परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका

  • परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका

    परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका

    • 10 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 67 Views
    • 0 Shares
     परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका
     
       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात शिक्षणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटकाव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.२ शिक्षण :
        भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण) शिक्षण प्रणाली (शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जा वाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी)समस्या आणि प्रश्‍न, मुलीकरिता शिक्षण, सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका
     
    *   यापुढे पालकांनी परीक्षाकेंद्री विचार करणं सोडून, पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा विचार करणं आवश्यक आहे. आपलं मूल भविष्यात कसंही पडलं, तरी मांजरासारखं चार पायांवर उभं राहिलं पाहिजे, ही प्रत्येक पालकाची मनोवृत्ती हवी. करोना काळाचा हाही एक धडा आहे...
     
    *  परीक्षाकेंद्री अभ्यासापासून विद्यार्थ्यांची सुटका करा, हा शिक्षणतज्ज्ञांचा आग्रहच. परिस्थिती मात्र ’कळतं; पण वळत नाही’ अशी. परीक्षाकेंद्री विचारातून बाहेर पडावं म्हटलं, तर अवस्था अभिमन्यूसारखी. जसजसं परीक्षेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जात होता, तसतसं परीक्षेमध्ये गुरफटणं वाढलं. गेल्या वर्षी शाळा बंद, तरी शिक्षण चालू राहिलं. ऑनलाइन पर्याय आले; पण उद्देश परीक्षाच. मधल्या काळात शाळा भरल्या, त्यावेळीही अभ्यासाची प्रेरणा परीक्षाच. अभ्यासबरोबर परीक्षा हेच समीकरण; पण बाजी पलटली. करोनाची दुसरी लाट आली, तिसर्‍या लाटेचा मुलांना असणारा धोका हा चिंतेचा विषय ठरला आणि परीक्षा हळूहळू शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रापासून दूर सरकू लागली. परीक्षा रद्द तरी होईल वा त्यावर तोडगा निघेल, हे उघड सत्य प्रत्येकानं ओळखलं
     
    *   पिढ्यानुपिढ्या शाळा, शिक्षण, अभ्यास सारं परीक्षेसाठी, असं विचारचक्र झालं होतं. त्याला छेद बसला. शिक्षण-परीक्षा-उत्तम गुण-पदवी-चांगली नोकरी-भरपूर पैसा-अत्युत्कृष्ट भौतिक सुविधा अशी शिक्षणासंबंधीच्या विचारांची साखळी रुजली होती. दुर्दैवानं यात ’चांगला माणूस’ निर्माण करणं, या शिक्षणाच्या उद्देशावर काट होती. सुशिक्षितपणा म्हणजे आपमतलबीपणा, हे शिक्षणाचं ’आउटपुट’ समाजानं स्वीकारलं. या साखळीतला परीक्षा हा दुवाच निखळला. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी, शिक्षणाकडे माणूस घडवण्याचं एक साधन म्हणून पाहण्याचा, तो दृष्टिकोन समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्याचा परिवर्तन काळ आला.
     
    *   शाळा भरणं अशक्यच. शाळा बंद-शिक्षण चालू, हीच वाट चोखाळायला लागेल. गेलं पूर्ण वर्ष प्रयोगांचं. वर्षानुवर्षं प्रयोगांमध्ये घालवणं अशक्यच. अशा वेळी विहीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, शाळा गेल्या शैक्षणिक वर्षांतील अनुभवाधारित, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा मार्ग नि:संशय निवडतील. आता आणि यापुढे पालकांनी शिक्षण ही गोष्ट पूर्णपणे शाळा किंवा क्लासवर सोडून व फक्त परीक्षाकेंद्री विचार करणं सोडून पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा विचार करणं आवश्यक आहे. आपलं मूल भविष्यात कसंही पडलं, तरी मांजरासारखं चार पायांवर उभं राहिलं पाहिजे, ही प्रत्येक पालकाची मनोवृत्ती हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टी आपण क्रमवार मांडू.
     
    १)  मुलांमध्ये श्रवणकौशल्याचं विकसन करण्यासाठी, एक गोष्ट एकदाच सांगून त्यांना ती कृतीत आणायला सांगण्याची सवय लावणं. हल्ली त्याच त्याच गोष्टींचा सतत भडीमार होत असल्यानं, एकदाच ऐकून, त्याचं आकलन होऊन, त्यावर कृती करण्याची सवय कमी होत आहे; त्यामुळे यावर प्रामुख्यानं काम करणं गरजेचं आहे.
     
    २)  भाषण कौशल्याबाबतही तसंच. नेमकं, नेटकं आणि हवं तेच योग्य शब्दांत मांडण्याचा सराव रोजच्या आयुष्यात आवश्यक आहे. नेमकेपणा जास्त आणि रटाळपणा कमी यासाठी सराव हवा. अगदी वाणसामानाची यादी करतानाही वरील कौशल्यांवर काम करणं शक्य आहे.
     
    ३)  बालवयातल्या निरीक्षण कौशल्याचा विकास, उत्तम विचारवंत, वैज्ञानिक, साहित्यिक, तंत्रज्ञ तयार करू शकतो. यासाठी ज्या गोष्टी बारकाईनं पाहणं, दाखवणं शक्य असतं, त्या मुलांना पाहू द्याव्यात, दाखवाव्यात. साधं उदाहरण द्यायचं, तर भाजी चिरल्यावर फोडींचा आकार, पोळ्या लाटतानाचा दाब, डोसे घालतानाची ज्वाळेची आच, अशा छोट्या गोष्टींचंही निरीक्षण केलं, तर अनेक गोष्टी उलगडतील. मालिकांमधला संवादाचा लहेजा, पात्रांचा पेहराव हाही निरीक्षणाचा विषय होईल.
     
