन्झाइम करते. ते ’स्पाइक’मधाल अमिनो आम्लांचा विशिष्ट क्रम ओळखून त्या जागी प्रथिन कापते. करोनाशी हुबेहूब जुळणारा ज्ञात विषाणू म्हणजे वटवाघळामधे सापडलेला ’आरएटटीजी-१३’ हा विषाणू. हा विषाणू आणि करोना या दोन्हींमधील ’स्पाइक’ प्रथिनाचा क्रम तंतोतंत सारखा आहे; फक्त एक फरक आहे. करोनामधील अमिनो आम्लाचा ’पीआरआरए’ हा क्रम वटवाघळातील विषाणूत नाही; मग तो आला कोठून?
     
    *   हा क्रम ’२२९ई’, ’एनएल ६३’, ’एचकेयू१’, ’ओसी ४३’ या विषाणूंमधे दिसतो. हे विषाणू माणसात सौम्य स्वरूपाची सर्दी, घसादुखी अशा आजारांना कारणीभूत ठरतात. या विषाणूंतून करोनामध्ये हा क्रम कसा आला? अनेकांच्या मते हे नैसर्गिकरीत्या होणे अशक्य. प्रयोगशाळेत वटवाघळातील विषाणूत हा क्रम मुद्दाम घातला गेला असावा, असा संशय शास्त्रज्ञांना आहे. तंत्रज्ञानाने असे बदल बेमालूमपणे करणे सहजशक्य आहे. याशिवाय, ’आरएटटीजी-१३’चा उगमही संशयाच्या भोवर्‍यात आहे. तो मोजिआंग खाणीतील वटवाघळात सापडला असावा आणि एप्रिल २०१२मध्ये कामगारांना झालेल्या न्यूमोनियासदृश आजाराचे कारण होता, असा संशय पुण्यातील बहुलकर दांपत्याने संशोधनात (मटा संवाद १३ जून) व्यक्त केला आहे. त्यावरून वटवाघळातील विषाणूवर संशोधन करून त्यात ’फुरीन’ एन्झाइम जास्त कार्यक्षमतेने कापेल, असा ’पीआरआरए’ क्रम प्रयोगशाळेत हेतुपुरस्सर समाविष्ट केला गेला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
     
    *   निसर्गात सापडणार्‍या विषाणूंमधे बदल घडवून त्यांचे गुणधर्म तपासण्याचे संशोधन कित्येक वर्षे सुरू आहे. अशा संशोधनात नैसर्गिक विषाणूची घातकता वाढण्याची शक्यता असलेले बदल केले जातात. अमेरिकेत अशा संशोधनावर बंदी होती; पण ’वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये असे संशोधन सुरू होते. त्याला अमेरिकेतूनच अप्रत्यक्ष अर्थपुरवठा होतो, असेही बोलले जाते. अशा अतिघातक विषाणूंवर संशोधन करताना ते चुकीने बाहेर सुटून रोग पसरू नये, म्हणून ते काटेकोर सुरक्षा असलेल्या ’बीएसएल-४’ या वर्गवारीतील प्रयोगशाळात केले जावे, असे बंधन आहे; पण वुहानमधील प्रयोगशाळेत खूपच कमी सुरक्षा असलेल्या ’बीएसएल-२’ दर्जाच्या प्रयोगशाळेत ते सुरू होते, असाही आरोप आहे. करोनाच्या महासाथीपूर्वी तेथील काही कर्मचार्‍यांना करोनासदृश आजार झाल्याचेही बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रयोगशाळेत संशोधनात तयार झालेला हा विषाणू अपुर्‍या सुरक्षेमुळे बाहेर पडून साथीचा उगम झाला असावा, असे वाटणार्‍या शास्त्रज्ञांचा एक गट आहे आणि त्याची संख्या वाढत आहे. या आरोपांचा त्या प्रयोगशाळेचे प्रमुख विषाणूतज्ज्ञ शी झेंगली यांनी इन्कार केला आहे.
     
    *   वुहानमधील प्रयोगशाळेतून करोना बाहेर पसरला नसल्यास हा विषाणू नैसर्गिकरीत्याच तयार होऊन पसरला, ही दुसरी शक्यता राहते. हा विषाणू वटवाघळातून थेट माणसांत किंवा वटवाघळातून अन्य प्राण्यांद्वारे माणसांत संक्रमित झाला, अशा शक्यता आहेत. पहिल्या शक्यतेतील अडचण म्हणजे विषाणू वटवाघळातून माणसात येण्यासाठी त्यांचा माणसाशी संबंध आला पाहिजे. ती शक्यता फारच कमी आहे. वटवाघळातील विषाणू थेट माणसांत येण्यासाठी मानवी पेशींमध्ये शिरण्यासाठी त्याच्या ’स्पाइक’ प्रथिनात व्हावे लागणारे आवश्यक बदल नैसर्गिकरीत्या होत नाहीत. असे बदल झाले, तरी त्या विषाणूंचा माणसाशी संपर्क झाल्याशिवाय त्यांचा उपयोग नसतो. त्यामुळे ते तसेच राहतात आणि नंतर नाहीसे होतात. याच काळात त्यांचा माणसाशी संपर्क झाल्यासच ते माणसात पसरू शकतात. म्हणजे वटवाघळांच्या वस्तीस्थानी माणूस जाऊन त्याला संसर्ग झाला असावा, किंवा विषाणू परत माणसात जाऊन हा आजार पसरविला पाहिजे, असे होण्याची शक्यता खूपच कमी. तरीही करोनाच्या बाबतीत वटवाघळात या विषाणूच्या जवळपास असणारा विषाणू अद्याप सापडलेला नाही. दुसरी शक्यता म्हणजे, हा विषाणू वटवाघळातून दुसर्‍या एखाद्या, ज्याचा माणसाच्या अधिक संपर्क येतो, अशा प्राण्यात आधी गेला आणि मग त्या प्राण्यातून माणसात गेला. या आधी ’सार्स’ आणि ’मर्स’ अशा तर्‍हेने माणसात संक्रमित झाल्याचे सिद्ध झाले आहे. करोनाबाबत असा प्राणी अजून तरी सापडलेला नाही.
     
    *   या संदर्भात तत्कालिन सोव्हिएत महासंघामध्ये १९७९ साली घडलेल्या घटनेची आठवण होते. त्या वेळी स्वेर्डलोव्हस्क या शहरात ’अँथ्रेक्स’ या ’बॅसिलस एंथ्रेसिस’ या जीवाणूचा अचानक संसर्ग झाल्याने अनेक लोक मृत्युमुखी पडले. या लोकांनी विनापरवाना बाजारातील मांस खाल्ल्याने त्यांना संसर्ग झाल्याचे सरकारने सांगितले. जगाला यात काहीतरी काळेबेरे वाटत होते. रशियाचा पोलादी पडदा नव्वदच्या दशकात उघडल्यानंतर तेथे जाऊन केलेल्या संशोधनातून असे आढळले, की त्या गावातील कारखान्यात जैविक युद्धासाठी ’बॅसिलस एंथ्रेसिस’ वाढवला गेला आणि त्या रात्री अपघाताने कारखान्यातून जीवाणूचे अंश बाहेर सोडले गेले होते. चीनच्या बाबतीत अशी शक्यता नसल्याने कदाचित या प्रश्‍नाचे खरे उत्तर जगाला कधीच मिळणार नाही.
     
    सौजन्य व आभार : महाराष्ट्र टाइम्स
    २९ जून २०२१ / योगेश शौचे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 35