लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन

  •  लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन

    लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 1243 Views
    • 2 Shares
     लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात लॉर्ड कर्झनयांच्याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास

        राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) -
        कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन
     
    *   १८९८ ते १९०५ दरम्यान लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन (११ जानेवारी १८५९-२० मार्च १९२५) हा भारताचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय होता. लॉर्ड एल्गिन नंतर तो भारताचा व्हाइसरॉय होता. तो त्याआधी इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चारवेळा येऊन गेला होता. त्याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी (५ जुलै १९०५) केली. या फाळणीच्या विरोधात झालेल्या जनतेच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द (१९११) करण्यात आली.
     
    *   त्याने त्याच्या कारकिर्दीत बर्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांमध्ये पोलिस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा वगैरे होत्या. १८९९ चा कलकत्ता महापालिका कायदा, १९०४ सालचा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हे त्याच्या कारकिर्दीत झाले. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल उभारला. तसेच कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.
     
    *   कर्झनच्या शेती सुधारणा : १९०० मध्ये पंजाबमध्ये जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा त्याने अमलात आणला. त्यान्वये शेतकर्‍यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली गेली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकर्‍यांची मुक्तता होण्यासाठी त्याने १९०४ साली सहकारी पतपेढी कायदा केला.
     
    *   केडलस्टन हॉल(डर्बिशर) येथे एका उमराव घराण्यात त्याचा जन्म झाला. लहानपणी त्याच्यावर त्याची शिक्षिका व शिक्षक यांच्या शिस्तबद्ध वर्तणुकीचे फार मोठे संस्कार झाले. त्यामुळे भावी आयुष्यात तो एक शिस्तप्रिय प्रशासक म्हणून प्रसिद्ध पावला. ईटन स्कूल व बेल्यल(ऑक्सफर्ड विद्यापीठ) महाविद्यालयांत त्याचे शिक्षण झाले. पुढे त्यास काही दिवस ऑल सोल्स कॉलेजमध्ये अधिछात्रवृत्ती मिळाली. विद्यार्थीदशेत तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता.
     
    *   १८८५ मध्ये लॉर्ड सॉल्झबरीचा तो दुय्यम चिटणीस झाला.
     
    *   १८८६ मध्ये लँकाशरच्या साउथपोर्ट विभागातर्फे तो पार्लमेंटवर निवडून आला.
     
    *   १८९१-९२ मध्ये त्याची भारताचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली.
     
    *   १८९५ मध्ये परराष्ट्रीय खात्यात तो काम करू लागला. दरम्यानच्या काळात अमेरिका, मध्य आशिया, तुर्कस्तान, इराण, चीन, रशिया, अफगाणिस्तान, सयाम  इंडोचायना इ. प्रदेशांचे दौरे काढून त्याने आपले अनुभव ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले आणि त्यांत त्या त्या देशातील सामाजिक व राजकीय प्रश्नांचा ऊहापोह केला.
     
    *   १८९५ मध्ये मेरी लायटर ह्या अमेरिकेच्या एका धनाढ्य युवतीशी त्याचे  लग्न झाले, तिच्यापासून त्यास एक मुलगी झाली व तीच पुढे त्याची वारस ठरली. या विवाहामुळे त्यास जगातील अनेक देशांना भेटी देण्याची संधी लाभली. प्रवासातील त्याचे अविस्मरणीय अनुभव ग्रंथरूपाने साकारले आहेत. रशिया इन सेंट्रल एशिया(१८८९), पर्शिया अँड द पर्शियन क्वश्चन (१८९२), प्रॉब्लेम्स ऑफ द फार ईस्ट(१८९४), द पामीर्स अँड द सोर्सऑफ द ऑक्सस(१८९५) इ. त्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शेवटच्या पुस्तकातील संशोधनामुळे त्यास जागतिक कीर्तीचे भूगोलाचे बक्षीस मिळाले. त्याची विद्वत्ता व कलासक्ती उल्लेखनीय आहे.
     
