‘लोक जनशक्ती’ पक्षामध्ये फूट

  • ‘लोक जनशक्ती’ पक्षामध्ये फूट

    ‘लोक जनशक्ती’ पक्षामध्ये फूट

    • 26 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 75 Views
    • 0 Shares
     ‘लोक जनशक्ती’ पक्षामध्ये फूट
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतीय राजकारणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात लोक जनशक्ती पक्षामध्ये फूट’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    ७.  पक्ष आणि हितसंबंधी गट :
        * भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप
        * प्रादेशिक पक्ष - विचारप्रणाली, संघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    ‘लोक जनशक्ती’ पक्षामध्ये फूट
     
    *   दिवंगत रामविलास पासवान यांनी २००० मध्ये स्थापन केलेल्या ‘लोक जनशक्ती’ या प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडली आहे.
     
    *   लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून रामविलास पासवान यांनी दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. आत्ताच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षांमुळे हीच संधी त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे चालून आली आहे. भाजपवर अवलंबून न राहता मेहनतीने पक्षाची फेरबांधणी करण्यासाठी त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा कस लागेल.
     
    *   बिहारची विधानसभा निवडणूक होऊन नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील या राज्यातील नाटय् संपलेले नाही. गंगा, कोशी या नद्यांमुळे इथली शेतजमीन सुपीक, तसे इथले राजकारणही. धर्माचे, जातींचे, उपजातींचे, राष्ट्रीय पक्षांचे, प्रादेशिक पक्षांचे इतके गुंतागुंतीचे राजकारण अन्य कुठल्या राज्यात पाहायला मिळणार नाही.
     
    *   दिवंगत रामविलास पासवान यांनी २००० मध्ये स्थापन केलेल्या ‘लोक जनशक्ती’ या प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडली आहे. रामविलास यांचा मुलगा चिराग यांच्या गटाला खरा पक्ष मानून मान्यता द्यायची की चिरागचे काका पशुपती पारस यांच्या गटाला, हे आता केंद्रीय निवडणूक आयोगाला ठरवावे लागेल. कारण दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांच्या गटाला बेकायदा ठरवलेले आहे. पशुपती यांनी त्यांच्या गटाची बैठक घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आणि चिराग यांची पक्षाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली, पक्षांतर्गत वेगवेगळ्या समित्या बरखास्त केल्या. हाच कित्ता आता चिराग पासवान गिरवतील. ‘लोक जनशक्ती’चे लोकसभेत सहा खासदार आहेत, त्यांपैकी पाच पशुपती यांच्या गटात सहभागी झाले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशुपती यांना त्यांच्या गटाचे नेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे संसदेत चिराग पासवान एकटे पडले आहेत. चिराग यांनी बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडलेली आहे. त्याआधी पक्षात फूट टाळण्यासाठी, पक्षावर आपला ताबा कायम ठेवण्यासाठी चिराग यांनी कसोशीने प्रयत्न केले. पण त्याची पशुपती यांनी दखल घेतली नाही. दिल्लीत रामविलास पासवान ‘१२, जनपथ’वर राहायचे, आत्ताही चिराग यांचे दिल्लीतील राजकारण याच सरकारी बंगल्यातून होते. पक्षाच्या बैठकाही इथेच होतात. रामविलास पासवान यांचे दोन दशकांहून अधिक काळ वास्तव्य राहिलेल्या या बंगल्यातील बैठकीतच त्यांनी ‘लोक जनशक्ती’चा कारभार अधिकृतपणे चिराग यांच्या ताब्यात दिला होता. पण काही महिन्यांत दिवस बदलले, चिराग यांना पक्ष वाचवण्यासाठी ‘१२, जनपथ’पासून नजीक असलेल्या पशुपती यांच्या अधिकृत निवासस्थानी धाव घ्यावी लागली. तिथे तासन्तास ताटकळत बसावे लागले. तरीही पदरी काहीही न पडता परतावे लागले. चिराग यांनी आपल्या काकांना केलेले भावनिक आवाहनही उपयोगी पडले नाही. चिराग पासवान यांना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी एकाकी लढा द्यावा लागत आहे.
     
