चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान

  • चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान

    चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान

    • 08 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 64 Views
    • 1 Shares
    चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात आपत्ती निवारण व तंत्रज्ञानया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञानआणि त्यावर विचारले जाऊ शकणारे प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : कृषी भूगोल

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    २.७ भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान -
        भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) आणि दूर संवेदन यंत्रणा.

    २.८ क) जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग  -
        * भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय (जीआयएस)
        * नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएस
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान
     
    *   भारतात तोक्ते आणि यास या चक्रीवादळांनी झालेली हानी ही तुलनात्मक कमी झाली. याचे पूर्ण श्रेय नियोजन व नवतंत्रज्ञानाला द्यायला हवे. संगणकीय प्रणालींच्या जोडीला उपग्रह तंत्रज्ञान, विविध छायाचित्रे, अभ्यास व इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने चक्रीवादळांच्या पूर्वसूचना मिळू शकतात.
     
    *   भारतातही दोन आठवड्यांत काही दिवसांच्याच फरकाने पूर्व व पश्‍चिम किनार्यांवर तोक्ते आणि यास या दोन चक्री वादळांनी तडाखा दिला. चक्रीवादळ म्हणजे वातावरणात चक्राकार फिरणारा; तसेच पुढे सरकणारा एक स्तंभ असतो. चक्रीवादळ अतितीव्र असते, तेव्हा त्यात मध्यभागी नेत्र असतो. येथे हवेचा दाब फारच कमी असतो. या भागात समुद्राची पातळी वर उचलली जाते. त्यामुळे जेव्हा अतितीव्र चक्रीवादळ समुद्रकिनार्यावर आदळते, तेव्हा समुद्रकिनार्यावर व आतील भागात पाण्याचा मोठा लोंढा पसरतो. वादळाच्या त्या अल्प काळात वार्याचा वेग वाढत असल्यामुळे त्या तडाख्यात घरदारे जमीनदोस्त होऊ शकतात, झाडे मुळासकट उन्मळून पडतात व या वादळाच्या जवळपास असलेला भूप्रदेश उद्ध्वस्त होतो. निसर्गाच्या अशा प्रकारच्या प्रकोपाकडे असहाय्यपणे बघत राहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यावेळी वादळग्रस्तांसमोर नसतो. या दोन्ही चक्रीवादळांनी झालेली हानी ही तुलनात्मक विचार केला तर कमी झाली. याचे पूर्ण श्रेय नियोजन व नवतंत्रज्ञानाला द्यायला हवे. २००८ साली आलेल्या नर्गिस चक्रीवादळामुळे तर तब्बल एख लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले होते. संगणकीय प्रणालींच्या जोडीला उपग्रहीय तंत्रज्ञान, विविध प्रकारची छायाचित्रे असल्याने माहितीचे विविध पैलू हाती येऊन त्यांचा अभ्यासही चटकन करता येतो व इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने हे अंदाज सर्वत्र कळूही शकतात.
     
    *   आता एक प्रश्‍न साहजिकच काहींच्या मनात येईल की, उपग्रहीय प्रतिमा ऊर्फ सॅटेलाईट इमेजेस यापूर्वीही वापरल्या जात होत्याच, मग नवतंत्रज्ञान त्यांहून वेगळे काय आहे आणि ते अधिक भरवशाचे कसे ठरते? दोराक या अभ्यासकाने शोधून जवळजवळ परिपूर्णतेकडे नेलेल्या ‘दोराक टेक्निक’चा वापर जगभर केला जातो. भूकंपाप्रमाणेच चक्रीवादळाने होणारे नुकसान त्याच्या तीव्रतेवर म्हणजेच त्यातून निर्माण होणार्या वार्याचा वेग आणि पडणार्या पावसाचे प्रमाण यावर अवलंबून असते. कमी दाबाच्या पट्ट्यात जमलेल्या ढगांची उंची, तेथील दाब व तापमान यांवरही बरेचसे परिणाम अवलंबून असतात.(खुद्द या वादळांचेही सायक्लोन, हरिकेन, टायफून असे विविध प्रकार असतात). उपग्रह प्रतिमा आणि छायाचित्रे यांचा अभ्यास करून दोराकने वादळांचे त्यांच्या दृश्य रूपावरून वर्गीकरण केले. यासाठी इन्फ्रारेड रेज्चा वापर केला. प्रत्येक वादळाच्या ‘चेहरेपट्टी’वरून त्याची तीव्रता अचूकतेने सांगता येऊ लागली. तरीदेखील असे जाणवू लागले होते की, या तंत्राने संबंधित वादळाच्या तीव्रतेचे दोन अंदाज मिळतात आणि ते परस्परांहून वेगळे असतात. म्हणजेच वादळाची तीव्रता अपेक्षित अचूकतेने समजत नाही. यानंतर हे अंदाज अचूक बनविण्यासाठी अर्थातच प्रयत्न सुरू राहिले. इथेच  तंत्रज्ञान कामाला येऊ लागले.
     
    *   आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या विलक्षण प्रक्रिया-क्षमतेची जोड देऊन, संग्रहात असलेल्या दोन लाखांपेक्षाही अधिक छायाचित्रांचा काही क्षणांतच अभ्यास करून योग्य निष्कर्ष मिळू शकतात. यासाठी कन्व्होल्यूशनल न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. वादळापूर्वी त्या भागात मोठ्या प्रमाणात ढगांचे थरावर थर जमा होतात. प्रत्येक थरातील ढगांच्या ‘पॅटर्न’चा अभ्यास करून पडू शकणार्या पावसाचे प्रमाण संगणकाद्वारे ठरवले जाते. यामध्ये इमेज रेकग्निशन तंत्राचा वापर केला जातो. यासाठी वापरलेले तंत्रज्ञानही मुद्दामच ‘ओपन सोर्स’ ठेवले आहे.
     
    *   उष्ण कटिबंधीय वादळांची तीव्रता आणखीही एका बाबीवर अवलंबून असते- समुद्राच्या पृष्ठभागावरून वातावरणात सोडली जाणारी सुप्त उष्णता. हिला ट्रॉपिकल सायक्लोन हीट पोटेन्शिअल असे नाव आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील वादळांसंदर्भात या औष्णिक शक्तीला महत्त्व आहे. सन १९९७ पासून २००७ दरम्यान घेतलेल्या २५ हजारांपेक्षाही अधिक तापमान-नोंदी आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क प्रकारच्या संगणकीय प्रणालीला पुरवल्या गेल्या. याशिवाय समुद्रपृष्ठावर २६ अंश सेल्सियस असे एकसारखे तापमान असलेल्या बिंदूंना जोडणार्या रेषा (आयसोथर्म) काढून त्यांचाही अभ्यास केला. विविध प्रकारे विश्‍लेषण आणि त्यावरून वर्तविलेल्या अंदाजांच्या अचूकतेची तुलना केल्यानंतर, पूर्वीच्या पद्धतींपेक्षा एएनएन श्रेष्ठ आणि भरवशाचे असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले. हवामानाचे अंदाज अचूकतेने मिळू लागल्याने शेतकर्यांचा तर फायदा होतोच; शिवाय अतिवृष्टी, संततधार, वादळे अशा बाबींची पूर्वसूचना वेळेत म्हणजे निदान दोन-चार दिवस आधी मिळाल्याने मालमत्तेचे नुकसान टाळता येते व मुख्य म्हणजे आपत्तीने बाधित भागातील अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवता येते.
     
     
    सौजन्य व आभार :  दैनिक पुढारी

    ४ जून २०२१ / डॉ. दीपक शिकारपूर

Share this story

Total Shares : 1 Total Views : 64