    *   १८९९ च्या जानेवारीत कर्झन भारतात व्हाइसरॉय म्हणून आला, त्यावेळी हिंदुस्थानात अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले होते. कणखर परराष्ट्रीय धोरणाची आवश्यकता होती. त्या दृष्टीने कर्झनने अनेक सुधारणा केल्या.
     
    *   महसूल, शिक्षण, पुरातत्त्व विभाग, शेती व वायव्य सरहद्दीचे धोरण या क्षेत्रांतील त्याच्या सुधारणा वाखाणण्यासारख्या आहेत. वायव्य सरहद्द प्रांतावर संरक्षणासाठी लाखो रुपये खर्च होत असत कारण त्या प्रदेशात वारंवार बंडे उद्भवत. हा प्रश्न कायमचा मिटविण्याच्या दृष्टीने त्याने वायव्य सरहद्द प्रदेशातील स्वतंत्र टोळ्यांच्या प्रश्नात मुद्दाम लक्ष घातले आणि वायव्य सरहद्द प्रदेशाचा एक निराळा प्रांत तयार केला व तेथील लोकांशी मनमिळाऊ धोरण ठेवून त्यांच्यावर सदर प्रांताच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली.
     
    *   १९०३ मध्ये त्यांने इराणच्या आखातास भेट दिली. रशियाच्या धोरणाबद्दल तो साशंक असल्यामुळे त्याने इराणबरोबरच्या ब्रिटिशांच्या व्यापारास उत्तेजन दिले.
     
    *   १९०३ च्या तिबेटमिशनद्वारा रशिया भारतात चंचूप्रवेश करील, अशी त्यास भीती वाटत होती. म्हणून त्याने इंग्रज वकिलांच्या संरक्षणासाठी सैन्याची योजना केली. तिबेटवर चीनची हुकमत असल्यामुळे तिबेट-मिशनला चीनचा आधार होता. म्हणून त्याने ल्हासापर्यंत प्रवेश केला आणि सप्टेंबर १९०४ मध्ये तह घडवून आणला.
     
    *   आपल्या सुधारणावादी धोरणास अनुसरून त्याने शिक्षण, पाटबंधारे, पोलीस व राज्ययंत्रणेच्या निरनिराळ्या शाखा यांच्या चौकशीसाठी विविध समित्या नेमल्या आणि व्हाइसरॉय म्हणून दुसर्‍यांदा नेमणूक झाल्यावर वरील समित्यांच्या शिफारशींप्रमाणे त्याने कायदे केले.
     
    *   १९०४ साली सहकारी पतपेढ्यांचा कायदा त्याने संमत करून घेतला.
     
    *   त्याने पुरातत्त्वखात्याची नव्याने कार्यक्षम रचना केली आणि पुराण स्मारक संरक्षण व भूमिगत निधी यांसंबंधी कायदे करून जुन्या संस्मरणीय वस्तू व वास्तू यांचा र्‍हास व नाश थांबविण्याचा प्रयत्न केला.
     
    *   शैक्षणिक बाबतीत त्याचे धोरण प्रतिगामी स्वरूपाचे होते. त्याने विद्यापीठीय, माध्यमिक व तांत्रिक शिक्षणास उत्तेजन देऊन, प्राथमिक शिक्षणाचा जोराने पुरस्कार व प्रसार केला. डायरेक्टर जनरल ऑफ एज्युकेशन हे उच्च शैक्षणिक पद त्याने शिक्षणाच्या सुधारणांसाठी निर्माण केले, तरी त्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे असंतोष निर्माण झाला. त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठांचा कायदा संमत करण्यात आला.
     
    *   ब्रिटिश व एतद्देशीय सत्ताधारी यांच्यामधील संबंध आणि संस्थानांच्या राज्यव्यवस्थेचा दर्जा सुधारावा, म्हणून त्याने ‘ इंपीरिअल कॅडेट कोअर’ ची स्थापना केली. तो साम्राज्यवादी असल्याने येथील संस्थानिकांशी सबुरीचे धोरण अवलंबून ब्रिटिशांचे साम्राज्य कसे दृढमूल होईल,ह्याकडे त्याने लक्ष दिले व हैदराबादच्या निजामाचा प्रश्न प्रयत्न सोडविण्याचा केला.
     
