समग्रलक्षी अर्थशास्त्र (शाश्‍वत विकास)

  • समग्रलक्षी अर्थशास्त्र (शाश्‍वत विकास)

    समग्रलक्षी अर्थशास्त्र (शाश्‍वत विकास)

    • 09 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 242 Views
    • 0 Shares
    शाश्‍वत विकास
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आर्थिक विकासया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’विकासाचे शाश्‍वतताकेंद्री धोरण’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (४) : समग्रलक्षी अर्थशास्त्र

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.२ वृध्दी आणि विकास :
        शाश्‍वत विकास - विकास आणि पर्यावरण, शाश्‍वत विकास उद्दिष्ट्ये

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    विकासाचे शाश्‍वतताकेंद्री धोरण
     
    *   पर्यावरणस्नेही शाश्‍वत विकासासाठी व्यवसाय-उद्योगांकडे दीर्घकालीन धोरणे असणे आवश्यक आहे. त्या धोरणांचे प्रर्तिंबब कामकाजातही पडायला हवे आणि त्यातून कंपन्या, त्यांचे भागधारक व अर्थव्यवस्थेसाठी मूल्यनिर्मितीदेखील व्हावी
     
    *   साधारणपणे प्रत्येक कालखंड किंवा युग त्या-त्या वेळच्या सर्वाधिक व्यापक आणि परिणामकारक घडामोडी, तंत्रज्ञान किंवा त्या वेळची आव्हाने यांवरून ओळखला जातो. त्यामुळे सध्या आपण ‘डिजिटलायझेशन’च्या युगात आहोत, असे म्हणणे सयुक्तिक राहील. भविष्यात डोकावून पाहायचे म्हटले तर पुढील एक-दोन दशके ‘शाश्‍वततेचे युग’ म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे. सध्या शाश्‍वतता हा मुख्य चर्चेचा विषय ठरत आहे, तसेच मागील काही वर्षांपासून व्यवसायातील अत्यावश्यक भाग म्हणून याचे महत्त्व वाढणे हे स्वागतार्ह आहे. आपल्यासमोर असलेल्या या जागतिक संकटाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि पुन्हा एकदा मानवी कृती व पर्यावरणावर होणारा त्यांचा परिणाम हा कधीही न सुटणारा गुंताही समोर आला आहे.
     
        शाश्‍वत कार्यप्रणालीवर जास्त भर -
     
    *   समाज आणि पर्यावरणासंदर्भात जबाबदार संस्था व कंपन्या आपल्या व्यवसाय पद्धती आणि कामकाजात शाश्‍वत पर्याय अंगीकारण्यासाठी विविध सक्रिय मार्ग धुंडाळत आहेत. सध्याच्या इमारती आणि कारखान्यांची पुनर्रचना करणे, नव्या सुविधा त्यात आणणे तसेच उत्पादन, पॅकेजिंग, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक अशा विविध व्यवसाय पद्धतींचा नव्या स्वरूपातील विचार यात केला जात आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांसाठी प्लास्टिक पॅकेजिंग पूर्णपणे बंद केले आहे. अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या कमी अंतराच्या दळणवळणासाठी विद्युतचलित वाहन (ईव्ही) वापरण्याची बांधिलकी जपत आहेत. व्यावसायिक कार्यप्रणालीत शाश्‍वत पर्यायांप्रति दाखवला जाणारा रस सध्या प्रचंड आहे आणि ही जागरूकता वाढत आहे. जवळपास प्रत्येक उद्योगक्षेत्र राष्ट्राच्या व्यापक शाश्‍वतता उद्दिष्टांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे.
     
    *   शाश्‍वततेसंदर्भात व्यवसायांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला आहे. मात्र, व्यवसायांकडे दीर्घकालीन धोरणे असणे आवश्यक आहे. अशी धोरणे ज्यामुळे कार्यपद्धती व कामकाजात शाश्‍वततेचा अवलंब केला जाईल आणि त्यातून संस्था, त्यांचे भागधारक आणि अर्थव्यवस्थेसाठी मूल्यनिर्मिती होईल. त्याच वेळी पर्यावरणावरील प्रतिकूल परिणामही कमी होईल. शाश्‍वतता कॉर्पोरेट विश्‍वात खोलवर रुजायला हवी, कामाच्या ठिकाणी प्रोटोकॉल, व्यावसायिक प्रक्रिया आणि मूल्यांमध्ये ती खोलवर झिरपायला हवी. यामुळे ऊर्जा वापर, टाकाऊ पदार्थ, उत्सर्जन आणि कार्यात्मक खर्च यांत घट होऊन व्यवसायासाठी लक्षणीय असे सकारात्मक परिणाम दिसून येतील. इतकेच नाही, यामुळे संस्थेची/कंपनीची प्रतिष्ठा वाढते, संस्थेत कर्मचारी अधिक प्रमाणात टिकून राहतात आणि उद्योगक्षेत्रात पत निर्माण होते. शाश्‍वततेचा अवलंब केल्यास उत्पादने, प्रक्रिया व धोरणांमध्ये नावीन्यता आणता येते आणि यातून पुरवठा साखळीतील कामकाज अधिक परिणामकारक आणि लवचीक बनते.
     
