गलवान खोर्‍यातील घटना

  •  गलवान खोर्‍यातील घटना

    गलवान खोर्‍यातील घटना

    • 26 Jun 2021
    • Posted By : vaishali
    • 22 Views
    • 0 Shares
     गलवान खोर्‍यातील घटना
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भौगोलिक घटनाया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात गलवान खोर्‍यातील घटनाव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा

        राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.  चालू घडामोडी  - भौगोलिक घटना

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    गलवान खोर्‍यातील घटना
     
    *   चीनकडे सर्वाधिक चांगली शस्त्रास्त्रेआहेत; पण लढाईची वेळ आली तर भारतीय सैन्य चिनी सैन्याला अस्मान दाखवू शकते. गतवर्षी गलवान खोर्‍यातील संघर्षामध्ये ही बाब भारतीय जाँबाज, शूर जवानांनी दाखवून दिली. पूर्व लडाखमधील संघर्ष चीनने घेतलेल्या सैन्यमाघारीच्या निर्णयानंतर शमला असला तरी चीनबरोबरचे युद्ध संपलेले नाही. चीनची आक्रमकता कमी करण्यासाठी, त्यांना तडाखा देण्यासाठी आर्थिक तडाखा देणे गरजेचे आहे.
     
    *   चीनने १५ जून २०२० च्या रात्री गलवानमध्ये आगळीक केली. चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत भारतीय शूर, जाँबाज जवानांनी जशास तसे उत्तर दिले. दगाबाजी करणे, गाफील ठेवून पाठीत खंजिर खुपसणे ही चीनची खासियत आहे. त्याचीच प्रचिती गलवान खोर्‍यात पुन्हा एकदा आली. चीनचे ५० हून अधिक सैनिक मारले गेले; पण आपले जाँबाज जवानही शहीद झाले, ही दुर्दैवी बाब आहे. गलवान संघर्षानंतर काही राजकीय पक्षांनी आणि काही चीनप्रेमी तज्ज्ञांनी ‘नेमके काय झाले आहे, हे देशासमोर यायला हवे असे म्हणत विरोधाचे ढोल वाजवण्यास सुरुवात केली होती; पण लढाईमध्ये ट्वेंटी-२० मॅचसारखी लगेच कॉमेंट्री देता येत नाही. लढाईमध्ये आपण काय करतो आहोत हे कधीच पूर्णपणे सांगितले जात नाही. किंबहुना, सांगायचेही नसते. कारण, आपले पुढचे आराखडे, नियोजन यावर अवलंबून असतात. त्यामुळे भारतीय सैन्याने याबाबत जी फारसे न बोलण्याची भूमिका घेतली होती, ती योग्यच होती.
     
    *   १९४७ चे युद्ध सहा महिने चालले. १९६२ चे चीनशी झालेले युद्ध, १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेले युद्ध आणि १९९९ सालचे कारगिल युद्ध या युद्धांमध्ये आपले जेवढे नुकसान झाले आणि त्यानंतर जो दहशतवाद, नक्षलवाद, काही भागांमध्ये बंडखोरी सुरू झाली. हे सर्व नुकसान जरी एकत्र केले तरी त्याहून अधिक नुकसान चीनच्या कोरोनारूपी जैविक हल्ल्याने झाले आहे. अशा वेळी सर्व भारतीयांनी एकत्र येऊन चिनी वस्तूंवर १०० टक्के बहिष्कार घालण्याची गरज आहे; पण आजही १३० कोटी भारतीय अजून एकत्र आलेले नाहीत. काही तज्ज्ञ सांगतात की, पूर्णपणे बहिष्कार घालणे शक्य नाही; पण चिनी वस्तूंचा अवाढव्य वापर केल्यामुळे त्यातून मिळणार्‍या पैशावरच चिनी अर्थव्यवस्था मजबूत झाली. चीनचे संरक्षण बजेट वाढले. चिनी सैन्याने आधुनिक शस्त्रे घेतली. चिनी सैन्याला आक्रमक बनायला जास्त वेळ मिळाला. ही आक्रमकता भारतीयांनी चिनी वस्तू घेतल्यामुळे मिळालेल्या नफ्यामधून आली. आपल्या सैन्याला जे बलिदान द्यावे लागते, त्याला जबाबदार आपणच आहोत. त्यामुळे आता वेळ आलेली आहे ती चीनवर १०० टक्के आर्थिक बहिष्कार घालण्याची आणि चीनला आर्थिक दणका देण्याची.
     