    *   मिठावरील कर कमी केला व किरकोळ प्राप्तिकर भरणार्यांना सूट दिली.
     
    *   अवर्षण,सरहद्दीवरील युद्ध व रुपयाची कृत्रिम किंमत वाढल्यामुळे व्यापाराला आलेली मंदी ह्यांमुळे दुष्काळ पडला, म्हणून पाटबंधारे बांधून त्याने शेतीस उत्तेजन दिले व इन्स्पेक्टर जनरल ऑफ इरिगेशन हे पद निर्माण करून शेतीच्या बाबतीत संशोधनास आवश्यक तो पैसा पुरविला.
     
    *   प्लेग व हिवताप ह्यांसारख्या रोगराईंना तोंड देण्यासाठी लाखो रुपये खर्चून औषधोपचार चालू केले व अशा साथींना तोंड देण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजले.
     
    *   त्याने व्यापाराचे स्वतंत्र खाते काढले व रेल्वेची वाढ करावयाचे ठरविले.
     
    *   कलकत्ता शहराचे सौंदर्य वाढविण्यात कर्झनचा मोठा वाटा आहे. सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त दिल्लीस भरलेल्या १९०३ च्या दरबाराचा तो अध्यक्ष होता. त्या प्रसंगी पूर्वेकडील देशांत पूर्वी कधीही पहावयास मिळाला नव्हता,असा भव्य दरबार भरवून त्याने राजेशाही थाटात सर्व सोहळा साजरा केला.
     
    *   मुदत संपताच त्यास पुन्हा गव्हर्नर जनरल (१९०४) करण्यात आले. तथापि ह्यावेळी हिंदुस्थानात राष्ट्रीय चळवळीस आरंभ झाल्यामुळे त्याच्या राजेशाही वागणुकीवर व साम्राज्यवादी धोरणावर टीका होऊ लागली.
     
    *   १९०५ साली त्याने बंगालची फाळणी केली, त्यामुळे बंगाली लोकांत विरोधाची लाट उसळली.
     
    *   १९०५ च्या सुमारास कर्झन व सेनापती लॉर्ड किचेनर यांत गव्हर्नर जनरल व कमांडर इन चीफ यांच्या अधिकारांसंबंधी मतभेद निर्माण झाले. त्या प्रकरणात त्याच्या मताला दुजोरा मिळाला नाही. उलट भारतमंत्र्याने किचेनरला पाठिंबा दिला. तेव्हा कर्झन राजीनामा देऊन इंग्लंडला परत गेला.  त्याने केलेल्या सुधारणांचे महत्त्व लोकांना बंगालच्या फाळणीच्या वादळानंतर १९११ मध्ये पटू लागले.
     
    *   १९०५ साली त्यास सिंक पोर्ट्सचा लॉर्ड वॉर्डन नेमण्यात आले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यास सन्मानार्थ पदवी दिली.
     
    *   १९०८ साली तो त्या विद्यापीठाचा चॅन्सलर झाला व आयर्लंडचा प्रतिनिधी पीअर म्हणून त्यास निवडण्यात आले.
     
    *   १९०९ ते १९१० च्या दरम्यान मजूरपक्षाविरुद्ध हाउस ऑफ लॉर्ड्सला पाठिंबा देण्याच्या बाबतीत त्याने पुढाकार घेतला. तो प्रथमपासून हुजूरपक्षाचा होता.
     
    *   १९२५ साली वयाच्या सहासष्टाव्या वर्षी तो लंडन येथे मरण पावला.
     
    *   तो साम्राज्यवादाचा मोठा पुरस्कर्ता होता,त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या पदावरून मुक्त झाल्यानंतर त्यास अनेक उच्चपदांच्या जागा मिळाल्या, पण इंग्लंडचा पंतप्रधान होण्याची त्याची महत्त्वाकांशा पूर्ण झाली नाही. 
     
