लोकसंख्या धोरण व महिला

  • लोकसंख्या धोरण व महिला

    लोकसंख्या धोरण व महिला

    • 14 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 13 Views
    • 0 Shares
     लोकसंख्या धोरण व महिला
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात लोकसंख्या व मनुष्यबळया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात चीनच्या लोकसंख्या धोरण व महिलांचा विरोधव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (३) :

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    १. मानव संसाधन विकास

    * लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतभूत असलेली विविध तत्त्वे आणि घटक

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चीनचे लोकसंख्या धोरण व महिलांचा विरोध
     
    *   चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पणदेशाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चिंता वाढलीय. त्यांच्या तीन मुलांच्या धोरणाला चीनमधल्या महिलांनी विरोध केलाय. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्ही घेऊ असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात युद्ध छेडलंय.
     
    *   लोकसंख्या हा धोरणात्मक निर्णयांच्या गंभीर चर्चांपासून ते गॉसिपिंगपर्यंतच्या विषयांमधला एक महत्त्वाचा विषय. त्यावर तासन्तास चर्चा करता येऊ शकते. कधी बस, तर कधी ट्रेनमधली गर्दी पाहिली की त्यामागच्या लोकसंख्येच्या कनेक्शनमुळे आपल्याला घाम फुटतो. त्याचवेळी अल्पसंख्याक आणि परराज्यातल्या लोकांवर वाढत्या लोकसंख्येचे आरोप करून त्यांना टार्गेट केलं जातं. त्यावरून राजकारणही तापतं.
     
    *   एकीकडे हे सगळं चाललेलं असतं. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या विस्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर विधायक चर्चा घडवली जाते. अशावेळी चीनच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मॉडेलची जगभर चर्चा होते. पण, त्यामुळे आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे आकडे समोर येताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चिंता वाढलीय. त्यांनी ‘थ्री चाईल्ड पॉलिसी’ जाहीर केली.
     
    *   या आधीच्या पॉलिसीमुळे तिथल्या जोडप्यांना फक्त दोन मुलांना जन्म देता येत होता. आताच्या नव्या बदलांमुळे ही संख्या तीनपर्यंत पोहोचेल. पण, या नव्या बदलांना तिथल्या महिला विरोध करताहेत. मूल हवं की नको याचा निर्णय आमचा आम्हाला घेऊ द्या, हा संदेश त्यांना जगभर पोहोचवायचाय.
     
    *   लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने कठोर पावलं म्हणून चीनने १९७९ मध्ये वन चाईल्ड पॉलिसी आणली. म्हणजे एका जोडप्याला फक्त एकाच मुलाला जन्म देता येईल. गरिबी कमी करणं आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उद्देश यामागे असल्याचं तेव्हा सरकारने म्हटलं होतं. त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचं होतं. पण, हा निर्णय फार वादग्रस्त ठरला. त्याने चीनमध्ये वादळ उठलं. एकच मूल जन्माला घालायची परवानगी असल्याने ते मूल मुलगाच असावं यासाठी प्रयत्न सुरू झाले. या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या होत होत्या. गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचं प्रमाण वाढल्यामुळे २०१५ ला चीनमध्ये त्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. मुलगा-मुलगी यांच्यातला भेदभाव आणि तिथल्या समाज, संस्कृतीचा मुलगाच हवा या अट्टाहासामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळालं. त्यानंतर २०१६ ला ‘वन चाईल्ड पॉलिसी’ ऐवजी ‘टू चाईल्ड पॉलिसी’ देशात लागू करण्यात आली. पण, २०१९ ला १००० व्यक्तींमागे नवीन जन्माला येणार्या मुलांची संख्या १०.४८ टक्क्यांनी घटली. तसेच २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चीनमध्येे जन्मलेल्या मुलांच्या संख्येत १५ टक्क्यांची घट झाली. हे का तर एक मूल पुरेसं असल्याची भावना आणि मुलांवरच्या वाढत्या खर्चामुळे मूल जन्माला घालायचं टाळलं जाणं हे कारण असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय.
     
        सरकार काय म्हणतंय ?
     
    *   ११ मे म्हणजेच मागच्या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या नव्या लोकसंख्येची आकडेवारी समोर आलीय. १९६० नंतर तिथं पहिल्यांदा लोकसंख्येच्या वाढीचा दर घटलाय. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धोरणात्मक बदल करत ३१ मे २०२१ ला तीन मुलांची नवी चाईल्ड पॉलिसी आणली.
     