    *   आपल्या धोरणांमध्ये शाश्‍वततेचा अवलंब करत असताना, काही मुद्द्यांवर उद्योगांनी आणि कंपन्यांनी भर द्यायला हवा. या संदर्भातील कृती वेगाने, ठोसपणे तसेच अर्थपूर्ण पद्धतीने केल्या जातील याची खातरजमा करण्याची जबाबदारी व्यवसायातील नेतृत्वावर आहे.-
     
    १)  व्यावसायिक धोरणे आणि शाश्‍वततेचा मेळ : शाश्‍वततेचा अवलंब करताना काही आव्हाने येऊ शकतात, त्यांचा विचार व्हायला हवा. फक्त चांगला हेतू असणे पुरेसे नाही, तर त्यांना ठोस कृतींचे रूप देता येणे गरजेचे आहे. कंपन्यांनी आवश्यक तेथे त्यांच्या प्रक्रिया, कच्चा माल मिळवण्यात आणि कार्यचलनातील परिणामकारकतेत हळूहळू बदल करत सुरुवात करावी. व्यावसायिक निर्णय घेताना मूळ व्यावसायिक धोरणांशी शाश्‍वततेचा मेळ घालण्याकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे.
     
    २)  भविष्यासाठी सज्ज शाश्‍वतता धोरणे : सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश असेल अशी धोरणे निर्माण करणे संस्थांसाठी हिताचे ठरेल. सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम घडवण्यात साह्यकारी ठरणार्‍या शाश्‍वत कार्यपद्धतींच्या संदर्भात निर्णय घेण्याचाही यात समावेश आहे. या प्रयत्नांमधून ज्यांना लाभ होऊ शकतो अशा समुदायांचाही या धोरणांमध्ये समावेश असावा. शाश्‍वतता उपक्रमांना वेग देण्यासाठी एखादे पर्यावरणीय कारण किंवा संकट कारणीभूत ठरण्याची वाट न पाहता आपण सक्रियपणे यासाठी प्रयत्न करायला हवेत.
     
    ३)  नेतृत्वाची बांधिलकी : व्यवसायातील नेतृत्वाला याची जाणीव हवी की, ते बदलांचे प्रवर्तक आहेत. आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांच्यात हे बदल रुजवण्याची आणि प्रत्येकाच्याच संदर्भात शाश्‍वतता हे मुख्य धोरण बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. निव्वळ नियमन म्हणून नव्हे, तर एक व्यावसायिक उद्दिष्ट म्हणून त्यांनी शाश्‍वतता धोरणांकडे पाहायला हवे. यासाठी त्यांनी आवश्यक ते स्रोत उपलब्ध करून द्यायला हवेत तसेच शाश्‍वतता उपक्रमासंदर्भातील प्रगतीची नोंदही ठेवायला हवी. त्यांची ही बांधिलकी सार्वजनिक स्तरावर मांडलीही जायला हवी. जनतेसमोर अहवाल मांडणे हे बांधिलकी जपण्याचे एक मोठे लक्षण आहे.
     
    ४)  परिसंस्थेचा सहभाग : कोणताही व्यवसाय एकटाच काम करत नसतो. प्रत्येक व्यवसायाचे त्याचे कर्मचारी, आजूबाजूचे समुदाय आणि पृथ्वीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतात. शाश्‍वततेसंदर्भातील आव्हानांना बर्‍याचदा वैयक्तिक प्रयत्नांऐवजी एकत्रित प्रयत्नांतून अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाता येते. त्यामुळेच आपले सहकारी, समुदाय, भागधारक आणि सरकारशी सहकार्याने काम करून धोरणात्मक बदल घडवणे, स्रोतांचा विकास करणे आणि शाश्‍वतता लक्ष्यांवर लक्ष केंद्रित केले जाणे कंपन्यांसाठी आवश्यक आहे.
     
    ५)  वेळापत्रकानुसार धोरणे आखणे आणि अमलात आणणे : धोरणे आखणे आणि ती अमलात आणण्याची सुरुवात शाश्‍वततेचा व्यवसायांसाठी नेमका काय अर्थ आहे याचा शोध घेणे आणि त्याची ठोस व्याख्या मांडणे यातून होते. पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या कोणत्याही व्यावसायिक अंगाचा यात समावेश असू शकतो. जसे की, कार्बन उत्सर्जन आणि टाकाऊ पदार्थ कमी करणे. यात लघुकालीन व दीर्घकालीन लक्ष्ये आणि ती गाठण्यासाठी योग्य माध्यमे व उपाययोजनांचा समावेश असावा. हे सगळे जुळवून आणले की, त्यासंदर्भातील उत्तरदायित्व आणि जबाबदार्‍या संस्थेतील संबंधित व्यक्तींकडे द्याव्यात. आपल्या व्यावसायिक पद्धती आणि त्यांचा पर्यावरण व समाजावर होणारा परिणाम यासाठी व्यवसायांनी स्वत:ला जबाबदार धरायला हवे.
     
    ६)  पारदर्शकता आणि अखंडता असणे: संस्थेतील शाश्‍वतताकेंद्री उपक्रमांच्या प्रगतीची माहिती नियमितपणे सर्व अंतर्गत आणि बाह्य भागधारकांना दिली जायला हवी. यामुळे विश्‍वासार्हता आणि पत निर्माण होण्यास साह्य लाभते. तसे पाहायला गेले तर या छोट्या-छोट्या बाबी आहेत. मात्र, शाश्‍वतता उपक्रम कसे आखले जातात, त्यांची अंमलबजावणी कशी होते, यात त्यामुळे फार मोठे बदल घडतात. आशादायक बदलाच्या भविष्याकडे वाटचाल करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
     
    सौजन्य व आभार :  दैनिक लोकसत्ता
    ६ जून २०२१ /  महेश प्रताप सिंह

Share this story

Total Shares : 0 Total Views : 242