शेअरबाजार व सुचेता दलाल

  • शेअरबाजार व सुचेता दलाल

    शेअरबाजार व सुचेता दलाल

    • 22 Jun 2021
    • Posted By : vaishali
    • 20 Views
    • 0 Shares
     शेअरबाजार व सुचेता दलाल
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात मौद्रिक व वित्तीय क्षेत्रया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात शेअरबाजार व सुचेता दलालव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : भारतीय अर्थव्यवस्था

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र :
        भांडवल बाजार - १९९१ नंतरच्या घडामोडी, सेबीची भूमिका, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    शेअरबाजार व सुचेता दलाल
     
    *   अर्थकारणात विश्‍वासार्हता ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. भविष्यात विकासाची गती काय राहील आणि व्यवसाय-उद्योग कशा प्रमाणात भरभराटीला येतील, याची पाहणी करून ‘बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स’ काढला जातो. कॉर्पोरेट क्षेत्र, कमॉडिटी क्रेट, रोखे बाजारपेठ किंवा शेअर बाजार हे सर्व विश्‍वासाच्या बळावर चालतात. या विश्‍वासास तडा गेल्यास भावांची पडझड होते.
     
    *   १२ जून २०२१ रोजी भारतातील अग्रगण्य अशा अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना २५ टक्क्यांच्या घसरणीला सामोरे जावे लागले. अल्पावधीत या समूहाचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांनी कोसळले. या समूहातील कंपन्यांच्या काही समभागांची मालकी असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची डिमॅट खाती नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठवली असल्याची बातमी पसरल्यामुळे याप्रकारे भाव कोसळले.
     
    *   जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे चौदाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या समूहातील समभागांचे भाव एका वर्षात दहापटींनी वाढले होते.
     
    *   समूहातील कंपन्यांच्या समभागांतील अग्रणी भागधारकांपैकी तीन परदेशी गुंतवणूकदार संस्थांची खाती गोठवली गेलेली नाहीत आणि यासंदर्भातील वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा अदानी समूहाने केल्यानंतर, अदानी समूहातील ६ कंपन्यांचे समभाग घसरणीतून सावरले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यामध्ये ४३,५०० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची मालकी असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची डिमॅट खाती गोठवली नसल्याचे ‘एनएसडीएल’चे उपाध्यक्ष राकेश मेहता यांनी स्पष्ट केले. परंतु, अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एटीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन गुंतवणूकदार संस्थांची डिमॅट खाती गोठवली असल्याचे ‘एनएसडीएल’च्या संकेतस्थळावर दर्शवण्यात आले होते. तथापि, ही दंडात्मक कारवाई अन्य एका प्रकरणात कायद्यानुसार जरूर ती माहिती पुरवण्यात न आल्यामुळे करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. खाती गोठवल्यानंतर या विदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील समभागांची विक्री करण्यास किंवा नव्याने खरेदी करण्यास मनाई करण्यात आली. परंतु, अदानींच्या प्रतिमेस तडा गेला तो गेलाच.
     
    *   २०२०-२१ वर्षभर अदानींच्या कंपन्यांच्या समभागांत विलक्षण तेजी आलेली होती. गौतम अदानी हे आशियातील एक नंबरचे धनिक उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून अग्रस्थान मिळवतील, असे बोलले जात होते. मात्र, अदानींच्या समभागांतील ही तेजी कंपनीच्या प्रत्यक्ष कामगिरीमुळे किती आणि बाहेरून आलेल्या पैशामुळे किती, असा प्रश्‍न निर्माण झाला. मॉरिशस, क्लेमन आयलंडस् अशा विविध देशांतून भारतात येणार्‍या गुंतवणुकीत व् पारदर्शकता नसते.
     
    *   १४ जून २०२१ रोजी अदानींच्या समभागांना शेअर बाजारात लोअर सर्किट लागले. सिक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) एका परिपत्रकानुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या निधीचे स्रोत आणि त्यांचे अंतिम लाभधारक यांचा तपशील देणे बंधनकारक आहे. परंतु, काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी (एफपीआय) हा तपशील पुरवलेला नाही. अशावेळी या एफपीआयनी ज्या गुंतवणुकी केल्या, त्यामुळे मनी लाँडरिंग कायद्याचे उल्लंघन होत आहे का, हा प्रश्‍न निर्माण झाला.
     
    *   अदानींमध्ये गुंतवणूक करणार्‍या एफपीआय या मॉरिशसमधल्या आहेत. अदानी एंटरप्रायझेसमध्ये प्रवर्तकांचे सुमारे ७५ टक्के स्वतःचे भागभांडवल आहे, तर एफपीआयचे २० टक्के. काही एफपीआयची अदानी समूहातील गुंतवणूक एकूण निधीतील ९५ ते ९९ टक्के इतकी आहे. जर एफपीआय एकाच समूहात जवळजवळ सर्वच गुंतवणूक करत असेल, तर त्याबद्दल शंका निर्माण होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास ‘सेबी’ तसेच केंद्रीय अर्थ खात्याने केला पाहिजे. शिवाय, मॉरिशससारख्या देशातून भारतात मोठ्या प्रमाणात काळा पैसा येतो आणि तो पांढरा होऊन जातो, हा अनुभव आहे. जेव्हा विदेशी निधीच एखाद्या कंपनीतील जास्तीत जास्त समभाग खरेदी करतात, तेव्हा जनतेसाठी त्या कंपनीचे फार कमी समभाग उपलब्ध होतात. अशावेळी त्या कंपनीचे भाव फार झपाट्याने वर-खाली होऊन, त्यात सामान्य गुंतवणूकदाराचे मात्र नुकसान होते.
     