    *   चिनी सैन्याला गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या युद्धभूमीवर, वेगवेगळ्या सीमांवर आम्ही पाहिले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की, चिनी सैन्याची लढण्याची क्षमता जितकी दाखवली जाते, त्यापेक्षा खूपच कमी आहे. काही वर्षांपूर्वी नाथू ला या खिंडीपाशी भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांपासून खूपच जवळ आले होते. या भागात चीनचे सैनिक आनंदोत्सव साजरा करत होते, नाचतही होते. त्यांना विचारले असता त्या जवानांचे चिनी सैन्यातील काम संपले आहे. ते पुन्हा चीनमध्ये परत जातील आणि आवडीचे काम पत्करणार होते. असे सैनिक कसे लढू शकतात याविषयी वेगळे बोलण्याची गरज नाही.
     
    *   चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य अनेक वेळा आमने-सामने आले. परंतु; आपल्या सैनिकांनी आक्रमकता दाखवली तेव्हा ते घाबरून लगेच परत जायचे. थोडक्यात, चिनी सैनिकांची दादागिरी ही अगदी सुरुवातीलाच असायची. त्यांना थोडे जरी प्रत्युत्तर दिले तरी ते लगेचच माघारी फिरायचे. पुण्यातील औंध येथे झालेल्या युद्धाभ्यासाकरिता चीनच्या तुकडीत सर्वोत्त्कृष्ट वेचून आणलेले सैनिक होते. त्यांच्याबरोबर भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनची एक कंपनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी होती. या स्पर्धांपैकी ५० टक्क्यांहून अधिक स्पर्धा आपण जिंकल्या होत्या.
     
    *   २०१४ मध्ये मुंबईत चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी काही जणांसमवेत भेटीला आली. दुसर्‍या दिवशी ते परत जाणार होते. परंतु; चिनी जनरल फ्लाईटची वेळ होत आली तरीही चिनी जनरल झोपलेले होते. त्यामुळे संपूर्ण विमान काही तासांसाठी उशिरा सोडण्यात आले. २०१७ मध्येही सुदानमधील बंडखोरांनी तिथल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कर्मचार्‍यांवर हल्ला केला तेव्हा चिनी सैन्य लढण्याकरिता पुढे आले नाही. त्यावेळी सुदानी बंडखोरांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला आणि त्यात दोन चिनी सैनिक मारले गेले. या घटनेमुळे चीनमध्ये हाहाकार माजला. पुढे चीनने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सैन्य पाठवणे खूप कमी केले.
     
    *   गलवानमध्येही भारतीय सैन्याने चिनी सैनिकांवर प्रतिहल्ला करत त्यांना मोठ्या संख्येने जखमी केले, काहींना कंठस्नान घातले. त्यावर आपले किती सैन्य ठार झाले ते स्पष्ट सांगण्याची चीन सरकारची हिंमतही झाली नाही. कारण चिनी सैनिकांची आणि चिनी नागरिकांची एक मनोधारणा आहे की, चीन एवढा ताकदवान आहे की, कोणताही देश आणि कोणत्याही देशाचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करू शकणार नाही.
     
    *   केवळ आधुनिक शस्त्रास्त्रे, त्यांचे फोटो, व्हिडीओ दाखवून प्रतिस्पर्धी देशाला घाबरवायचे, त्यांच्यावर मानसिक आघात करायचा ही चीनची नीती राहिली आहे. १९७८ नंतर चीन व्हिएतनामशी युद्ध हरल्यानंतर आपल्या आर्थिक ताकदीचा आणि आपल्या मोठ्या सैन्याच्या फोटोंचा आणि व्हिडीओचा वापर करून सर्व जगाला घाबरविण्याचा प्रयत्न चीनने अत्यंत खुबीने आणि जोरकसपणाने केला. चिनी सैन्याने सध्या कोणतीही लढाई न लढल्याने शांतता काळात ज्याप्रमाणे सैन्याची अधोगती होते, तसे झाले आहे. त्यांची शिस्त खराब आहे. सैनिकांची जमिनीवर लढण्याची क्षमता अतिशय कमी आहे. जेव्हा कठीण परिस्थिती येते, त्या त्या वेळेला ते लगेच माघार घेतात. 
     
    *   सारांश, चीनकडे सर्वाधिक चांगली शस्त्रास्त्रेे आहेत, रस्ते सीमेपर्यंत येऊन पोहोचले आहेत, त्यांच्याकडे प्रचंड मोठी वाहने आहेत. परंतु; हे सर्व यंत्रांवर केंद्रित आहे; पण ज्यांना ती शस्त्रे चालवायची आहेत ते कमजोर आहेत, अनुत्सुक आहेत. लढाईची वेळ आली तर भारतीय सैन्य त्यांना निश्‍चितपणे अस्मान दाखवू शकते. त्यामुळे  स्वतःहून लष्करी हल्ला करण्याची चिनी सैन्याची क्षमता संशयास्पद आहे. चीनने जरी चुकून हल्ला करण्याचा निर्णय घेतला तरी त्यांची धुलाई होईल.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    २१ जून २०२१ / ब्रिगेडियर हेमंत महाजन

Share this story

Total Shares : 0 Total Views : 22