आंग्रिया बँक : प्रवाळ बेट

  • आंग्रिया बँक : प्रवाळ बेट

    आंग्रिया बँक : प्रवाळ बेट

    • 09 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 102 Views
    • 0 Shares
    आंग्रिया बँक : प्रवाळ बेट
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात जैविक बहुविधता व पर्यावरणया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात  आंग्रिया बँकव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    २.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) -
        परिसंस्था- जैविक आणि अजैविक घटक, पोषण/रासायनिक घटकद्रव्यांचे चक्रीकरण, जैव विविधतेमधील र्‍हास, जैव विविधतेच्या र्‍हासाची धोकेजागतिक तापमान वाढ

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    'आंग्रिया बँक' प्रवाळ बेट
     
    *   आंग्रिया बँक ही महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली एकमेव कोरल रीफ आहे. कोकणात समुद्रकिनार्‍याला काहीशी समांतर अशी आंग्रिया बँक ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि प्रवाळानं वेढलेली जागा आहे. मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून ती ओळखली जाते.
     
        ’आंग्रिया बँक’ची निर्मिती कशी झाली ?
     
    *   आंग्रिया बँक हे एक प्रकारचं प्रवाळ बेट (coral reef) असून, ते मालवणच्या किनार्‍यापासून सुमारे ११० किलोमीटरवर, तर रत्नागिरीच्या किनार्‍यापासून १०५ किलोमीटरवर पाण्यात आहे.
     
    *   हा एक खुल्या समुद्रातला पाण्याखालचा उंचवट्यासारखा पठारी भूभाग आहे. त्याचा आकार सुमारे २०११ चौरस किलोमीटर आहे.
     
    *   आंग्रिया बँकवरचा भाग आसपासच्या समुद्रापेक्षा तुलनेनं उथळ आहे आणि तिथे समुद्राची खोली कमीत कमी २४ मीटर ते सरासरी २८ मीटर एवढी आहे. आंग्रिया बँकच्या दोन्ही बाजूंना समुद्राची खोली वाढत जाते आणि काही ठिकाणी ती अगदी चारशे मीटरपर्यंत खोल आहे.
     
    *   हा प्रदेश काँटिनेंटल शेल्फ म्हणजे सागरमग्न खंडभूमीचाच भाग आहे. म्हणजेच एकेकाळी हिमयुगादरम्यान हा भाग पाण्याच्या वर होता. मग सुमारे ११,६५० वर्षांपूर्वी शेवटचं हिमयुग संपलं, तेव्हा समुद्राची पातळी वाढल्यानं हा भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर हजारो वर्षांत इथे हळूहळू प्रवाळ आणि त्याच्या साथीनं सागरी जीवन बहरत गेलं आणि हे प्रवाळ बेट आकाराला आलं.
     
    *   सध्या इथे सुमारे ६५० चौरस किलोमीटरवर प्रवाळांचा अधिवास आहे. म्हणजे आकारानं मुंबईपेक्षा थोडीशी मोठी जागा.
     
        आंग्रिया बँक का आहे महत्त्वाची ?
     
    *   आंग्रिया बँक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि जैवविविधतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे.
     
    *   मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात या परिसराचा वापर केला होता. इथल्या उथळ पाण्यात त्या काळातली लढाऊ जहाजं आणि गलबतं आरामात नांगर टाकून उभी राहू शकायची. त्याचा वापर करून आंग्रे यांनी फ्रेन्च, पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा आक्रमकांपासून मराठा साम्राज्याचं संरक्षण केलं. त्यामुळेच या भागाला कान्होजी आंग्रेंचं नाव देण्यात आलं आहे.
     
    *   आंग्रिया बँक जैववविविधतेच्या दृष्टीनं संपन्न आहे. मालवणमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची खखडऊ- ही स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था, राज्य सरकारचा कांदळवन विभाग, केरळमधली सीएमएलआरई ही अर्थविज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी संस्था अशा संस्थांच्या सागरी जीववैज्ञानिकांनी या परिसरात संशोधन केलं आहे.
     
    *   इथली जैवविविधता अनन्यसाधारण आहे. इथे शार्क, मोरे ईल, कूपर फिश अशा अनेक प्रजाती आढळून आल्या.
     
        माशांची जन्मभूमी -
     
    *   प्रवाळांचा अधिवास आणि खुल्या समुद्रातली काहीशी संरक्षित जागा असल्यानं इथे माशांचा वावर आहे. एक प्रकारे ही माशांची जन्मभूमी बनली आहे. आंग्रिया बँकच्या जैवविविधतेवरच कोकणातली मासेमारीही अवलंबून आहे.
     
    *   यांत्रिक मासेमारी करणारे ट्रॉलर्स इथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे माशांना अधिकचं संरक्षण मिळालं आहे. मासे इथे प्रजननासाठी येतात आणि त्यामुळेच आंग्रिया बँक हे आपल्याला विपुल प्रमाणात मिळणार्‍या मच्छीमागचं मोठं कारण आहे.
     
    *   महाराष्ट्रात किनारी प्रदेशात हजारो लोकांचं पोट याच मासेमारीवर अवलंबून आहे आणि एका मोठ्या वर्गाला त्यातून आहारात अत्यावश्यक असलेली प्रथिनं मिळतात. त्यामुळे आंग्रिया बँकवरची जैवविविधता नष्ट झाली, तर त्याचा परिणाम या सगळ्यांवर होईल.
     
        आंग्रिया बँकच्या संरक्षणातल्या अडचणी -
     
    *   जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातल्या इतर प्रवाळ बेटांसारखंच आंग्रिया बँकवर टांगती तलवार आहे. या प्रदेशात नौदलाचा वावर आहे. तसंच तेल आणि नैसर्गिक वायूसाठी उत्खननाचेही प्रस्ताव पुढे आले होते. या सगळ्यामुळे आंग्रिया बँकवरच्या प्रवाळांना धोका संभवतो. सध्याच्या स्थितीत या जागेला कायद्याचं संरक्षण नाही.
     
    *   अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं या जागेला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दिला होता. केंद्र सरकारकडून संमती मिळाली, तर आंग्रिया बँकला अभयारण्याचा दर्जा मिळू शकतो.
     
    *   आंग्रिया बँक ही भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रात अर्थात Exclusive Economic Zone (EEZ) मध्ये येते.
     
    *   समुद्रात १२ सागरी मैलांपर्यंतचा (२२ किलोमीटर) परिसर ही त्या देशाची सागरी सीमा मानली जाते. तर किनार्‍यापासून २०० नॉटिकल मैलांपर्यंतचा भाग हा त्या त्या देशाचं अनन्य आर्थिक क्षेत्र मानलं जातं, जिथल्या सागरी संपत्तीवर त्या त्या देशाचा अधिकार असतो आणि नैसर्गिक वायू किंवा तेलासाठी इथे उत्खनन करता येतं.
     
    *   आंग्रिया बँक ही भारतात एएन मध्ये असलेलं पहिलं सागरी अभयारण्य ठरू शकतं त्यानंतर या परिसरातील इतर जागांनाही कायदेशीर संरक्षण मिळवता येऊ शकतं.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 102