    ४)  शाळेत समाजरचना, उतरंड, सामाजिक वृत्ती यांचं भान आपोआप येतं. शाळा बंद असल्यानं, ते आता अशक्य. मुलांचं समाजभान वाढवण्यासाठी त्यांच्याशी त्याविषयी मुद्दाम चर्चा केली पाहिजे.
     
    ५)  चालढकल ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते; काटेकोरपणा शिकवावा लागतो. तेच लक्षात ठेवून प्रसंगी गोडीगुलाबीनं, प्रसंगी धाकदपटशानं वेळेच्या नियोजनाची आणि वेळ पाळण्याची सवय मुलांना लावावी लागेल.
     
    ६)  भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच समवयस्क जवळचे वाटतात. सध्या अशी प्रत्यक्ष भेट विरळा. आभासी भेटीत भावनांचं स्थान गौण. यासाठी घरात आपणच आपल्या भावना स्पष्ट शब्दांत मांडण्याची सवय लावली, तर ती मुलांत झिरपेल. उदाहरणार्थ चिडचिड या एकाच कृतीतून राग, कंटाळा, नैराश्य, वैताग अशा भावना दाखवण्यापेक्षा; मला राग आला आहे किंवा दु:ख होत आहे किंवा कंटाळा आला आहे, असं आपल्या भावनांचं वर्णन केलं, तर मुलं ते आचरतील.
     
    ७)  गृहव्यवस्थापन शास्त्रात कार्यसरलीकरण ही संज्ञा आहे. म्हणजे कमीत कमी वेळ आणि ऊर्जा वापरून काम करण्याचं तंत्र. यात भावी कृतीचं विश्लेषण करून त्यातील अनावश्यक कामं टाळणं, उरलेल्या कामांचा योग्य क्रम लावणं, प्रमाणित कार्यपद्धती शोधणं, कार्यासाठी लागणार्‍या वेळेची निश्रि्चत प्रमाणकं प्रस्थापित करणं, असे घटक येतात. साधे कपडे वाळत घालायचे, तरी कपड्यांची बादली, पिळे सहज हाताशी येतील अशा उंचीवर ठेवणं, जेणेकरून पुन्हा पुन्हा वाकणं टळेल. मग कपडे वाळत घालण्याचा क्रम, त्यासाठी काठी किंवा हात यांचा वापर करून वेळ वाचवणं, अशा गोष्टींचा विचार करून काम सोपं करता येईल. घरातील प्रत्येक कामात याची सवय लावली, तर ती भविष्यातील पुंजी ठरेल.
     
    ८)  सध्याच्या काळाला सामोरं जाण्यासाठी, समस्या निराकरण पद्धतीशी मुलांची ओळख करून देणं आवश्यक आहे. दैनंदिन चर्चेतून या प्रक्रियेची ओळख मुलांना करून देता येईल. आज रात्री जेवायला काय करावं बरं? ही एक समस्याच. त्यासाठीचे पर्याय विचारात घेता येतील. उदा. रात्री सर्व ताजे पदार्थ करावेत, की दुपारच्या पदार्थांना पूरक पदार्थ करावेत, की ’वन डिश मिल’ करता येईल, की एखादा नवीन पदार्थ करून पाहता येईल. मग घरातल्या साहित्यापासून कोणकोणते पदार्थ जेवणाच्या वेळेपर्यंत तयार होऊ शकतात याची एक यादी करून, कुटुंबातील सदस्याची रुची, निवड यांचा विचार करून, स्वयंपाकाचा आराखडा बनवणं आणि दिलेल्या वेळेत तो पूर्ण करणे, हा समस्या निराकरणाचा छोटासा प्रयत्नच आहे. कुटुंबाच्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, गृहसजावट अशा गोष्टी शोधून अशीच कृती करता येईल.
     
    *   हे सर्व करण्यासाठी वेळ कुठं आहे, मुलं भेटतातच कुठे, ती ऐकतात कुठं आमचं, हे नेहमीचे प्रश्न आणि समस्या असतील; पण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आपल्याला या समस्यांचं योग्य ते निराकरण करून, त्यावर कुटुंबासाठी योग्य तो पर्याय शोधणं गरजेचं आहे. हे सगळं लिहावंसं का वाटलं याबाबत पहिली आठवलेली गोष्ट म्हणजे, शाळा सुरू असताना मी नववीला गणित; तसंच स्वविकास आणि कलारसास्वाद असे विषय शिकवत असे. डिसेंबरात इतर शिक्षक करतात; तसंच स्वविकास आणि कलारसास्वादाच्या तासिका मी गणितासाठी वळवल्या. तेव्हा चाळीसपैकी आठ-दहा मुलांचा गट मला म्हणाला, गणित शाळेबाहेरही शिकायला मिळतं, ते स्वविकास शिकवा. ते ऐकून लक्षात आलं, हे लिहिण्याची गरज आहे.
     
    सौजन्य व आभार :  महाराष्ट्र टाइम्स
    २०  जून २०२१ / मेघना जोशी

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 67