    *   ”हिंदुस्थानातील लोक राज्यकारभार करण्यास संपूर्णतया नालायक असून इंग्रजांनी हिंदुस्थानचे राज्य चालवावे, हा ईश्वरी संकेत आहे व त्यामुळे हिंदी लोकांना राजकीय सवलती देणे,म्हणजे ईश्वरी संकेताचा अवमान करणे होय ”,असे त्याचे प्रामाणिक मत होते. जेव्हा भारतात व इतर प्रदेशात ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येईल,तेव्हा ब्रिटनची गणना तिसर्‍या दर्जाच्या राष्ट्रात होईल,”असे भाकित त्याने वर्तविले होते. त्याच्या साम्राज्यवादी धोरणामुळे  भारतात राष्ट्रीय जागृती झपाट्याने झाली.
     
    लॉर्ड कर्झन व पुरातत्त्व खाते
     
    *   लॉर्ड जॉर्ज नथानिएल कर्झन हे एक विशेष व्यक्तित्व होते. ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक अधिकारी प्रांतिक गव्हर्नर आणि व्हाईसराय गव्हर्नर जनरल झाले. सगळेच साम्राज्यवादी विचाराचे होते. साम्राज्याचे कैवारी होते. त्यांची जबाबदारीच साम्राज्याच्या वाढीची, बळकटीची आणि रक्षणाची होती. कर्झन अत्यंत स्वतंत्र बुद्धीचा आणि अध्ययनशील बाण्याचा होता.
     
    *   “भारताची संस्कृती प्राचीन आहे. ती अनेक बाबतीत समृद्ध, पुढारलेली आणि निराळी आहे. या समाजाचा इतिहास, प्राचीन वारसास्थळे शोधणे, जपणे, जतन करणे हे ब्रिटिश साम्राज्याचे स्वाभाविक आणि महत्त्वाचे उत्तरदायित्व आहेअसे लॉर्ड कर्झनचे ठाम मत होते.
     
    *   शिक्षणविषयक धोरण आणि बंगालची फाळणी या दोन समस्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीतले जनमत कर्झनच्या टोकाच्या विरोधात गेले. या धोरणांबद्दलच्या वादंगामुळे त्याची प्रतिमा सदाची झाकोळलेली राहिली. तरी त्याची सहा वर्षाची कारकीर्द इतिहासकारांचा अध्ययनाचा आणि इतिहास- पुस्तकांचा विषय बनला.
     
    *   सांसदीय राजकारणाचा अनुभव असलेला कर्झन ब्रिटनचा संसद सदस्य होता. भारतातले ब्रिटिश साम्राज्य कसे असावे याबद्दलच्या त्याच्या विशिष्ट धारणा होत्या. त्याच्या हाताखालील प्रशासन त्या धारणांशी ‘सहजसंगत’ नव्हते. त्याचा अनुभव आणि ग्रह देखील तसाच होता. ढिसाळ कारभाराला निर्णय घेणारे धुरीण मंडळ आणि सल्लागारांचे तोकडे ज्ञान व अनुभव कारणीभूत आहेत असेही त्याचे ठाम मत होते.  तत्कालीन ब्रिटिश प्रशासन चिखल राज्यात डुंबणार्‍या म्हशीसारखे ढिम्म असल्याचे लॉर्ड कर्झनचे (१९००-१९०५) मत पुरातत्त्व विभागाबद्दलही होते. ते सुधारण्याची तळमळ आणि महत्त्वाकांक्षा त्याच्यात तेवत असायची. सुधारण्याचा प्रयत्न करणे, टीका करणे, धोरण सुधारण्याचे प्रस्ताव लिहित राहणे हा त्याचा खाक्या होता.
     
    *   लॉर्ड कर्झन हा दुष्काळ पडला, प्लेगची साथ आली तर त्या भागात स्वत: प्रत्यक्ष फिरणारा देखरेख करणारा  व्हाईसरॉय होता. दुष्काळ, महसूलसारा, पाटबंधारे ते लष्कर व परराष्ट्रधोरण अशा सगळ्या बाबतीत तो त्याच्या अध्ययनशील पठडीने मत बनवीत असे आणि धोरण सुचवीत असे. त्याच्या या स्वभावाचा लाभ झालेले एक क्षेत्र म्हणजे भारतातील प्राचीन पुरातत्त्वीय संशोधन.
     
