भांडवली संपत्ती व कर आकारणी

  • भांडवली संपत्ती व कर आकारणी

    भांडवली संपत्ती व कर आकारणी

    • 26 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 281 Views
    • 0 Shares
     भांडवली संपत्ती व कर आकारणी
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात समग्रलक्षी अर्थशास्त्र’ या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात भांडवली संपत्ती व कर आकारणीव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : समग्रलक्षी अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १.३ सार्वजनिक वित्त :
        सार्वजनिक प्राप्तीचे/महसुलाचे स्रोत - करभार/कराघात व कराचा परिणाम

    २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था :
        महसुलाचे स्रोत - (केंद्रीय व राज्यस्तरीय), करसुधारणांचे समीक्षण - मूल्यवर्धित कर - वस्तू व सेवा कर

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    भांडवली संपत्ती व कर आकारणी
     
    *   भांडवली नफा हा कोणत्या संपत्तीवर करपात्र आहे हे समजल्यानंतर यावरील करपात्रता त्याच्या धारण काळावर अवलंबून असते.व्यक्तीची करपात्रता ही त्याच्याकडील संपत्तीच्या प्रकारानुसार आणि तिच्या धारण काळानुसार ठरते. म्हणूनच ‘संपत्ती’ म्हणजे काय आणि भांडवली नफ्यासाठी ‘संपत्ती’ची व्याख्या काय हेही करदात्यांनी समजून घेतले पाहिजे.
     
    *   नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त मिळालेल्या उत्पन्नावर करपात्रता कशी आणि किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. सोने, घर, जमीन, प्लॉट, दुकान, समभाग, वगैरे संपत्तीची विक्री केल्यास होणारा नफा किंवा तोटा प्राप्तिकर कायद्यात कशा पद्धतीने हाताळला जातो? याबद्दल करदात्यांच्या मनात संभ्रम असतो.
     
    *   संपत्तीच्या प्रकारानुसार आणि त्याच्या धारण काळानुसार व्यक्तीची करपात्रता ठरते. ज्या व्यक्ती खरेदी-विक्रीचा धंदा करतात त्यांच्यासाठी विक्रीवर होणारा नफा हा ‘धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नात’ गणला जातो. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती सोन्याचांदीचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर होणारा नफा हे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न आहे. इतर व्यक्तींसाठी याच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा आहे. भांडवली नफा हा संपत्ती कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून असतो. प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यासाठी ‘संपत्ती’ची व्याख्या दिलेली आहे. यानुसार संपत्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. संपत्तीच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. परंतु यामध्ये व्यापारातील साठा, ग्रामीण भागातील शेतजमीन, सुवर्ण रोखे (गोल्ड बाँड), वैयक्तिक वस्तू यांचा समावेश होत नाही. वैयक्तिक वस्तूंमध्ये कपडे, भांडी, गाडी, फर्निचर, इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे या वस्तूंच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जात नाही. परंतु काही वैयक्तिक वस्तू मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये सोने-चांदीपासून तयार केलेले दागिने, शिल्पे, चित्रे, पुरातत्त्व वस्तूंचा संग्रह वगैरेंचा समावेश आहे. म्हणजेच सोन्याचे दागिने जरी वैयक्तिक वस्तू असली तरी त्याच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जातो.
     
    *   भांडवली नफा हा कोणत्या संपत्तीवर करपात्र आहे हे समजल्यानंतर यावरील करपात्रता त्याच्या धारण काळावर अवलंबून असते. या धारण काळानुसार भांडवली नफा हा अल्प मुदतीचा आहे किंवा दीर्घ मुदतीचा आहे हे ठरते. साधारणत: ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती दीर्घ मुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफादेखील दीर्घ मुदतीचा असतो. ३६ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती अल्प मुदतीची होते. याला काही अपवाद आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे समभाग, रोख्यांसाठी आणि इक्विटी फंडातील युनिट्ससाठी हा कालावधी ३६ महिन्यांऐवजी १२ महिन्यांचा आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या समभागांसाठी, स्थावर मालमत्तेसाठी (जमीन, इमारत किंवा दोन्ही) हा कालावधी ३६ महिन्यांऐवजी २४ महिन्यांचा आहे.
     
    *   दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करबचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत शिवाय महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येतो आणि सवलतीच्या दरात (२० टक्के) कर भरता येतो. शेअर बाजारात नोंदणीकृत समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्स ज्यावर ‘कलम ११२ अ’नुसार सवलतीच्या दरात (१० टक्के) कर भरला जातो त्यासाठी महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येत नाही.
     
    *   अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे लागू असलेल्या कराच्या दराने कर भरावा लागतो. शेअर बाजारात नोंदणीकृत समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्सवर, ज्यावर प्रतिभूती व्यवहार कर (एसटीटी) भरला जातो त्यावर सवलतीच्या दरात (१५ टक्के) कर भरला जातो.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    २० जून २०२१ / प्रवीण देशपांडे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 281