    *   विमानतळ, बंदरे, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांत अदानी समूह कार्यरत आहे.  एप्रिल २०२१ मध्ये अदानीने वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टशी करार करून, भारतातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स हब उभारण्याचे ठरवले. ५,३४,००० चौरस फुटांचे उभारले जाणारे हे हब फ्लिपकार्टला लीझवर देण्यात येणार आहे. अदानीने धान्याची गोदामेही बांधण्याचा कार्यक्रम केव्हापासून हाती घेतला आहे. अदानी हे केंद्र सरकारच्या अत्यंत जवळचे असे उद्योगपती मानले जातात. २०१८ साली  केंद्र सरकारने अदानी समूहास देशभर नैसर्गिक गॅसचे जाळे विणण्याची व फ्युएल स्टेशन्स उभारण्याची १२६ कंत्राटे दिली. 
     
    *   पीएनबी हाऊसिंग फायनान्समधील भागभांडवल कार्लाईलच्या नेतृत्वाखालील प्रायव्हेट इक्विटी कन्सॉर्शियमकडे सुपूर्द करण्यात आले. पीएनबी या सरकारी बँकेच्या संस्थेचे नियंत्रण याप्रकारे ज्याच्याकडे सोपवण्यात आले, त्या व्यवहाराबद्दल संशय व्यक्त केला गेला. याचे कारण २०१७ मध्ये पीएनबीचा जो आयपीओ आला होता, त्यापेक्षा ७५ टक्के कमी भावात हे समभाग विकण्यात आले. भांडवल उभारायचे होते, तर हक्क विक्री किंवा राईट इश्यू काढणे अधिक योग्य ठरले असते. परंतु, ते घडले नाही. त्यामुळे पीएनबीतील मायनॉरिटी स्टेकहोल्डर्स हे चिंतेत आहेत.
     
    *   पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न झाले. याच प्रकरणातील भारतात वाँटेड असलेल्या नीरव मोदीचे प्रत्यार्पणदेखील लांबले. नीरव व मेहुल यांनी मिळून १४ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. भारतातील विविध १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवणारा विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये  राहून ‘मी कोणाचीही कोणतीही फसवणूक केलेली नाही, असे म्हणत आहे.
     
    *   २०१२ साली एनएसईएल या स्पॉट एक्स्चेंजमध्ये ५,६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यानंतर यामधील आरोपी जिग्नेश शहा याला त्याने सुरू केलेल्या मल्टिकमॉडिटी एक्स्चेंज किंवा एमसीएक्समधून बाहेर पडावे लागले. भारतातील अनेक वृक्षलागवड कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन पोबारा केला. अन्य क्षेत्रांतील शेकडो कंपन्यांनी समभागांद्वारे पैसा जमा करून पळ काढला. सातत्याने अशाप्रकारच्या फसवणुकी होत गेल्या आणि भांडवली बाजारात विदेशातील संशयास्पद व काळा पैसा येऊन, कृत्रिम तेजी निर्माण झाल्यास ते धोकादायक असते.
     
    *   कोरोना महामारी व बाजारातील नरमाई, यामुळे विकास दर उणे अवस्थेत गेला असताना, शेअर बाजार जेव्हा शिखरावर पोहोचतो, तेव्हा प्रश्‍न निर्माण होतात. शेअर बाजार जसा वर जातो, तसा खालीही येतो. त्यात चटके बसतात ते श्रीमंतांना नव्हे, तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना. बँकांमध्ये ठेवी ठेवून महागाईस तोंड देता येत नाही. त्यामुळे शेअर बाजाराकडे अधिकाधिक लोकांनी वळले पहिजे. परंतु, शेअर बाजार कोणत्याही परिस्थितीत मनी लाँडरिंगचे केंद्र बनता कामा नये.

    सुचेता दलाल
     
      १२ जून रोजी सकाळी प्रसिद्ध बिझनेस पत्रकार सुचेता दलाल यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी कुठल्याही कंपनीचे नाव घेतलेले नव्हते; पण एका अत्यंत गंभीर घोटाळ्याचा मात्र इशारा दिला होता. जगद्विख्यात उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ट्विटने जसे बिटकॉईनच्या भावात चढ-उतार होतात, तसे सुचेता यांच्या ट्विटने अदानींच्या समभागांचे भाव हलले. एक ऑपरेटर फॉरेन एंटिटीजमार्फत एका समूहाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढवत असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. पूर्वी जे घडत होते, तेच आजही घडत आहे, असे सुचेता यांनी म्हटले होते. १९९२ चा हर्षद मेहता गैरव्यवहार सुचेता यांनी उघडकीस आणला होता. केतन पारेख, एनरॉनसारख्या अनेक भानगडी त्यांनी बाहेर काढल्या. सुचेता यांचे ‘द स्कॅम’ हे पुस्तकही गाजले आणि त्यावर आधारित एक वेबसीरिजही तयार झाली होती. १९९८ सालापर्यंत सुचेता ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आर्थिक संपादक होत्या आणि त्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सल्लागार संपादक म्हणून त्या काम करत होत्या. २००६ साली त्यांनी आपले पती देवाशीष बसू यांच्यासमवेत ‘मनीलाईफ’ हे मासिक सुरू केले. मग मनीलाईफ फाऊंडेशन स्थापन करून, गुंतवणूक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संरक्षणाचे काम सुरू केले.
     
    *   सुचेता यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाली असून, त्या अत्यंत निर्भीड आणि प्रामाणिक अशा पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या ट्विटचा ताबडतोब परिणाम झाला आणि देशातील प्रमुख आर्थिक दैनिकांनी अदानींसंबंधींच्या घडामोडींचा पाठपुरावा सुरू केला.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १९ जून २०२१ / हेमंत देसाई

Share this story

Total Shares : 0 Total Views : 20