    *   केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची दिल्लीत जोरदार चर्चा सुरू असताना, “मी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेईन, तेव्हा संसदीय पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देईन,” असे जाहीर व सूचक विधान हाजीपूरचे खासदार पशुपती पारस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दोन बैठका घेतल्या आणि १२-१५ मंत्र्यांच्या प्रगतिपुस्तकाचा आढावा घेतला असे म्हणतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भाजपच्या काही प्रादेशिक नेत्यांची-खासदारांची बैठक घेतल्याची चर्चा होती. त्यावरून मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला आणि कदाचित अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मानली जाते. मोदींच्या संभाव्य नव्या चमूमध्ये चिराग यांचे काका पशुपती यांचा समावेश केला जाणार असेल, तर ‘लोक जनशक्ती’मधील कौटुंबिक अधिकारवादाचे नाटय् कोणत्या राष्ट्रीय पक्षाच्या आशीर्वादाने घडले असू शकेल, याचा अंदाज येऊ शकतो. पासवान काका-पुतण्यात फूट पाडल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे वैफल्य थोडे कमी होऊ शकेल. नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले असले तरी, बिहारमधील एकेकाळी असणारी जनता दल (संयुक्त) पक्षाची ताकद कमी झालेली आहे. मोदी हे राम, मी त्यांचा हनुमानअसे म्हणत गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात हल्लाबोल केला, जनता दलाविरोधात उमेदवार उभे केले. बिहारमध्ये भाजप व ‘लोक जनशक्ती’चे सरकार सत्तेवर येईल आणि नितीशुकमार यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असे चिराग यांनी जाहीरपणे म्हटले होते. ते बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले खरे, पण त्यांनी भाजपविरोधात उमेदवार उभे केले नाहीत. लोक जनशक्ती आणि जनता दल या दोन प्रादेशिक पक्षांमधील लढाईत जनता दलाच्या १०-१५ जागा हातून निसटल्या, इथे भाजपने परस्पर बाजी मारली. त्याचा राग नितीशकुमार यांच्या मनातून अजूनही गेलेला नाही, तो विधानसभेत आणि बाहेरही सातत्याने उफाळून येत असतो. भाजपवर मात करता येत नसली तरी, किमान शह देता येईल या उद्देशाने नितीशकुमार यांनी ‘लोक जनशक्ती’च्या पक्ष फुटीला मदत करून चिराग यांची कोंडी केल्याचे मानले जाते. पशुपती यांनी नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे, जनता दलाला पाठिंबा असल्याचेही ते म्हणतात. चिराग यांच्या आततायी राजकारणाला धडा शिकवल्याचे आत्मिक समाधान नितीशकुमार यांना मिळाले आहे.
     
