डॉ. केशव बळीराम हेडगेवार

  • डॉ. केशव बळीराम हेडगेवार

    डॉ. केशव बळीराम हेडगेवार

    • 22 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 35 Views
    • 0 Shares
     डॉ. केशव बळीराम हेडगेवार
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात राष्ट्रवादाचा उदय आणि विकासया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात डॉ. केशव बळीराम हेडगेवारयांच्याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास

        राज्यसेवा (पूर्व) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास -
        सामाजिक पार्श्‍वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना

    १.९ सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी -
        हिंदू महासभेचे राजकारण

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    डॉ. केशव बळीराम हेडगेवार
     
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन (२१ जून). त्यांच्याबाबतचा लेख -
     
    *   २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे आणखी एक विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा तो स्मृतिदिन आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रांत संघाचा विचार घेऊन अनेक संस्था देशभर कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातही संघाचा विचार केंद्रस्थानी पोहोचला आहे. समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’ आणि लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ यांतील विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. या ग्रंथांचे ते बर्‍याचदा वाचन करीत. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होते. भारताच्या इतिहासाबद्दल डॉ. हेडगेवार यांचे आकलन सावरकरांइतकेच सूक्ष्म होते.
     
    *   हिंदू समाजाचे संघटन करून राष्ट्राला परमवैभवावर नेण्याचे ध्येय डॉ. हेडगेवारांनी समोर ठेवले होते. येथील हिंदू समाज इमारतीच्या आधारशीलेसारखा आहे, अशी त्यांना अनुभूती झाली होती. संघाचे काम प्रतिक्रियात्मक वा कोणाच्या विरोधासाठी त्यांनी निर्माण केले नाही. हे विधायक कार्य आहे असे ते संघाबद्दल म्हणत. जो-जो या देशाला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो त्याला ते राष्ट्रीय म्हणत. त्यामुळे त्यांनी संघाचे नाव ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे न ठेवता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे ठेवले. हिंदुराष्ट्र हे वादातीत सत्य असून, भारतात एक जरी हिंदू शिल्लक राहिला तरी हे हिंदुराष्ट्र राहील, अशी त्यांची धारणा होती. २०२५ साली संघ आपली शताब्दी साजरी करेल.
     
    *   डॉ. हेडगेवारांच्या ‘हिंदुराष्ट्र’ संकल्पनेत एक महत्त्वाचा पैलू अध्याहृत होता. तो म्हणजे- ‘विचारसृष्टीतील स्वराज्य’! ही कल्पना मूळ मांडली ती श्रेष्ठ तत्त्वचिंतक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांनी. सन १९३१ मध्ये भट्टाचार्य यांनी चंद्रनगर येथील भाषणात विचारसृष्टीतही स्वराज्य हवे या भूमिकेचे निरुपण केले. वस्तुत: त्यापूर्वीच्या आदल्याच दशकात डॉ. हेडगेवार व स्वा. सावरकर यांनी या भूमिकेला साकार केले होते. राजकीय क्षेत्रात एका व्यक्तीचे दुसर्‍या व्यक्तीवर जे वर्चस्व असते ते प्रकर्षाने जाणवते. परंतु एक संस्कृती दुसर्‍या संस्कृतीवर विचारसृष्टीच्या क्षेत्रातही वर्चस्व गाजवत असते आणि हे वर्चस्व अधिक परिणामकारक असते. मात्र ते आपल्याला जाणवत नाही. राजकीय क्षेत्रातील वर्चस्वाचा परिणाम मनुष्यमात्राच्या बहिर्जीवनावर होत असतो. परंतु विचारसृष्टीतल्या क्षेत्रातले एका संस्कृतीचे दुसर्‍या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण मनुष्याच्या आंतर्जीवनावर होत असते, म्हणून ते जाणवत नाही. ब्रिटिशांनी हिंदूंचे जे अराष्ट्रीयीकरण केले ते डॉ. हेडगेवारांनी ओळखले होते. म्हणून रा. स्व. संघाच्या माध्यमातून भारतीयांची आपल्या देश, संस्कृती व इतिहासाशी नाळ जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जातपात, भाषा, प्रांत यांवर उठून भारतीयांचा देहस्वभाव बदलून एक-राष्ट्रीयत्वाची भावना त्यांना विकसित करावयाची होती.
     