    *   चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे प्रमुख असलेल्या निंग जिझे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ‘चीनची एकूण लोकसंख्या १४१ कोटी आहे. २०१० च्या जनगणनेशी तुलना केली तर तेव्हा लोकसंख्या १३४ कोटी होती. म्हणजेच यात ५.३८ टक्क्यांनी वाढ झालीय. तसंच वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर ०.५७ टक्के राहिलाय. २००० ते २०१० च्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दराशी याची तुलना केली तर यात ०.०४ इतकी घट झाल्याचं दिसतंय.’ असं जिझे यांनी म्हटलंय.
     
    *   रॉयटर या संस्थेच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी चीनमध्ये १ कोटी २० लाख बाळांचा जन्म झाला. २०१६ ला हाच आकडा १ कोटी ८० लाखांच्या जवळपास होता. देशातल्या तरुणांची लोकसंख्या कमी होणं आणि वृद्धांच्या संख्येत वाढ होण्याची भीती चीन सरकारला सतावतेय. त्यामुळे वृद्धांची संख्या वाढली तर त्यांना सांभाळणार कोण? देशाचं भवितव्य काय असेल यावरून सरकार काळजीत आहे.
     
    *   सरकारने तीन मुलं जन्माला घालायचे धोरण लागू केले असले तरी आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवर सरकार काय करणार आहे याबद्दल अद्याप काहीही माहीत नसल्याचं जाणकार म्हणताहेत. चीन सरकारने याआधी लोकसंख्या नियंत्रणासाठी जी कठोर पावलं उचलली त्यातून लोकांची मोकळीक झाली असेलही, पण लोकांच्या मूलभूत अधिकारात दखल असल्याची टीकाही सरकारवर होतेय.
     
    *   यी फूक्सियन हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन मॅडिसन युनिव्हर्सिटीत प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विषयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘थ्री चाईल्ड पॉलिसी’ म्हणजे कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्येवरचं एकप्रकारे ओझंच असल्याचं म्हटलंय. चीनच्या बाल धोरणावर त्यांनी वेळोवेळी टीका केलीय. त्यातल्या चुकाही दाखवून दिल्यात.
     
    *   लोकसंख्येच्या विस्फोटामुळे बेकारी आणि गरिबीसारख्या समस्या उभ्या राहतील. तीन-तीन मुलं जन्माला घातली तर त्यांच्या शिक्षणाचा मुद्दाही उभा राहील. आरोग्यव्यवस्थेवर ताण पडेलच, शिवाय कुटुंबावरचा आर्थिक भार वाढेल, असं फूक्सियन यांच्यासारखे अनेक तज्ज्ञ म्हणताहेत.
     
    *   विबो ही चीनमधली सोशल नेटवर्किंग साईट आहे. या विबोवर चीनची सरकारी न्यूज एजन्सी असलेल्या सिन्हूआने एक सर्व्हे केला. थ्री चाईल्ड पॉलिसीसाठी आपण तयार आहात का हा प्रश्न तिथं विचारण्यात आला होता. ३१ हजार लोक यात सहभागी झाले. यातल्या २८ हजार लोकांनी सरकारच्या नव्या धोरणाविरोधात मत मांडलंय. चिनी महिलांचा यातला सहभाग लक्षणीय होता.
     
    *   पुरुषप्रधान व्यवस्थेत महिलांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांचा नकाराचा अधिकार अमान्य केला जातो. वन चाईल्ड पॉलिसीवेळी चीनमध्ये वाढलेलं स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण याचीच साक्ष देणारं आहे. त्यातून त्यांना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळेच आताच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेत आमचे निर्णय आम्हाला घेऊद्या, हा संदेश त्यांनी जगभर पोहोचवलाय. मूल जन्माला आलं की त्याची सगळी जबाबदारी आईवर टाकली जाते. कधीकधी इच्छा नसतानाही तिला एका चौकटीत वावरावं लागतं. ज्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे अशा महिलांची यात ससेहोलपट होते. त्याला छेद देत केवळ मुलं जन्माला घालण्यापुरत्या आम्ही नाही. तर त्यापलीकडे आमचा आम्हाला अवकाश आहे. आमचं आम्हाला करिअर आहे, असं चिनी महिला ठणकावून सांगताहेत.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    १२ जून २०२१ / अक्षय शारदा शरद

Share this story

Total Shares : 0 Total Views : 13