    *   पासवान कुटुंबातील अंतर्गत स्पर्धा आणि नितीशकुमार यांची वर्चस्वाची लढाई ही भाजपच्या राजकीय रणनीतीआड येणार नाही, याची खात्री केंद्रातील सत्ताधारी पक्षाने केली आहे. बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्या तरी, मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, असे अमित शहा यांनी निक्षून सांगितले होते. राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीला विश्‍वासार्ह नेता मिळू द्यायचा नाही, हे नितीशकुमार यांना मुख्यमंत्री करण्यामागील प्रमुख कारण होते. हेच कारण आताही आणि नजीकच्या भविष्यातही सयुक्तिक ठरते. पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपचा नामुष्कीजनक पराभव केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांच्या संभाव्य आघाडी आणि राजकारणाला महत्त्व येण्याची शक्यता भाजपला नाकारता येत नाही. ही आघाडी सर्वमान्य नेता म्हणून नितीशकुमार यांचा स्वीकार करू शकते. म्हणूनच ‘एनडीए’तून बाहेर पडण्याची संधी भाजप सहजासहजी नितीशकुमार यांना मिळवू देणार नाही. त्यासाठी त्यांच्या बिहारमधील काही राजकीय मागण्या मान्य करण्याची तडजोड केली जाऊ शकते. राज्यसभेवर रामविलास पासवान यांच्या जागी ‘लोक जनशक्ती’चा सदस्य निवडला जाणार नाही, ही मागणी आधीच मान्य केली गेली. पशुपती पारस यांच्या गटाला मान्यता देऊन त्यांना मंत्रिपद दिले जाईल, मग कदाचित जनता दलही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होईल. चिराग पासवान यांना केंद्रात मंत्री बनवण्याचा निर्णय मात्र मोदी-शहांचा असल्याने त्यावर नितीशकुमार यांचे नियंत्रण असणार नाही! ‘लोक जनशक्ती’तील फुटीवर बोलताना चिराग पासवान यांनी भाजपला जबाबदार धरलेले नाही, त्यांनी मोदी-शहांविरोधातही विधान केलेले नाही. फुटीचे खापर संयुक्त जनता दलावर फोडून भाजपशी असलेले संबंध न बिघडू देण्याची खबरदारी चिराग यांनी घेतलेली आहे. अजूनही भाजपच्या आधारावर राजकारणात टिकून राहू शकतो अशी आशा चिराग पासवान बाळगून असावेत. पण तसे झाले तर चिराग यांच्या छोटय राजकीय प्रवासातील ही दुसरी मोठी चूक ठरेल. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडील रामविलास पासवान यांचे निधन झाले, त्यानंतर ‘लोक जनशक्ती’च्या वतीने सर्व निर्णय चिराग यांनी घेतले. बिहारच्या राजकारणात आपले आणि आपल्या पक्षाचे महत्त्व वाढेल या नाहक आशेवर त्यांनी स्वत:चा आणि पक्षाचा वापर करू देण्याची परवानगी भाजपला दिली. ‘लोक जनशक्ती’च्या माध्यमातून भाजपने जनता दलाचे आणि नितीशकुमार यांचे राजकीय खच्चीकरण केले; पण या लढाईत ‘लोक जनशक्ती’चे अधिक नुकसान झाले. पक्षाला ना अपेक्षित जागा जिंकता आल्या, ना सत्तेत वाटा मिळाला. रामविलास पासवान यांना राजकीय वारे कुठून कुठे वाहात आहे, याचा पक्का अंदाज असे. त्यांच्या पुत्राचा राजकीय अनुभव इतका कमी आहे की, राजकीय वार्‍याचा अंदाज सोडाच, पक्षावरील पकडही निसटू लागल्याचा अंदाज त्यांना आला नाही. चिराग यांना जसा कोणाचा तरी आशीर्वाद लाभला, तसा तो कुटुंबातील इतर सदस्यांनाही मिळू शकतो, हे समजण्याआधीच त्यांच्या पक्षात फूट पडली होती. पण चिराग यांचे वय ही त्यांच्याकडील जमेची बाजू आहे. राजकीय आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी अपयश पाहिले आहे. भाजपच्या आशेवर न राहता मेहनतीने पक्षाची फेरबांधणी केली तर बिहारच्या राजकारणात त्यांना कालांतराने महत्त्व मिळवता येऊ शकते. लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून रामविलास पासवान यांनी दुसाध समाजाचे राजकारण केले, दबावगट निर्माण केला. त्या आधारावर राष्ट्रीय राजकारणात स्वतंत्र स्थानही निर्माण केले. हा वडिलांचा कित्ता गिरवण्याची संधी चिराग यांच्याकडे आत्ताच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षांमुळे चालून आली आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत आता खर्‍या अर्थाने चिराग पासवान यांच्या राजकीय नेतृत्वाचा कस लागेल.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    २०  जून २०२१ / महेश सरलष्कर

Share this story

Total Shares : 0 Total Views : 75