    *   १९२५ साली नागपुरात डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची सुरुवात केली. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस- ‘संघाची कार्यपद्धती म्हणजे डॉ. हेडगेवारांच्या अलौकिक प्रतिभेची देणगी असे नेहमी वर्णन करीत. डॉ. हेडगेवारांनी लोकसंघटनेचा महान मंत्र स्वयंसेवकांना दिला. आपल्या अनुपम अशा संघटन कौशल्याच्या व लोकसंग्रहाच्या आधारावर सरसंघचालकपदाच्या १५ वर्षांच्या कालावधीत देशव्यापी संघटन त्यांनी उभे केले.
     
    *   डॉ. हेडगेवारांचा मूळ स्वभाव लोकसंग्रह करण्याचा होता. त्यामुळे विविध प्रकारची माणसे त्यांनी संघकामास जोडली. स्वयंसेवकांना उद्देशून ते नेहमी म्हणत, ‘संघ केवळ स्वयंसेवकांपुरता नाही, तर संघाबाहेरील लोकांसाठीही असून आपला प्रत्येक मित्र स्वयंसेवक असला पाहिजे आणि प्रत्येक स्वयंसेवक हा मित्र झाला पाहिजे.’ डॉक्टरांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित होत असे. डॉक्टरांचे केवळ संघातच नव्हे, तर संघबाह्य वर्तुळातही अनेकांशी घनिष्ठ संबंध होते. हेडगेवार घराणे हे अतिशय कोपिष्ट व रागीट म्हणून प्रसिद्ध होते. परंतु लोकसंघटनेच्या आड येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा डॉ. हेडगेवारांनी जाणीवपूर्वक त्याग केला.
     
    *   गोळवलकर गुरुजींनी डॉक्टरांच्या अनुपम संघटन कौशल्याबद्दल म्हटले होते की, ‘असंख्य माणसे गोळा करणे व त्यांच्यामधून उत्कृष्ट कार्यकर्ता तयार करत अशा प्रचंड कार्याची निर्मिती करताना डॉक्टरांना अनेक यातनांना तोंड द्यावे लागले; पण याचे दर्शन डॉक्टरांच्या व्यवहारात कधीच दिसत नसे.’ व्यक्तिगत स्नेहाला मतभिन्नतेचे ग्रहण लागू न देण्याची अद्भुत कला डॉक्टरांकडे होती. मतभेदातही प्रेम कमी न होऊ देण्याची शिकवण डॉक्टरांनी दिली आणि मतभेदातही कटुता न येऊ देणे याकडे त्यांचे सदैव लक्ष असे. डॉक्टरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांच्यावर अनेक अपमानास्पद प्रसंग, भाषणे/लेख येऊनसुद्धा डॉक्टरांनी आपल्या मनाचा समतोलपणा कधीच ढळू दिला नाही आणि म्हणूनच भिन्न स्वभावाच्या व्यक्तींना एका विचारात व एका सूत्रात गुंफण्याची किमया ते करू शकले. प्रत्येकाशी वागण्याची डॉक्टरांची समान पद्धत होती, कारण ‘सर्व समाज माझा’ या भूमिकेतून डॉक्टर काम करीत होते.
     
    *   १९३६ मध्ये फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात ध्वजारोहणप्रसंगी तिरंगा ध्वज वर जाताना अडकला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या किसनसिंह राजपूतने चपळाई दाखवून अडकलेला ध्वज सोडविला. केवळ तो संघ स्वयंसेवक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी किसनसिंहचे तोंडदेखले कौतुक केले. डॉक्टरांना ही घटना समजली. ते शिरपूरला गेले. तेथील स्थानिक शाखेत जाऊन सार्वजनिक कार्यक्रमात किसनसिंह राजपूतचा चांदीचा पेला देऊन सत्कार केला.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    २० जून २०२१ / रवींद्र माधव साठे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 35