    *   जेम्स बर्गेसनंतरच्या काळात अ‍ॅलेक्झांडर कनिंगहॅमच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सर्वेक्षणाला मरगळ आली होती. साम्राज्य भारतभर पसरले होते. त्या- त्या प्रसंगी सोयीचे वाटेल तसे सर्वेक्षणाचे विभाग ठरविले गेले होते. ते फार विचारपूर्वक आखले नव्हते. सर्वेक्षणाची गती आणि गुणवत्ता खालावली होती; प्रांतिक आणि स्थानिक सरकारांच्या उदासीन ढकलपट्टीने आणि तुटपुंज्या आर्थिक तरतुदीने पांगुळलेली होती. वारसास्थळांची देखभाल आणि संरक्षण नीट होत नव्हते. ही अवस्था फक्त ब्रिटिश प्रांतिक सरकारामध्ये होती असे नव्हे. संस्थानांमधील दुरवस्थासुद्धा तशीच आढळत होती.
     
    *   लॉर्ड कर्झनने भारतातील वारसास्थळांची देखभाल आणि संरक्षण यासाठी ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ (भारत मंत्री) दिलेल्या प्रस्तावात पुढील  मागण्या अंतर्भूत केल्या होत्या -
     
    १)  पुरातत्त्व खात्याच्या आधुनिक क्षमतेवर आणि ज्ञानाच्या साधनांवर भर देण्यासाठी ’डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजी’ हे पद पुनश्‍च निर्माण करावे. त्या जागेवर पुरातत्त्वीय ज्ञानदृष्टी, आधुनिक तंत्रांची पद्धतींची जाण असणारा अभियंता नेमावा.
     
    २)  उत्खनन, जतन, दुरुस्ती, प्राचीन वस्तूंचे जतन, नोंदणी, वर्णन; शिलालेख किंवा पत्रांचे जतन आणि वाचन या सगळ्या पैलूंबाबत या संचालनालयाने मार्गदर्शन आणि नियोजन करावे.
     
    ३)  सर्व स्थानिक प्रांतिक सरकारांनी त्याच्या सल्ल्यानुसार कार्य करावे आणि दरसाल त्याचा अद्ययावत अहवाल भारत सरकारकडे धाडावा.
     
    ४)  नव्या संभाव्य स्थळांचे उत्खनन, त्याची काळजीपूर्वक हाताळणी, हाती आलेल्या वस्तू पुराव्यांचे जतन, ही सगळी अंगे एकत्रित हाताळली पाहिजेत.
     
    ५)  वित्तीय तरतुदीमध्ये भरघोस वाढ मागितली.
     
    *   ‘एशिआटिक सोसायटी ऑफ बेंगाल’समोर दिलेल्या भाषणात लॉर्ड कर्झनने स्पष्ट म्हटले आहे की वास्तुलेख / शिलालेख उलगडणे, वाचणे हे अन्य उत्खनन शोधांइतकेच मोलाचे आहे. आधुनिक पुरातनविद्येमध्ये एखादा पैलू दुय्यम दर्जाचा आणि दुसरे पैलू अधिक मोलाचे ही धारणा नाही. ही सर्व प्राचीन साधने ही इतिहासाची सारख्याच मोलाची अंगे आहेत.
     
    *   नोव्हेंबर १९०१ मध्ये ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ने ‘प्रायोगिक तत्त्वावर पाच वर्षांसाठी’ मंजुरी दिली. फेब्रुवारी १९०२ मध्ये ग्रीस, दक्षिण तुर्कस्तान आणि क्रेट भागातील उत्खननाने मोठा लौकिक पावलेल्या जॉन मार्शलची डायरेक्टर जनरल म्हणून नेमणूक जाहीर झाली.
     
    सौजन्य व आभार : मराठी विशवकोष,
    दैनिक लोकसत्ता - १८ जून २०२१ / प्रदीप आपटे

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 1243